गुरुवार, ७ जुलै, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस सतरावा ७ जुलै )

 !! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस सतरावा  ७ जुलै )

            आज सकाळी साडेसहा वाजता  वेळापूरहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान झाले. लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून माऊली, माऊली असे म्हणत स्वागत करत होते. सकाळी नऊ वाजताच उघडेवाडी (ठाकूर बुवा) येथे पालखीचे आगमन झाले. याठिकाणी गोल रिंगण असते. या रिंगणाचे वैशिष्ट्य असेकी, येथे वारकरी मोठ्या प्रमाणात खेळ खेळत असतात. दिंड्या क्रमाक्रमाने सोडल्या जातात. येथे वारकरी मोठ्या प्रमाणावर धावताना दिसून आले, मीही रिंगणात धावण्याचा आनंद लुटला. महिला फुगड्या तसेच अन्य खेळ खेळताना दिसल्या. वारीचा आनंद लुटताना लोक दिसून आले.










             प्रथम प्रत्यक्ष रिंगणाची पाहणी केली जाते. इशारा मिळताच स्वार असलेला अश्व व माऊलींचा अश्व धावताना दिसले. रिंगणाच्या ठिकाणी मध्यभागी पालखीसाठी मंडप उभारला होता.रिंगण स्थळापासून साधारण चार किलोमीटर अंतरावर तोंडले-बोंडले जवळ संत तुकाराम व ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या एकाचवेळी आल्या. आज दिवसभर अतिशय आल्हाददायक वातावरण होते. दुपारी पावसाची हलकी सर आल्याने वारकरीही आनंदित झाले. तोंडले गावाजवळ नंदाचा ओढा आहे. तेथे ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंडे  पाण्यात खेळत असत. सध्या याठिकाणी पूल झालेला आहे. येथे स्प्रिंकलरच्या साह्याने वारकऱ्यांना भिजवले जात होते.



                येथील विसाव्याच्या ठिकाणी परिसरातील लोक वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करतात. दुपारी पंढरपूर तालुक्यातील नांदुरे गावच्या अरुण भिंगारे यांनी तोंडले येथे भोजनाची व्यवस्था केली होती. तोंडले येथे प्रवेशद्वारावर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा आहे. तोंडलेपासून संत तुकाराम, संत सोपानदेव व ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या एकत्र आल्याने जणू काही भक्तीचा महासागरच रस्त्यावर उतरला होता. पिराची कुरोली येथे सोपानदेव व ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्यांची भेट होते हा सोहळा खूपच रमणीय असतो. आजचा मुक्काम भंडीशेगाव येथे ज्ञानेश यलमार यांचे घरी आहे. 

       पालखी सोहळ्यात वाहनांची संख्या प्रचंड असते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस तसेच गृहरक्षक दल प्रयत्न करत असतात. कितीही प्रयत्न केले तरी मनुष्यबळ कमीच पडते. वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे पार पडावी यासाठी पुणेस्थित असणारे पण मूळचे कठापूरचे नाथाजी केंजळे यांनी स्थापन केलेले वाहतूक मुक्ती दल पोलिसांना मदत करत असते. नाथाजी यांच्याबरोबर २० लोकांची टीम आहे. ते आळंदीपासून वाहतूक सुरक्षित होण्यासाठी कार्यरत आहेत.

      अनेक स्वयंसेवी संस्था हा पालखी सोहळा व्यवस्थित पार पडावा यासाठी आपापल्या परीने सहकार्य करीत असतात. आपणही आपल्या परिसरात होणारे सार्वजनिक कार्यक्रम सुरळीतपणे पार पडावेत यासाठी जे शक्य असेल ते

सहकार्य करावे असे वाटते.

     राजेंद्र पवार 

 ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...