सोमवार, ४ जुलै, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस चौदावा ४ जुलै )

 !! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस चौदावा ४ जुलै )

              आज सकाळी साडेसहा वाजता ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान बरडहून झाले. गावातून रथ आणणे अवघड असल्याने नुसती पालखीच गावात नेली जाते. यामुळे ग्रामस्थांना, भाविकांना माऊलींच्या पादुकांचे जवळून दर्शन घेता येते. आज पहिला विसावा संत साधुबुवा महाराज मंदिर, राजुरी येथे होता. या स्थानाला साधूबुवाचा ओढा असेही म्हटले जाते. या मंदिरात टाळ, मृदंगाच्या तालावर वारकरी नुसते माऊली, माऊली म्हणत नाचत असतात. याठिकाणी मठाचीवाडी येथील दत्ता पवार यांनी आमच्या अल्पोपहाराची व्यवस्था केली होती.

                मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर सोलापूर जिल्ह्याची हद्द सुरु होते. हद्द सुरु होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे नीरा नदीपासून विशेषतः लोणंदपासून बंदोबस्त सुरु होतो. सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत सातारा पोलिसांची जबाबदारी असते. सातारा जिल्हा पोलीस दल पालखी सोलापूर जिल्हा पोलीस दलाकडे सुपूर्त करते. चार्ज हँडओव्हर करण्याची प्रक्रिया ही नजरेचे पारणे फेडणारी असते. सोलापूर जिल्ह्यात कारुंडे येथे पहिला विसावा होता. याठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने, स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. प्रत्येक विसावा स्थळाला यात्रेचे स्वरुप आलेले असते. थोडे दुर्लक्ष झाले तरी आपल्या माणसापासून आपण भरकटतो. विशेषतः महिला, लहान मुलांना पोलिसांच्या सहकार्याशिवाय आपल्या माणसापर्यंत पोहचताच येत नाही. दुपारनंतर मोरोची येथे पालखीने विसावा घेतला. सकाळी उन्हाचा तडाखा तर दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी आल्या. सकाळी उकाड्याने हैरान तर दुपारनंतर आम्हास पावसाने दिलासा दिला. पाऊस परवडला पण उन्ह नको असेच आम्हाला वाटते. उन्हात काम न करण्याच्या सवयीने तसे वाटत असावे.  काही मेंढ्या वारी करताना दिसून आल्या.एक वारकरी तर आपल्या सोबत कुत्रा घेऊन चालले होते.








              वारीत लोक संस्कृतीला चालना मिळते. बऱ्याच वेळा डोंबारी आपला खेळ दाखवताना दिसत होते.तर मरीआईचा गाडापण  आपणास दिसतो. बऱ्याचशा कला सामाजिक आश्रयाच्या अभावाने बंद पडत आहेत. वारीत लाखो लोक सहभागी होतात त्यामुळे अशा पारंपरिक कलांना उर्जितावस्था प्राप्त होत आहे असे वाटते.

             आज आमच्या निवासाची व्यवस्था ज्ञानदीप क्रेडिट सोसायटीच्या नातेपुते शाखेने केली होती तर भोजनाची व्यवस्था याच गावातील भीमराव दादा बर्वे यांनी केली होती. या मंडळींचा सेवाभाव बऱ्याच गोष्टी शिकवून जातो. आज दुपारी कारुंडे गावापासून पावसाला सुरुवात झाली. काही वेळा चांगल्या सरी आल्या. पाऊस आलाकी

सर्व वारकरी प्लॅस्टिकच्या कागदाची खोळ डोक्यावर घेतात. हा कागदच बहूउद्देशीय आहे. जेवायला बसायचं असेल तर हा कागद बस्कर म्हणून वापरता येतो, झोपायचं असेल तर हाच कागद अंथरूण म्हणून वापरता येतो. पाऊस आलाकी डोक्यावर घेतला जातो.

     एखादी वस्तू जर अशी अनेक प्रकारे वापरता येते तर माणसाच्या बाबतीतही गोष्ट तंतोतंत लागू पडते. जर या गतिमान जगात टिकायचे असेल तर व्यक्तीही मल्टिस्किल असली पाहिजे. थोडक्यात एखाद्या व्यक्तीला अधिकाधिक गोष्टी आत्मसात करायला आल्या पाहिजेत आणि त्याप्रमाणे  समाजाला सेवा देता आली पाहिजे असे मला वाटते.

  राजेंद्र पवार 

 ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...