बुधवार, ६ जुलै, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस सोळावा ६ जुलै)

 !! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस सोळावा ६ जुलै)

              आज सकाळी साडेसहा वाजता माळशिरसहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान झाले. जसजसी पालखी पुढे पुढे जात आहे तसतसा वारकऱ्यांचा प्रवाह मोठा बनत चालला आहे. आजही खुडूस या गावी गोल रिंगण झाले. दरम्यानच्या काळात पावसानेही हजेरी लावली. यावेळी वारकऱ्यांनी चिखलाचाही आनंद लुटला. हरिनामात दंग झाल्यानंतर कपड्याकडेही पाहिले जात नाही याचा प्रत्यय आज आला.  रिंगणानंतर आम्ही एका पत्र्याच्या शेडमध्ये विश्रांती घेत होतो. त्यावेळी मूळच्या जर्मन असणाऱ्याआणि आता भारतीय  झालेल्या अर्पणा घोष यांची भेट झाली. त्या रथामागे ३० क्रमांकाच्या दिंडीत चालत आहेत. पाश्चिमात्य असूनदेखील भारतीय संस्कृतीची ओढ त्यांना लागली आहे. पांडुरंगाच्या ओढीने वारीतला सगळा त्रास आनंदाने सहन करत आहेत.

             आज दुपारचा विसावा विझोरी येथे होता.आम्हाला या वारीत वैष्णव चॅरिटेबल ट्रस्टचे वारंवार सहकार्य झाले आहे. किंबहुना त्यांच्यामुळेच आमची वारी सुकर होत आहे.विजय कासुर्डे यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. आजचा मुक्काम वेळापूर येथे आहे.  





             वेळापूर गाव जवळ येताच तीव्र उतार आहे. येथे येताच संत तुकाराम महाराजांना पंढरपूर येथील मंदिराचे शिखर दिसले. पांडुरंगाला भेट घेण्यासाठी ते धावत सुटले. वेळापूर येथे एक भारुडाचा कार्यक्रम होतो. हा मान शेडगे दिंडीला आहे. भारुडाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन होते. उदाहरणादाखल एक भारुड देत आहे.

    बया बया बया!

    काय झालं बया?

    दादला नको ग बाई

    मला नवरा नको ग बाई!

    मोडकच घर, तुटकेचं छप्पर

    पन रहायला जागा नाही

   मला दादला नको ग बाई!

   फाटकेच लुगडं,तुटकीच चोळी

   पण शिवायला दोराच नाही

    मला दादला नको ग बाई!

     अशी अनेक भारुडे आपण ऐकलीत.

  वारी हे प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे.

           आज पंढरपूरमधील सिंहगड कॉलेजच्या  कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या सेकंड इअरला असणाऱ्या अंजली बाबर, आकांक्षा मिरगणे,राशेश्वरी मेनकुदळे, रुचिता फासे या विद्यार्थ्यांनी भेटल्या. त्या प्लॅस्टिकचा वापर वारकऱ्यांनी टाळावा यासाठी प्रबोधन करत होत्या. प्लॅस्टिक पत्रावळी वापरु नये, ग्लास वापरु नये. प्लॅस्टिक कॅन्सरला निमंत्रण देते. प्लॅस्टिक कुजत नाही. आपण झाडांच्या पानांची पत्रावळी वापरावी. प्लॅस्टिक वापराचे दुष्परिणाम त्या मुलींनी सहज सांगितले. आजही बऱ्याच ठिकाणी प्लॅस्टिकचा वापर होताना दिसतो.

           कोणतीही नवीन गोष्ट समाजात रुजवायची असेल तर त्यासाठी सक्षम पर्याय द्यावा लागतो. उदाहरण द्यायचे झाले तर वृक्षतोंडीस पर्याय म्हणून गॅस वापराचे देता येईल. ५० मायक्रॉंनच्या आतील प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे टाळला पाहिजे. आपणही प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे टाळूया. प्लॅस्टिकचा पुनर्वापर करुया.जनतेचे आरोग्य अबाधित राहील याची काळजी घेऊया.

     राजेंद्र पवार

   ९८५०७८११७८

1 टिप्पणी:

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...