गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०

जागतिक धूम्रपानविरोधी दिन !! (१ जानेवारी)

 !! जागतिक धूम्रपानविरोधी दिन !!

   (१ जानेवारी)



               सर्व साधारणपणे धुम्रपान म्हणजे धूर आत ओढणे असा होतो.सध्या धुम्रपान करण्यासाठी अनेक पदार्थांचा वापर केला जातो,उदा. तंबाखू, अफिम आणि इतर नशा देणाऱ्या पदार्थाचा हि वापर केला जातो.आज धुम्रपान करण्यासाठी सिगारेट, चिलीम (गांजा), बिडी, पाईप, हुक्का या पद्धतीचा वापर केला जातो.नशा करण्यासाठी धुम्रपान केले जाते.हे कधी फॅशन, कधी मज्जा, कधी टेन्शन आहे म्हणून तर कधी मित्रांसोबत अनेक जन धुम्रपान करत असतात. धुम्रपान केल्याने त्या व्यक्तीस थोडेसे उत्तेजित किंवा आनंदी झाल्यासारखे वाटते. याच्यामागील शास्त्रीय कारण असे की तंबाखू मधील निकोटीन हा पदार्थ आपल्या शरीरातील डोपामिन वाढवतो यामुळे धुम्रपान करणारी व्यक्ती आनंदी आणि उत्साही होते.पुरुषा प्रमाणेच महिलाही धूम्रपान करत असतात.

         धुम्रपानाचे दुष्परिणाम

१)धूम्रपान / तंबाखूचे सेवन स्त्रियांमध्ये इस्ट्रोजनची पातळी कमी करते व रजोनिवृत्ति लवकर होते.

२)धूम्रपान / तंबाखूचे सेवन शारीरिक ताकद कमी करते आणि त्यामुळे सहनशीलता ढासळते.

३)ज्या स्त्रिया धूम्रपान करतात आणि गर्भनिरोधके घेतात त्यांच्यात स्ट्रोकचा धोका वाढतो.आपण धूम्रपानापासून दूर राहूया.

संकलक: राजेंद्र पवार

       ९८५०७८११७८


बुधवार, ३० डिसेंबर, २०२०

इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे स्मृतिदिन

इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे स्मृतिदिन डिसेंबर ३११९२६





 इतिहासाचार्य  विश्वनाथ काशीनाथ राजवाडे (जुलै १२१८६३ - डिसेंबर ३११९२६) हे मराठी इतिहास-संशोधक होते. 

त्यांनी संपादित केलेले 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' ह्या ग्रंथाचे २२ खंड हे मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या अभ्यासासाठीचे महत्त्वाचे साधन मानले जाते.

राजवाड्यांचे लेखन आणि प्रस्तावना 

राजवाडे यांच्या नावावर स्वतंत्र असा एकही ग्रंथ नाही. त्यांनी नियतकालिकांमधून किरकोळ स्वरूपाचे लेख लिहिले. ‘महिकावतीची बखर’ आणि ‘राधामाधवविलास चंपू’ या प्राचीन ग्रंथांचं संपादन केले आणि मुख्य म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची साधने गोळा करून ती तब्बल बावीस खंडांमध्ये छापली. त्यांच्यापैकी काही खंडांना प्रस्तावना लिहिल्या. राजवाडे संपादनांपेक्षा अधिक गाजले ते या प्रस्तावनांमुळे. ज्यांना या प्रस्तावना आवडल्या नाहीत, त्यांनाही राजवाडे यांनी अविश्रांत कष्ट घेऊन, प्रचंड भ्रमंती करून जमा केलेल्या इतिहासाच्या साधनसामग्रीसाठी त्यांच्या ऋणात राहण्यावाचून पर्यायच नव्हता.

राजवाडे यांनी लिहिलेले साहित्य 

  • भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
  • इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड १ -मराठी भाषा व व्याकरण
  • इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड २ -मराठी ग्रंथ व ग्रंथकार
  • इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ३ -संस्कृत भाषा विषयक
  • इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ४ -अभिलेख संशोधन
  • इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ५ -मराठी धातुकोष
  • इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ६ -व्युत्पत्ती कोष
  • इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ७,८ -समाजकारण व राजकारण
  • इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ९ - आत्मवृत्त व लेख
  • इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड १० -प्रस्तावना खंड
  • इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ११ -इतिहास
  • इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड १२ -संपादक राजवाडे
  • इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड १३ -समग्र संत साहित्य
  • खानदेशातील घराणी
  • तीर्थरूप शहाजीराजे भोसलें यांचे चरित्र
  • मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड १ ते २२ (संपादन आणि प्रस्तावना)
  • राजवाडेनामादिशब्द व्युत्पत्तिकोश
  • राजवाडे लेखसंग्रह (संपादक - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी; साहित्य अकादमी प्रकाशन)
  • राधामाधवविलासचंपू (संपादन आणि प्रस्तावना)
  • संस्कृत प्रतिशब्दशः भाषांतर
  • संस्कृत भाषेचा उलगडा
  • ज्ञानेश्वर नीति कथा
  • ज्ञानेश्वरी (राजवाडे संहिता) : अध्याय १ (२३ पानी प्रस्तावनेसह), ४, १२
  • ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण

संकलन 
राजेंद्र पवार 
मोबा ९८५०७८११७८ 

सोमवार, २८ डिसेंबर, २०२०

!! दिनानाथ मंगेशकर जन्मदिन !! (२९ डिसेंबर)

 

!! दिनानाथ मंगेशकर जन्मदिन !!
   (२९   डिसेंबर)



    दिनानाथ मंगेशकर जन्म:२९ डिसेंबर १९००मृत्यू:२४एप्रिल १९४२  एक प्रसिद्ध मराठी नाट्य अभिनेते, प्रसिद्ध नाट्यसंगीत संगीतकार आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतकार आणि गायक होते. ते सुप्रसिद्ध गायक लता मंगेशकर , आशा भोसले , मीना खाडीकर , उषा मंगेशकर आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांचे वडील होते. दीनानाथ मंगेशकर यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
  संकलंक : राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८

शनिवार, २६ डिसेंबर, २०२०

!! रतन टाटा जन्मदिन !! (२८ डिसेंबर )

 

!! रतन टाटा जन्मदिन !! (२८ डिसेंबर )



         रतन नवल टाटा (जन्म: २८डिसेंबर १९३७ हे एक भारतीय उद्योगपती , गुंतवणूकदार, परोपकारी आणि टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष होते. त्यांचा अध्यक्ष पदाचा कार्यकाळ १९९१ते २०१२ असा २१ वर्षाचा होता.त्यानंतर २०१६-२०१७ मध्ये देखील ते टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष झाले.
                रतन टाटा यांनी आपल्या२१ वर्षांच्या कारकिर्दीत कंपनीचा नफा पाचपटीने वाढवला.सुरुवातीला त्यांनी जे काही निर्णय घेतले ते त्यांनी सिध्द करुन दाखविले.  ते  आजही अनेक संस्थांचे विश्वस्त आहेत. त्यांना भारतातील सर्वोच्च तिसरा सन्मान पदमभूषणने २००० साली तर दुसरा सर्वोच्च सन्मान पदमविभूषण  पुरस्काराने २००८ साली सन्मानित करण्यात आले आहे.
               रतन टाटा हे  टाटा उद्योग समूहाला जागतिक स्तरावरील व्यवसाय बनवण्याच्या प्रयत्नात आहेत.टाटा उद्योगसमूह हा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा मुंबईत मुख्यालय असलेला भारतीय उद्योगसमूह आहे. हा भारतातल्या सर्वात मोठया खाजगी उद्योगसमूहापैकी एक आहे. बाजारभांडवल आणि महसुलाचा विचार करता भारतातील हा आघाडीचा समूह आहे .रसायने,पोलाद,वाहन निर्मिती, माहिती तंत्रज्ञान, दुरसंपर्क, ऊर्जा, चहा आणि आतिथ्य या क्षेत्रात या समूहातील कंपन्या प्रामुख्याने आघाडीवर आहेत. सहा खंडातील ८० हून अधिक देशात टाटा समूहाचे काम विस्तारलेले आहे.रतन टाटा यांना जन्मदिनाच्या निमित्ताने लक्ष लक्ष शुभेच्छा.
संकलक : राजेंद्र पवार
          ९८५०७८११७८

!! जागतिक बँकेची स्थापना १९४५ !! (२७ डिसेंबर


 

   !! जागतिक बँकेची स्थापना १९४५  !!   (२७ डिसेंबर )


         जागतिक बँक  ही एक आंतरराष्ट्रीय वित्त आणि पतपुरवठा संस्था आहे. हीची स्थापना  २७ डिसेंबर १९४५ रोजी झाली.या बँकेच्या स्थापनेसाठी  ब्रेटन वुडस्  समितीच्या जागतिक आर्थिक नियंत्रण शिफारशीं  स्वीकारण्यात आल्या होत्या. या समिती मध्ये ४५ मित्रराष्ट्रे होती. विकसनशील देश व अविकसित देश यांना विकासासाठी कर्जपुरवठा करणारी संस्था असे याचे स्वरूप आहे. या बँकेने पहिले कर्ज फ्रांस या देशाला दिले.
       गरीबी दूर करण्यासाठी ही बँक जगभरात विषेश प्रयत्नशील आहे.
     जागतिक बँकेची उद्दिष्टे खालील प्रमाणे --
१)सरकारांचे सबलीकरण व सरकारी     अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
२)अर्थव्यवस्थांचा विकास
३)भ्रष्टाचार निर्मूलन
४)गरीबी हटाव
५)संशोधन व शिक्षण
            शिक्षणासाठी जागतिक बँक विषेश परिश्रम घेते.भारतासहित अनेक देशांना या बँकेने विविध  प्रकल्पासाठी कर्जे दिली आहेत.
संकलक : राजेंद्र पवार
           ९८५०७८११७८

शुक्रवार, २५ डिसेंबर, २०२०

!! आदिवासींच्या जीवनातील अंधार दुर करणारे ’’डॉ. प्रकाश बाबा आमटे’’जन्मदिन !! (२६ डिसेंबर )

 


!! आदिवासींच्या जीवनातील अंधार दुर करणारे ’’डॉ. प्रकाश बाबा आमटे’’जन्मदिन !! (२६ डिसेंबर )




   डॉ.प्रकाश आमटे जन्म:२६ डिसेंबर १९४८
            बाबा आमटेंनी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हयात हेमलकसा इथं लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना केली होती. या शिवाय ते स्थानिक आदिवासींच्या विकासाकरता आणि आरोग्याकरता देखील कार्य करीत होते. विशेषतः बाबांनी कुष्ठरोग्यांकरता कार्य केलं, त्यांच्याकरता आनंदवनाची स्थापना केली. बाबांच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात आज ही जवाबदारी डॉ. प्रकाश आणि त्यांचे दोन चिरंजीव अनिकेत व दिगंत फार चांगल्या प्रकारे सांभाळतायेत.
         प्रकाश आमटे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी आमटे स्वतः डॉक्टर आहेत. ते दोघेही बाबा आमटेंच्या परंपरेला जोपासत आणि पुढे नेत आदिवासींच्या सेवार्थ आपले पुर्ण लक्ष केंद्रीत करून आहेत.
       पुर्वी जेव्हां डॉ. प्रकाश आणि त्यांच्या पत्नी हेमलकसा  येथे वास्तव्याला आल्या त्यावेळी दरवाजा नसलेली एक छोटी झोपडी वजा खोली त्यांनी बांधली आणि तेथे राहु लागले. तेव्हां तेथे वीज नव्हती, आणि स्वतःचे असे काही खाजगी आयुष्य जगता येईल अशी देखील परीस्थिती नव्हती माडिया गोंड आदिवासी समुदायाकरता या डॉक्टर दांपत्याने आरोग्याची आणि योग्य शिक्षण देण्याची जबाबदारी उचलली.
          सुरूवातीला हे सर्व अशक्यप्राय आणि प्रचंड कठीण वाटावे असेच होते. पण पुढे पुढे त्यांच्यात राहुन त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर, त्यांची सेवा करत करत आदिवासींच्या मनात त्यांनी जागा निर्माण केली.
            गडचिरोली जिल्हयातील  हेमलकसा इथं १९७५ साली स्वित्झरलॅंड च्या आर्थिक मदतीने एक छोटेसे रूग्णालय स्थापीत करण्यात आले, यात औषधांची चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे डॉ.प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी यांना या ठिकाणी काही शस्त्रक्रिया करणे शक्य होऊ लागले.
         या ठिकाणी डॉक्टर दांपत्यानी मलेरिया, क्षयरोग, दाह, यांसोबत भाजलेल्या रूग्णांवर यशस्वी उपचार केलेत, याशिवाय साप विंचु यांच्या दंशाने मरणासन्न अवस्थेत पोहोचलेल्या रूग्णांवर देखील उपचार केले. ते पाहाता या आदिवासींचा विश्वास वाढीस लागला आणि मोठया संख्येने रूग्णं येथे उपचार घेण्याकरता येऊ लागले.
      डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी यांनी आदिवासींच्या शिक्षणाकरता देखील मोठं कार्य केलं.त्यांच्या अधिकारांची जाणीव त्यांना करून दिली. या व्यतिरीक्त लालची आणि भ्रष्ट वनअधिकाऱ्यांना या भागातुन हाकललं सुध्दा !
        १९७६ साली त्यांनी हेमलकसा इथं एका शाळेची स्थापना केली. सुरूवातीला आदिवासी आपल्या पाल्यांना या शाळेत पाठवण्यास तयार होत नव्हते पण पुढे पुढे मुलं शाळेत येऊ लागली. या ठिकाणी आदिवासी मुलांना शिक्षणासोबतच स्वयंरोजगार करण्याकरता देखील प्रशिक्षीत केले जाते.
              हेमलकसा येथील  शाळेत आदिवासींना शेतीविषयी, फळं, भाज्यांच्या उत्पादनाविषयी प्रशिक्षण दिले जात होतं. या व्यतिरीक्त आदिवासी बांधवांना वनांच्या संरक्षणा संबंधी जागरूक करण्यात या दांपत्यानी मोलाची भुमिका पार पाडली.
            या शाळेतुन शिक्षण घेतलेले विदयार्थी आज डॉक्टर, वकील, अधिकारी, शिक्षक झाले असुन आपले आयुष्य चांगल्या तऱ्हेने व्यतीत करतायेत. या उभयतांच्या मुलांनी देखील याच शाळेतुन शिक्षण घेतले आहे.
               डॉ. प्रकाश आमटेंनी वन्य प्राण्यांकरता एक प्राणी संग्रहालय देखील बनविले आहे. या ठिकाणी अनाथ झालेल्या लहान प्राण्यांना ठेवले जाते. प्राण्यांचे हे निवासस्थान डॉ.आमटेंच्या घरी अंगणातच तयार करण्यात आले आहे. येथे अस्वल, बिबटया, मगर यासारखी ६०पेक्षा अधिक जातीची जनावरं अगदी गुण्यागोविंदाने राहातात. डॉ. प्रकाश आमटे या प्राण्यांना स्वतःच्या हाताने जेऊ घालतात.
            पुर्वी येथील आदिवासी लोक प्राण्यांची शिकार करीत असत त्या प्राण्यांवर डॉ. आमटे उपचार करीत.
         आदिवासींकरता हेमलकसा येथे या आमटे दाम्पत्यांनी रूग्णालयाची स्थापना केली आहे. आदिवासींवर मोफत उपचार केले जातात. या व्यतिरीक्त येथे मातृत्व सदन देखील उभारण्यात आले आहे, स्वास्थ्यासंबंधी माहिती या सदनात दिली जाते.
           २००८ साली आमटे दाम्पत्याला त्यांच्या सामाजिक दातृत्वाकरीता ’मॅगसेसे पुरस्काराने ’ सन्मानित करण्यात आले आहे. १९७३ पासुन डॉ. प्रकाश महाराष्ट्रातील सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. त्यांच्या कार्याची जाणीव ठेवत त्यांना २००२ साली पदमश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या व्यतिरीक्त सामाजिक कार्याकरता २०१४ साली मदर टेरेसा पुरस्काराने त्यांच्या कार्याला सन्मान देण्यात आला आहे.
         डॉ. प्रकाश आमटेंवर चित्रपट –
  डॉ. प्रकाश आमटेंवर आधारीत चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला आहे. Dr Prakash Baba Amte : The Real Hero या चित्रपटात डॉ.. प्रकाश आमटेंची भुमिका नाना पाटेकर या अभिनेत्याने तर डॉ. मंदाकिनी आमटेंची भुमिका सोनाली कुलकर्णी या अभिनेत्रीने साकारली आहे.
       डॉ. प्रकाश आमटेंनी आपले संपुर्ण आयुष्य आदिवासींची सेवा करण्यात व्यतीत केले आणि करतायेत. या गोष्टीचे कौतुक करावे तेवढे कमीच ! त्यांना पाहाता इतरांनी देखील त्यांच्या कार्याला अंगीकारून बरेच काही शिकण्यासारखे आहे.
      डॉ.प्रकाश आमटे यांच्या सामाजिक कार्याला मानाचा मुजरा.
माहिती स्रोत:माझी मराठीवरील लेख
(टीप:सहलीच्या निमित्ताने आम्ही हेमलकसा येथे भेट दिली आहे.)
        संकलक:राजेंद्र पवार
          ९८५०७८११७८



गुरुवार, २४ डिसेंबर, २०२०

!! नाताळ माहिती !! (२५ डिसेंबर)

      !! नाताळ  माहिती !! 

     (२५ डिसेंबर)



      नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असुन तो दरवर्षी २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. जगाच्या बऱ्याच भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो तर काही ख्रिश्चन अनुयायी हा सण सायंकाळी साजरा करतात. सर्वात प्रथम इ. स.पू.३३६ मध्ये रोम येथे ख्रिसमस हा सण साजरा झाला असे मानले जाते.

          या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू ,शुभेच्छापत्रे देऊन परस्परांचे अभिनंदन करतात. तसेच आपल्या घरांना रोषणाई करुन सजवले जाते. ख्रिसमस ट्री हा या सणाचा अविभाज्य घटक आहे. याचदिवशी रात्री सांताक्लॉज लहान मुलांना भेटवस्तू वाटतो असे मानले जाते. यामध्ये चॉकलेट, केक इत्यादी वेगवेगळे पदार्थांचा समावेश असतो.

 या सणाच्या निमित्ताने ख्रिस्ती बांधवाना शुभेच्छा.

    संकलक : राजेंद्र पवार

        ९८५०७८११७८


बुधवार, २३ डिसेंबर, २०२०

!! साने गुरुजी जन्मदिन !! (२४ डिसेंबर )

 

    !! साने गुरुजी जन्मदिन !!
   (२४ डिसेंबर )



    साने गुरुजी :जन्म२४ डिसेंबर १८९९
     मृत्यू:११ जून १९५०
                         साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील
 पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशा रितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात २४ डिसेंबर १८९९ रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यानी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती.
                 शिक्षण पूर्ण   झाल्यावर त्यांनी अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे (१९२४ ते १९३०) नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र येथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.
            इ.स. १९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. इ.स. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी ‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढले. दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर 
येथील काँग्रेस अधिवेशन (१९३६) यशस्वी होण्यासाठी त्यांनी खूप काम केले. इ.स. १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार केला. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी 'मैला वाहणे' व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली. त्यानी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली.
        ‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून साने गुरुजीच्या देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील बलसागर भारत होवो सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.
            समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला महात्मा गांधींचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला; तो शेवटपर्यंत मिळाला नाही. अखेर त्यांनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले.
  स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वतः तमिळ, बंगाली आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे-रचित 'गीता प्रवचनेसुद्धा विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात (१९३२) सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला. तसेच पुढे बंगलोर येथील तुरुंगात असताना त्यांनी तिरुवल्लिवर नावाच्या कवीच्या 'कुरल' नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर केले. नंतर फ्रेंच भाषेतील Les Misérables या कादंबरीचे 'दु:खी' या नावाने मराठीत अनुवादन केले. डॉ. हेन्‍री थॉमस या जगप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाच्या The story of human race या पुस्तकाचे मराठीत 'मानवजातीचा इतिहास' असे भाषांतर केले. 'करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे' हे गुरुजींच्या जीवनाचे सार होते. मनोरंजनातून मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी गुरुजींनी अनेक पुस्तके लिहिली. साने गुरुजींचे भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मावर निरतिशय प्रेम होते. त्यानी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला. तसेच भारतीय संस्कृतीतील अनेक महापुरुषांची चरित्रे लिहिली. त्यांचे 'मोरी गाय' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. मातृहृदयी गुरुजींनी आई वडिलांच्या प्रेमावर 'मोलकरीण' नावाची अप्रतिम कादंबरी लिहिली ज्यावर पुढे जाऊन मराठी चित्रपट निघाला. गुरुजींनी लिहिलेली 'खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे' ही प्रार्थना ऐकण्यासाठी यु ट्यूबची लिंक देत आहे आपण ती ऐकावी.
https://youtu.be/bpQuFycSCvk

         साने गुरुजींना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.

    संकलक :  राजेंद्र पवार
            ९८५०७८११७८


मंगळवार, २२ डिसेंबर, २०२०

!! किसान दिन !! (२३ डिसेंबर )

 

!! किसान दिन !! (२३ डिसेंबर )




                भारत हा खेड्यांचा देश आहे आणि सर्व ग्रामीण समुदायात मोठ्या प्रमाणात शेतीची कामे केली जातात , म्हणूनच भारताला शेती प्रधान देश असे म्हटले जाते. सुमारे ७०% भारतीय लोक शेतकरी आहेत. ते आपल्या देशाचा मुख्य कणा आहेत.  ते अन्न पिके आणि तेलबियानिर्मिती करतात.
ते व्यापारी पिकांचे उत्पादक आहेत. ते अन्य उद्योगांसाठी काही कच्चा माल तयार करतात, म्हणूनच ते आपल्या राष्ट्राचे प्राण  आहेत. भारतातील सुमारे ७०% लोक प्रत्यक्ष  किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहेत, भारतीय शेतकरी दिवसरात्र काम करतात. तो बियाणे पेरतो आणि रात्री पिकांचे रक्षण करतो. तो आपल्या पशुधनाची काळजी घेतो. आजकाल अनेक राज्यात पशूंच्या
(बैलांच्या) सहाय्याने शेती जवळपास नष्ट झाली आहे.शेतीत यांत्रिकीकरण आले आहे.आज सर्वच कामे यंत्रावर होत आहेत. उदा. शेतीची पूर्व मशागत, आंतर मशागत,औषध फवारणी, हार्वेस्टिंग, मळणी इत्यादी.शेतकऱ्यांना त्याची पत्नी, मुले  त्यांच्या कामात मदत करतात त्यांच्याही श्रमाचा विचार व्हायला हवा.
          भारतीय शेतकरी गरीब आहे. त्याचे दारिद्र्य जगभर प्रसिद्ध आहे. शेतकरी दोन वेळचं अन्नही मिळवू शकत नाही.  तो आपल्या मुलांना चांगले शिकवू शकत नाही. तो आपल्या मुलामुलींसाठी योग्य कपडे विकत घेऊ शकत नाही. तो आपल्या पत्नीला दागिने घालण्याचा आनंद देण्यास असमर्थ आहे.  सावकार  शेतकऱ्यांना त्रास देतात. थोडक्यात शेतकऱ्यांची स्थिती दयनीय आहे.शेतकरी कर्जात जन्माला येतो आणि कर्जातच मरतो.
       शेतकऱ्यांची  ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे यासाठी शासन स्तरावर काही गोष्टी करणे आवश्यक आहे. आता जग ही बाजारपेठ झाली आहे.जगात कशाची मागणी आहे तसा पुरवठा करता आला पाहिजे. आपला माल उच्च दर्जाचा असला पाहिजे.बऱ्याच वेळा मालाची गुणवत्ता राखता न आल्याने जागतिक बाजारपेठेत आपला माल रिजेक्ट झाला आहे. आज बाजारात अधिक किंमतीला माल खरेदी करणारा ग्राहक आहे. उत्पादक ते ग्राहक यामधील साखळी कमी करता आली पाहिजे. आज कृषी विधेयकावरुन गोंधळ चालू आहे. काळानुसार काही बदल अपरिहार्य असतातच.१९६० च्या दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निर्मिती झाली. व्यापाऱ्यांपेक्षा चांगला भाव  लोकांना मिळू लागला. आज काही गोष्टी कालबाह्य झाल्या त्यामुळे काही बदल अपेक्षित असतातच. परंतु भविष्यात शेतकऱ्यांच्या हिताला बाधा येणार नाही ना याचीही काळजी शासन स्तरावर घेतली गेली पाहिजे.खरतर शेतकरी स्मार्ट झाला पाहिजे.शेतकऱ्यांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोनही बदलला पाहिजे. इंडस्ट्रीप्रमाणे  शेती झाली पाहिजे. व्यापारी शेतकऱ्यांना लुटतात.शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले पाहिजे यासाठी हमीभाव तर पाहिजेच. त्याला शेतीसाठी संरक्षित पाणी, अप्रोच रोड, वाहतूक व्यवस्था, शितसाखळी, तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, विजेची सोय ,कर्ज सुविधा इत्यादी.
       आपण आशा धरुयाकी हे बदल लवकर घडून येतील. शेतकऱ्याला समाजात मान सन्मान मिळेल. सीमेवर जसं सैनिक अहोरात्र पारा देत असतो म्हणून आपण आपल्या घरी सुरक्षित असतो अगदी याप्रमाणे आपला अन्नदाता रात्रंदिवस शेतात काबाडकष्ट करतो म्हणून आपण दोन वेळचं जेवण घेत असतो. जय जवान, जय किसान म्हणून चालणार नाही तर दोघांनाही सन्मानाने वागवले पाहिजे. आपल्या देशातील किसानांना  किसान दिनाच्या निमित्ताने मानाचा मुजरा.
शब्दांकन -- राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८


सोमवार, २१ डिसेंबर, २०२०

!! श्रीनिवास रामानुजन जन्मदिन !! (२२ डिसेंबर )

 


!! श्रीनिवास रामानुजन  जन्मदिन !!
(२२ डिसेंबर )




श्रीनिवास रामानुजन जन्म :  २२ डिसेंबर १८८७ मृत्यू २७एप्रिल १९२०  भारतीय गणितज्ञ होते. रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन हे गणिताचा विचार करीत असत. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे म्हणूनच ते झोपेतून जागे होताच अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत.
या महान गणितज्ञाने वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धान्त सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत.
        रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात १९११ साली छापून आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला. १९१३ साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रो. हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रो. हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजनने त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत, असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले होते. लवकरच रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते १७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले.इंग्लंडला गेल्यावर रामानुजन यांची तब्येत खराब झाली.रामानुजन यांना इंग्लंडमधील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले तेव्हा त्यांना भेटण्यासाठी जी.एच .हार्डी एका मोटारीतून गेले. त्या मोटारीचा क्रमांक होता १७२९ .हार्डीनी रामानुजन यांना ही गोष्ट सांगताना मोटारीचा क्रमांक बोरिंग होता असं सांगितले.तेव्हा तत्काळ रामानुजन यांनी 'नाही तो क्रमांक बोरिंग नव्हता, उलट तो एक खूपच चांगला नंबर आहे. ही दोन वेगवेगळ्या घनांच्या बेरजेने येणारी सगळ्यात लहान संख्या आहे.' {१२३+१३=१७२९ आणि १०३+९३=१७२९). तेव्हापासून १७२९या संख्येला हार्डी -रामानुजन संख्या म्हटले जात . १९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षांच्या काळात रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. १९१८ साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत.
    रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरी केली जाते.        
      १९१९  मध्ये रामानुजन इंग्लंडमधून मायदेशी परत आले. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष हे अंथरुणालाच खिळून गेले. क्षयाची असाध्य व्याधी त्यांना जडली होती. वयाच्या अवघ्या तेहेतिसाव्या वर्षी २७ एप्रिल १९२० रोजी हे महान गणितज्ञ हे जग सोडून गेले. त्यांच्या निधनाने केवळ भारतीयांचेच नव्हे तर संपूर्ण गणितविश्वाचे नुकसान झाले.
      रामानुजन यांना जन्मदिवसाच्या (गणित दिवसाच्या )निमित्ताने विनम्र अभिवादन.
     संकलक: राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८

रविवार, २० डिसेंबर, २०२०

!! नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध. !! (२१ डिसेंबर )

 

  !! नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध. !!
    (२१ डिसेंबर )

अनंत लक्ष्मण कान्हेरे जन्म : आयनी मेटे, रत्‍नागिरी जिल्हा,  १८९१; मृत्यू : ठाणे, १९ एप्रिल १९१० हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होते. ते गणेश दामोदर सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या 'अभिनव भारत' या क्रांतिकारक संघटनेचे सदस्य होते. नाशिकचा कलेक्टर ए.एम.टी. जॅक्सन याची हत्या करणारे अनंत कान्हेरे हे खुदीराम बोस यांच्यानंतरचे सर्वांत तरुण वयाचे भारतीय क्रांतिकारक ठरले.
                      सावरकर बंधू, मदनलाल धिंग्रा यांच्याकडून स्फूर्ती घेऊन अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला ठार मारण्याचे ठरविले. त्याला कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे अशा समवयस्क साथीदारांची जोड मिळाली.
       जॅक्सनची मुंबई येथे वरच्या पदावर बदली करण्यात आली. त्याला नाशिक येथेच मारणे जास्त सोपे होते. २१ डिसेंबर १९०९ या दिवशी नाशकातल्या विजयानंद थिएटरमध्ये 'शारदा' या नाटकाचा प्रयोग जॅक्सनच्या निरोप समारंभासाठी ठरला होता. जॅक्सन मराठी भाषेचा आणि नाटकांचा चाहता असल्याने या प्रयोगास येणार होताच. नाटकाचा प्रयोग सुरू होण्याची वेळ झाली, सर्वजण आपापल्या जागेवर स्थानापन्न होत असताना अनंत कान्हेरे ह्यांनी जॅक्सनवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. जॅक्सन जागीच ठार झाला. अनंत कान्हेरे आपल्या जागेवरच शांतपणे उभे राहिले, त्यांना अटक करण्यात आली. कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे यांच्यावर खटला भरण्यात आला. २० मार्च १९१० रोजी तिघांनाही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. १९ एप्रिल १९१० या दिवशी तिघांनाही ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आले.
ठाण्याच्या तुरुंगात अनंत कान्हेरे यांचे स्मारक आहे. नाशिकमध्ये 'अनंत कान्हेरे' नावाचे क्रिकेटचे मैदान आहे.
संकलक : राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८

शनिवार, १९ डिसेंबर, २०२०

!! ऊस क्षेत्रातील किमयागार योगेश पवार !! वर्णे ता.जि. सातारा येथील रहिवासी माजी सैनिक, वसंतराव नाईक फूलशेती पुरस्कार विजेते,सातारा तालुका कुस्ती मल्ल विद्या अध्यक्ष योगेश पवार (आप्पा) यांनी ऊस शेती क्षेत्रात किमया केली आहे. ऊस शेतीचा किमयागार म्हणून त्यांची तालुक्यात ओळख झालेली आहे. योगेश पवार यांचे बंधू संतोष पवार हे हेही सैन्यात होते त्यांचे शेतीमधील योगदान वाखाणण्यासारखे आहे. योगेश पवारांच्या विचाराला संतोष (दादा)पवार यांच्या कृतीची उत्तम साथ आहे. आता पुढील पिढीही शेतीमध्ये मदत करत आहे. योगेश पवार यांचेकडे पारंपरिक ऊस शेती आहे. त्यांचे वडीलही आदर्श शेतकरी होते. इतरांच्यापेक्षा उत्पादन जास्त असले तरी त्याला शास्त्रीय ज्ञानाची जोड नसल्याने त्याला मर्यादा होत्या. योगेश पवार यांचे वैशिष्ट्य म्हणजे लढाई करायची ती जिकण्यासाठी. ते कारगिल योध्ये आहेत.ऑपरेशन विजयमध्ये त्यांचा सहभाग लक्षणीय होता. या युध्दात ते जखमी झाले. जखमी असतानाही शेतीत लक्ष घालायला सुरुवात केली. ऊस शेती करत असताना जमिनीची योग्य मशागत, बियाणे निवड, माती परीक्षण, खत व्यवस्थापन,पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत, एकरी ऊसाची संख्या या बाबी महत्वाच्या आहेत. गतवर्षी को-८६०३२ या जातीची पूर्व हंगामी लागवड केली होती. योगेश पवार यांनी ऊस पीक स्पर्धेतही भाग घेतला होता. त्यांच्या ऊस शेतीला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना यांच्या अधिकाऱ्यांनी वारंवार भेटी दिल्या आहेत.या दोन्ही संस्थांच्यावतीने स्पर्धेत सहभाग घेतला असल्याने संबधित संस्थांच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले होते. योगेश पवार यांनी यावर्षी एकरी १२६ टन सरासरी उत्पादन घेतले आहे.पुढील पीक हंगामात एकरी १५० टन ऊस उत्पादन घेण्याचा त्यांचा मानस आहे. त्यादृष्टीने त्यांची वाटचाल चालू आहे. गेल्या दहा वर्षांपासून ते ऊस शेतीत प्रयोग करत आहेत. एकरी ५० टनापासून १२६ टनांपर्यंत मजल मारली आहे. पुढचा लक्षांक ते निश्चितच गाठतील यात शंका नाही. ते ऊस पिकाबरोबर आले, पपई, गहू, ज्वारी इत्यादी उत्पादने घेतात. प्रत्येक पीक बघण्यासारखे असतेच.अशा या ऊस शेतीतील किमयागाराच्या शेतीला आपण आवश्य भेट द्यायला हवी. राजेंद्र पवार ९८५०७८११७८




!! ऊस क्षेत्रातील किमयागार योगेश पवार !!





    वर्णे ता.जि. सातारा येथील रहिवासी
माजी सैनिक, वसंतराव नाईक फूलशेती
  पुरस्कार विजेते, सातारा तालुका कुस्ती मल्ल विद्या अध्यक्ष योगेश पवार (आप्पा)
यांनी ऊस शेती क्षेत्रात किमया केली आहे. ऊस शेतीचा किमयागार म्हणून त्यांची तालुक्यात ओळख झालेली आहे.
योगेश पवार यांचे बंधू संतोष पवार हे ही सैन्यात होते त्यांचे शेतीमधील योगदान वाखाणण्यासारखे आहे. योगेश पवारांच्या विचाराला संतोष (दादा)पवार यांच्या कृतीची उत्तम साथ आहे. आता पुढील पिढीही शेतीमध्ये मदत करत आहे.
         योगेश पवार यांचेकडे पारंपारिक ऊस शेती आहे. त्यांचे वडीलही आदर्श शेतकरी होते. इतरांच्यापेक्षा उत्पादन जास्त असले तरी त्याला शास्त्रीय ज्ञानाची जोड नसल्याने त्याला मर्यादा होत्या.
       योगेश पवार यांचे वैशिष्ट्य म्हणजे लढाई करायची ती जिंकण्यासाठी. ते कारगिल योध्ये आहेत.ऑपरेशन विजयमध्ये त्यांचा सहभाग लक्षणीय होता. या युध्दात ते जखमी झाले. जखमी असतानाही शेतीत लक्ष घालायला सुरुवात केली.
       ऊस शेती करत असताना जमिनीची योग्य मशागत, बियाणे निवड, माती परीक्षण, खत व्यवस्थापन,पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत, एकरी ऊसाची संख्या या बाबी महत्वाच्या आहेत.
            गतवर्षी को-८६०३२ या जातीची पूर्व हंगामी लागवड केली होती. योगेश पवार यांनी ऊस पीक स्पर्धेतही भाग घेतला होता. त्यांच्या ऊस शेतीला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना यांच्या अधिकाऱ्यांनी वारंवार भेटी दिल्या आहेत. या दोन्ही संस्थांच्यावतीने  स्पर्धेत सहभाग घेतला असल्याने संबधित संस्थांच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले होते.
        योगेश पवार यांनी यावर्षी एकरी १२६ टन सरासरी उत्पादन घेतले आहे. पुढील पीक हंगामात एकरी १५० टन ऊस उत्पादन घेण्याचा त्यांचा मानस आहे. त्यादृष्टीने त्यांची वाटचाल चालू आहे. गेल्या दहा वर्षांपासून ते ऊस शेतीत प्रयोग करत आहेत. एकरी ५० टनापासून १२६ टनांपर्यंत मजल मारली आहे. पुढचा लक्षांक  ते निश्चितच गाठतील यात शंका नाही.
      ते ऊस पिकाबरोबर आले, पपई, गहू, ज्वारी इत्यादी उत्पादने घेतात. प्रत्येक पीक बघण्यासारखे असतेच. अशा या ऊस शेतीतील किमयागाराच्या शेतीला आपण अवश्य भेट द्यायला हवी.
         राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८

शुक्रवार, १८ डिसेंबर, २०२०

!! विजय दिवस मॅरेथॉन !!(१९ डिसेंबर )

 !!  विजय दिवस मॅरेथॉन !!(१९ डिसेंबर )




   भारताने १९७१ च्या युध्दात  पाकिस्तानवर   एकतर्फी विजय मिळवला. हे युध्द १३ दिवस चालले.१६ डिसेंबर हा युध्दाचा अखेरचा दिवस.  १६ डिसेंबर रोजी विजय संपादन केल्यामुळे  हा दिवस "विजय दिवस" म्हणून देशभर साजरा केला जातो. या युध्दामुळे बांगला देशाची निर्मिती झाली. पाकिस्तानच्या ९३००० सैनिकानी आत्मसमर्पण केले.या युध्दात आपल्या देशाचेही ९९०० जवान शहीद झाले तर१८५१ जवान जखमी झाले.

        विजय दिवसाच्या निमित्ताने शहीद जवानांना आदरांजली वाहिली जाते. त्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आपल्याकडे कराडला दरवर्षी "विजय दिवस" फार मोठया प्रमाणात साजरा केला जातो. यावर्षी मात्र कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने हा दिवस साजरा होऊ शकला नाही. परंतु मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.  ही स्पर्धा १६ ते २० डिसेंबर मध्ये पूर्ण करावयाची होती. मी २१ किलोमीटर मध्ये भाग घेतला होता. स्पर्धेचा रुट नेहमीचाच म्हणजे वर्णे हायस्कूल-अपशिंगे-बोरगाव-नागठाणे-

नागठाणे पेट्रोल पंप-सर्व्हिस रोडने बोरगावचे बोरजाई मंदीर परत वर्णे असा होता. यावेळी हे अंतर १:५२:४६(एक तास बावन्न मिनिटे सेहेचाळीस सेकंदात) पूर्ण केले. आज माझ्याबरोबर महेश माने  हा विद्यार्थी होता. त्याच्यामुळेच हे अंतर विक्रमी वेळात पूर्ण करु शकलो.नेहमीप्रमाणे रुट सपोर्ट दादासाहेब सुतार यांनी केला.आपल्या सदिच्छामुळेच मला यश प्राप्ती झाली आहे असेच प्रेम असू द्या.

        आपणही निरोगी आयुष्यासाठी नियमित व्यायाम करावा. आपली प्रतिकार शक्ती वाढवावी,आजारापासून दूर राहावे असे मला वाटते.

           राजेंद्र पवार 

           ९८५०७८११७८

गुरुवार, १७ डिसेंबर, २०२०

!! संत गाडगेबाबा स्मृतिदिन !! (२० डिसेंबर )

 

        !!   संत गाडगेबाबा स्मृतिदिन !! (२० डिसेंबर )



             जन्म :२३ फेब्रुवारी १८७६ मृत्यू: २० डिंसेंबर १९५६.  हे एक थोर आधुनिक मराठी संत व समाजसुधारक. त्यांचा जन्म शेणगाव (जि.  अमरावती ) येथे परीट जातीत  झाला. वडिलांचे नाव झिंगराजी व  आईचे सखूबाई. आडनाव जाणोरकार. त्यांचे मूळ नाव डेबूजी असे होते. तथापि त्यांचा वेश म्हणजे अंगावर फाटकी गोधडी आणि हातात गाडगे असा असल्यामुळे लोक त्यांना ‘ गोधडे महाराज ’ किंवा  ‘ गाडगे महाराज ’ म्हणूनच ओळखत. १९१२ मध्ये त्यांचा कुंताबाईशी विवाह झाला; परंतु संसारात त्यांचे मन रमले नाही. पुढे काही वर्षांनी घर सोडून तीर्थयात्रा करीत ते फिरू लागले. समाजातील कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष लोकसेवेचे व लोकशिक्षणाचे व्रत स्वीकारले.
                     लहानपणापासूनच त्यांना भजन-कीर्तनांची आवड होती आणि त्यांची वृत्तीही धार्मिक व परोपकारी होती. समाजसुधारणेसाठी व लोकशिक्षणासाठी त्यांनी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले. ते निरक्षर असले, तरी त्यांची भाषा सुबोध व सर्वसामान्यांच्या एकदम हृदयाला जाऊन भिडणारी होती. महाराष्ट्रात सर्वत्र तसेच गुजरात, कर्नाटक व आंध्र प्रदेशाच्या काही भागांत त्यांनी गावोगाव कीर्तने करून लोकजागृती केली. त्यांचा नैतिक उपदेश साधा व सर्वसामान्यांना उपयुक्त ठरावा असाच होता.
        ' चोरी करू नये, कर्ज काढून चैन करू नये, दारू पिऊ नये, देवापुढे पशूंचा बळी देऊ नये ’, अशा प्रकारचा उपदेश ते आपल्या कीर्तनांतून मार्मिक उदाहरणे देऊन करीत. पारंपरिक, पारमार्थिक विषयांसोबतच व्यावहारीक व नैतिक विषयांचाही त्यांनी आपल्या कीर्तनांतून लोकजागृतीसाठी चांगला उपयोग करून घेतला.
              स्वच्छता, प्रामाणिकपणा व भूतदया यांवर त्यांचा विशेष भर असे. तीर्थयात्रेच्या ठिकाणी ते जात; परंतु देवदर्शन न घेता मंदिराच्या बाहेर थांबून यात्रेकरूंची सेवा करीत व तेथील परिसर स्वतःच्या हातांनी स्वच्छ करीत. खाण्यापिण्याच्या बाबतीतही त्यांचा कमालीचा साधेपणा होता. श्रीमंत भक्तांनी दिलेले चांगले अन्न ते भिकाऱ्यांना वाटून टाकीत आणि स्वतः गरिबाच्या घरची चटणी- भाकरी मागून आणून खात.
                        लहानपणापासूनच ते जातिपंथभेदातीत होते. जातिभेद नष्ट करून एकजिनसी समाज निर्माण व्हावा, असे त्यांना मनापासून वाटे व त्या दृष्टीने यांचे आचरण आणि प्रयत्‍नही  असत. पंढरपूर, नासिक, त्र्यंबकेश्वर, आळंदी इ. ठिकाणी यात्रेकरूंचे अत्यंत हाल होत, म्हणून त्यांनी त्यांच्या सोयीसाठी प्रशस्त धर्मशाळा बांधल्या. विदर्भातील ऋणमोचन येथे त्यांनी  लक्ष्मीनारायणाचे मंदिर उभारले व नदीवर घाटही बांधला. अनेक ठिकाणी त्यांनी गोरक्षण संस्थाही उभारल्या; तसेच अनाथांसाठी व अपंगांसाठी अनेक प्रकारे कार्य केले. समाजसेवा करणाऱ्या अनेक संस्थांनाही त्यांनी उदारहस्ते देणग्या दिल्या.
            अनेक ठिकाणी देवाधर्माच्या नावावर चालणारी पशुहत्या त्यांनी बंद केली. अध्यात्माच्या जंजाळात न शिरताही, संसारातच राहून ईश्वरभक्ती करता येते, अशी साधी व सरळ शिकवण त्यांनी  समाजास दिली.
        'संत तुकाराम महाराज आमचे गुरू आहेत व माझा कोणीही शिष्य नाही ’, असे ते म्हणत. त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांची गादी अथवा मठ कोठेही निर्माण झाला नाही.
         समाजात शिक्षणप्रसार करून अनेक शिक्षणसंस्थांना त्यांनी मदत केली. लोकांची त्यांच्यावर नितांत श्रद्धा होती; त्यामुळे लोकांनी त्यांना विपुल पैसा दिला. तो सर्व  त्यांनी लोकोपयोगी कार्यात वेचला. त्यांनी उभारलेल्या सर्वच संस्थांचा कारभार विश्वस्त मंडळेच पाहतात.
        गाडगे महाराजांविषयी बहुजनसमाजात कमालीचा आदरभाव आहे. त्यांनी महाराष्ट्रात केलेले लोकजागृतीचे व लोकसेवेचे कार्य अत्यंत मोलाचे आहे. प्रवास करीत असता अमरावतीजवळ त्यांचे अचानक निधन झाले. त्यांची समाधी अमरावती येथे आहे.संत गाडगेबाबा यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
       संकलक : राजेंद्र पवार
              ९८५०७८११७८

!! गोवा मुक्ती दिन !!(१९ डिसेंबर )

 

!! गोवा मुक्ती दिन !!(१९ डिसेंबर )




        १५१० मध्ये पोर्तुगीजांनी गोव्याच्या भूमीवर पाय ठेवला तेव्हापासून गोमंतकीय जनतेचे जे नष्टचर्य सुरू झाले ते तब्बल साडेचारशे वर्षांनंतर १९ डिसेंबर १९६१ रोजी संपले. दरवर्षी १९ डिसेंबर हा गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.
                  १९६१च्या युद्धानंतर भारतभूमीवरील उरलेसुरले पोर्तुगीज अधिपत्य समाप्त झाले, तसेच गोवा, दमण व दीव हा प्रदेश संपूर्णपणे मुक्त झाला. या अर्थाने, १९६१ चे युद्ध हा गोवा मुक्ती प्रक्रियेचा शेवटचा व अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा होता. हे मुक्तियुद्ध म्हणजे गोवा मुक्ती आंदोलनाचा फक्त निर्णायक भाग होता.
               या युद्धाव्यतिरिक्त गोवा मुक्ती आंदोलनाचा खूप मोठा इतिहास आहे, ज्यामध्ये स्थानिक गोवेकर स्वातंत्र्यसैनिकांचा खूप मोठा वाटा आहे.
भारतातील घडामोडी शांत झाल्यावर पंतप्रधान पंडित नेहरु यांनी गोव्याच्या स्वातंत्र्यावर भर दिला. पण गोव्याचे भारतात विलिनिकरण करण्याच्या बाजूने पोर्तुगीज नव्हते. नेहरु यांनी भारत आणि पोर्तुगीज कॉलनीत चांगले संबंध राहण्याच्या दिशेने पाऊले उचलली. पण या कॉलन्यांमधील प्रशासक भारताला सहकार्य करीत नव्हते. अखेर नेहरु यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून पोर्तूगीजांवर दबाव आणला. शांततेच्या मार्गाने भारत सोडून जाण्याचा संदेश दिला. वाटाघाटी यशस्वी होत नसल्याने तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी भारतीय लष्कराला कारवाईचे आदेश दिले.
पोर्तुगीज सरकारची ही जुलूमशाही आणि आंदोलनाला मिळणारा जनतेचा तीव्र प्रतिसाद या पाश्र्वभूमीवर नेहरूंनी १७ डिसेंबर १९६१ रोजी आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता भारतीय सैन्य गोव्यात घुसवण्याचा निर्णय घेतला. गोव्यातील जनतेने सैन्याचे स्वागत आणि सहकार्य केले.
              अखेर १९ डिसेंबर १९६१ रोजी गोव्यात तिरंगा फडकला आणि गोवा मुक्त झाला. दीव आणि दमन आधीच मुक्त झाले होते. या तिघांना मिळून केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. नंतर १९६७ साली सार्वमताने गोवा घटक राज्य म्हणून घोषित झाले. गोवा, दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशात १९६३ साली निवडणूक झाली.
       दोन्ही खासदार व बहुसंख्य आमदार महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे निवडून आले. पक्षाचे अध्यक्ष दयानंद बांदोडकर यांनी निवडणूक लढवली होती. बांदोडकर हे या प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री ठरले.
        पणजी हे शहर गोव्याची राजधानी असून, वास्को हे राज्यातील सर्वांत मोठे, तर पोर्तुगीजांचा ऐतिहासिक प्रभाव असलेले मडगाव हे राज्यातील महत्त्वाचे शहर आहे.
माहिती स्रोत: मराठीसृष्टीमधील  संजीव वेलणकर यांचा लेख
संकलक :राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८


!! अस्पृश्यता निवारण दिन !! (१८ डिसेंबर )

 

!! अस्पृश्यता निवारण दिन !! (१८ डिसेंबर )




                   अस्पृश्यतेचा शाब्दिक अर्थ म्हणजे स्पर्श न करणे .  अस्पृश्य व्यक्तीला स्पर्श केल्यास उच्च जातीचे लोक 'अपवित्र' बनतात आणि पवित्रता परत मिळवण्यासाठी पवित्र गंगा-स्नान करतात.भारतात अस्पृश्यता मानणे हा दंडनीय गुन्हा घोषित करण्यात आला आहे.
       अस्पृश्यता ही मानवी समाजासाठी एक भयंकर कलंक आहे.  अमेरिका , इंग्लंड , जपान यासारखे देश वैज्ञानिक दृष्टीकोनातून विकसित  झाले असले तरी ते अस्पृश्यतेने ग्रस्त आहेत.अमेरिकेसारख्या महान राष्ट्रात काळा आणि गोरा असा भेदभाव आजही काही प्रमाणात दिसून येतो.आपल्या देशात अस्पृश्यतेचे पूर्ण निर्मूलन झाले आहे असे वाटते.कोठेही भेदभाव बाळगताना दिसून येत नाही. कोठे भेदभाव बाळगला जात असेल तर तो नष्ट करण्यासाठी आपण प्रयत्न करुया.

संकलक :  राजेंद्र पवार
     ९८५०७८११७८

 

मंगळवार, १५ डिसेंबर, २०२०

! क्रांतिकारक राजेंद्र लाहिरी स्मृतिदिन !!(१७ डिसेंबर

 !!  क्रांतिकारक राजेंद्र लाहिरी स्मृतिदिन !!(१७ डिसेंबर )



           राजेंद्र लाहिरी जन्म-२९ जून १९०१ मृत्यू:१७ डिसेंबर१९२७ पूर्ण नाव राजेंद्र नाथ लाहिरी , एक भारतीय क्रांतिकारक होते. ते काकोरी कट आणि दक्षिणेश्वर बॉम्बस्फोटामागील मास्टरमाइंड होते. ते हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे सक्रिय सदस्य होते.त्यांचा हेतू  ब्रिटीशांना भारतातून हाकलून देणे हा होता.
                   दक्षिणेश्वर बॉम्बस्फोटाच्या घटनेत लाहिरीने भाग घेतला आणि नंतर ते फरार झाले. ते काकोरी रेल्वे दरोड्यात मास्टरमाइंड होते. क्रांतिकार्याला लागणारा पैसा जमवण्यासाठी त्यांनी रेल्वेतून नेला जाणारा सरकारी खजिना ९ ऑगस्ट१९२५ रोजी काकोरी या उत्तर प्रदेशातील स्टेशनजवळ लुटला. यालाच "काकोरी  कट " म्हटले जाते.बंगालच्या दक्षिणेश्वरच्या  बॉम्ब प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आणि  याचप्रकरणात त्यांना दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा झाली.
          राजेंद्र लाहिरी यांना १७ डिसेंबर १९२७ रोजी उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्हा कारागृहात फाशी देण्यात आले.
    राजेंद्र लाहिरी यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
संकलक : राजेंद्र पवार
       ९८५०७८११७८


!! विजय दिवस !!(१६ डिसेंबर )

 

          !!  विजय दिवस !!(१६ डिसेंबर )



            विजय दिवस --१६ डिसेंबर १९७१ रोजी भारताने पाकिस्तानवर  विजय संपादन केला.  हे युद्ध संपल्यानंतर ९३००० पाकिस्तानी सैन्याने आत्मसमर्पण केले. १९७१च्या युद्धात भारताने पाकिस्तानला कठोरपणे पराभूत केले, त्यानंतर पूर्व पाकिस्तान स्वतंत्र झाला, जो आता बांगलादेश म्हणून ओळखला जातो. हे युद्ध भारतासाठी ऐतिहासिक असल्याचे सिद्ध झाले.या विजयामुळे  प्रत्येक  भारतीय नागरिकाची छाती अभिमानाने फुलून आली.
   या विजयाप्रित्यर्थ१६ डिसेंबर हा दिवस 'विजय दिन' म्हणून साजरा केला जातो. १९७१ च्या युद्धात सुमारे ९९०० भारतीय सैनिक शहीद झाले, तर,१८५१ सैनिक जखमी झाले.
          १ डिसेंबर रोजी पाकिस्तानी कमांडर लेफ्टनंट जनरल ए.ए.के. नियाझी व  कमांडर लेफ्टनंट जनरल जगजितसिंग अरोरा यांना युद्ध कैदी बनवले होते. १९७१ च्या युध्दात शहीद झालेल्या जवानांना विनम्र आदरांजली.
संकलक: राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८

रविवार, १३ डिसेंबर, २०२०

!! टी.एन. शेषन जन्मदिन !!(१५ डिसेंबर )

 


!! टी.एन. शेषन जन्मदिन !!(१५ डिसेंबर )



         तिरुनेल्लरी नारायण अय्यर शेषन तथा टी.एन. शेषन जन्म : १५ डिसेंबर १९३२ मृत्यू : १० नोव्हेंबर २०१९ हे १९९० ते १९९६ या काळात भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. त्यांनी भारताच्या पूर्वीच्या निवडणूक प्रक्रियेतील अनेक गैरमार्ग व दोष दूर केले. उदाहरणार्थ, त्यांनी गैरप्रकार होत असलेल्या बिहार राज्याच्या निवडणुका चारवेळा रद्द केल्या.
        शेषन यांना सन १९९६मध्ये उत्कृष्ट शासकीय सेवेसाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आहे.टी. एन. शेषन यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
      संकलक:राजेंद्र पवार
     ९८५०७८११७८



!! महाराष्ट्र वाल्मिकी -ग.दि. माडगूळकर स्मृतिदिन !! (१४ डिसेंबर )

 


!! महाराष्ट्र वाल्मिकी -ग.दि. माडगूळकर स्मृतिदिन !!   (१४ डिसेंबर )



            माडगूळकर गजानन दिगंबर : जन्म : शेटफळे-सांगली जिल्हा, १ ऑक्टोबर १९१९ मृत्यू : पुणे, १४ डिसेंबर १९७७. हे विख्यात मराठी कवी व पटकथा–संवाद-लेखक होते.त्यांचे शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे झाले. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. पुढे घरच्या गरीबीमुळे चरितार्थासाठी चित्रपटव्यवसायात आले त्यांना लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. तिचा येथे उपयोग झाला. ‘हंस पिक्चर्स’ ह्या चित्रसंस्थेच्या, मा. विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी (१९३८) ह्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकीर्दीचा आरंभ केला. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. त्या निमित्ताने खांडेकरांच्या संग्रहातली पुस्तके त्यांना वाचावयास मिळाली; खूप लिहावेसे वाटू लागले; त्यांच्या कवितालेखनालाही वेग आला. नवयुग चित्रपट ह्या चित्रसंस्थेत के. नारायण काळे ह्यांच्या हाताखाली साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगूळकरांना मिळाली, तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात, हे त्यांना अगदी जवळून पहावयास मिळाले. तसेच आचार्य अत्रे ह्यांच्या सोप्या पण प्रासादिक गीतरचनेचा आदर्श त्यांच्या समोर राहिला. पुढे नवहंस पिक्चर्सच्या भक्त दामाजी (१९४२) आणि पहिला पाळणा (१९४२) ह्या चित्रपटांची गीते लिहिण्याची संधी मिळाली. पुढे राजकमल पिक्चर्सच्या लोकशाहीर रामजोशी (१९४७) ह्या चित्रपटाची कथा-संवाद आणि गीते त्यांनी लिहीली; त्यात एक भूमिकाही केली. ह्या चित्रपटाला फार मोठी लोकप्रियता लाभली. त्यानंतर कवी आणि लेखक अशा दोन्ही नात्यांनी माडगूळकर हे मराठी चित्रसृष्टीचा एक भक्कम आधार बनले. गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून दीडशेहून अधिक मराठी आणि कथासंवादकार म्हणून पंधरा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गीते चैत्रबन (१९६२) ह्या नावाने संग्रहित आहेत, तसेच त्यांनी लिहिलेल्या काही मराठी चित्रकथाही पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाल्या आहेत (तीन चित्रकथा, १९६३). युद्धाच्या सावल्या (प्रयोग, १९४४) ह्या नावाचे एक नाटक त्यांनी लिहिले होते, तथापि ते फारसे यशस्वी झाले नाही. त्यांच्या उल्लेखनीय पुस्तकांपैकी काही अशी : कविता–जोगिया (१९५६), चार संगीतिका (१९५६), काव्यकथा (१९६२), गीत रामायण (१९५७), गीत गोपाल (१९६७), गीत सौभद्र (१९६८). कथासंग्रह–कृष्णाची करंगळी (१९६२), तुपाचा नंदादीप (१९६६), चंदनी उदबत्ती (१९६७). कादंबरी–आकाशाची फळे (१९६०). आत्मचरित्रपर–मंतरलेले दिवस (१९६२), 'अजून गदिमा' आणि वाटेवरल्या सावल्या (१९८१).
              माडगूळकरांच्या कवितेवर ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम आदी संतांच्या कवितेप्रमाणेच पंडिती आणि शाहिरी कवितेचेही सखोल संस्कार झाले होते, ह्याचा प्रत्यय त्यांनी चित्रपटांसाठी लिहिलेल्या सुंदर घाटाच्या, सोप्या परंतु प्रभावी गीतांतूनही येतो. त्यांच्या कवितेतील अस्सल मराठमोळेपणामागेही हेच संस्कार उभे असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे लोकगीतांच्या लोभस लयतालांनी त्यांची गीते नटलेली असत. उत्तम समरगीते आणि बालगीतेही त्यांनी लिहिली. मराठी रसिकांनी माडगूळकरांच्या काव्यरचनेला मनःपूर्वक प्रतिसाद दिला आणि त्यांच्या गीत रामायणाने तर कीर्तीचा कळस गाठला; त्यांना ‘महाराष्ट्र-वाल्मीकी’ ही सन्माननीय पदवी लोकांनी स्वयंस्फूर्तीने दिली. गीतरामायणाच्या गायनाचे शेकडो कार्यक्रम झाले व अजूनही होत आहेत. अन्य भारतीय भाषांत त्याचे अनुवादही झाले.
                  ग.दि. माडगूळकर हे आधुनिक काळतील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते. ग.दि.माडगूळकर हे गद्य व पद्य दोन्ही क्षेत्रांत प्रसिद्ध आहेत. संत कवी नसले तरी त्यांचे गीत रामायण फार लोकप्रिय आहे. त्यांच्या गीत रामायणाने अखिल महाराष्ट्राला वेड लावले आहे. गदिमा भावकवीही आहेत. त्यांच्या काव्यावर संत काव्य आणि शाहिरी काव्य या दोन्हींचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या लावण्या व चित्रपट गीतेही प्रसिद्ध आहेत.
              ग .दि. माडगूळकर यांनी 'भूमिकन्या सीता'या नाटकातील पदेसुद्धा लिहिली होती. 'मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणीवाणी', 'मानसी राजहंस पोहतो','सुखद या सौख्याहुनी वनवास' ही त्यातील प्रसिद्ध गाणी आहेत. त्यांचे संगीत स्नेहल भाटकर यांनी दिले होते, आणि गायिका ज्योत्स्ना भोळे यांनी ती गायिली होती.
               त्यांच्या चित्रकथा वैविध्यपूर्ण असून त्यांचे संवाद सोपे पण प्रत्ययकारी आहेत. चित्रपटतंत्राची त्यांची अत्यंत सूक्ष्म जाण त्यांतून लक्षात येते. त्यांनी लिहिलेल्या आणि विशेष गाजलेल्या चित्रपटांत पुढचं पाऊल (पटकथा, संवाद, गीते १९५०), बाळा जो जो रे (१९५१), लाखाची गोष्ट (१९५२), पेडगावचे शहाणे (१९५२), ऊन पाऊस (१९५४), मी तुळस तुझ्या अंगणी (१९५५), जगाच्या पाठीवर (१९६०), संथ वाहते कृष्णामाई (१९६७) ह्यांचा समावेश होतो. (कथा, पटकथा, संवाद, गीते त्यांपैकी सर्व वा काही).
            तूफान और दिया (१९५६), दो आँखे बारह हाथ (१९५७), गूँज उठी शहनाई (१९५९) हे त्यांनी लिहिलेले उल्लेखनीय हिंदी चित्रपट.
            माडगूळकर हे उत्तम चरित्र अभिनेतेही होते. पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, वऱ्हाडी आणि वाजंत्री (१९७३) ह्या चित्रपटांत त्यांनी केलेल्या भूमिका संस्मरणीय ठरलेल्या आहेत. त्यांच्या जोगिया, मंतरलेले दिवस, चैत्रबन इ. अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली. भारत सरकारने पद्मश्री देऊन (१९६९) त्यांचा सन्मान केला. १९७३ मध्ये यवतमाळ येथे भरलेल्या मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेचे ते काही काळ नियुक्त सदस्य होते; तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाचेही ते सदस्य होते. त्यांच्या नावाचे 'गदिमा प्रतिष्ठान' काढण्यात आले आहे.
               माडगूळकर पुणे येथे निधन पावले. माडगूळकर यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
           संकलक : राजेंद्र पवार
          ९८५०७८११७८
 

शनिवार, १२ डिसेंबर, २०२०

! अभिनेत्री स्मिता पाटील स्मृतिदिन !! (१३ डिसेंबर )

 

!! अभिनेत्री स्मिता पाटील स्मृतिदिन !! (१३ डिसेंबर )




              स्मिता पाटील जन्म:जन्म १ ऑक्टोबर १९५५ मृत्यू: १३ डिसेंबर १९८६ या  चित्रपट, दूरदर्शन आणि नाट्यगृहातील भारतीय अभिनेत्री होत्या.त्यांनी  ८०हून अधिक हिंदी , मराठी , गुजराती , 
मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये   काम केले. त्यांच्या कारकीर्दीत त्यांना दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार मिळाले . १९८५ मध्ये भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री  हा पुरस्कार  त्यांना मिळाला होता.
त्यांचे गाजलेले चित्रपट
मंथन,भूमिका, आक्रोश,चक्र,चिदम्बरम,मिरच मसाला(mirchi masala)
स्मिता पाटील यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
संकलक : राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८

शुक्रवार, ११ डिसेंबर, २०२०

!!पद्मविभूषण शरद पवार यांचा आज वाढदिवस !! (१२ डिसेंबर )

 

!!पद्मविभूषण शरद पवार यांचा आज
   वाढदिवस !!  (१२ डिसेंबर )




   शरद पवार जन्म:१२ डिसेंबर १९४०
     राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  अध्यक्ष, महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री, देशाचे संरक्षण मंत्री, कृषिमंत्री, राज्यातील महाविकास आघाडीचे शिल्पकार, राजकारणातील चाणक्य,यशवंतराव चव्हाण साहेबांचे राजकीय वारसदार शरद पवार यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांच्याविषयी थोडीशी माहिती......
           राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन वाटचाल करणारे व्यक्तिमत्त्व आहे. पुरोगामीत्वाचा वारसा त्यांना त्यांच्या माता पित्याकडून मिळालेला आहे.त्यांचे वडील गोविंदराव हे नीरा कॅनॉल सहकारी सोसायटीचे बराच काळ सेक्रेटरी तर बारामती येथे निघालेल्या सहकारी बँकेचे पहिले व्यवस्थापक होते. आई शारदाबाई पवार या पुणे जिल्हा लोकल बोर्डाच्या शिक्षण समितीच्या प्रमुख होत्या. त्यांची कन्या सुप्रिया सुळे ह्या लोकसभेच्या सदस्या आहेत ,उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुतणे तर विधानसभा सदस्य रोहित पवार हे नातू होत.
         शरद पवार हे अपराजित योध्दा म्हणूनच ओळखले जातात. शरद पवार यांचेकडे प्रचंड संघटन कौशल्य आहे.सन१९५६ मध्ये ते शाळेत असताना त्यांनी गोवा मुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला. तेथून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे खऱ्याअर्थाने त्यांना राजकारणात  संधी मिळाली. या संधीचे सोनं त्यांनी केले.१९६७ ला बारामती मतदार संघातून राज्य विधानसभेवर निवडून गेले.१९७२,१९७८, मध्ये विधानसभा निवडणूका लढल्या.१९८४ मध्ये लोकसभेची निवडणूक लढली होती. त्यांना राज्यातच रस असल्याने पुन्हा १९८५ ची विधानसभेची निवडणूक लढली.
       शरद पवार हे विधानसभा तसेच लोकसभा अशा दोन्हीही ठिकाणी विरोधी पक्षनेते होते. क्रिकेट हे त्यांच्या आवडीचे क्षेत्र ,ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळ,आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत. शरद पवार यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्यही उल्लेखनीय आहे. ते आशिया खंडातील सर्वात मोठया असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तर बारामती येथे असणाऱ्या विद्या प्रतिष्ठान, कृषी विकास प्रतिष्ठान, विद्या प्रसारक मंडळ शिवनगरशी  संबंधित आहेत. शरद पवार यांचा स्पर्श झाला नाही असे एकही क्षेत्र सापडणार नाही.
          शरद पवार यांनी घेतलेले काही महत्वाचे निर्णय ....
१)संरक्षण खात्यात महिलांना प्रवेश.
२)शेतकऱ्यांना कर्जमाफी
३)लघुउद्योगांना सवलती
४)मुंबई बॉम्बस्फोटानंतर लगेचच
  पुनर्वसन
५)लातूर भूकंप पुनर्वसन
६)क्रीडा विभागात आमूलाग्र बदल.
७)गळीत हंगामकाळ निश्चिती
८)सर्व महाविद्यालयाना समान फी.
९)मराठवाडा विद्यापीठाला डॉ.
  बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव.
  शरद पवार यांच्याकाळातील काही महत्वाचे प्रकल्प......
१)पाणी वापर नवनवीन तंत्राचा विकास
करण्यासाठी प्रकल्प
२)सहकारावर भरपूर जोर
३)औद्योगिक विकासासाठी प्रकल्प.
४) कृषी विद्यापीठातल्या संशोधनासाठी
  मदत
५)अन्नधान्यउत्पादन तसेच तेलबिया आणि ऊस उत्पादन वाढीसाठी खास  प्रकल्प योजना
६)आदिवासींच्या सर्वांगीण
    विकासासाठी योजना
७)एम.आय.डी.सी. अधिक प्रभावी करुन
  उद्योगधंद्यांना प्रोत्साहन.  
   केवळ बारामतीचाच नव्हे,तर हा महाराष्ट्राचा "राजा" आज ना उद्या भारताचा सुध्दा "राजा" होऊ शकणारा हा नेता सध्या तरी तब्बेतीने अस्वस्थ आहे.८१ वर्षात पदार्पण करणारा नेता मनाने खूप उमेद बाळगून आहे. प्रत्यक्ष कामासाठी धावपळ करण्याकरता तब्बेतीची साथ हवी. आपल्या राज्याचे तसेच देशाचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी परमेश्वराने त्यांना उदंड आयुष्य द्यावे हीच प्रार्थना.
      शरद पवारसाहेब  यांना ऐंशीव्या वाढदिवसाच्या निमित्ताने लक्ष लक्ष शुभेच्छा.
              राजेंद्र पवार
              उपाध्यक्ष
        राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
         सातारा जिल्हा
         ९८५०७८११७८

बुधवार, ९ डिसेंबर, २०२०

!! युनिसेफ स्थापना !! (११ डिसेंबर )

 


!! युनिसेफ स्थापना !! (११ डिसेंबर )




             संयुक्त राष्ट्र बाल निधी ( इंग्रजी : युनायटेड नेशन्स चाइल्ड फंड , शॉर्ट नेम: युनिसेफ ) ची स्थापना करण्याचे प्राथमिक उद्दीष्ट दुसर्‍या महायुद्धात नष्ट झालेल्या राष्ट्रांच्या मुलांना अन्न व आरोग्य सेवा पुरविणे हा होता.  युनिसेफची स्थापना  ११ डिसेंबर १९४६ रोजी झाली.युनिसेफचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे .  युनिसेफला१९६५ मध्ये  शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . इंदिरा गांधी शांतता पुरस्कार देऊनही  या संस्थेला  गौरवण्यात आले. युनिसेफची १२० हून अधिक शहरांमध्ये कार्यालये आहेत.
युनिसेफचे पुरवठा विभाग कार्यालय कोपेनहेगन , डेन्मार्क येथे आहे . जीवन बचत करणारी लस , एचआयव्ही ग्रस्त मुलांसाठी व त्यांच्या मातांसाठी औषधे, कुपोषणाच्या उपचारांसाठी औषधे, प्रासंगिक निवारा इत्यादीसारख्या महत्वाच्या वस्तूंचे वितरण करण्याचे हे प्राथमिक ठिकाण आहे. ३७ सदस्यांचा वर्किंग ग्रुप युनिसेफच्या कामावर देखरेख ठेवतो. ते धोरणे बनवते आणि त्याच वेळी ते आर्थिक आणि प्रशासकीय योजनांशी संबंधित प्रोग्रामना मान्यता देते. सध्या युनिसेफ प्रामुख्याने पाच प्राधान्यांवर लक्ष केंद्रित करते. मुलांचा विकास, मूलभूत शिक्षण, लैंगिक समानता (यात मुलींचे शिक्षण समाविष्ट आहे), बाल हिंसाचार प्रतिबंध, शोषण, बाल कामगार निषेध, एचआयव्ही एड्स , मुलांच्या हक्कांसाठी वैधानिक संघर्ष करण्यासाठी कार्य करते.

संकलक: राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८

!! चक्रवर्ती राजगोपालाचारी जन्मदिन !!(१० डिसेंबर )

 

!! चक्रवर्ती राजगोपालाचारी जन्मदिन !!(१० डिसेंबर )



    चक्रवर्ती राजगोपालाचारी जन्म:१० डिसेंबर १८७८ मृत्यू:२५ डिसेंबर १९७२
       चक्रवर्ती राजगोपालाचारी ज्यांना राजाजी देखील म्हटले जाते.  ते वकील , लेखक , राजकारणी आणि 
तत्त्वज्ञ होते. ते स्वतंत्र भारताचे दुसरे गव्हर्नर जनरल आणि पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते. ते १०एप्रिल १९५२ ते १३ एप्रिल १९५६ पर्यंत मद्रास प्रांताचे मुख्यमंत्री होते. ते दक्षिण भारतातील कॉंग्रेसचे प्रमुख नेते होते , परंतु नंतर ते कॉंग्रेसचे कट्टर विरोधी ठरले आणि त्यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. ते गांधीजींचे जवळचे होते . ते दक्षिण भारतात राहत होते .हिंदीच्या प्रचारासाठी  त्यांनी खूप काम केले. त्यांना भारत सरकारने १९५४ साली" भारतरत्न"पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना
जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
संकलक:राजेंद्र पवार
             ९८५०७८११७८

मंगळवार, ८ डिसेंबर, २०२०

!! के. शिवराम कारंत (ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कन्नड साहित्यिक ) स्मृतिदिन !! (९ डिसेंबर

 


!! के. शिवराम कारंत (ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कन्नड साहित्यिक )
स्मृतिदिन !! (९ डिसेंबर



                शिवराम कारंथ जन्म : १० ऑक्टोबर १९०२ मृत्यू : ९ डिसेंबर १९९७ हे ज्ञानपीठ पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कन्नड भाषेतील साहित्यकार होते. कर्नाटकातील यक्षगान या लोककलेचे पुनरुज्जीवन कारंतांनी केले. त्यांनी लिहिलेल्या ४७ कादंबऱ्या हे केवळ आधुनिक कन्नड साहित्यासच दिलेले योगदानच नाही, तर भारतीय साहित्यविश्वास दिलेली समृद्धी आहे.
          कारंतांच्या मराठीत अनुवादित झालेल्या कादंबऱ्या
१)अशी धरतीची माया
२)कुडिय
३)चोमा महार
४)डोंगराएवढा
५)तनमनाच्या भोवऱ्यात
६)धर्मराजाचा वारसा
७)मिटल्यानंतर
     के.शिवराम कारंत यांनास्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
     संकलक: राजेंद्र पवार
     ९८५०७८११७८

सोमवार, ७ डिसेंबर, २०२०

!! नानासाहेब पेशवे जन्मदिन !! (८ डिसेंबर )

 !! नानासाहेब पेशवे जन्मदिन !! 

    (८ डिसेंबर )

   जन्म:८ डिसेंबर १७२० मृत्यू :२३ जून १७६१



                    बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे हे थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र होते. ते थोरल्या बाजीराव यांच्या नंतर मराठा साम्राज्याचे पेशवे बनले. त्यांच्याच काळात मराठा साम्राज्याने यशाचे उत्तुंग शिखर गाठले आणि मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. नानासाहेबांनी पुणे शहराच्या उन्नतीसाठी खूप मोठे योगदान दिले.

            नानासाहेब पेशवे यांना  २५ जुन १७४० रोजी छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्रे सातारा दरबारी प्रदान केली. त्यांच्या पेशवाईच्या काळात मराठा साम्राज्याने बाळसे धरले. मराठ्यांनी उत्तर भारतात जरब बसवली आणि साधारण इ.स. १७६० च्या आसपास मराठा साम्राज्य ही भारतीय उपखंडातील एक बलाढ्य अशी ताकत होती. परंतु १७६१च्या तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचा झालेला पराभव हा त्यांच्या सोनेरी कारकिर्दीला डागाळून टाकणारा ठरला. त्याच पराभवाच्या धक्याने २३ जून १७६१ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

       बाळाजी बाजीरावांचा जन्म ८ डिसेंबर १७२० रोजी पुणे येथे झाला. थोरले बाजीराव पेशवे हे त्यांचे वडील. लहानपणापासूनच बाळाजी बाजीरावांना घरातील लोक व खुद्द छत्रपती नानासाहेब म्हणून बोलवू लागले. छत्रपतींची त्यांच्यावर मर्जी होती. थोरल्या बाजीरावांच्या निधनानंतर शाहू छत्रपतींनी पेशवाईची वस्त्रे नानासाहेबांना दिली. बाळाजी बाजीरावांनी त्यांच्या पूर्वीच्या दोन पेशव्यांसारखेच मराठा छत्रपतींच्या संमतीने साम्राज्यवादी धोरण अवलंबिले. शाहू छत्रपतींनी मराठा राज्याची सर्व कायदेशीर व प्रत्यक्ष कारभाराची सूत्रे त्यांच्याकडे सोपवली व स्वतः मराठा साम्राज्याचे नामधारी प्रमुख राहिले. इ.स. १७४९ साली शाहू छत्रपतींचा मृत्यू झाल्यानंतर बाळाजी मराठा राज्याचा सर्वसत्ताधीश झाला. शाहूचा वारस रामराजा हा सातारा येथे नामधारी छत्रपती म्हणून छत्रपतीच्या गादीवर होता तरीही बाळाजीने छत्रपतीच्या विशेष राजकीय हक्कांचा वापर सुरू केला. त्यामुळे पेशवे व रामराजे यांच्यात दिनांक २५ सप्टेंबर, इ.स. १७५० रोजी सांगोला येथे करार झाला. त्यानुसार पेशव्यांनी छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा असे ठरले. बाळाजी बाजीरावाने छत्रपतींना दरसाल पासष्ट लाख रुपये द्यावेत असेही या करारान्वये ठरले.

        नानासाहेब पेशवे यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.

     संकलक: राजेंद्र पवार

        ९८५०७८११७८

रविवार, ६ डिसेंबर, २०२०

!!  सशस्त्र सेना झेंडा दिवस !! (७ डिसेंबर )



      ७ डिसेंबर  १९४९ या दिवसापासून देशात सशस्त्र दरवर्षी सशस्त्र झेंडा सेना  दिन  साजरा केला जातो. देशातील जनता व इतर सामाजिक संस्था ध्वजनिधी जमा करतात. या निधीचा वापर देशाचे रक्षण करीत असताना धारातीर्थी पडलेल्या वीर जवानांच्या, पत्नींच्या व मुलांच्या, माजी सैनिकांच्या कल्याणासाठी केला जातो. जिल्हा सैनिक बोर्ड  शाळा, कॉलेज व विविध संस्थांच्या मदतीने निधीची रक्कम गोळा करते. निधी देणारांना लाल, निळा व गडद निळ्या रंगांमध्ये असलेले कागदाचे टोकन फ्लॅग दिले जातात. फ्लॅगचे हे तीन रंग म्हणजे जिल्हा सैनिक बोर्ड, राज्य सैनिक बोर्ड व केंद्रिय सैनिक बोर्ड यांचे प्रतीक आहेत.
    आपणही ध्वजनिधीमध्ये योगदान देऊया.
     संकलक:राजेंद्र पवार
       ९८५०७८११७८

शनिवार, ५ डिसेंबर, २०२०

! डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन !! (६ डिसेंबर )

 

  !!     डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन  !!
  (६ डिसेंबर )



डॉ. भीमराव रामजी आंबेडकर जन्म --१४ एप्रिल १८९१ मृत्यू – ६ डिसेंबर १९५६   ते बाबासाहेब आंबेडकर नावाने ओळखले जात. आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हीतून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या.आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यांनी नंतरच्या जीवनात राजकीय कार्यांवर लक्ष केंद्रित केले; ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित करणे, दलितांसाठी राजकीय हक्क व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला१९५६ मध्ये त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला, व लक्षावधी दलितांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. १९५० च्या दशकात बौद्ध भिक्खुंनी त्यांना बोधिसत्व ही बौद्ध धर्मातील उपाधी प्रदान केली. इ.स. १९९० साली त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला.डॉ. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके  उभी राहिली आहेत.
भारतीय संविधान निर्माते,दलित उद्धारक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
       संकलक: राजेंद्र पवार
               ९८५०७८११७८

 


!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...