!! किसान दिन !! (२३ डिसेंबर )
भारत हा खेड्यांचा देश आहे आणि सर्व ग्रामीण समुदायात मोठ्या प्रमाणात शेतीची कामे केली जातात , म्हणूनच भारताला शेती प्रधान देश असे म्हटले जाते. सुमारे ७०% भारतीय लोक शेतकरी आहेत. ते आपल्या देशाचा मुख्य कणा आहेत. ते अन्न पिके आणि तेलबियानिर्मिती करतात.
ते व्यापारी पिकांचे उत्पादक आहेत. ते अन्य उद्योगांसाठी काही कच्चा माल तयार करतात, म्हणूनच ते आपल्या राष्ट्राचे प्राण आहेत. भारतातील सुमारे ७०% लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहेत, भारतीय शेतकरी दिवसरात्र काम करतात. तो बियाणे पेरतो आणि रात्री पिकांचे रक्षण करतो. तो आपल्या पशुधनाची काळजी घेतो. आजकाल अनेक राज्यात पशूंच्या
(बैलांच्या) सहाय्याने शेती जवळपास नष्ट झाली आहे.शेतीत यांत्रिकीकरण आले आहे.आज सर्वच कामे यंत्रावर होत आहेत. उदा. शेतीची पूर्व मशागत, आंतर मशागत,औषध फवारणी, हार्वेस्टिंग, मळणी इत्यादी.शेतकऱ्यांना त्याची पत्नी, मुले त्यांच्या कामात मदत करतात त्यांच्याही श्रमाचा विचार व्हायला हवा.
भारतीय शेतकरी गरीब आहे. त्याचे दारिद्र्य जगभर प्रसिद्ध आहे. शेतकरी दोन वेळचं अन्नही मिळवू शकत नाही. तो आपल्या मुलांना चांगले शिकवू शकत नाही. तो आपल्या मुलामुलींसाठी योग्य कपडे विकत घेऊ शकत नाही. तो आपल्या पत्नीला दागिने घालण्याचा आनंद देण्यास असमर्थ आहे. सावकार शेतकऱ्यांना त्रास देतात. थोडक्यात शेतकऱ्यांची स्थिती दयनीय आहे.शेतकरी कर्जात जन्माला येतो आणि कर्जातच मरतो.
शेतकऱ्यांची ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे यासाठी शासन स्तरावर काही गोष्टी करणे आवश्यक आहे. आता जग ही बाजारपेठ झाली आहे.जगात कशाची मागणी आहे तसा पुरवठा करता आला पाहिजे. आपला माल उच्च दर्जाचा असला पाहिजे.बऱ्याच वेळा मालाची गुणवत्ता राखता न आल्याने जागतिक बाजारपेठेत आपला माल रिजेक्ट झाला आहे. आज बाजारात अधिक किंमतीला माल खरेदी करणारा ग्राहक आहे. उत्पादक ते ग्राहक यामधील साखळी कमी करता आली पाहिजे. आज कृषी विधेयकावरुन गोंधळ चालू आहे. काळानुसार काही बदल अपरिहार्य असतातच.१९६० च्या दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निर्मिती झाली. व्यापाऱ्यांपेक्षा चांगला भाव लोकांना मिळू लागला. आज काही गोष्टी कालबाह्य झाल्या त्यामुळे काही बदल अपेक्षित असतातच. परंतु भविष्यात शेतकऱ्यांच्या हिताला बाधा येणार नाही ना याचीही काळजी शासन स्तरावर घेतली गेली पाहिजे.खरतर शेतकरी स्मार्ट झाला पाहिजे.शेतकऱ्यांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोनही बदलला पाहिजे. इंडस्ट्रीप्रमाणे शेती झाली पाहिजे. व्यापारी शेतकऱ्यांना लुटतात.शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले पाहिजे यासाठी हमीभाव तर पाहिजेच. त्याला शेतीसाठी संरक्षित पाणी, अप्रोच रोड, वाहतूक व्यवस्था, शितसाखळी, तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, विजेची सोय ,कर्ज सुविधा इत्यादी.
आपण आशा धरुयाकी हे बदल लवकर घडून येतील. शेतकऱ्याला समाजात मान सन्मान मिळेल. सीमेवर जसं सैनिक अहोरात्र पारा देत असतो म्हणून आपण आपल्या घरी सुरक्षित असतो अगदी याप्रमाणे आपला अन्नदाता रात्रंदिवस शेतात काबाडकष्ट करतो म्हणून आपण दोन वेळचं जेवण घेत असतो. जय जवान, जय किसान म्हणून चालणार नाही तर दोघांनाही सन्मानाने वागवले पाहिजे. आपल्या देशातील किसानांना किसान दिनाच्या निमित्ताने मानाचा मुजरा.
शब्दांकन -- राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा