सोमवार, ३० नोव्हेंबर, २०२०

!! जागतिक एड्स दिन !! (१ डिसेंबर)

 !! जागतिक एड्स दिन !! (१ डिसेंबर)



         दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. जगभर फैलावलेल्या एड्स(AIDS-Acqired Immune Deficiency Syndrome) या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी, यासाठी हा दिवस पाळावा असे जागतिक राष्ट्रसंघाने(UNO-United Nations Organization) घोषित केले आहे.


एचआयव्ही होऊ नये म्हणून काय करावे?

१)ताबडतोब नष्ट केल्या जातील अशा सुया व सिरिंज वापरणे.

२)रक्तदान करणा-या व्यक्तींच्या रक्त नमुन्याची चाचणी करणे

३)लैंगिक संबंधांच्या वेळी कंडोमचा वापर करणे

४)शरीरविक्रय करणा-या व्यक्तींशी शरीरसंबंध टाळावेत.

५)एकमेकांचे रेझर, टुथ ब्रश, सिरिंज, सुया वापरणं टाळावं.

६)एचआयव्ही झालेल्या स्त्रीने गर्भधारणा टाळावी.


प्रमुख लक्षणे :


१) अकारण वजनात १० टक्क्यांपेक्षा घट

२) सतत बारीक ताप, रात्रीचा घाम येणे

 ३) सतत जुलाब होणे व आजार बरा न होणे ४) तोंडात बुरशी व अन्ननलिकेत चट्टे उठणे

 ५) तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राहणारी लसिका ग्रंथींची सूज 

६)डोकेदुखी

७)थकवा

८)मळमळ आणि भूक कमी होणे

९)नागीन

१०)वारंवार तोंड येणे

११)अंगावर लालसर डाग येणे


एड्स या आजारावर पूर्ण उपचार अजून उपलब्ध नाहीत. त्यामुळे एड्स होऊ नये म्हणून काळजी घ्यावी. 


संकलक 

राजेंद्र पवार 

मोबा- ९८५०७८११७८ 


रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

! INDIA’S HERITAGE VIRTUAL HALF MARATHON !!

 ! INDIA’S HERITAGE VIRTUAL HALF MARATHON !!

       जागतिक वारसास्थळ म्हणून नोंदणी झालेल्या आपल्या देशातील स्थळांची माहिती व्हावी या उद्देशाने "माईलस्टोन फिटनेस क्लब "ने हाफ मॅरेथॉनचे आयोजन केले होते.  या मरेथॉनमध्ये २ कि.मी, ५ कि. मी, १०कि. मी.आणि २१ कि. मी.मध्ये भाग घेता येत होता.

 मी वयाच्या ६२ व्या वर्षी २१ कि. मी.मध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेचा प्रारंभ १८ऑक्टोबर पासून झालेला होता. प्रत्येक रविवारी स्पर्धा असायची, शेवटचा दिवस २९ नोव्हेंबर असा होता. यावेळी मी प्रत्येक स्पर्धा दोन तासांच्या आत  पूर्ण केली, इतकेच नव्हे तर प्रत्येक वेळी टॉप टेन मध्ये माझा नंबर आलेला आहे.


१)  सुंदरबन (प.बंगाल)                                 १८ ऑक्टोबर              ०१:५८:२५    

      



२)  व्हॅली ऑफ फ्लॉवर्स (उत्तराखंड )            २५ ऑक्टोबर             ०१:५९:०८




३)  ताजमहाल  (आग्रा)                                 ०१ नोव्हेंबर                 ०१:५४:०५




४)  खजुराहो (मध्यप्रदेश )                             ०८ नोव्हेंबर                ०१:५५:४२





५)  कुंभारगड (राजस्थान)                             १५ नोव्हेंबर                ०१:५५:०९





६)  हंपी (कर्नाटक )                                      २२ नोव्हेंबर                ०१:५७:२१





७)  काझीरंगा (आसाम )                                २९ नोव्हेंबर               ०१:५२:५५

शेवटच्या दिवसाचे सर्टिफिकेट आणि लीडरबोर्ड २ दिवसांनी येईल.




          या स्पर्धेत आमच्या कुटुंबातील अन्य ४ सदस्य सहभागी झाले होते. मुलगा डॉ.श्रीधर १० कि. मी;सून सौ. शीतल ५ कि. मी;पुतणी कु.अंजली ५ कि. मी;पत्नी सौ. कुसुम २ कि. मी.मध्ये भाग घेतला होता. मी स्पर्धेसाठी वर्णे (हायस्कूल)-अपशिंगे (मि.)- बोरगाव-नागठाणे-नागठाणे पेट्रोल पंप परत वर्णे असा मार्ग निवडला होता.फक्त एकदाच सातारा एम.आय.डी.सी. मध्ये धावलो होतो.प्रत्येक वेळी रुट सपोर्ट देण्याचे काम दादासाहेब सुतार यांनी केले होते.स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी महेश माने व चेतन साळुंखे हे दोघेही माझेबरोबर धावले. या दोघांच्यामुळे हाफ मरेथॉनचे अंतर मी विक्रमी वेळात पूर्ण केले.

       मी सेवानिवृत्तीनंतर स्पर्धेत भाग घेण्यास सुरुवात केली आणि आपणा सर्वांच्या सदिच्छामुळे यशस्वी झालो. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी व्यायामाची गरज आहे. आतातर कोरोनाचा काळ आहे त्याला सामोरे जाण्यासाठी आपली प्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे आहे. चला तर आपण सर्वजणच नियमित व्यायाम करुया, कोरोनाला हरवूया.

            राजेंद्र पवार

          ९८५०७८११७८

!! बा. भ. बोरकर जन्मदिन !! (३० नोव्हेंबर )

 


!! बा. भ. बोरकर जन्मदिन !!
     (३० नोव्हेंबर )



       बाळकृष्ण भगवंत बोरकर जन्म:३० नोव्हेंबर १९१०मृत्यू:८जुलै १९८४  प्रसिध्द कवी आणि लघुनिबंधकार बा. भ. बोरकर यांचा आज जन्मदिन. दि. ३० नोव्हेंबर १९१० रोजी गोव्यातील बोरीम(कुडचूडे) या गावी त्यांचा जन्म झाला. गोव्यात काही काळ शिक्षक असणारे बोरकर पुढे मुंबईच्या ‘विविधवृत्त’ या पत्रात काही काळ काम करीत होते.‘आमचा गोमांतक’ आणि ‘पोर्जेचा आवाज’ या पत्रांचे ते संपादक होते. कविवर्य बोरकर पुणे आणि पणजी आकाशवाणीवर कार्यक्रमांचे सूत्रधार आणि निर्माते होते. त्यांना स्वत:च्या कवी असण्याचा फार अभिमान होता. बालकवी आणि भा. रा. तांबे यांना आदर्श मानणारे बोरकर ख-या अर्थाने निसर्गकवी होते. ‘माझ्या गोव्याचा भूमीत’, ‘जपानी रमलेची रात्र’, या त्यांच्या गाजलेल्या कविता. ‘प्रतिभा’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रसह. ‘ जीवनसंगीत’, ‘दूधसागर’, ‘आनंदभैरवी’, ‘गीतासार’, ‘चित्रवाणी’, ‘कांचनसंध्या’, हे त्यांचे अन्य काव्यसंग्रह. ‘सासाय’ या त्यांच्या कोकणी भाषेतल्या कवितासंग्रहाला १९८१ चा साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला. १९६७ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ देऊन शासनाने सन्मानित केले. गोवामुक्ती आंदोलनातल्या त्यांच्या योगदानाबद्दल ‘ताम्रपट’ देऊन त्यांचा सन्मान केला गेला. महात्माजींवर ‘महात्मायन’ हे खंडकाव्य लिहू पाहणारा हा कवी आपणाला आठवतो तो त्यांच्या ‘सरीवर सरी आल्या गं, सचैल गोपी न्हाल्या गं’ अशा दिलखेचक कवितांमुळेच! ही कविताही आपणासाठी सोबत देत आहे तिचा आस्वाद घ्यावा.
     बा. भ.बोरकर यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.



     संकलक: राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८

शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०२०

!! जे.आर.डी. टाटा स्मृतिदिन !! (२९ नोव्हेंबर )

 


!! जे.आर.डी. टाटा स्मृतिदिन !!
  (२९ नोव्हेंबर )



            जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा उर्फ जे.आर.डी. टाटा जन्म:२९ जुलै१९०४ मृत्यू:२९ नोव्हेंबर  १९९३ हे भारतीय उद्योजक होते. ते पहिले भारतीय वैमानिक असून, भारतातील विमान वाहतूक उद्योगाचे जनक मानले जातात.
टाटांचा जन्म २९ जुलै १९०४ मध्ये पॅरिस, फ्रान्स येथे झाला. रतनजी दादाभॉय टाटांचे ते दुसरे पुत्र होते. मुंबईतील कॅथेड्रल ॲंड जॉन केनॉन स्कूल येथे काही वर्ष ते शिकले, पण टाटांची आई फ्रेंच असल्यामुळे त्यांचे बालपण मुख्यत: फ्रान्सातच गेले. काही कारणाने ते मॅट्रीक परीक्षेपुढे शिकू शकले नाहीत.
            इंग्लिश खाडी विमानाद्वारे पहिल्यांदा पार करणारे सुप्रसिद्ध फ्रेंच वैमानिक लुईस ब्लेरिअट यांच्या जीवनकार्याने जेआरडी खूप प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांनीही विमान शिकण्याचा ध्यास घेतला. १९२९ साली त्यांनी वैमानिकाचा परवाना मिळवला. वैमानिकाचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. १९३२ साली त्यांनी टाटा एरलाईन्स या पहिल्या भारतीय प्रवासी विमानवाहतूक कंपनीची स्थापना केली. पुढे  १९४६ साली तिचे नाव बदलून एअर इंडिया ठेवले गेले.
         वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी म्हणजे १९३८ साली ते टाटा सन्स उद्योगसमूहाचे चेअरमन बनले. ते प्रदीर्घ काळ त्या पदावर होते. त्यांनी पदभार सांभाळला तेव्हा टाटा सन्स उद्योगसमूहाच्या १४ कंपन्या होत्या. टाटांच्या काळात ९१ कंपन्यांची भर पडली. रसायन, वाहन, चहा, माहिती, हॉटेले आणि तंत्रज्ञान अशा नवीन क्षेत्रांत त्यांनी टाटा उद्योगसमूहाचा विस्तार केला. टाटांच्या पुढाकाराने  १९५६ साली कंपनीतील कामगारांच्या कल्याणासाठी खास योजना राबविण्यात आली. त्यामध्ये 'दिवसातून आठ तास काम', 'मोफत आरोग्यसेवा', 'भविष्य निर्वाह निधी' आणि 'अपघात विमा योजना' अशा पायाभूत गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. पुढे या योजना भारतीय केंद्र शासनाने सर्व उद्योग-व्यवसायांसाठी कायदेशीररित्या बंधनकारक केल्या.
                       टाटांच्या कारकिर्दीत उद्योगसमूहाच्या विस्ताराबरोबरच इतर अनेक संस्था स्थापन झाल्या. भारतात मूलभूत संशोधन व्हावे म्हणून त्यांनी  १९३६ साली टाटा समाजविज्ञान संस्था आणि  १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्था या संशोधनसंस्था स्थापण्यात पुढाकार घेतला. आशियातील पहिले कर्करोग रुग्णालय १९४१ साली मुंबईत सुरू केले.
            टाटांना त्यांच्या हयातीत अनेक पुरस्कार मिळाले. भारत सरकारने १९५७ साली पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना  गौरवले, तर  १९९२ साली त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला.
२९ नोव्हेंबर १९९३ साली वयाच्या ८९ व्या वर्षी जिनेव्हा, स्वित्झर्लंड येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.
    उद्योजक जे.आर.डी.टाटा यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
   संकलक: राजेंद्र पवार
          ९८५०७८११७८

गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२०

!! कवी हरिवंशराय बच्‍चन जन्मदिन !! (२७ नोव्हेंबर )

 


!! कवी हरिवंशराय बच्‍चन जन्मदिन !!
    (२७ नोव्हेंबर )



हरिवंशराय बच्‍चन जन्म :२७ नोव्हेंबर १९०७ मृत्यू:१८ जानेवारी २००३  हे हिंदी भाषेतील एक प्रसिद्ध कवी आणि लेखक होते. ते प्रसिद्ध हिन्दी सिने-अभिनेते अमिताभ बच्चनचे वडिल होते. त्यांचा जन्म  उत्तर प्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्याच्या बाबूपट्टी गावात झाला होता. त्यांचे एम.ए.पर्यंतचे शिक्षण अलाहाबाद येथे झाले. त्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. पदवी मिळवली.   ते अलाहाबाद विश्वविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक झाले. निवृत्तीनंतर त्यांनी भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयात हिंदी विशेषज्ञ म्हणून नोकरी केली. ते राज्यसभेच्या १२ नामनिर्देशित सदस्यांपैकी एक होते.
         हरीवंश राय बच्चन यांनी अमिताभ यांना" मन का होतो अच्छा मन का ना होतो जादा अछ्छा" हे सांगितले. त्यांची मधुशाला नावाची दीर्घ कविता प्रसिद्ध आहे. "मंदिर मस्जिद बैर कराते मेल कराती मधुशाला" अशी एक काव्यपंक्ती यामध्ये आहे.
    हरिवंश राय बच्चन यांच्या काही
    कविता
अग्निपथ
आज मुझसे बोल, बादल
आ रही रवि की सवारी
इस पार उस पार
इतने मत उन्मत बनो
ऐसे में मन बहलाता हूं
कवी का गीत
कोशीश करनेवालोंकी हार नहीं होती
गर्म लोहा
गीत मेरे
चल मर्दाने
पथ का गीत
कोशीश करनेवालोंकी हार नहीं होती ही कविता ऐकण्यासाठी व्हिडीओ लिंक देत आहे आपण कवितेचा आस्वाद घ्यावा.
      संकलक: राजेंद्र पवार
          ९८५०७८११७८

! महात्मा जोतिबा फुले स्मृतिदिन !! (२८ नोव्हेंबर )

 

!!    महात्मा जोतिबा फुले स्मृतिदिन !!  (२८ नोव्हेंबर )



          महात्मा जोतिबा फुले यांचे पूर्ण नाव जोतीराव गोविंदराव फुले. यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोर्‍हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. त्यांचे मूळ गाव कटगुण हे होते.
        महात्मा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी "सत्यशोधक समाज" नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती.  महात्मा फुलेंवर थॉमस पेन यांच्या ‘The Right Of Man’ या पुस्तकाचा प्रभाव होता.
              महात्मा फुलेंचे सामाजिक कार्य
     ऑगस्ट १८४८ मध्ये पुणे येथे बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली.
         १७ सप्टेंबर १८५१ रोजी रास्ता पेठेत मुलीची दुसरी शाळा सुरु केली.
        १५ मार्च १८५२ रोजी वेताळपेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची तिसरी शाळा सुरु केली.
      १८५२ मध्ये दलितांना शिक्षण देण्यासाठी पहिली शाळा सुरु केली.
           १८५५ मध्ये रात्रीची शाळा सुरु केली.
     १८६३ मध्ये बालहत्त्या प्रतिबंधक गृहाची स्थापना आपल्याच घरी केली.
     १८६४ मध्ये पुण्यात एक पुनर्विवाह घडवून आणला.
      १८६८ मध्ये स्वत:च्या घरातील पिण्याच्या पाण्याचा हौद अस्पृश्यांना खुला करुन परंपरागत रुढींना धक्का दिला.
      ‘शेतकऱ्यांचा आसूड‘ या आपल्या ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांचे विदारक चित्र रेखाटून शिक्षणाअभावी समाजाची स्थिती पुढीलप्रमाणे शब्दबद्ध केली.
                 विद्येविना मती गेली;
                  मतीविना नीती गेली;
                  नीतीविना गती गेली;
                   गतीविना वित्त गेले;
                   वित्ताविना शूद्र खचले;
                 इतके अनर्थ एका अविद्येने केले. 
  यातच त्यांनी शिक्षण, वसतिगृह, सिंचन, धरणे तलाव, विहिरी यासारखे उपाय सुचवले.
          २४ सष्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
                १८८० मध्ये महात्मा फुले यांनी कामगाराच्या प्रश्‍नाची वाचा फोडण्यासाठी नारायण लोखंडे यांच्या माध्यमातून बॉम्बे मिल असोसिअशन या संघटनेची स्थापना केली.
        इ.स. १८८८ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या चिरंजीवाच्या (ड्यूक ऑफ कॅनॉट) कार्यक्रमात त्यांनी ‘शेतकऱ्यांचा प्रतिनिधी’ म्हणून पारंपरिक वेशात उपस्थित राहून शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे मांडले.
            महात्मा फुले यांनी हंटर कमिशनपुढे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे अशी आग्रही मागणी केली. यामुळेच जनतेने त्यांना १८८८ साली महात्मा ही पदवी दिली.
         महात्मा फुले यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
संकलक: राजेंद्र पवार
           ९८५०७८११७८

बुधवार, २५ नोव्हेंबर, २०२०

!! भारतीय संविधान दिन. !! (२६ नोव्हेंबर)

 


!! भारतीय संविधान दिन. !!
   (२६ नोव्हेंबर)



         भारताचे संविधान (भारताची राज्यघटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा (legal basis) आहे. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व  २६ जानेवारी १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत.
    !! भारताचे संविधान !!
               उद्देशिका
   आम्ही भारताचे लोक,भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास:
       सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय; विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
    निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि
    त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करुन;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर,१९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वत:प्रत अर्पण करीत आहोत.
              जयहिंद
  संकलक:राजेंद्र पवार
     ९८५०७८११७८

               

सोमवार, २३ नोव्हेंबर, २०२०

!! यशवंतराव चव्हाण स्मृतिदिन !! (२५ नोव्हेंबर )

 

!! यशवंतराव चव्हाण स्मृतिदिन !!
(२५ नोव्हेंबर )




    --   यशवंतराव बळवंतराव चव्हाण जन्म:१२मार्च  १९१३मृत्यू: २५ नोव्हेंबर  १९८४ हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते. तर काही काळ ते भारताचे संरक्षणमंत्री सुद्धा होते. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म१२ मार्च  १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. “युगांतर”, “सह्याद्रीचे वारे”, “कृष्णाकाठ”, “ऋणानुबंध” ही त्यांची साहित्यसंपदा आहे.
       इ.स. १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. १ मे १९६० रोजी  मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर  महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली.  १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली. हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. केंद्रात १९७७-७८ मध्ये जनता पक्षाचे सरकार असताना  ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले.
       चव्हाण साहेबांनी घेतलेले महत्वाचे निर्णय....
   विकेंद्रीकरणाला महत्व, पंचायत राज योजना, कसेल त्याची जमीन,१८ सहकारी साखर कारखाने सुरु केले. पाटबंधारे व उद्योग विकासासाठी मंडळ, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, मराठी भाषेला राज्य भाषेचा दर्जा.
       काही महत्वाचे प्रकल्प....
कोयना वीज निर्मिती प्रकल्प,साहित्य-संस्कृती-कला यांच्या विकासासाठी विविध योजना, पानशेत धरणाचा प्रारंभ.
      सातारा जिल्ह्यापुरता विचार करायचा झाला तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य जिल्हा म्हणून ओळख करुन देण्यात चव्हाण साहेबांचा सिंहाचा वाटा आहे.
यशवंतराव चव्हाण यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
संकलक: राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८

!! महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार स्मृतिदिन !! (२४ नोव्हेंबर )

 

!! महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार स्मृतिदिन !! (२४ नोव्हेंबर )



   मारोतराव कन्नमवार जन्म:१०जानेवारी१९००मृत्यू:२४नोव्हेंबर१९६३  कन्नमवार यांना मुख्यमंत्री पदासाठी  फारच अल्पकाळ मिळाला.२०नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३ या कालावधीत ते मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्यांनी दळणवळण खात्याचे मंत्रीपद सांभाळले होते.
    त्यांच्याविषयी थोडीसी माहिती.....
     मुख्यमंत्रीपदाच्या अल्प कारकिर्दीतही
महाराष्ट्रातल्या जनमानसावर आपल्या कर्तृत्वाची छाप ठेवून जाणारा मुख्यमंत्री म्हणून मारोतराव कन्नमवार यांचे नाव आदराने घेतले जाते. घरोघरी वृत्तपत्रे विकणारा, रेल्वेस्टेशनवर तिकीट तपासनीस म्हणून काम करणारा, चंद्रपूरसारख्या अतिदुर्गम भागातून आलेला एक सामान्य माणूस उदंड
इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमाच्या बळावर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो ही घटना निश्चितच प्रेरणादायी आहे.
      मारोतराव कन्नमवार हे समाजातील अगदी तळाच्या वर्गातून स्वकर्तुत्वाने मोठे झालेले नेतृत्व होते. ते केवळ देशभक्तच नव्हते तर, धुरंधर राजकारणी, हाडाचे पत्रकार, प्रतिभावंत साहित्यिक, उत्तम खेळाडू व प्रभावी वक्ते होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी महत्वाचे संरक्षण प्रकल्प महाराष्ट्रात आणले. ओझरचा मिग विमान कारखाना,वरणगाव,भंडारा व भद्रावती येथील संरक्षण साहित्य उत्पादनाचे कारखाने त्यांच्या अचूक प्रयत्नामुळे महाराष्ट्रात आले. आज क्रांती घडवून आणणाऱ्या वाशी येथील खाडी पुलाची कल्पना ही कन्नमवार यांचीच देणं आहे. चिनी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातले वातावरण राष्ट्रीय प्रवृत्तीने भारुन टाकण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
त्यांनी त्याकाळी संरक्षण निधीसाठी तब्बल सात कोटी एक्यानव लाख पंचावन्न हजार रुपये जमा केले होते.
एकूणच त्यांची कारकीर्द महाराष्ट्राच्या राजकारणावर कायमस्वरूपी ठसा उमटवून गेली.
     मारोतराव कन्नमवार यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
   संकलक: राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८

रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

!! डॉ.जगदीशचंद्र बोस स्मृतिदिन !! (२३ नोव्हेंबर )

 

       !!  डॉ.जगदीशचंद्र बोस स्मृतिदिन !!
     (२३ नोव्हेंबर )  



   डॉ. जगदीशचंद्र बोस जन्म:३० नोव्हेंबर१८५८मृत्यू:२३ नोव्हेंबर१९३७ हे        एक भारतीय जीवशास्त्रज्ञ, भौतिक शास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ तसेच पुरातत्त्वज्ञ होते. भारतीय महान शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचे वनस्पती विषयावरील कार्य महान आहे
        विद्युतशक्तीवरील संशोधन....
           इंग्लंड व कोलकाता येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात १८८५ ते १९१५ अशी ३० वर्षे भौतिकशास्त्र शिकवत असतानाच जगदीशचंद्रांनी विद्युतशक्तीवर संशोधन केले. विद्युत चुंबकीय तरंगांचा शोध घेऊन त्यांनी बॅटरी बनवली. या शोधाची कीर्ती सर्वदूर पसरली. प्रसिद्ध शास्त्रज्ञ पोइंकर आणि जे. जे. थॉम्पसन यांच्या लिखाणात या शोधाचा उल्लेख आला आहे. नेमेलाइटच्या मदतीने संदेश पाठवण्यात त्यांना यश मिळाले होते.
                .इ.स. १८९६ मध्ये रेडिओ संदेश वहनाचे प्रयोग  मार्कोनीने केले व त्याआधी १८९५ मध्ये जगदीशचंद्रांनी ते केेले. हे आता अमेरिकेत मान्य झाले आहे.
       वनस्पती शास्त्रातील संशोधन.....)
विद्युतशक्तीवरील संशोधनानंतर बोस हे वनस्पतिशास्त्राकडे वळले. सचेतन आणि अचेतन वस्तूतील साम्य आणि भेद याचा त्यांनी अभ्यास केला. स्नायू, मज्जातंतू, सुखदु:ख आदी विकार यांचा वनस्पतीबाबत त्यांनी धांडोळा घेतला. डायामेट्रिकल कोन्ट्रॅक्शन अ‍ॅपरेटस, रेझोनंट रेकॉर्डर्स ही दोन उपकरणे तयार करुन त्यांनी त्यांच्या साहाय्याने थंडी, प्रकाश, विद्युत, उष्णता या घटकांचा वनस्पती व प्राणी यांच्यावरील परिणामांचा अभ्यास केला. वनस्पतींचे श्वसन, रुधिराभिसरण पद्धतीने होणारे त्यांच्यातील कार्य, अन्नाची ने-आण निरुपयोगी वस्तूंचा निचरा हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. वनस्पतीमध्ये होणार्‍या सूक्ष्म बदलांची माहिती ठेवून त्याच्या नियमित नोंदी त्यांनी ठेवल्या. त्यावर संशोधन केले. त्यांच्या याच संशोधनातून ‘वनस्पतींना संवेदना असतात’ हे त्यांनी सिद्ध केले.           वनस्पतिशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी रेझोनंट रेकॉर्डर, ऑसिलेटिंग रेकॉर्डर, कंपाऊंड लेव्हलर, क्रेसकोग्राफ, बॅलिन्सिंग अ‍ॅपरेट्स आदी उपकरणे तयार केली
      डॉ. जगदीशचंद्र बोस यांचे वयाच्या ७९व्या वर्षी २३ नोव्हेंबर, १९३७ रोजी निधन झाले.डॉ.जगदीशचंद्र बोस यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
संकलक: राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८

शनिवार, २१ नोव्हेंबर, २०२०

!! रवींद्र सदाशिव भट स्मृतिदिन !! (२२ नोव्हेंबर )

 


!! रवींद्र सदाशिव भट स्मृतिदिन !!
   (२२ नोव्हेंबर )





       रवींद्र सदाशिव भट जन्म:१७सप्टेंबर १९३९ मृत्यू:२२ नोव्हेंबर  २००८ हे मराठी संतांचे चरित्र कादंबर्‍यांतून रेखाटणारे लेखक, प्रसिद्ध कवी, नाटककार, पटकथाकार होते.त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील वाई येथे झाला होता.
    रवींद्र भट यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह म्हणून काम केले होते. 'ते माझे घर' या चित्रपटाचे  निर्माता होते. 'ते माझे घर' या चित्रपटास १९६३ सालचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे.
     रवींद्र भट यांची काही साहित्य संपदा
!! कादंबरी  !!
अनादि मी अनंत मी ,आभाळाचे गाणे,इंद्रायणीकाठी,एका जनार्दनीं,घरट्यात मी एकटा,घास घेई पांडुरंगा,बंध विमोचन राम,देवाची पाऊले, भगीरथ,भेदीले सुर्यमंडला,सत्यम शिवम सुंदरम,सागरा प्राण तळमळला,हेचि दान देगा देवा,
  !! नाटक !!
अरे संसार संसार,अवघी दुमदुमली पंढरी
असा नवरा नको गं बाई,एक कळी फुललीच नाही,केल्याने होत आहे रे,खुर्ची,
!! बालसाहित्य !!
कथा समर्थांच्या,जय गंगे भागीरथी,जय जय रघुवीर समर्थ,दिनांची माऊली,संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ,विवेकानंद,स्वातंत्र्यवीर
!! कवितासंग्रह !!
ओठावरले गाणे,खुर्ची,जाणता अ जाणता,मन गाभारा गाभारा,मोगरा फुलला,
!! ललित !!
कृष्णाकाठचा भुत्या ,योगसुखाचे सोहळे,
सारी पावले मातीचीच ,ज्ञानदेवा डोळा पाहू चला ,
     रवींद्र भट यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
संकलक : राजेंद्र पवार
    ९८५०७८११७८

गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२०

! विनोदी लेखक चिं.वि. जोशी स्मृतिदिन !! (२१ नोव्हेंबर

 

!! विनोदी लेखक चिं.वि. जोशी स्मृतिदिन !! (२१ नोव्हेंबर )





               चिंतामण विनायक जोशी जन्म :  १९ जानेवारी १८९२ मृत्यू : २१ नोव्हेंबर १९६३ हे विनोदी साहित्यासाठी प्रसिद्ध असलेले मराठी लेखक होते. पाली भाषेचा त्यांचा विशेष अभ्यास होता. बडोदे महाविद्यालयात ते पाली विषयाचे प्राध्यापक होते.
           त्यांचे वडील विनायक रामचंद्र जोशी हे शिक्षक होते. त्यांनी आगरकर यांच्या सुधारक या वृत्तपत्राचे काही काळ संपादनही केले होते. सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाणारे गणेश वासुदेव जोशी हे देखील जोश्यांच्याच घराण्यातले होते. चि.वि. जोशी यांचे बहुतांशी लेखन हे विनोदी वाङमय असले तरी ते व्यावहारिक जीवनात ते धीरगंभीर प्रवृत्तीचे गृहस्थ होते. त्यांच्या मुलाचा अकाली मृत्यू झाला होता, त्यामुळे ते दु:खी असत.
                          दूरचित्रवाणीवरची ’चिमणराव-गुंड्याभाऊ’ ही मालिका खूप गाजली. मालिकेत चिमणरावांचे काम दिलीप प्रभावळकरांनी, गुंड्याभाऊचे बाळ कर्वे यांनी, चिमणरावांच्या पत्‍नीचे (कावेरीचे-काऊचे) स्मिता पावसकर यांनी, मैना या कन्येचे काम अरुणा पुरोहित यांनी तर मोरू व राघू या पुत्रांचे काम अनुक्रमे नीरज माईणकर व गणेश मतकरी यांनी केले होते. सुषमा तेंडुलकर, लक्ष्मीकांत बेर्डे, सुलभा कोरान्ने या व इतर बऱ्याच कलाकारांनी देखील या मालिकेत काम केले होते. या मालिकेच्या निर्मात्या विजया जोगळेकर-धुमाळे होत्या.
         चिं.वि. जोशी यांच्या कथेवर सन १९४२ मध्ये 'सरकारी पाहुणे' नावाचा चित्रपट निघाला होता. त्याचे दिग्दर्शन मास्टर विनायक यांनी केले होते. चिमणरावांची भूमिका दामुअण्णा मालवणकर यांनी केली होती.
           चिं.वि.जोशींच्या, संध्या बोडस-काणे व अलका जोशी-मांडके या नातींनी संकलित केलेले ’चि.वि. जोशी - साहित्यातले आणि आठवणीतले’ हे पुस्तक कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने छापून प्रसिद्ध केले आहे. अक्षरधारा प्रकाशनाने 'विनोदाचे बादशहा चिं. वि जोशींचे निवडक विनोद' नावाचे एक अतिशय छोटे पुस्तक प्रकाशित केले आहे. विनोदांचे संकलन रवींद्र कोल्हे यांनी केले आहे.चि. वि. जोशी यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
      संकलक: राजेंद्र पवार
       ९८५०७८११७८

मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२०

!! प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे स्मृतिदिन !! (२० नोव्हेंबर )

 


  !! प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे स्मृतिदिन !! (२० नोव्हेंबर )



      केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे जन्म: १७ सप्टेंबर १८८५ मृत्यू: २० नोव्हेंबर १९७३ हे मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी होते. शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे हे केशव सीताराम ठाकरे यांचे पुत्र  तर राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे नातू होत.
             रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे जन्मलेल्या केशव ठाकरे यांचे महात्मा फुले हे आदर्श होते. महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर समाजसुधारणांबाबतच्या त्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या. म्हणूनच महात्मा फुले यांचा पुण्यातील कट्टर सनातन्यांकडून छळ झाल्यानंतरच्या काळात त्यांचा लढा पुढे चालविण्यासाठीच प्रबोधनकार पुण्यात स्थायिक झाले. या कार्यात त्यांच्या विरोधकांनी आणलेले अडथळे पार करत त्यांनी साऱ्यांची दाणादाण उडवून दिली.
                सामाजिक सुधारणा हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. त्यांनी ध्येयप्राप्तीसाठी कधीच कोणतीही तडजोड केली नाही. मग भले बालविवाह व विधवांच्या केशवपनाची अभद्र रूढी असो, देवळांमधील ब्राह्मण पुजाऱ्यांची अरेरावी, हुकूमशाही असो, अस्पृश्यतेचा प्रश्र्न असो किंवा हुंडाप्रथेचा प्रश्र्न असो; ते या सर्व आघाड्यांवर अखेरपर्यंत त्वेषाने लढत राहिले. त्यांच्या लढ्यापासून, तत्त्वांपासून त्यांना परावृत्त करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, अनेक आमिषे दाखविली पण प्रबोधनकारांनी कशालाही दाद दिली नाही. अन्याय्य रूढी, जाति-व्यवस्था आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी वक्तृत्व, लेखन व प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रे वापरून त्यांनी पुराणमतवाद्यांशी लढा दिला.
       समाजातील सर्व विकारांचे मर्म ब्राह्मणी कर्मकांडांत आहे असे त्यांचे मत होते. धार्मिक पूजेचे विधी, उपासतापास, व्रतवैकल्ये आणि धर्म या नावाखाली सर्व जातींमध्ये जे रूढ परिपाठ आहेत, ते सर्व परिपाठ ब्राह्मणांनी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी प्रस्थापित केले आहेत. या दुष्ट रूढींमुळेच स्त्रियांवर अन्याय होतो. विशेष अधिकारांपासून वंचित अशा बहुजन समाजावर अन्याय होतो. सारांश सर्व अशिक्षित जनता या रूढींखाली भरडली जाते असे वाटल्याने त्यांनी या सर्व घटकांच्या मुळावर, म्हणजेच ब्राह्मणशाहीवर घाला घातला. पुरोगामी, उदारमतवादी, सुधारक विचारांच्या ब्राह्मणांविषयी त्यांच्या मनात द्वेषभावना नव्हती. पण धंदेवाईक भट-भिक्षुकशाही व्यवस्थेचे ते टीकाकार होते. संत एकनाथांच्या जीवनावरील ’खरा ब्राह्मण’ या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी खऱ्या ब्राह्मणांची भूमिका मांडली.
       त्यांच्या कार्यख्यातीमुळे ते राजर्षी शाहू महाराजांच्या संपर्कात आले. शाहू महाराज हे स्वतः सुधारणावादी व महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे ते प्रबोधनकारांचे चाहते झाले. त्यांनी प्रबोधनकारांची परीक्षाही घेतली व नंतर जाहीरपणे सांगितले की, लाच देऊन ज्याला वश करता येणार नाही किंवा विकत घेता येणार नाही अशी एकच व्यक्ती मी पाहिली आहे, ती म्हणजे प्रबोधनकार होय.
           मुंबईत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी हुंडाप्रतिबंधक चळवळ हाती घेतली. सर्व जातींची हुंडाप्रतिबंधक स्वयंसेवक सेना स्थापन करून अनेक वरपित्यांना त्यांनी घेतलेल्या हुंड्याच्या रकमा परत देण्यास भाग पाडले. त्या काळी विवाहाआधी प्रेम करणे हा गुन्हा, व्यभिचार समजला जाई. अशा काळात त्यांनी अनेक प्रेमी युगुलांचे विवाह लावून दिले. आजच्या काळात हे संदर्भ वाचताना आपणास या गोष्टी सहज वाटतात, या समस्यांची तीव्रता आपल्या लक्षात येत नाही. त्या काळच्या कर्मठ वातावरणात समाजसुधारणांचा केवळ उच्चार करणेही अवघड होते. आजही हुंड्याविरोधात अनेक कायदे आहेत, पण हुंडा घेण्याच्या प्रवृत्तीचा समूळ नाश झालेला नाही. स्त्रियांवर अत्याचार होतच आहेत. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात या समस्येची काय तीव्रता असेल याची केवळ कल्पनाच केलेली बरी! यावरून प्रबोधनकारांचे द्रष्टेपण सिद्ध होते.
            प्रबोधनकार हे लेखक, पत्रकार व इतिहास संशोधकही होते. त्यांनी सारथी, लोकहितवादी व प्रबोधन या नियतकालिकांच्या माध्यमातून आधुनिक विचारांचा प्रसार केला. कोदंडाचा टणत्कार, भिक्षुकशाहीचे बंड, देवांचा धर्म की धर्माची देवळे, ग्रामधान्याचा इतिहास, कुमारिकांचे शाप, वक्‍तृत्वशास्त्र इत्यादी ग्रंथासह समर्थ रामदास, संत गाडगे महाराज, रंगो बापूजी, पंडिता रमाबाई, माझी जीवनगाथा (आत्मचरित्र) ही चरित्रे - अशा साहित्यसंपदेची त्यांनी निर्मिती केली. त्यांची ’खरा ब्राह्मण’ आणि ’टाकलेले पोर’ ही दोन्ही नाटके समाजसुधारणांसाठी क्रांतिकारकच ठरली. खरा ब्राम्हण या नाटकाच्या प्रयोगाला परवानगी देऊ नये अशी मागणी पुण्यातील ब्राम्हणांनी न्यायालयाकडे केली असता, न्यायाधीशांनी प्रबोधनकारांच्या बाजूने निकाल दिला होता.
           संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हा त्यांच्या जीवनातील सर्वांत महत्त्वाचा लढा होता. या वेळी त्यांचे वयही बरेच झाले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी या चळवळीला नेतृत्व दिले, काही काळ कारावासही भोगला. या चळवळीतील त्यांच्या योगदानाची बरोबरी फक्त प्रल्हाद केशव अत्रे आणि कॉम्रेड डांगे यांच्याशीच करता येईल. या चळवळीत त्यांनी वेगवेगळ्या विचारांच्या व्यक्ती आणि पक्ष यांना एकत्र बांधून ठेवण्यात यश मिळवले. ते कुशल संघटकही होते.प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
    संकलक: राजेंद्र पवार
                  ९८५०७८११७८

 

      !! इंदिरा गांधी जन्मदिन !!
     (१९ नोव्हेंबर )




              इंदिरा गांधी जन्म:१९  नोव्हेंबर १९१७ मृत्यू: ३१ ऑक्टोबर१९८४ या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. बांग्लादेशाच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता.
           लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर पंतप्रधानपदाच्या प्राप्तीसाठी त्यांना मोरारजी देसाई यांच्याशी सामना करावा लागला. त्या १९६६ मध्ये देशाच्या पाचव्या पंतप्रधान (पहिल्या महिला पंतप्रधान) बनल्या. त्यांनी पोखरण येथे पहिली अणुचाचणी घडवून आणली.
                        इंदिरा गांधींचा जन्म  अलाहाबाद येथे झाला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्र्यसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९५५ मध्ये त्या काँग्रेस कृती समितीच्या व सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्य झाल्या. फेब्रुवारी १९५९ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या. केंद्रीय मंत्रिमंडळात त्या १९६४ साली प्रथम रुजू झाल्या. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात माहिती व नभोवाणी मंत्री म्हणून त्यांनी त्यावेळी कार्य केले. लालबहादुर शास्त्री यांचा ताश्कंद येथे १९६६ मधे मृत्यू झाल्यानंतर कॉँग्रेस अध्यक्ष कामराज याच्या पाठिंब्याने १८६ मतांनी मोरारजी देसाई यांचा पराभव करून त्या २४ जानेवारी १९६६ रोजी श्रीमती इंदिरा गांधी प्रधानमंत्री म्हणून विजयी झाल्या. १४ प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि पोखरण येथे पहिली अणुचाचणी, ऑपरेशन ब्लू स्टार या त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना होत्या.
                      १९७७ साली त्यानी देशात आणीबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. यामुळे १९८० पर्यंत त्या सत्तेपासून दूर राहिल्या. १९८० च्या निवडणुकांत जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला. पण यावेळी त्यांना अशांत पंजाबचा सामना करावा लागला. ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा निर्णय खलिस्तान चळवळीला आळा घालण्यासाठी घेतला. पण अखेर त्यामुळेच त्यांच्या दोन सुरक्षारक्षकांकडून त्यांची हत्या झाली. इंदिरा गांधीना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
संकलक: राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८

 


   !  चित्रपती व्ही. शांताराम जन्मदिन !
     (१८ नोव्हेंबर )  





    व्ही.शांताराम जन्म:१८ नोव्हेंबर १९०१मृत्यू:२८ ऑक्टोबर १९९०  
                      शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच व्ही. शांताराम हे एक मराठी-हिंदी चित्रपट निर्माते, आणि दिग्दर्शक होते. शांताराम आधी प्रभात फिल्म कंपनीत होते. मात्र त्यानंतर त्यांनी राजकमल कलामंदिर ही स्वत:ची चित्रपट निर्माती कंपनी काढली.
           ते  पटकथाकार म्हणून   देखील परिचित आहेत.त्यांना १९८५ साली दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर १९९२ ला पदमभूषण पुरस्कार मिळाला.
       व्ही. शांताराम यांचे काही चित्रपट
   १)दो आँखे बारा हात
   २) झनक झनक पायल बाजे
   ३)डॉक्टर कोटणीस की अमर कहाणी
   ४) गीत गाया पत्थरोने
   ५) नवरंग
   ६)  पिंजरा
    ७) शेजारी
         व्ही. शांताराम यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
संकलक: राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८

रविवार, १५ नोव्हेंबर, २०२०

भारतीय राजकारणी लाला लजपतराय स्मृतिदिन !! (१७ नोव्हेंबर )

 

    !!   भारतीय राजकारणी लाला लजपतराय स्मृतिदिन !! (१७ नोव्हेंबर )



                 लाला लजपत राय  जन्म: २८ जानेवारी१८३६ मृत्यू:  १७ नोव्हेंबर १९२८ हे पंजाबी, भारतीय राजकारणी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. ते जहाल मतवादी नेते होते.त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात.त्यांनी पंजाब नॅशनल बँकेची स्थापना केली.
          लाला लजपत राय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या त्रयीला लाल-बाल-पाल म्हणतात.
           भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी झाल्यानंतर आणि पंजाबमधील राजकीय निदर्शनामध्ये भाग घेतल्यानंतर, मे १९०७ मध्ये कोणताही खटला न चालवता लाल लजपत रायांची मंडाले, ब्रह्मदेशात  रवानगी करण्यात आली. पण त्यांना अटक करून ठेवण्यासाठी पुरेसा पुरावा नाही, असे लॉर्ड मिंटो यांनी ठरवल्याने नोव्हेंबरमध्ये त्यांना परत जाण्याची परवानगी देण्यात आली.
          १९२० साली कोलकाता येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खास अधिवेशनात ते अध्यक्ष म्हणून निवडून आले. १९२१ मध्ये त्यांनी लोक सेवक मंडळ या ‘ना नफा’ तत्वावरील कल्याणकारी संघटनेची स्थापना लाहोर येथे केली. फाळणीनंतर या संस्थेचे कार्यालय दिल्ली येथे हलवण्यात आले. भारतभरात या संस्थेच्या अनेक शाखा आहेत.             
            १९२८ मध्ये भारतातील राजकीय परिस्थितीबद्दल अहवाल देण्यासाठी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटीश सरकारने एका आयोगाची स्थापना केली. भारतातील राजकीय पक्षांनी या आयोगावर बहिष्कार घातला, कारण या आयोगाच्या सदस्यांमध्ये एकही भारतीयाचा समावेश नव्हता. या आयोगाविरुद्ध भारतभर निदर्शने झाली.३० ऑक्टोबर १९२८ रोजी जेव्हा या आयोगाने लाहोरला भेट दिली, तेव्हा त्याविरुद्ध मूक निदर्शनांचे नेतृत्व लाला लजपत रायांनी केले. पोलिस अधीक्षक जेम्स स्कॉट यांनी या निदर्शकांवर लाठी हल्ला करण्याचे आदेश दिले.जखमी होऊन सुद्धा लाला लजपत रायांनी या जमावासमोर भाषण केले."आज मी ज्या लाठ्या खाल्ल्या, त्या म्हणजे ब्रिटीश सरकारच्या भारतातील राजवटीच्या शवपेटिकेवरील शेवटचे खिळे ठरतील, असे मी जाहीर करतो." हे त्यांचे यावेळचे उद्गार होते.
          निदर्शनांच्या वेळेला झालेल्या लाठी हल्ल्यातून लाला लजपत राय पूर्णपणे बरे झाले नाहीत आणि हृदय विकाराच्या धक्क्याने १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचे निधन झाले. स्कॉटच्या लाठीमारामुळे लालाजींचा मृत्यू ओढवला, असे डॉक्टरांचे म्हणणे होते. पण जेव्हा हा मुद्दा ब्रिटनच्या संसदेत उपस्थित करण्यात आला तेव्हा, यात आपली काहीही भूमिका नव्हती, असे ब्रिटीश सरकारने जाहीर केले. या घटनेचा सूड घेण्याचे भगतसिंग यांनी ठरवले.
           पण ऐनवेळी स्कॉटला ओळखण्यात चूक झाल्यामुळे भगतसिंगांना सॉन्डर्स या सहाय्यक पोलिस अधीक्षकावर गोळ्या झाडण्याचा इशारा करण्यात आला. १७ डिसेंबर १९२८ रोजी लाहोर मधील जिल्हा पोलिस मुख्यालयातून बाहेर पडणाऱ्या सॉन्डर्सवर राजगुरू आणि भगतसिंग यांनी गोळ्या झाडल्या. या दोघांचा पाठलाग करणारा चनन सिंग नावाचा हेड कॉन्स्टेबल चंद्रशेखर आझाद यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झाला.  लाला लजपतराय यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
संकलक: राजेंद्र पवार
       ९८५०७८११७८

शनिवार, १४ नोव्हेंबर, २०२०

!! गिजुभाई बधेका जन्मदिन !! (१५ नोव्हेंबर )

 


!! गिजुभाई बधेका जन्मदिन !!
       (१५ नोव्हेंबर )




गिजुभाई बधेका जन्म:१५ नोव्हेंबर १८८५ मृत्यू:२३ जून १९३९  गिजुभाईंनी मॉन्टेसरी शिक्षण पद्धती भारतात आणण्यास मदत केली . त्यांना "मुछली माँ" ("कुजबुजणारी आई") म्हणून संबोधले जाते. बधेका हे उच्च न्यायालयाचे वकील होते, तथापि आपल्या मुलाच्या जन्मानंतर, त्यांना बालपणातील विकास आणि शिक्षणात रस निर्माण झाला. १९२० मध्ये, बधेका यांनी "बाल मंदिर"(बालवाडी) पूर्व-प्राथमिक शाळेची स्थापना केली .
        खरतरं  गिजुभाईंना रोजीरोटी मिळवण्यासाठी आफ्रिकेला जावे लागले. गिजुभाईंच्यावर आफ्रिकेत सॉलिसिटर एसपी स्टीव्हन्स यांचा जास्त प्रभाव पडला. त्यांनी गिजुभाईंना स्वावलंबी होण्याचा सल्ला दिला. नंतरच ते मुंबईला आले, कायद्याचे शिक्षण घेतले, वकील झाले,न्यायाधीश झाले.मुलाच्या जन्मानंतर नोकरीचा त्याग केला.शिक्षणकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. थोडक्यात पूर्वप्राथमिक शिक्षण सुरु करण्याचे श्रेय गिजुभाईंना जाते. त्यांनी लहान मुलांसाठी पुस्तके लिहिली होती.
जन्मदिनाच्या निमित्ताने गिजुभाई बधेका
यांना विनम्र अभिवादन.
      संकलक: राजेंद्र पवार
          ९८५०७८११७८

       

शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०२०

 

    !!     भाऊबीज   (यमद्वितीया )  !!
      (१६ भाऊबीज )



                      कार्तिक शुद्ध द्वितीया यादिवशी भाऊबीज हा सण साजरा केला जातो. याला यमद्वितीया असेही म्हणतात. त्यामागील कारण म्हणजे या दिवशी यम आपल्या बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो. हेच कारण आहे की या दिवशी बहीण भावाला  ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.
                       असे म्हणतात की या दिवशी स्त्रियांमध्ये देवीतत्त्व जागृत होतं. अशा परिस्थितीत बहिणीच्या सानिध्यात राहण्याने तिच्या हाताने बनलेले पदार्थ खाल्ल्याने आणि तिच्याकडून ओवाळून घेतल्याने भावाला व्यावहारिक आणि आध्यात्मिक लाभ होतो.
          सण साजरा करण्याची पद्धत
या दिवशी भावाला तेल-उटणे लावून अंघोळ घालावी.
            बहिणीने भावाच्या आवडीचे पदार्थ तयार करावेत, भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे. एखाद्या स्त्रीला भाऊ नसल्यास तिने चंद्राला भाऊ मानून ओवाळावे. भावाने ओवाळणी म्हणून बहिणीला भेटवस्तू द्यायला हवी.  अपमृत्यू निवारणार्थ या दिवशी यमाला दीप दान करावे.आपणास भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
संकलक : राजेंद्र पवार
              ९८५०७८११७८

!! बालदिन !! (१४ नोव्हेंबर )

 

           !! बालदिन !! (१४ नोव्हेंबर )



      भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा १४ नोव्हेंबर हा जन्मदिवस दरवर्षी संपूर्ण भारतात त्यांचा जन्मदिवस  बालदिन म्हणून साजरा केला जातो.लहान मुलं म्हणजे पंडितजींना जीव की प्राण ,मुलं ही देवाघरची फुलं आहेत असे ते म्हणायचे.
        पंडित जवाहरलाल नेहरु मुलांमध्ये रमायचे.मुलावरच्या प्रेमामुळे ते सर्वांचे लाडके चाचा नेहरु झाले. मुलं ही देशाचं भविष्य आहेत, त्यामुळे लहान वयात त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तरच ते आदर्श नागरिक होऊ शकतील. त्याच उद्देशाने पंडितजींनी पंतप्रधान झाल्यावर लहान मुलांसाठी अनेक योजना तयार केल्या आणि त्याची अंमलबजावणी होत आहेकी नाही याकडे जातीने लक्ष दिले. अशा पंडितजींना मानाचा मुजरा.           
संकलक:  राजेंद्र पवार
       ९८५०७८११७८

!! लक्ष्मीपूजन !! (१४ नोव्हेंबर )

 

    
!! लक्ष्मीपूजन !!    (१४ नोव्हेंबर )   


    
              अश्विनातले शेवटचे दोन दिवस आणि कार्तिकाचे पहिले दोन दिवस अशी ही चार दिवसांची मुख्य दिवाळी. अश्विन वद्य‍अमावस्येला संध्याकाळी घरोघरी,
दुकानांतून सोन्या-चांदीच्या पेढ्यातून, ऑफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते.
घरातल सोन नाणं-रोकड ह्यांची पूजा करतात. व्यापारी सर्व हिशेबाच्या वह्यांच पूजन करतो. ह्या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या दिवशी आरोग्यलक्ष्मी ( केरसुणी ) हिची पण पूजा करतात.शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे
लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान
करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक
ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांचीपूजा करतात.या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून  हळद-कुंकू वाहून   घरात वापरण्यास सुरुवात करतात. लक्ष्मी पूजनानंतर फटाक्यांची अतिषबाजी करून आनंद साजरा केला जातो. प्राचीन काळी या रात्री कुबेरपूजन करण्याची रित होती. कुबेर हा शिवाचा
खजीनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि
त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करुन पुजणे हा मुळचा सांस्कृतिक
कार्यक्रम होता. परंतु गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी
कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पुजा होऊ लागली. विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यांमध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत. काही मूर्तींमध्ये कुबेर त्याची पत्‍नी
इरितिसह दाखविला आहे. यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि
त्यांची पत्‍नी इरिति यांची पूजा केली जात असावी. .कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिष्ठित केले गेले.
संकलक: राजेंद्र पवार
            ९८५०७८११७८

गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२०

!! धनत्रयोदशी !! (१३ नोव्हेंबर )

         !!    धनत्रयोदशी   !! (१३ नोव्हेंबर )




          धनत्रयोदशी : हा दिवाळीचा पहिला दिवस. दिवाळी हा सण संपन्नतेचा सण आहे. धनत्रयोदशीला धन म्हणजेच पैसा, सोने-चांदी यांची पूजा करून आपली व आपल्या कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी अशी प्रार्थना केली जाते.

        धनत्रयोदशीचे अध्यात्मिक महत्व :

धनतेरस किंवा धनत्रयोदशी ही अश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते. म्हणूनच अश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. हा दिवस दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणून ओळखला जातो. दिवाळीची सुरवात या दिवसापासून होते.

धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे…

            कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न लावून देतात. लग्नानंतरचा चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या यमलोकात परततो. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात.

             या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो असा समज आहे.

धनत्रयोदशी बद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे ‘समुद्र मंथन’. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेवांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवारनास समुद्रमंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.

आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे पूजन करतात. प्रसादास कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.

           ज्या धनामुळे आपल्या जीवनाचे पोषण सुरळीत चालू आहे, त्या धनाची या दिवशी पूजा करतात. येथे `धन’ म्हणजे शुद्ध लक्ष्मी. श्रीसूक्तात वसू, जल, वायू, अग्नि, सूर्य, यांना धनचं म्हटले आहे. ज्या धनाला खरा अर्थ आहे, तीच खरी लक्ष्मी ! अन्यथा अलक्ष्मीमुळे (पैशामुळे) अनर्थ घडतो.

          तसेच या दिवशी लोकं सोने देखील मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. या दिवशी सोने खरेदी केल्याने आर्थिक उन्नती होते असा समज आहे. जर कुणी सोने खरेदी नाही करू शकले तर ते कुठलीही एखादी वस्तू या दिवशी खरेदी करतात.आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

            संकलक: राजेंद्र पवार

            ९८५०७८१७८


मंगळवार, १० नोव्हेंबर, २०२०

!! वसुबारस !! (१२ नोव्हेंबर )

 

   !!  वसुबारस !! (१२ नोव्हेंबर )



                दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुबारस हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो. यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. ह्या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. काही स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.
    आपणास दीपावली सणाच्या हार्दिक शुभेच्छा.
     संकलक: राजेंद्र  पवार
         ९८५०७८११७८

सोमवार, ९ नोव्हेंबर, २०२०

!! मौलाना अबुल कलाम आझाद जन्मदिन (शिक्षणदिन २०११ पासून)!! (११ नोव्हेंबर )

 

       !!   मौलाना अबुल कलाम आझाद  जन्मदिन (शिक्षणदिन २०११ पासून)!!
      (११ नोव्हेंबर )    

    


 
मौलाना अबुल कलाम आझाद जन्म : ११ नोव्हेंबर १८८८ मृत्यु: २३ फेब्रुवारी १९५८  हे एक भारतीय प्रमुख राजकीय पुढारी होते. त्यांचे मूळ नाव मोहिउद्दीन अहमद असे असून अबुलकलाम म्हणजे वाचस्पती ही त्यांची पदवी होती. पुढे ‘आझाद’ (स्वतंत्र) हे टोपणनावही  ही उपाधि मिळाली. त्यांचा जन्म मक्केला झाला. वडिलांबरोबर १८९० साली ते कलकत्याला आले. पारंपरिक मुसलमानी शिक्षणपद्धतीप्रमाणे मौ. आझादांनी फार्सी, उर्दू व अरबी या भाषांचे प्रथम अध्ययन करून नंतर तर्कशास्त्र, इस्लाम धर्म, तत्त्वज्ञान व गणित ह्यांचा अभ्यास केला. पुढे सर सय्यद अहमदखान ह्यांच्या लेखांचा परिणाम होऊन मौलानांनी इंग्रजीचा अभ्यास स्वतंत्रपणे सुरू केला.
               १९०८ मध्ये ईजिप्त, अरबस्तान, तुर्कस्तान, फ्रान्स इ. देशांना त्यांनी भेटी दिल्या. तेथील क्रांतिकारकांच्या संपर्कामुळे त्यांची राजकीय मते बदलू लागली आणि कलकत्त्यास परत येताच हिंदी मुसलमानांनी स्वातंत्र्यसंग्रामात पुढाकार घ्यावा, हे मत त्यांनी प्रतिपादिले. लोकजागृतीसाठी १९१२ साली कलकत्ता येथे त्यांनी अल्-हिलाल हे उर्दू साप्ताहिक सुरू केले. अनेक वृत्तपत्रांतून ‘आझाद’ ह्या टोपणनावाने ते लेखन करीत. अल्-हिलालमधील प्रखर राजकीय टीकेमुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्याकडून १०,००० रुपयांचा जामीन मागितला. आझादांनी तो दिला नाही, म्हणून ते वृत्तपत्र बंद पडले. १९१५ साली त्यांनी अल्-बलाघ हे दुसरे वृत्तपत्र काढले. त्यामुळे आझादांना अनेक प्रांतांत जाण्यास बंदी घालण्यात आली; पुढे त्यांना सांचीला स्थानबद्ध करण्यात आले. मुसलमानांत त्यांच्या अटकेमुळे नवे वारे संचारले. १९२० साली त्यांची सुटका झाली. ते असहकाराच्या चळवळीत सामील झाले. १९२१ मध्ये पुन्हा त्यांना अटक करण्यात आली; पण एका वर्षानंतर त्यांना मुक्त करण्यात आले; १९२३ च्या दिल्ली येथील काँग्रेसच्या विशेष अधिवेशनाचे ते अध्यक्ष झाले. १९३० मध्ये त्यांना पुन्हा कैद झाली. ह्या वेळी मुसलमान जमातीस सत्याग्रहात सामील करून घेण्याचे मुख्य श्रेय आझादांनाच मिळाले.
             आझाद १९३९ ते ४६ पर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष होते. १९४२ च्या चले जाव आंदोलनाच्या वेळी त्यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला. १९४५ साली सर्व नेत्यांबरोबर त्यांची सुटका झाली. १९४२ ची क्रिप्सयोजना, १९४५ ची वेव्हेलची सिमला परिषद व १९४६ मधील ब्रिटिश मंत्र्यांचे शिष्टमंडळ इ. प्रसंगीच्या सर्व वाटाघाटींत काँग्रेसतर्फे अध्यक्ष ह्या नात्याने त्यांनीच पुढाकार घेतला. स्वातंत्र्यानंतर ते केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाले आणि अखेरपर्यंत शिक्षणमंत्री म्हणून राहिले. आझाद प्रभावी वक्ते होते. त्यांचे इंग्रजी, उर्दू, अरबी व फार्सी भाषांवर चांगले प्रभुत्व होते; त्यांनी अनेक वृत्तपत्रांतून स्फुट लेखन केले आणि उर्दूत काही पुस्तके लिहिली आहेत. त्यांतील तजकेरा,गुब्बारे खातिर्, कौले फैसल, दास्ताने करबला, तरजुमानुल कोरान ही प्रसिद्ध आहेत. तरजुमानुल कोरान म्हणजे कुराणचा सटीप उर्दू अनुवाद असून तो फार लोकप्रिय आहे. ह्याशिवाय त्यांचे इंडिया विन्स फ्रीडम (१९५९) हे आत्मचरित्र त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले आहे;  मात्र त्यातील अप्रकाशित तीस पाने १९८८ मध्ये प्रसिद्ध करण्यात येतील. त्यांची भाषणेही पुस्तकरूपाने अलीकडे प्रसिद्ध झाली आहेत. 
     त्यांचा  जन्मदिन २०११ पासून संपूर्ण भारतात शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो.
      मौलाना अबुल कलाम आझाद यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
संग्राहक -- राजेंद्र पवार
       ९८५०७८११७८

रविवार, ८ नोव्हेंबर, २०२०

 

!!ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा स्मृतिदिन !!
  (१० नोव्हेंबर )



        माणिक वर्मा जन्म:१६ मे १९२६ मृत्यू:१०नोव्हेंबर१९९६
माणिक वर्मा, पूर्वाश्रमीच्या माणिक दादरकर या हिंदुस्तानी संगीत व सुगम संगीत या संगीतप्रकारांत गायन करणाऱ्या मराठी गायिका होत्या. त्या हिंदुस्तानी संगीतातील किराणा घराण्याच्या शैलीत गायन करत. 
           मराठी भाषेतील गाजलेली भावगीते, नाट्यगीते व चित्रपटगीते त्यांनी गायली आहेत. किराणा घराण्याच्या गायिका  हिराबाई बडोदेकर यांच्याकडे त्या हिंदुस्तानी  संगीत शिकल्या. संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल  १९७४ साली पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले.
    माणिक वर्मा यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
(माणिक वर्मा यांनी गायलेले"अमृताहूनी गोड नाम तुझे देवा"हे गीत ऐकण्यासाठी लिंक देत आहे. आपण या गीताचा आस्वाद घ्यावा.)
https://youtu.be/5MW577qqtgI
           संकलक:  राजेंद्र पवार
                     ९८५०७८११७८

!महर्षी धोंडो केशव कर्वे स्मृतिदिन !! (९ नोव्हेंबर )

 

!!महर्षी धोंडो केशव कर्वे स्मृतिदिन !!
    (९ नोव्हेंबर )




महर्षी धोंडो केशव कर्वे जन्म:१८ एप्रिल
१८५८ मृत्यू:९ नोव्हेंबर १९६२
             आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ व कर्ते समाजसुधारक होते. महर्षी अण्णासाहेब कर्वे या नावानेच ते सर्वांना परिचित आहेत. त्यांचा जन्म कोकणातील मुरुड या गावी एका गरीब कुटुंबात झाला. शालेय शिक्षण मुरुड व रत्नागिरी येथे झाला. १८९१ मध्ये मुंबई येथून ते बी. ए. झाले. त्याच वर्षी लो. टिळकांनी फर्ग्युसन कॉलेजमधील आपल्या जागेचा राजीनामा दिल्यावर नामदार गोखल्यांनी त्यांची गणिताचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. त्यानंतरच त्यांच्या समाजकार्यास चालना मिळाली.
         महर्षी धोंडो केशव कर्वे यांची पहिली पत्नी वारल्यानंतर १८९१ मध्ये त्यांनी पंडिता रमाबाईंच्या ‘शारदा सदन’ या संस्थेतील एका विधवेशी पुनर्विवाह केला. आनंदीबाई तथा बाया कर्वे यांनी कर्व्यांना आयुष्यभर साथ दिली. या पुनर्विवाहामुळे कर्व्यांना तत्कालीन ब्राह्मण समाजाने वाळीत टाकले पण तरीही न डगमगता त्यांनी विधवांच्या उद्धाराचे कार्य चालूच ठेवले. १८९३ साली त्यांनी ‘विधवाविवाह प्रतिबंध निवारक मंडळ’ काढले आणि पुनर्विवाहितांचे कुटुंब-मेळेही भरविले. याच दिशेने विधवांच्या शिक्षणासाठी त्यांनी १८९९ साली ‘अनाथबालिकाश्रम’ या संस्थेची स्थापना केली. पुण्याजवळील हिंगणे येथे १९०० सालापासून हा आश्रम सुरू झाला. पुढे सुगृहिणीपदाच्या दृष्टीने योग्य असेच शिक्षण स्त्रियांना दिले पाहिजे, या जाणिवेने ते स्वतंत्र महिला विश्वविद्यालयाच्या स्थापनेसाठी प्रयत्न करू लागले. त्यातूनच ठाकरसी कुटुंबाच्या आर्थिक मदतीने १९१६ मध्ये श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ उभे राहिले. या विद्यापीठातील अभ्यासक्रमामध्ये स्त्रीजीवनाशी संबद्ध अशा विविध विषयांचा समावेश असून शिक्षणाचे माध्यम मातृभाषा आहे. अनाथ बालिकाश्रम आणि महिला विद्यापीठ या संस्थांतून महाराष्ट्रातील हजारो स्त्रियांनी आपले शिक्षण पुरे केले आहे. या दोन संस्थांच्या उभारणीसाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी अण्णासाहेब कर्व्यांनी आयुष्यभर स्वदेशात आणि परदेशातही  मिशनरी बाण्याने वणवण केली.
         महर्षी कर्वे यांचे आयुष्य संस्थामय होते. वरील संस्थांखेरीज १८८६ मध्ये ‘मुरुड फंड’ ,१९१० मध्ये स्त्रियांच्या उद्धारासाठी आमरण कार्य करणारे कार्यकर्ते निर्माण व्हावेत म्हणून काढलेला ‘निष्काम मठ’ ,१९३६ मध्ये ग्रामीण शिक्षणासाठी ‘महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ’ , जातिभेद आणि अस्पृश्यता यांच्या निर्मूलनाच्या उद्दिष्टाने काढलेला  १९४४ मध्ये‘समता-संघ’ इ. संस्था त्यांनी स्थापन केल्या. त्यांचे आत्मवृत्त १९१५ मध्ये प्रकाशित झाले असून ते अत्यंत उद्बोधक आहे.
            आधुनिक भारताच्या सामाजिक सुधारणेच्या इतिहासात व विशेषतः स्त्रीशिक्षण, विधवाविवाह या बाबतींत कर्व्यांनी आपल्या आमरण कार्याने, चिकाटीने आणि ध्येयवादाने एक अपूर्व आदर्श निर्माण केला. या शतायुषी महर्षीचा गौरव भारत सरकारने १९५५ मध्ये पद्मविभूषण ,१९५८ मध्ये भारतरत्न  या पदव्या देऊन केला. त्यांच्या कार्याचे दिग्दर्शन करणारा एक अनुबोधपटही सरकारने काढलेला आहे.
      महर्षी धोंडो केशव कर्वे यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
      संकलक: राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...