!! विनोदी लेखक चिं.वि. जोशी स्मृतिदिन !! (२१ नोव्हेंबर )
चिंतामण विनायक जोशी जन्म : १९ जानेवारी १८९२ मृत्यू : २१ नोव्हेंबर १९६३ हे विनोदी साहित्यासाठी प्रसिद्ध असलेले मराठी लेखक होते. पाली भाषेचा त्यांचा विशेष अभ्यास होता. बडोदे महाविद्यालयात ते पाली विषयाचे प्राध्यापक होते.
त्यांचे वडील विनायक रामचंद्र जोशी हे शिक्षक होते. त्यांनी आगरकर यांच्या सुधारक या वृत्तपत्राचे काही काळ संपादनही केले होते. सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाणारे गणेश वासुदेव जोशी हे देखील जोश्यांच्याच घराण्यातले होते. चि.वि. जोशी यांचे बहुतांशी लेखन हे विनोदी वाङमय असले तरी ते व्यावहारिक जीवनात ते धीरगंभीर प्रवृत्तीचे गृहस्थ होते. त्यांच्या मुलाचा अकाली मृत्यू झाला होता, त्यामुळे ते दु:खी असत.
दूरचित्रवाणीवरची ’चिमणराव-गुंड्याभाऊ’ ही मालिका खूप गाजली. मालिकेत चिमणरावांचे काम दिलीप प्रभावळकरांनी, गुंड्याभाऊचे बाळ कर्वे यांनी, चिमणरावांच्या पत्नीचे (कावेरीचे-काऊचे) स्मिता पावसकर यांनी, मैना या कन्येचे काम अरुणा पुरोहित यांनी तर मोरू व राघू या पुत्रांचे काम अनुक्रमे नीरज माईणकर व गणेश मतकरी यांनी केले होते. सुषमा तेंडुलकर, लक्ष्मीकांत बेर्डे, सुलभा कोरान्ने या व इतर बऱ्याच कलाकारांनी देखील या मालिकेत काम केले होते. या मालिकेच्या निर्मात्या विजया जोगळेकर-धुमाळे होत्या.
चिं.वि. जोशी यांच्या कथेवर सन १९४२ मध्ये 'सरकारी पाहुणे' नावाचा चित्रपट निघाला होता. त्याचे दिग्दर्शन मास्टर विनायक यांनी केले होते. चिमणरावांची भूमिका दामुअण्णा मालवणकर यांनी केली होती.
चिं.वि.जोशींच्या, संध्या बोडस-काणे व अलका जोशी-मांडके या नातींनी संकलित केलेले ’चि.वि. जोशी - साहित्यातले आणि आठवणीतले’ हे पुस्तक कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने छापून प्रसिद्ध केले आहे. अक्षरधारा प्रकाशनाने 'विनोदाचे बादशहा चिं. वि जोशींचे निवडक विनोद' नावाचे एक अतिशय छोटे पुस्तक प्रकाशित केले आहे. विनोदांचे संकलन रवींद्र कोल्हे यांनी केले आहे.चि. वि. जोशी यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
संकलक: राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा