!! यशवंतराव चव्हाण स्मृतिदिन !!
(२५ नोव्हेंबर )
-- यशवंतराव बळवंतराव चव्हाण जन्म:१२मार्च १९१३मृत्यू: २५ नोव्हेंबर १९८४ हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते. तर काही काळ ते भारताचे संरक्षणमंत्री सुद्धा होते. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म१२ मार्च १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. “युगांतर”, “सह्याद्रीचे वारे”, “कृष्णाकाठ”, “ऋणानुबंध” ही त्यांची साहित्यसंपदा आहे.
इ.स. १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. १ मे १९६० रोजी मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली. हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. केंद्रात १९७७-७८ मध्ये जनता पक्षाचे सरकार असताना ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले.
चव्हाण साहेबांनी घेतलेले महत्वाचे निर्णय....
विकेंद्रीकरणाला महत्व, पंचायत राज योजना, कसेल त्याची जमीन,१८ सहकारी साखर कारखाने सुरु केले. पाटबंधारे व उद्योग विकासासाठी मंडळ, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, मराठी भाषेला राज्य भाषेचा दर्जा.
काही महत्वाचे प्रकल्प....
कोयना वीज निर्मिती प्रकल्प,साहित्य-संस्कृती-कला यांच्या विकासासाठी विविध योजना, पानशेत धरणाचा प्रारंभ.
सातारा जिल्ह्यापुरता विचार करायचा झाला तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य जिल्हा म्हणून ओळख करुन देण्यात चव्हाण साहेबांचा सिंहाचा वाटा आहे.
यशवंतराव चव्हाण यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
संकलक: राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा