रविवार, ३० जून, २०१९

!! पाऊले चालती पंढरीची वाट !! (६ )










     
 आज पालखीचे सासवडहून प्रस्थान सकाळी ८ वाजता झाले.प्रस्थानापूर्वी दर्शनासाठी  वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.पालखी तळावर वारकरी परमेश्वराच्या नामसंकीर्तनामध्ये दंग झालेले दिसुन येत होते.आज पालखीने बोरावके मळा, यमाईची शिवरी तसेच साकुर्डे याठिकाणी विसावा घेतला. माऊलींच्या पालखीचे स्वागत सासवड ते जेजुरी  मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी उभे राहून तसेच पुष्पवृष्टी करुन केले .सुरुवातीला सासवडमध्ये पाऊस पडत होता.मध्यतरी पावसाने थोडी विश्रांती घेतली.शिवरी यमाई पासून पुन्हा पावसास सुरुवात झाली. पावसात भिजण्याचा आनंद खासकरून भाविकांनी लुटला. पावसात रस्त्याने चालताना वारकऱ्यांची कसरत होत होती. पाऊस नसलेल्या ठिकाणी रस्त्यावर सुंदर रांगोळी रेखाटली होती.जेजुरी गाव जवळ आल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी तसेच दिंड्याचे स्वागत भंडारा उधळून जेजुरीवासीयांनी केले.आज दुपारच्या भोजनाची व्यवस्था पुरंदर तालुक्यातील वीर येथील संजय धुमाळ यांनी केली होती. तर रात्रीची निवास व भोजन व्यवस्था मुळचे एकंबेवासीय व सध्या जेजुरी येथे कार्यरत असणारे दत्ता चव्हाण  यांनी केली होती.ज्याठिकाणी पालखी विसावा घेते त्या त्या गावाना यात्रेचे स्वरुप आलेले असते.
            पालखी मार्गावर स्वच्छता अभियान ,वृक्षारोपण ,बेटी बचाव बेटी पढाव अभियान यासारखे रथ प्रचार करताना दिसतात. राज्यातील  विकासाच्या योजना अधिकाधिक लोकांपर्यंत जाण्यासाठी वारी हा उत्तम मार्ग आहे असे मला वाटते.
     शब्दांकन -- राजेंद्र पवार
               ९८५०७८११७८

शनिवार, २९ जून, २०१९

!! पाऊले चालती पंढरीची वाट !! (५ )


        आज सासवडनगरीमध्ये माऊलींचा मुक्काम होता. आमची येथील मुक्कामाची तसेच भोजनाची सोय वैष्णव चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्ट मुंबईच्या माध्यमातून झाली होती.आज विश्रांतीचा दिवस असल्याने आम्ही नेहमीपेक्षा उशिरा उठलो. शहरातून फेरफटका मारला.माऊलीच्या दर्शनाचा लाभ परिसरातील लोकांनी घेतला. दर्शनासाठी खुप मोठी रांग लागली होती .प्रत्येकजण माऊलीच्या दर्शनासाठी आसुसलेला होता.सर्वत्र नामसंकीर्तन ऐकू येत होते.
                   दुपारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाघीरे कॉलेज सासवड यांनी सादर केलेले "निर्मल वारी,स्वच्छ वारी "हे पथनाट्य पाहण्याचा योग आला.पथनाट्यामधून प्लास्टिकचा वापर टाळा.जेवणासाठी वनस्पतींच्या पानांच्या पत्रावळीचा वापर करा.कोणत्याही परिस्थितीत प्लास्टिक पत्रावळीचा वापर करु नका. प्लास्टिकचे विघटन होत नाही. सासवड नगरपालिकेने संपूर्ण वारकऱ्यांसाठी पानांच्या पत्रावळी मोफत पुरवल्या ,तसेच वापरलेल्या पत्रावळी गोळा करण्याची व्यवस्था केली. या पानांच्या पत्रावळीपासुन नगरपालिका खत बनवणार आहे. शौचालयासाठी मोबाईल टॉयलेटचा वापर करा.उघड्यावर शौचास जाऊ नका.रोगराईला निमंत्रण देऊ नका.कोणताही बदल अपेक्षित असेल तर नुसता उपदेश करुन उपयोग होत नाही तर त्याला पर्यायी व्यवस्था करावी लागते हाच संदेश सासवड नगरपालिकेने दिला आहे असे मला वाटते.


     शब्दांकन -- राजेंद्र पवार
              ९८५०७८११७८

शुक्रवार, २८ जून, २०१९

!! पाऊले चालती पंढरीची वाट  !! (३  व ४ )





          पालखीचा तिसरा दिवस, पुणे येथील मुक्कामाचा दिवस होय.  यादिवशी  पुणेकरांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. सर्वत्र ज्ञानोबा तुकोबा यांच्या नामाचा गजर ऐकू येत होता. अवघी पुण्यनगरी वैष्णवांच्या मांदियाळीने फुलुन गेली होती.वरुणराजानेदेखील आज हजेरी लावली.दिंड्या जागोजागी स्थिरावल्या होत्या, तेथे किर्तन ,प्रवचन, भजन यांचा कल्लोळ ऐकू येत होता. त्यामुळे वारकरी,भाविकाबरोबर,अवघे पुणेकरही भारावले होते.आम्ही गोरख चव्हाण (माऊली) यांचे  पुणे येथील घरी मुक्काम  केला होता. चव्हाण (माऊलींनी )आमची व्यवस्था उत्तम केली होती.
           चौथ्या दिवशी सकाळी ६ वाजता ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे  भवानी पेठेतुन प्रस्थान झाले.बरोबर सकाळी ८ वाजता वानवडी याठिकाणी आरती झाली. रस्त्याच्या दुतर्फा पुणेकरांनी गर्दी केली होती. सर्वत्र हरिनामाचा गजर ऐकू येत होता. आजही चहा,बिस्किटे, राजगिरा लाडु, अल्पोपहाराची व्यवस्था पुण्यातील विविध मंडळांनी ,तसेच राजकीय पक्षांनी केली होती . पालखीने पहिला विसावा गाडीतळ हडपसर येथे घेतला .याठिकाणी  पुणेस्थित निंबळक येथील ज्ञानेश्वर पवार यांनी अल्पोपहार व्यवस्था केली होती. साधारणपणे अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली.पुढचा विसावा उरळी देवाची याठिकाणी होता. आम्हीही शेजारी असणाऱ्या वज्रेश्वरी मंदिरात विश्रांती घेतली.पुढचा विसावा वडकी नाला याठिकाणी होता. तेथे आम्ही  दुपारच्या भोजनाचा आस्वाद घेतला. दुपारच्या भोजनाची व्यवस्था सौ.पूनम जगदाळे व उन्मेष जगदाळे(पुणे) या दाम्पत्याने केली होती.
              दुपारनंतर दिवे घाट मार्गक्रमनास सुरुवात झाली. घाटातील वातावरण खूपच विलोभनीय होते. अनेक वाहिन्या वारीचे चित्रीकरण करत होत्या. घाट संपताच फिजिओथेरपीची सोय होती. बहुतेक लोकांनी फिजिओथेरपी सेंटरचा लाभ घेतला. पांडुरंगाच्या कृपेने  मला कोणताही त्रास झाला नाही. घाट संपलाकी लगेचच झेंडेवाडी  येथे विसाव्याचे ठिकाण आहे.येथे पंचायत समिती पुरंदर तसेच जलसंपदा मंत्री विजयबापू शिवतारे यांच्यावतीने माऊलींचे स्वागत करण्यात आले.दिवे घाटापासुन पावसास सुरुवात झाली.सर्व वारकरी पावसाचे स्वागत करतच मार्गक्रमण करत होते. रात्री ८.३० वाजता पालखी, सासवड पालखीतळावर पोहचली.उद्याचा संपूर्ण दिवस पालखी सासवड मुक्कामी विसावणार आहे.
         आज घाटातला अवघड टप्पा वारकऱ्यांनी पूर्ण केला. जीवनात देखील असे अनेक अवघड टप्पे असतात. असे टप्पे पूर्ण केले की यश आपलेच असते असे मला वाटते हाच संदेश आपल्याला मिळतो.
    शब्दांकन -- राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८

बुधवार, २६ जून, २०१९

!! पाऊले चालती पंढरीची वाट !! (२ )
       आज पालखी (आजोळघर) आळंदीहून सकाळी ६ वाजता निघाली. आळंदी नगरपरिषद,पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे  महानगरपालिका,तसेच सर्व राजकीय पक्ष, विविध संघटना यांच्यावतीने पालखीचे उस्फुर्त स्वागत करण्यात आले.सकाळी ८ वाजता चऱ्होली येथे पहिली आरती झाली. चोपदाराने दंड उंचावताच शांतता पसरली. आरती झाली.नंतर दिघी याठिकाणी  पालखीने छोटी विश्रांती घेतली. दुपारचा विसावा फुलेंनगर (येरवडा) येथे होता. येथे जेवणाची उत्तम व्यवस्था  करण्यात आली होती.पालखी मार्गावर सर्वत्र पिण्याचे पाणी, चहा,राजगिरा लाडु, बुंदी लाडु,केळी, बिस्किटे, शेंगदाणे ,अल्पोपहार यांचे समाजसेवी संस्थांचे वतीने वारकऱ्यांना वाटप करण्यात आले.
     




   आज पालखीचा मार्ग बराचसा मिलिटरी एरियातुन होता या मार्गावर सैनिकांनी पालखीचे तसेच वारकऱ्यांचं उस्फुर्तपणे स्वागत केले. आपणाला संधी मिळेल त्यावेळी आपणही अतिथींचे स्वागत उस्फुर्तपणे करावे.आजच्या दिवसातून आपण अतिथींचे  स्वागत कसे करावे हाच संदेश मिळाला.
 
शब्दांकन -- राजेंद्र पवार
          ९८५०७८११७८

मंगळवार, २५ जून, २०१९

!! पाऊले चालती पंढरीची वाट !! ( १ )




      आज ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रस्थानाचा दिवस, संध्याकाळी ४ वाजता  ज्ञानेश्वर माऊली पालखीचे प्रस्थान झाले. प्रस्थानाचे दिवशी सकाळी महापूजा असते. मंदिराचा कळस हलल्याशिवाय माऊलीचे प्रस्थान होत नाही अशी वारकऱ्यांची श्रध्दा आहे. प्रस्थान झालेकी प्रदक्षिणा प्रारंभ होतो. प्रदक्षिणा मार्गावर  फक्त दिंड्यानाच प्रवेश मिळतो. दिंडीमध्ये किमान दोन पताकाधारी ,पखवाज, विणेकरी आणि टाळकरी असतात. टाळकऱ्याशिवाय कोणालाही पालखी प्रदक्षिणेत सहभागी होता येत नाही.
        थोडक्यात टाळ हाच प्रदक्षिणा मार्गात सहभागी होण्याचा अधिकृत परवाना होय.  प्रदक्षिणा करुन माऊली आजोळघरी मुक्कामास जातात. प्रदक्षिणाची सांगता होताना आरती होते. दुसऱ्या दिवशी सकाळी पालखीचे प्रस्थान कधी होणार आहे याची घोषणा केली जाते. सर्वत्र ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष ऐकू येत होता. मंदिरात रात्रभर भजन किर्तन चालु असते.वारकरी आपली सर्व चिंता पांडुरंगावर सोपवून वारीत सहभागी होतात. कोणतीही गोष्ट श्रद्धेने केली तर यश मिळते अशी वारकऱ्यांची भावना असते. आपणही आपले काम श्रध्दापूर्वक करावे हाच संदेश वारीतुन मिळतो.
      शब्दांकन -- राजेंद्र पवार
             ९८५०७८११७८

सोमवार, १० जून, २०१९

!!  गांधीजींच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षाच्या निमित्ताने  !!
             !! बॅरिस्टर गांधी !!
         गांधीजींनी १८ व्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा पास केली.त्यानंतर लगेचच ते कायद्याचं शिक्षण घ्यायला लंडनला गेले.कायद्याची परीक्षा देणे सोपे असल्याचे त्यांच्या लगेचच लक्षात आले. बॅरिस्टरना त्याकाळी ' डिनर बॅरिस्टर'म्हणत ,कारण त्यांना मेजवान्याना उपस्थित राहावे लागत असे, त्याचा खर्च विद्यार्थ्यांना करावा लागत असे. गांधीजींना ते आवडत नसे.ते शाकाहारी होते आणि मद्य घेत नसत.


      खटला चालवत असताना पुस्तकी ज्ञान कसे वापरावे ते त्यांना कळेना. एका इंग्रजी वकिलाने त्यांना सांगितले की,"प्रामाणिकपणा आणि मेहनत या गोष्टी चांगला वकील होण्यासाठी पुरेश्या आहेत.याच गुणांवर पुरेसे पैसे मिळवता येतात" यामुळे गांधीजींना हुरुप आला.गांधीजींनी इतिहास व सामान्य ज्ञानाची पुस्तके वाचण्याचा  इंग्रजी सद्गृहस्थाचा सल्ला  मानला.
       गांधीजींनी थोडा वेळ स्मार्ट 'इंग्रजी सदग्रहस्थ' बनण्याचा प्रयत्न केला. त्यांनी योग्यप्रकारे उच्चार करणं, भाषण करणं, नृत्य करण,व्हायोलिन वाजवणे आणि सुटबुट घालण्याचा सराव केला.त्यांचे जीवन आरामाकडे आणि चैनीकडे झुकू लागलं.आपण वेडेपणा करत असल्याचे काही महिन्यात  त्यांच्या लक्षात आले. या महागड्या सवयीमुळे ते आपल्या मोठया भावावर पैशाचे ओझं टाकत होते. ते इंग्लडला कायदा शिकायला आले होते, ब्रिटिश माणसासारखी राहणी शिकायला नाही. ताबडतोब त्यांनी आपली राहणी बदलली.इंग्लंडमध्ये ३२ महिने राहिल्यावर, ते योग्यवेळी बॅरिस्टर झाले. आणि ते भारतात परतले.
         गांधीजींचा पहिला खटला अगदी साधा होता. त्यांना ३० रुपये फी मिळणार होती.२२ वर्षाचा अननुभवी बॅरिस्टर बोलायला उभा राहिला पण त्यांच्या तोंडातून शब्द फुटेना लाजिरवान्या अवस्थेत  त्यांना कोर्टातून निघून जावे लागले. पुन्हा त्या कोर्टात त्यांनी खटला चालवला नाही.
       सुरुवातीला गांधीजींना खर्चाचा मेळ बसला नाही.६ महिने अनुभव घेतल्यानंतर गांधीजी राजकोटला घरी परत गेले.इंग्लंडहुन आलेला आपला भाऊ यशस्वीपणे व्यवसाय करील याबाबत  घरातील लोकांची घोर निराशा झाली. गांधीजींना फार वाईट वाटलं.सुरुवातीस गांधीजींना आर्थिक चणचण खूपच भासली.
      गांधीजींच्या सुदैवानं त्यांच्याकडे दक्षिण आफ्रिकेतल्या एका श्रीमंत मुसलमान व्यापाऱ्यांचे काम चालुन आले. त्यांना या कामाचा चांगला मोबदला मिळणार होता. त्यांनी हे काम स्वीकारले .डर्बनला पोचल्यावर तिसऱ्या दिवशी गांधीजी कोर्टात गेले.तिथल्या न्यायमूर्तींनी त्यांना पगडी काढायला सांगितली त्यास गांधीजींनी नकार दिला आणि ते बाहेर पडले. दक्षिण आफ्रिकेत पाऊल टाकल्यापासून ते पाहत होते गोरे लोक भारतीयांना वाईट वागणूक देत होते त्यांचे तिथे स्वागत होत नव्हत.आणि त्यांच्यावर' हमाल बॅरिस्टर'असा शिक्का पडला. या अपमानांनी ते अस्वस्थ झाले. त्यानंतर गांधीजींनी  दादा अब्दुल्लाच्या खटल्यात समेट घडवुन आणला.
        गांधीजींनी डर्बनच्या न्यायालयात वकिली सुरु केली. तेव्हा बालसुंदरम नावाचा कामगार तिथे आला.त्याचे कपडे फाटले होते आणि पुढचे दोन दात पडले होते. त्याला गोऱ्या मालकांनी मारले होते. गांधीजींनी त्याला शांत केलं .त्याला गोऱ्या डॉक्टरकडे उपचारासाठी नेलं आणि त्याची दुखापत गंभीरअसल्यामुळे तसं प्रमाणपत्र मिळवलं.बालसुंदरमचा खटला त्यांनी लढवला आणि जिंकला. त्यानंतर त्याला चांगला मालक मिळवुन दिला.या घटनेमुळे गरीब भारतीय कामगारांमध्ये ते एकदम लोकप्रिय झाले. दिनदुबळ्यांचा रक्षणकर्ता म्हणून त्यांची कीर्ती भारतापर्यंत पोचली. त्यानंतर लोक त्यांचाकडे निराधार लोकांचा मित्र म्हणून पाहू लागले.
         भारतात आणि दक्षिण आफ्रिकेत त्यांना असे आढळून आले की  १०० खटल्यापैकी ९९ खटल्यात भारतीयांना युरोपियनाविरुद्ध न्याय मिळत नसे.त्यामुळे त्यांनी म्हटलं,"एखाद्यातरी इंग्रजाला भारतातल्या निर्घृण हत्याबद्धल कडक शिक्षा झाली आहे का?इंग्रज अधिकाऱ्याच्या खटल्याकडे आणि त्यांना झालेल्या किरकोळ शिक्षेकडे पहा. त्यांनी जाणूनबुजून केलेल्या असाह्य निग्रोच्या छळाबद्धल ही विनोदी शिक्षा--"स्वतःचेच कडक  नियम पाळून आणि कायद्याविरूद्ध अनेकदा ताशेरे झाडूनही गांधीजींचा व्यवसाय वाढत गेला. भारतात त्यांनी फार कमी काळ वकिली केली.दक्षिण आफ्रिकेत त्यांनी २० वर्षाचेवर वकिली केली.
         आपल्या देशातील लोकांना मानवी अधिकार मिळावेत यासाठी सरकारला विरोध करायला  गांधीजी शिकवत.त्यासाठी त्यांना तुरुंगात जावे लागले आणि दक्षिण आफ्रिकेच्या तसेच भारतीय न्यायालयातही खटले चालविण्यात आले होते. अनेकदा ते तुरुंगात गेले.दक्षिण आफ्रिकेत ज्या कोर्टात वकिली  केली त्याच कोर्टात त्यांना बेड्या घातलेल्या अवस्थेत आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहावं लागलं. त्यांना अशा प्रकारे पहिली शिक्षा झाल्यावर त्यांचे नाव बॅरिस्टर यादीतून वगळण्यात आले.
     गांधीजींनी ब्रिटिश न्यायालयाविरुद्ध असहकार पुकारला. गांधीजींनी हाक दिल्यावर अनेक प्रथितयश वकिलांनी आपली वकिली सोडली आणि स्वातंत्र्य चळवळीत ते सामील झाले.
   संदर्भ-- बहुरूप गांधी
    लेखक -- अनु बंदोपाध्याय
    संग्राहक -- राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८

शनिवार, ८ जून, २०१९

!! वृक्षथॉन Run For The Environment !!

            उद्याच्या हरित भविष्यासाठी धावणे स्पर्धा...
ही स्पर्धा ९ जून रोजी पुणे येथे घेण्यात आली. या स्पर्धेत मी १० कि. मी.धावणे प्रकारात भाग घेतला होता. ही स्पर्धा पुणे येथील बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स येथुन सुरु झाली. ही स्पर्धा मी ५४ मिनिटे व









२९ सेकंदात (००:५४:२९) पार केली. या स्पर्धेचा प्रारंभ  पिंपरी चिंचवडच्या उपायुक्त नम्रता पाटील यांच्या शुभहस्ते झाला. स्पर्धेस प्रारंभ होण्यापूर्वी राष्ट्रगीत म्हटले गेले. संपूर्ण परिसर देशभक्तिमय वातावरणाने भारून गेलेला होता. स्पर्धेत सहभागी प्रत्येकास सकाळ समूह यांचेकडून रोप भेट देण्यात आले होते. सहभागी सदस्यांनी रोपांची लागवड करावी आणि ही वसुंधरा पुढील पिढ्याना राहण्यासाठी अधिक सुंदर करावी ही स्पर्धा आयोजन करण्यामागे मुख्य भूमिका होती. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी मला माझे भाचे श्रीकांत घोरपडे यांचे सहकार्य लाभले.आपणा सर्वांच्या सदिच्छामुळे ही स्पर्धा पूर्ण करण्यात यश आले आहे. आपणही स्पर्धेत भाग घ्यावा. ही वसुंधरा  पुढील पिढ्यांना राहण्यायोग्य करावी असेही मला वाटते.
     शब्दांकन - राजेंद्र पवार
            ९८५०७८११७८

बुधवार, ५ जून, २०१९

!!  माती परीक्षण कार्यशाळा वर्णे  !!
         आज जागतिक पर्यावरण दिवस,या दिवसाचे औचित्य साधून सातारा येथील राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझरच्या विभागीय कार्यालयाने वर्णे येथे माती परीक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते.या कार्यशाळेसाठी वर्णे येथील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.






           माती परीक्षण का,कशासाठी करावयाचे याचे सुंदर विवेचन श्रीपती लाड सर यांनी केले. ते म्हणाले की, माती परीक्षण केल्यामुळे आपणास जमिनीचा सामू समजतो. जमिनीत क्षार किती प्रमाणात आहेत ते समजते. नत्र, स्फुरद, पालाश यांचे प्रमाण समजते. जमिनीत कोणकोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज आहे तेही समजते.परीक्षणासाठी माती घेताना बांधापासून ५ फुट आतील माती घ्यावी. किमान ७ ते ८ ठिकाणची माती घ्यावी,माती घेताना १ फुटाचा खड्डा घ्यावा. सर्व ठिकाणची माती एकत्र करावी ,त्यामध्ये खडे राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. शेवटी चाळून १०० ग्रॅम माती राहील याची काळजी घ्यावी, ती एका पिशवीत भरावी,त्यावर आपल्या नावाचे लेबल,सर्वे नंबर, शेताचे नाव,मोबाईल नंबर नमूद करावा. आपणास मोबाईल नंबरवर माती परीक्षनाचा रिपोर्ट मिळतो.
       माती परीक्षण करत असताना आपण कोणते पीक घेणार आहोत हे कळवले तर खतांची आवश्यक मात्रा किती द्यावी हेही आपणास कळू शकते. खतांची मात्रा एकरात दिलेली असते, आपण आवश्यक त्या प्रमाणात खते द्यावीत.कोणत्याही खताबरोबर युरिया देऊ नये.
         वरिष्ठ प्रबंधक आर. के.गुप्ता म्हणाले की, शेती आपली आई आहे. कोणत्याही परिस्थितीत तिच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. आपले ऊसाच्या बाबतीत किमान लक्ष्य एकरी १०० टन असले पाहिजे. मजुरांच्या भरवशावर राहु नका. आपल्या शेतातील सुक्ष्म अन्न द्रव्याची तपासणी करून घ्या. आमचेकडे ती ४५ रुपयात करुन मिळते.
           जयेश देवळेकर म्हणाले की, सध्या सेंद्रिय शेतीचा ट्रेंड वाढत आहे परंतु आपणाकडे पुरेश्या प्रमाणात सेंद्रिय खतांचा पुरवठा होत नाही ही वस्तुस्थिती आहे. आपण आवश्यक त्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावयास हवा.जमिनीतील जिवाणूंची संख्या वाढवण्यासाठी "सिटी कंपोस्ट"खत आमचेकडे मिळते. ते पूर्णपणे घनकचऱ्यापासून बनवले जाते. त्याचा वापर आपण करु शकता.
         यावेळी वर्णेसोसायटी क्र.१ चे चेअरमन लक्ष्मण चव्हाण (गुरुजी)म्हणाले की,आपण रासायनिक खताबरोबर हिरवळीच्या खताकडे लक्ष द्यायला हवे, रासायनिक खतांचा वापर मर्यादित प्रमाणात करावयास हवा.आपल्या जमिनीचा पोत खराब होणार नाही याकडेही लक्ष दिले पाहिजे. यावेळी मलाही विचार व्यक्त करावयाची संधी मिळाली. शेवटी प्रत्येक सहभागी शेतकऱ्यांना झाडाचं रोप भेट देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तसेच सोसायटीच्या सेवकांनी परिश्रम घेतले.
      आजच्या कार्यक्रमातून आपण माती परीक्षण करूनच खतांची मात्रा द्यावी. जमिनीवर आपल्या मातेप्रमाणे प्रेम करावे. वृक्षाची योग्य ती काळजी घ्यावी हाच संदेश मिळतो.
शब्दांकन -- राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८

रविवार, २ जून, २०१९

!! गांधीजींच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने !!
    !!  बहुरूप शिक्षक  !!
७३ व्या वर्षी कस्तुरबा गांधीजींच्या बरोबर आगाखान पॅलेसमध्ये स्थानबद्ध होत्या. गांधीजींना त्यावेळी मोकळा वेळ असे. त्यांनी रामायण व महाभारताचे काही खंड कस्तुरबासाठी संपादित केले होते. ते रोज त्यांच्याबरोबर बसत आणि त्यांना भूगोल, गुजराथी साहित्य शिकवत. कस्तुरबानी मात्र त्यांच्या शिकवण्याला फारसा प्रतिसाद दिला नाही. तुरुंगात असताना गांधीजींनी एका चिनी कैद्याला इंग्रजी शिकवलं, नंतर आयरिश तुरुंगधिकाऱ्याला गुजराती शिकवलं, नंतर भाचीच्या मुलीला, नातीला इतिहास, भूगोल आणि भूमिती शिकवली.
          शिक्षक म्हणून स्वतःच्या क्षमतेबद्दल चांगलाच आत्मविश्वास होता. पण शिक्षक म्हणून त्यांची दृष्टी आणि शिकवण्याची पध्दत खूप वेगळी होती. दक्षिण आफ्रिकेत एक न्हावी,एक कारकून आणि एक दुकानदार अशा तिघांना इंग्रजी शिकायचे होते पण शिक्षकाला द्यायला पैसे न्हवते. नियमित वर्गांना जायला वेळ न्हवता. गांधीजी त्यांच्या घरी जात आणि ६ महिन्यात त्यांना हिशोब ठेवण्यापूरते आणि पत्र लिहिन्यापुरते इंग्रजी शिकवलं.
     फिनिक्स आश्रमात तिथल्या मुलांसाठी गांधीजींनी प्राथमिक शाळा सुरु केली. ते स्वतः मुख्याध्यापक होते. इतर आश्रमवासी त्यांना मदत करत असत. अनेक धर्माचे विद्यार्थी तिथं होते आणि शिक्षक वेगवेगळ्या देशांतून आलेले असत.इंग्लंड, जर्मनी, भारत. शिक्षकांना शारीरिक श्रमाची इतकी कामं असत की कधीकधी ते शाळेत शेतातूनच घोट्यापर्यंत मातीचे, चिखलाचे पाय घेऊन येत. गांधीजी कधीकधी एखाद्या बाळाला हातात जोजवत शिकवत असत. गांधीजी ते स्वतः करत नाहीत असं कुठलंही काम विध्यार्थ्यांना सांगितलं नाही. घाबरट शिक्षक कधीही विध्यार्थ्यांना निर्भय बनवू शकणार नाही असा त्यांचा विश्वास होता. शिक्षक स्वतः मुलासमोरचा आदर्श पाठ असायला हवा.
             मुलांनी शारीरिक श्रमाची काम करावीत आणि सुदृढ व्हावं असे त्यांना वाटे. टॉलस्टॉय फॉर्मवर आणि साबरमती आश्रमातही गांधीजी मुलांना जोडे बनवायला शिकवत. मातृभाषेतून साहित्याचे धडे दिले जात. गांधीजींना गुजराथी, मराठी, हिंदी, उर्दू, तमिळ, इंग्रजी, फ्रेंच आणि लॅटिन या भाषा येत.
       गांधीजी सहशिक्षणाचा प्रचार करत. "आपण मुलं मुली असा भेदभाव सोडला पाहिजे. मुलांना धोका पत्करण्याची परवानगी द्यायला हवी. मुलामुलींमध्ये काही चुकीची वर्तणूक घडली तर गांधीजी शुद्धीसाठी उपवास करायला बसत. विद्यार्थ्यांची प्रकृती उत्तम असायला हवी. कधीही अर्थार्जन करु शकतील एवढी त्यांची तयारी असावी. मुलांना लेखनापूर्वी वाचायला शिकवावं यावर त्यांचा भर होता. उत्तम हस्ताक्षर हा शिक्षणाचा एक भाग आहे असे ते मानत. स्वतःच्या वाईट हस्ताक्षराची त्यांना लाज वाटे. ते शिक्षकांना सांगत की, मुलांना आधी सरळ रेषा, कंस, त्रिकोण, पक्षी, फुलं पान यांची चित्र काढायला द्या म्हणजे ती अक्षरं लिहू शकतील त्यांना गिरवावी लागणार नाहीत.
       गांधीजींवर रस्कीन,टॉलस्टॉय आणि टागोरांच्या विचारांचा प्रभाव होता. शिक्षणतज्ज्ञ म्हणून जगात थोर प्रयोगवीरांमध्ये त्यांचा समावेश होईल. त्यांनी बिहारमध्ये काही शाळा सुरू केल्या. बंगालमध्ये एक राष्ट्रीय विद्यालय सुरु केलं आणि अहमदाबादमध्ये राष्ट्रीय विद्यापीठ स्थापन केले.
संदर्भ -- बहुरूप गांधी. 
          लेखक -- अनु बंदोपाध्याय
       संग्राहक -- राजेंद्र पवार
                 ९८५०७८११७८

शनिवार, १ जून, २०१९

!! हाफ नाईट मॅरेथॉन २०१९  !!


         शनिवार दिनांक १ जून २०१९ या दिवशी सातारा येथे हाफ नाईट मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मी भाग घेतला होता. रात्री११ वाजता स्पर्धेस प्रारंभ झाला.
               (Half Marathon at AFSF star of india night Challenger  Marathon 2019 ) ही पूर्ण करण्यासाठी मला २ तास ३२मिनिटे व३३ सेकंद  (२.३२.३३ )इतका वेळ लागला.





स्पर्धेपूर्वी देशभक्तिमय वातावरण तयार झाले होते. भारत माता की जय, वंदे मातरम, जय भवानी जय शिवाजी आदि घोषणा दिल्या जात होत्या. अशा स्पर्धेत भाग घेताना दुसऱ्या कोणाशी स्पर्धा न करता आपली स्पर्धा आपल्याशीच करावयाची असते. आपल्यामधील उणीवा आपण शोधवयाच्या असतात. आपल्या आरोग्यासाठी आपण अशा स्पर्धेत भाग घेतला पाहिजे असे मला वाटते.
      शब्दांकन -- राजेंद्र पवार
            ९८५०७८११७८

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...