रविवार, १३ जुलै, २०२५

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!



             आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे "आयोजन करण्यात आलले होते. स्पर्धेचे आयोजक ' गोल्ड लिफ एंटरटेनमेंट' हे होते.या स्पर्धेची थीम होती, पर्यावरण विषयक जनजागृती करणे, वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन करणे. स्पर्धा पूर्ण केल्यानंतर प्रत्येकाला एक रोप देण्यात आले.

              या मॅरेथॉनमध्ये माझ्यासह विशाल घोरपडे , सौ.प्रगती घोरपडे,  शार्वी घोरपडे आणि वासुदेव शिरोडकर यांनी सहभाग घेतला होता. या ठिकाणी २१ कि.मी., १०कि.मी., ५ कि.मी., २कि.मी. अशा स्पर्धा होत्या. माझ्यासह वासुदेव आणि विशाल यांनी हाफ मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता तर शार्वीने २ किलोमिटरमध्ये आणि प्रगतीने १० किलोमीटरमध्ये भाग घेतला होता. 

              ही स्पर्धा सकाळी सहा वाजता मान्यवरांनी फ्लॅग ऑफ करुन झाली. स्पर्धेचा प्रारंभ झाल्याबरोबर स्पर्धकांच्या अंगावर पुष्पवष्टी झाली. हाफ मॅरेथॉनचा रूट हा तीव्र चढउताराचा होता. (Eavation gain & loss 365 ) मीटर असे होते. भल्याभल्यांना घाम फुटणारी ही स्पर्धा होती. अनेक स्पर्धकांनी ही स्पर्धा अर्ध्यातून सोडून देणे पसंत केले. ही स्पर्धा ७/७ किलोमीटरच्या तीन लूपमध्ये ही स्पर्धा झाली. स्पर्धा मार्गावर वाहतुकीचे कसलेच नियोजन नसल्याचा फटका प्रत्येकाला बसला. रूट सपोर्टमध्ये पाणी आणि एनर्जी ड्रिंकशिवाय काही नव्हते. जागोजागी स्पर्धकांना प्रेरणा देण्यासाठी कोणीच नव्हते.

              आज माझ्या बाबतीत मात्र चांगलाच योग जुळून आला होता. आमच्या सौ. कुसुमताईनी स्पर्धेच्या ठिकाणी पूर्ण वेळ उपस्थित राहून प्रोत्साहित केले. असं माझ्या जीवनात पहिल्यांदा घडलं त्यामुळे ते कायम स्मरणात राहील. स्पर्धा मार्गावर मी शिक्षण घेतलेले बी. एड. कॉलेज होते. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. कॉलेज प्रवेशद्वारावर छबी टिपण्याचा मोह आवरला नाही.

              नुकतीच पावसाने उघडीप दिल्याने हवेत दमटपणा जाणवत होता. सहा महिन्याच्या कालावधीनंतर मी प्रत्यक्ष स्पर्धेत भाग घेतला. सराव कमी असल्याचा मलाही त्रास जाणवला. आज मी ही स्पर्धा (२:४०:४४ )दोन तास चाळीस मिनिटे आणि चव्वेचाळीस सेकंदात पूर्ण केली.



     मॅरेथॉनमध्ये आपल्या शरीराचा कस लागतो. खर तर आपली शारीरिक क्षमता तपासण्यासाठी आपण अशा स्पर्धेत भाग घेतला पाहिजे असे वाटते.

       राजेंद्र पवार 

   ९८५०७८११७८

मंगळवार, २९ एप्रिल, २०२५

दर्जेदार ऊस बियाणे (रोपे)शेतकऱ्यांमध्ये आर्थिक क्रांती घडवतील : चित्रपट निर्माते मानसिंग पवार

 दर्जेदार ऊस बियाणे (रोपे)शेतकऱ्यांमध्ये आर्थिक क्रांती घडवतील : चित्रपट निर्माते  मानसिंग पवार

   काशीळमधील सरस हायटेक नर्सरी ही श्रीकांत  घोरपडे यांनी अक्षय माने व समाधान माने यांच्या सहकार्याने सुरु केली आहे. या नर्सरीच्या द्वितीय वर्धापनदिनप्रसंगी कृषीविषयक मालिका तसेच चित्रपट निर्माते मानसिंग पवार म्हणालेकी, दर्जेदार ऊस बियाणे/रोपे असतील तरच शेतकऱ्यांमध्ये आर्थिक क्रांती घडेल. रोपामुळे ऊसाची लागण एकसारखी होते. एकरी ऊसाची संख्या मर्यादित ठेवता येते. आपण थोडी काळजी घेतली तर  एकरी १०० टन उत्पादन सहज घेता येते. आयसीएआर ऊस पैदास केंद्र,कोईमतुर येथून बियाणे आणून ही रोपे तयार केली आहेत. सध्या ऊसामध्ये गवताळ वाढीची समस्या उद्भवत आहे. दर्जेदार रोपामुळे या समस्येचे समूळ उच्चाटन होत आहे. ऊस बियाणेबरोबर तांत्रिक मार्गदर्शन श्रीकांत घोरपडे यांचे होत असल्याने या परिसरातील शेतकरी एकरी शंभर टन उत्पादन सहज घेतील.  दर्जेदार रोपे पुरवणे, कमीत कमी खर्च, पाण्याचे योग्य नियोजन करुन लोकांचे उत्पादन वाढवणे हा एकमेव उद्देश श्रीकांत घोरपडे यांचा आहे.








          याप्रसंगी  कृषी विज्ञान केंद्र बोरगावचे  विषय विशेषज्ञ डॉ. महेश बाबर, डॉ. भूषण यादगिरवार डॉ . संग्राम पाटील ,सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, उद्योजक धनंजय थोरात, प्रशांत कणसे, संजय ढाणे, शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबईचे संचालक राजेंद्र पवार, संचालक प्रविण पाटील , अतीतच्या नवचैतन्य सहकारी पतसंस्थेचे संस्थापक राजेंद्र जाधव,  चिंचणेरचे कृषी सहाय्यक धनाजी फडतरे, कृषी  सहाय्यक फडतरे मॅडम,प्रगतशील शेतकरी संतोष काळभोर, बाळासाहेब माने, जयवंत माने, सकाळ अग्रोवन समूहाचे विकास जाधव ,  सुरेश माने, सचिन घोरपडे, नवनाथ घाडगे, उमेश निकम यांची विशेष उपस्थिती होती.

    यावेळी मार्गदर्शन करताना भूषण यादगिरवार म्हणालेकी, उच्चशिक्षित तरुणांनी शेतीत यायला हवे. शास्त्रशुध्द पद्धतीने शेती केली तर ऊसच नव्हे तर प्रत्येक पिकात विक्रमी उत्पादन घेता येते.

श्रीकांत घोरपडे यांनी शेतीत नवनवीन प्रयोग केल्यामुळे त्यांच्या उत्पादनात पर्यायाने उत्पन्नात  विक्रमी वाढ झाली आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आम्ही आपणास हवे ते सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत असे अभिवचनही  त्यांनी दिले.

      प्रास्ताविकात श्रीकांत घोरपडे यांनी आपली शेतीतील वाटचाल यामध्ये कृषी विज्ञान केंद्र, बोरगावचे सहकार्य, मार्गदर्शन याबद्दल ऋण व्यक्त केले. जिल्हा तसेच राज्य, राष्ट्रीय स्तरावरील अनेक सन्मान  केवळ कृषी विज्ञान केंद्रामुळे प्राप्त झाले आहेत. आपण सर्वांनीच या कृषी विज्ञान केंद्राचा लाभ घ्यायला हवा असेही ते म्हणाले.

   यावेळी डॉ. संग्राम पाटील, डॉ. महेश बाबर, चंद्रकांत जाधव, राजेंद्र जाधव, धनाजी फडतरे यांची समयोचीत भाषणे झाली.

      कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. भूषण यादगिरवार यांनी केले तर आभार राजेंद्र पवार यांनी मानले. सदरच्या कार्यक्रमास  काशिळ परिसरातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

सोमवार, २८ एप्रिल, २०२५

आर्थिक शेतीबरोबर आरोग्य शेतीचा विचार होणे आवश्यक : अंकुश सोनावले

 आर्थिक शेतीबरोबर आरोग्य शेतीचा विचार होणे आवश्यक : अंकुश सोनावले

              सेंद्रिय  शेती  काळाची गरज  या विषयावर बोलताना नागठाणे मंडळाचे कृषी पर्यवेक्षक  अंकुश सोनावले म्हणालेकी, आर्थिक शेतीबरोबर आरोग्य शेतीचा विचार होणे आवश्यक आहे. वाढत्या रासायनिक खतांचा वापरांमुळे आपणास विषमुक्त अन्न मिळत नाही. आपणास  आर्थिक लाभ होताना दिसत आहे परंतु आरोग्याला फार मोठी हानी पोहचत आहे. आपले आरोग्य चांगलं राहायचं असेल तर ज्वारी, बाजरी, राळा, नाचणी यांचाआहारात वापर वाढवायला हवा. लाकडी  घाण्याचे तेल वापरायला हवे, आपल्या घरी एखादी गीर गाय किंवा पंढरपुरी म्हैस पाळायला हवी जेणेकरून घरच्याघरी दूध मिळू शकेल, असे केले तरच आपलं आरोग्य चांगलं राहील. सातारा जिल्हा सेवानिवृत्त मुख्याध्यापक सेवासंघाने रणजित कौर गडोख महाराष्ट्र विद्यालय अतित येथे रविवार दिनांक २६ एप्रिल रोजी कार्यक्रमाचे आयोजन संघाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त  केले होते. 




          यावर्षी सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचेदेखील अमृत महोत्सवी वर्ष आहे.संघाने या वर्षानिमित्त वर्षभर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.  आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आत्माचे प्रकल्प संचालक अजय शेंडे होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ते म्हणाले की,आपण शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहायला हवे. प्रत्येक शेतकऱ्याने जमाखर्च लिहिला पाहिजे.शेतीचा सेंद्रिय कर्ब  वाढण्यासाठी  जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत . रासायनिक खतांचा वापर कमीत कमी केला पाहिजे. बिजनेसमध्ये वाढ द्यायला हवी. संघाचे विद्या सचिव अरुण माने यांनी सेंद्रिय शेतीबाबत  १२ वर्षात स्वतः च्या शेतीत केलेले प्रयोग सांगितले. 

           सेंद्रिय शेतीत यशस्वी होण्यासाठी गट शेतीला पर्याय नाही. शेतकऱ्यांनी स्वतःचे मार्केट स्वतः तयार करायला हवे तरच आपला टिकाव लागणार आहे. अभिजीत जाधव यांनी सेंद्रिय शेती गटावर जोर दिला. पाहुण्यांचे स्वागत संघाचे अध्यक्ष एस. बी. खराते  यांनी तर प्रास्ताविक संघाचे सचिव आर. एल.नायकवडी यांनी  केले. पाहुण्यांची ओळख मोहनराव जाधव यांनी करुन दिली. सदरच्या कार्यक्रमास अतीत पंचक्रोशीतील प्रयोगशील शेतकरी, संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते. शेवटी ए. पी. पाटील यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण सेंद्रिय शेतीवर भर द्यायला हवा असे वाटते.

      राजेंद्र पवार 

 संचालक, शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड,मुंबई

    ९८५०७८११७८

      ८१६९४३१३०६

रविवार, १९ जानेवारी, २०२५

!! टाटा मुंबई मॅरेथॉन २०२५ TATA consultancy services !! (१९ जानेवारी )

 !! टाटा मुंबई मॅरेथॉन २०२५ TATA consultancy services !!  (१९ जानेवारी )

   आज रविवार दिनांक १९ जानेवारी २०२५  या दिवशी टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय पातळीवरची असून ती देशात प्रथम क्रमांकाची आहे.आंतरराष्ट्रीय स्पर्धेस पात्र होण्यासाठी ही स्पर्धा विशिष्ट वेळेत पूर्ण करणे आवश्यक असते.






 आजची स्पर्धा ४२ कि. मी.२१ कि.मी. व १० कि.मी. अशी होती. मी ४२ कि.मी. च्या स्पर्धेत भाग घेतला होता. मी आज ही स्पर्धा ५:३६:०४ पाच तास छ्त्तीस मिनिटे आणि चार सेकंदात पूर्ण केली.

             मुंबई मॅरेथॉनमध्ये देश तसेच  विदेशातील  स्पर्धक  मोठ्या संख्येने भाग घेत असतात. साधारण साठ हजार स्पर्धक देश तसेच विदेशातून आले असावेत.स्वयंसेवकांची संख्याच दहा हजाराच्या आसपास असते.४२ कि.मी.चा विचार करावयाचा म्हटले तर  त्यासाठी चार गट (ए.बी. सी. डी.) असे केले होते.

        माझा ए गटातच समावेश होता. स्पर्धा जरी ५ वाजता सुरु झाली असली तरी गेट ३ वाजताच खुले केले होते. उशिरा येणारास धावण्याची संधी मिळत नाही. आजच्या या स्पर्धेत साठहून अधिक सातारकर सहभागी झाले असावेत. रनिंग क्षेत्रात बऱ्यापैकी साताऱ्याचा दबदबा निर्माण झाला आहे.

             स्पर्धेचा मार्ग आझाद मैदान, सी.एस. एम.टी., मुंबई हायकोर्ट, मरीन ड्राईव्ह, पेडर रोड, बांद्रा वरळी सी लिंक हाजी अली असा होता. काही ठिकाणी  चढ काही ठिकाणी उतार तर बाकीचा सपाट भाग होता. चढाला बऱ्यापैकी कस निघत होता.

        स्पर्धकांचा जोश वाढवण्यासाठी ठिकठिकाणी  वाद्यवृंद होते. मुंबईचे वातावरण दमट त्याचबरोबर सूर्य उगवल्यानंतर उन्हाचा तडाखा त्यामुळे मला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. मला पाच तासात स्पर्धा पूर्ण करावयाची होती. स्पर्धा मार्गावर बऱ्यापैकी हायड्रेशन पॉइंट होते. पाणी अजून जवळ जवळ मिळायला पाहिजे होते असे वाटते.

     फुल मॅरेथॉन आपल्या शरीराचा कस काढणारी स्पर्धा असते. आज मला एरोली रनर्स ग्रुपचे सदस्य आणि शिवकृपाचे अधिकारी  संदीप शिर्के यांची मोलाची मदत झाली.

       जीवनात यशस्वी होण्यासाठी खडतर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. आपणही अशा स्पर्धेत भाग घेऊन आपल्या शरीराची क्षमता तपासायला हवी. स्वतः निरोगी राहायला हवे असे मनोमन वाटते.

सोमवार, ६ जानेवारी, २०२५

!! साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, चवदार तळे, शिवथर घळ भेट एक अविस्मरणीय दिवस !! (६ जानेवारी)

 !! साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, चवदार तळे, शिवथर घळ भेट एक अविस्मरणीय दिवस !! (६ जानेवारी)

              सातारा जिल्हा सेवानिवृत्त मुख्याध्यापक सेवासंघ आयोजित एक दिवसाची शैक्षणिक सहल रविवार दिनांक ५ जानेवारी रोजी निश्चित करण्यात आली होती. नियोजनाप्रमाणे सकाळी ७:३० वाजता ती मार्गस्थ झाली. सहलीतील सहभागी सदस्य वेगवेगळ्या ठिकाणावरून येणार असल्याने वीसपंचवीस मिनिटे उशिराच मार्गस्थ झालो. या सहलीमुळे शाळेतील दिवसांची आठवण झाली. सुरुवातीस ज्येष्ठांची हजेरी घेण्यात आली. एखादा दुसराजण वाट पाहायला लावतोच.चला एकदाचे मार्गस्थ झालो. पहिला थांबा सातारा येथील मोळाचा ओढा येथे होता. तेथे उर्वरित सदस्यांना घेऊन महाबळेश्वरकडे प्रयाण केले.












             सकाळची वेळ असल्याने बहुतांशी सदस्य अल्पोपहाराची आठवण करुन देत होते. सर्व गोष्टींचे नियोजन असल्याने महाबळेश्वर घाट सुरु होताच स्वादिष्ट असा अल्पोपहार देण्यात आला. महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण असल्याने येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते.आम्ही फक्त येथे आमच्या स्मृती जागवल्या आणि संघाचे उपाध्यक्ष टी.के. बाबर यांना घेऊन पोलादपूरच्या दिशेने निघालो. घाटातील वाट लक्ष वेधून घेत होती. जिकडे पाहावे तिकडे वृक्षाशिवाय काही दिसत नव्हते. प्रतापगडाला जाणारा दिशादर्शक फलक पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाची आठवण झाली. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला तो क्षण नजरेसमोरून गेला. सातारा जिल्हा प्रशासन शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहाने दरवर्षी साजरा करते. त्या दिवसाची आठवण करुन दिली गेली.

                   आम्ही रायगड जिल्ह्यात प्रवेश केला. पायथ्याला पोलादपूर शहर लागले. सावित्री नदीच्या काठाकाठाने आम्ही महाडकडे गेलो. सावित्री नदीच्या तुटलेल्या पुलाचा प्रसंग अंगावर शहारे आणणारा असाच होता. आता नवीन पुल झाला आहे. महाड शहर म्हटलेकी "चवदार तळे" हे आठवल्याशिवाय राहत नाही. याठिकाणी भेट दिली ती दुपारच्यासत्रात. मुंबई गोवा महामार्गावर शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड, मुंबई शाखा महाडचे सर्व अधिकारी आमची वाट पाहत होते. महाडपासून शिवकृपाची गाडी आम्हास दिशादर्शन करत होती. त्यामुळे पुढील प्रवास सुखद झाला. 

३६ एकर क्षेत्र या स्मारकासाठी अधिग्रहित करण्यात आले आहे. केवळ सहा सात एकरक्षेत्रच वापरात आहे. उर्वरित क्षेत्र जंगलाने व्यापले आहे. कोकण रेल्वेचा मार्ग देखील या क्षेत्रातून गेला आहे. हे ठिकाण महाड आणि माणगावपासून जवळ आहे. रस्त्याने आणि रेल्वेने सहज येथे जाता येते. याठिकाणी वर्षभर प्रबोधनाचे कार्यक्रम चालू असतात. स्मारकाच्या ठिकाणी गेल्यानंतर शिवकृपाच्या वतीने स्वागत समारंभ झाला. सर्वांचे गुलाब पुष्प,कॅलेंडर, हरिपाठ, भगवद्गीता भेट देऊन स्वागत करण्याचा मान मला मिळाला. शाखाधिकारी श्रेणिक जगताप यांनी संस्थेची माहिती दिली. शिवकृपाचे सभासद होण्याचे आवाहन देखील करण्यात आले. राष्ट्रीय स्मारकाचे प्रमुख विनायक धुरी यांनी साने गुरुजींच्या जीवनाचा पटच आमच्यापुढे उलघडून दाखवला. सेवा संघाचे अध्यक्ष एस.बी. खराते यांचेही मार्गदर्शन झाले.

          साने गुरुजी कोकणातील पालगडचे, शिक्षण घेतल्यानंतर खानदेशात नोकरी निमित्ताने गेले. शिक्षक विद्यार्थी नाते काय असावे हे साने गुरुजींच्याकडून शिकावे. ज्यांना ज्यांना साने गुरुजींच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला ते विद्यार्थी धन्य होत. तो काळ स्वातंत्र्य आंदोलनाचा होता. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांनी आंदोलनात उडी घेतली. ब्रिटिश सरकारने त्यांना अटक केली. वेगवेगळ्या तुरुंगात ठेवल्याचा उल्लेख आहे. एक शिक्षक म्हणून त्यांचे काम सर्वांना प्रेरणादायी आहे. तुरुंगात असताना सहकैदयाना मार्गदर्शन करण्याची भूमिकाही त्यांची होती. तुरुंगात असताना आंदोलनाचा मार्ग स्वीकारला म्हणून त्रिचनापल्ली येथील तुरुंगात हलवले. आंतरभारतीची कल्पना तेथेच सुचली. प्रत्येकाला किमान आपल्या मातृभाषेशिवाय आणखी एखादी भाषा अवगत असावी. आता तर एखादी परकीय भाषा आपणास आली पाहिजे.

            पंढरपूरचा पांडुरंगाचे दर्शन सर्वांना घेता येत नव्हते. हरिजन दर्शन घेऊ शकत नव्हते. ते मंदिर सर्वांसाठी खुले करण्याचे काम गुरुजींनी उपोषणाच्या माध्यमातून केले. खऱ्याअर्थाने पंढरीचा पांडुरंग, आपणा सर्वांचा "विठुराया" पांडुरंगाने मुक्त केला. येथे चित्ररुपात प्रदर्शनी पाहायला मिळते. विद्यार्थी दशेपासून अंतापर्यंतचा प्रवास प्रदर्शनीच्या माध्यमातून अधोरेखित केला आहे.

            विद्यार्थी मासिकाचे संपादन,असहकार चळवळ, कारावास, दांडी यात्रा, सायमन आयोग विरोध, त्रिचनापल्ली सेंट्रल जेल, कायदेभंग चळवळ, कारागृहातील लेखन, भारतीय संस्कृती, शेतकरी व कामगार , चलेजाव आंदोलन, येरवड्याच्या कारागृहात , पंढरपूर सत्याग्रह,स्वातंत्र्य आणि गांधी हत्या,कर्तव्य आणि साधना, आंतरभारती आणि महानिर्वाण अशा चित्र प्रदर्शनी पाहायला मिळतात. दुपारच्या स्नेह भोजनाचा आस्वाद येथेच घेतला. शिवकृपाच्या महाड शाखेचे शाखाधिकारी जगताप साहेब आणि त्यांचे सहकारी राहुल वीरकर, आकाश जाधव, अमोल कचरे यांनी स्मारकाच्या ठिकाणची व्यवस्था उत्तम केली होती.



           दुपारच्या सत्रात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष केलेल्या चवदार तळे येथे भेट दिली. या प्रंसगाची सर्वांना माहिती आहे. नंतर मात्र आम्ही शिवथर घळ या स्थळाला भेट दिली. येथील वास्तव्यात रामदास स्वामीनी दासबोध ग्रंथ कल्याण स्वामींच्या माध्यमातून लिहिला गेला. हे ठिकाण निसर्गाच्या सान्निध्यात पर्वत रांगेत आहे.आजही तेथे जायचे म्हटले तर अनेक अडचणीत येतात. साडेतीनशे वर्षांपूर्वी काय परिस्थिती असेल याची कल्पनाच केलेली बरी. या ठिकाणी ध्यानस्थ बसण्यासाठी जागा आहे. आम्हाला फारसा वेळ नसल्याने आम्ही तेथून मार्गस्थ झालो. आता दिवस लहान असल्याने शिवथर घळ जवळच अंधार पडला.



    आमचा परतीचा प्रवास वरंध घाटमार्गे भोर सातारा असा झाला. आजची सहल आम्हाला अतिशय प्रेरणा देऊन गेली. स्वांतत्र्य,समता,बंधुता, ममत्व या गोष्टींचे महत्व पटवून दिले गेले. शिक्षकाने नव्हे तर प्रत्येक नागरिकाने अशा स्थळांना भेटी द्यायला हव्यात असे वाटते.

          राजेंद्र पवार 

       संचालक, शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड, मुंबई

 ९८५०७८११७८

८१६९४३१३०६

रविवार, १५ डिसेंबर, २०२४

!! बारामती पॉवर मॅरेथॉन २०२४ !! (१५ डिसेंबर)

 !! बारामती पॉवर मॅरेथॉन २०२४ !! (१५ डिसेंबर)

               आज १५ डिसेंबर २०२४ रोजी बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनने बारामती पॉवर मॅरेथॉनचे आयोजन केले होते. आजच्या स्पर्धा ५, १०, २१ व ४२ किलोमीटरच्या होत्या. मी २१ किलोमीटरच्या स्पर्धेत भाग घेतला होता. आज मी ही स्पर्धा १:५५:४३ एक तास पंचावन्न मिनिटे आणि त्रेचाळीस सेकंदात पूर्ण केली. ६० वर्षापुढील वयोगटात माझा तिसरा  क्रमांक आला. 

            स्पर्धेचा प्रारंभ सकाळी ६ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , पुनीत बालन, आय जी. कृष्ण प्रकाश व अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते फ्लॅग ऑफने झाली. स्पर्धा सुरु होण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, गणपती बाप्पा मोरया अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

             स्पर्धेसाठी रुट सपोर्ट लाजवाब होता. पाणी, इनर्जी ड्रिंक, केळी, संत्रा, मोसंबी आदींची सोय स्पर्धकांची क्षमता द्विगुणित करत होती. ठराविक अंतरावर वाद्यवृंद स्पर्धकांचा जोश वाढवत होते. डी.जे.नी तर धमालच केली होती.  रेल्वे स्टेशन ग्राँऊंडचा वापर इव्हेंटसाठी केला होता.या ठिकाणी आपल्या देशातील अयोध्या येथील राम मंदिर, गेट वे ऑफ इंडिया सारख्या महत्वाच्या प्रतिकृती उभारल्या होत्या.या ठिकाणी प्रत्येक स्पर्धक फोटो सेशन करताना दिसून आले. आम्ही ही संधी सोडली नाही.

            मला यशापर्यंत घेऊन जाण्यासाठी विशाल घोरपडे यांची मोलाची मदत झाली. अशा स्पर्धेत प्रत्येक सेकंदाला अनन्य साधारण महत्व असते. एखाद्या दुसऱ्या सेकंदानेही आपण पोडियमपासून मागे राहू शकतो. हीच गोष्ट आपल्या जीवनाला तंतोतंत लागू पडते म्हणून आपण वेळेला किंमत द्यायला हवी. तसे नाही केले तर जीवनातील अनेक संधीना आपणास मुकावे लागेल. सातारा येथील डॉ. सुधीर पवार, विठ्ठल अरगडे, स्मिता शिंदे सारख्या  स्पर्धकांनी  या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता.

          आतापर्यंत मी तीन वेळा बारामती येथे मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. प्रत्येक वेळी बक्षिसांचा मानकरी ठरल्याचा विशेष आनंद होत आहे. बारामतीमध्ये शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई, शाखा बारामती तसेच शाखा माळशिरसचे शाखाधिकारी नितीन फडतरे, संचालक रमेश चव्हाण, आयर्नमॅन मच्छिंद्र आटोळे यांचे विशेष सहकार्य लाभले.या लोकांच्या ऋणात राहणेच मी अधिक पसंत करीन.

      आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य सुदृढ राहणे फार गरजेचे आहे. चांगले आरोग्य राहण्यासाठी प्रत्येकाने व्यायाम करायला हवा. देशाला प्रगती पथावर नेण्यासाठी आरोग्य संपन्न पिढी घडवन्याच्या उपक्रमात आपण सहभागी होऊया.स्वतः ही आरोग्य संपन्न राहूया.

       राजेंद्र पवार 

       संचालक, शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड,मुंबई

     ९८५०७८११७८, ८१६९४३१३०९

रविवार, ८ डिसेंबर, २०२४

!! गरवारे वाई हाफ मॅरेथॉन २०२४ !! (८ डिसेंबर)

 !! गरवारे वाई हाफ मॅरेथॉन २०२४ !!  (८ डिसेंबर)

               आज  रविवार दिनांक ८ डिसेंबर २०२४ रोजी वाई नगरीत गरवारे वाई हाफ हील मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेची सुरुवात द्रविड हायस्कूल वाई येथून पहाटे ६:१५ वाजता मान्यवरांच्या शुभहस्ते फ्लॅग ऑफ ने झाली. स्पर्धा सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत म्हटले गेले. राष्ट्रप्रेमाने  वातावरण भारून गेले. यामध्ये ३ किलोमीटर फन रन, १० किलोमीटर, २१ किलोमीटर असे इव्हेंट होते. 

             आज मी २१ किलोमीटर मध्ये भाग घेतला होता.मला आपल्या जिल्ह्यातील, राज्यातील, देशातील इतकेच नव्हे तरआंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक  धावपटूंबरोबर धावता आले. एकापेक्षा एक सरस  असेच रनर यामध्ये सहभागी झाले होते. आज  मी ही स्पर्धा १:५६:०२ एक तास  छपन्न मिनिटे आणि दोन सेकंदात पूर्ण केली. आजचा माझा वयोगट ५५ वर्षापुढील होता. या कॅटेगरी मध्ये माझा ६ वा क्रमांक आला. या कॅटेगरी मध्ये  माझ्यापेक्षा १०/११ वर्षांनी लहान असणारे अनेक स्पर्धक असल्याने माझा नंबर येण्याची शक्यता नव्हती. तरीही मिळालेले यश निश्चितच प्रेरणादायी आहे.

                   माझ्या यशामागे विशाल घोरपडे यांचे खूप परिश्रम आहेत.ते माझ्याबरोबर धावले , धावताना बऱ्याचश्या टिप्स दिल्या. वेळप्रसंगी मदतीचा हात दिला. थोडक्यात छानपैकी रुट सपोर्ट दिला. त्यामुळे मला कमी वेळ साधता आली. स्वास्थ्यम फिटनेस क्लबचेही नेहमीच मार्गदर्शन असते. आज अविनाश सुतार यांचीही खूप मदत झाली. मला प्रोत्साहन देण्यासाठी वाईच्या ज्ञानदीप शैक्षणिक संकुलाचे चेअरमन दिलीप चव्हाण ही आलेले होते. थोडक्यात माझ्या यशात अनेकांचा वाटा आहे.

                 आजच्या स्पर्धेची सुरुवात द्रविड हायस्कूलपासून झाली. सुरुवातीला काही वेळ अंधार होता. कृष्णा नदी ओलांडून गणपती मंदिर, शाहीर चौक, इतिहास प्रसिद्ध मेणवली , भोगाव, वरखडवाडी धोम, धोम धरण आणि टर्न असा मार्ग होता. स्पर्धेचा मार्ग चढउताराचा होता.धावपटुना प्रोत्साहन देण्यासाठी जागोजागी वाद्यवृंद  होते त्यामुळे स्पर्धकांचा जोश वाढत होता.स्पर्धा मार्ग हा नदीच्याकडेने असल्याने जणू काही नागमोडी वळणावरून आपण धावत आहोत असे वाटत होते.याठिकाणी काही  काव्य पंक्ती नमूद  कराव्यास वाटतात.

   असे जगावे दुनियेमध्ये ,आव्हानाचे लावून अत्तर!

   नजर रोखुनी नजरेमध्ये ,आयुष्याला द्यावे उत्तर!

   अशी दांडगी इच्छा ज्याची ,मार्ग तयाला मिळते सत्वर  !

  या स्पर्धेत सब टू होणे अभिमानास्पद मानले जाते. तो मान  आपणा सर्वांच्यामुळे  मला मिळालेला आहे. वाई मॅरेथॉनचे घोष वाक्य होते,

"निरतिशयम धावन्ती, !! run beyond limits !!"

             वाई मॅरेथॉनमुळे  ग्रामीण भागात चांगले खेळाडू तयार होत आहेत ही अभिमानाची बाब आहे. चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येकाने नियमित व्यायाम केला पाहिजे. "धावणे तुमच्या शरीरासाठी उत्तम आहे. "Health  is Wealth आपण सर्वजण नियमितपणे व्यायाम करुया, स्वतः आरोग्य संपन्न राहूया.

                 राजेंद्र पवार 

              संचालक,

शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड,मुंबई 

              ९८५०७८११७८.

               ८१६९४३१३०६

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...