!! बारामती पॉवर मॅरेथॉन २०२४ !! (१५ डिसेंबर)
आज १५ डिसेंबर २०२४ रोजी बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनने बारामती पॉवर मॅरेथॉनचे आयोजन केले होते. आजच्या स्पर्धा ५, १०, २१ व ४२ किलोमीटरच्या होत्या. मी २१ किलोमीटरच्या स्पर्धेत भाग घेतला होता. आज मी ही स्पर्धा १:५५:४३ एक तास पंचावन्न मिनिटे आणि त्रेचाळीस सेकंदात पूर्ण केली. ६० वर्षापुढील वयोगटात माझा तिसरा क्रमांक आला.
स्पर्धेचा प्रारंभ सकाळी ६ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , पुनीत बालन, आय जी. कृष्ण प्रकाश व अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते फ्लॅग ऑफने झाली. स्पर्धा सुरु होण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, गणपती बाप्पा मोरया अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
स्पर्धेसाठी रुट सपोर्ट लाजवाब होता. पाणी, इनर्जी ड्रिंक, केळी, संत्रा, मोसंबी आदींची सोय स्पर्धकांची क्षमता द्विगुणित करत होती. ठराविक अंतरावर वाद्यवृंद स्पर्धकांचा जोश वाढवत होते. डी.जे.नी तर धमालच केली होती. रेल्वे स्टेशन ग्राँऊंडचा वापर इव्हेंटसाठी केला होता.या ठिकाणी आपल्या देशातील अयोध्या येथील राम मंदिर, गेट वे ऑफ इंडिया सारख्या महत्वाच्या प्रतिकृती उभारल्या होत्या.या ठिकाणी प्रत्येक स्पर्धक फोटो सेशन करताना दिसून आले. आम्ही ही संधी सोडली नाही.
मला यशापर्यंत घेऊन जाण्यासाठी विशाल घोरपडे यांची मोलाची मदत झाली. अशा स्पर्धेत प्रत्येक सेकंदाला अनन्य साधारण महत्व असते. एखाद्या दुसऱ्या सेकंदानेही आपण पोडियमपासून मागे राहू शकतो. हीच गोष्ट आपल्या जीवनाला तंतोतंत लागू पडते म्हणून आपण वेळेला किंमत द्यायला हवी. तसे नाही केले तर जीवनातील अनेक संधीना आपणास मुकावे लागेल. सातारा येथील डॉ. सुधीर पवार, विठ्ठल अरगडे, स्मिता शिंदे सारख्या स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता.
आतापर्यंत मी तीन वेळा बारामती येथे मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. प्रत्येक वेळी बक्षिसांचा मानकरी ठरल्याचा विशेष आनंद होत आहे. बारामतीमध्ये शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई, शाखा बारामती तसेच शाखा माळशिरसचे शाखाधिकारी नितीन फडतरे, संचालक रमेश चव्हाण, आयर्नमॅन मच्छिंद्र आटोळे यांचे विशेष सहकार्य लाभले.या लोकांच्या ऋणात राहणेच मी अधिक पसंत करीन.
आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य सुदृढ राहणे फार गरजेचे आहे. चांगले आरोग्य राहण्यासाठी प्रत्येकाने व्यायाम करायला हवा. देशाला प्रगती पथावर नेण्यासाठी आरोग्य संपन्न पिढी घडवन्याच्या उपक्रमात आपण सहभागी होऊया.स्वतः ही आरोग्य संपन्न राहूया.
राजेंद्र पवार
संचालक, शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड,मुंबई
९८५०७८११७८, ८१६९४३१३०९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा