!! साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, चवदार तळे, शिवथर घळ भेट एक अविस्मरणीय दिवस !! (६ जानेवारी)
सातारा जिल्हा सेवानिवृत्त मुख्याध्यापक सेवासंघ आयोजित एक दिवसाची शैक्षणिक सहल रविवार दिनांक ५ जानेवारी रोजी निश्चित करण्यात आली होती. नियोजनाप्रमाणे सकाळी ७:३० वाजता ती मार्गस्थ झाली. सहलीतील सहभागी सदस्य वेगवेगळ्या ठिकाणावरून येणार असल्याने वीसपंचवीस मिनिटे उशिराच मार्गस्थ झालो. या सहलीमुळे शाळेतील दिवसांची आठवण झाली. सुरुवातीस ज्येष्ठांची हजेरी घेण्यात आली. एखादा दुसराजण वाट पाहायला लावतोच.चला एकदाचे मार्गस्थ झालो. पहिला थांबा सातारा येथील मोळाचा ओढा येथे होता. तेथे उर्वरित सदस्यांना घेऊन महाबळेश्वरकडे प्रयाण केले.
सकाळची वेळ असल्याने बहुतांशी सदस्य अल्पोपहाराची आठवण करुन देत होते. सर्व गोष्टींचे नियोजन असल्याने महाबळेश्वर घाट सुरु होताच स्वादिष्ट असा अल्पोपहार देण्यात आला. महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण असल्याने येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते.आम्ही फक्त येथे आमच्या स्मृती जागवल्या आणि संघाचे उपाध्यक्ष टी.के. बाबर यांना घेऊन पोलादपूरच्या दिशेने निघालो. घाटातील वाट लक्ष वेधून घेत होती. जिकडे पाहावे तिकडे वृक्षाशिवाय काही दिसत नव्हते. प्रतापगडाला जाणारा दिशादर्शक फलक पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाची आठवण झाली. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला तो क्षण नजरेसमोरून गेला. सातारा जिल्हा प्रशासन शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहाने दरवर्षी साजरा करते. त्या दिवसाची आठवण करुन दिली गेली.
आम्ही रायगड जिल्ह्यात प्रवेश केला. पायथ्याला पोलादपूर शहर लागले. सावित्री नदीच्या काठाकाठाने आम्ही महाडकडे गेलो. सावित्री नदीच्या तुटलेल्या पुलाचा प्रसंग अंगावर शहारे आणणारा असाच होता. आता नवीन पुल झाला आहे. महाड शहर म्हटलेकी "चवदार तळे" हे आठवल्याशिवाय राहत नाही. याठिकाणी भेट दिली ती दुपारच्यासत्रात. मुंबई गोवा महामार्गावर शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड, मुंबई शाखा महाडचे सर्व अधिकारी आमची वाट पाहत होते. महाडपासून शिवकृपाची गाडी आम्हास दिशादर्शन करत होती. त्यामुळे पुढील प्रवास सुखद झाला.
३६ एकर क्षेत्र या स्मारकासाठी अधिग्रहित करण्यात आले आहे. केवळ सहा सात एकरक्षेत्रच वापरात आहे. उर्वरित क्षेत्र जंगलाने व्यापले आहे. कोकण रेल्वेचा मार्ग देखील या क्षेत्रातून गेला आहे. हे ठिकाण महाड आणि माणगावपासून जवळ आहे. रस्त्याने आणि रेल्वेने सहज येथे जाता येते. याठिकाणी वर्षभर प्रबोधनाचे कार्यक्रम चालू असतात. स्मारकाच्या ठिकाणी गेल्यानंतर शिवकृपाच्या वतीने स्वागत समारंभ झाला. सर्वांचे गुलाब पुष्प,कॅलेंडर, हरिपाठ, भगवद्गीता भेट देऊन स्वागत करण्याचा मान मला मिळाला. शाखाधिकारी श्रेणिक जगताप यांनी संस्थेची माहिती दिली. शिवकृपाचे सभासद होण्याचे आवाहन देखील करण्यात आले. राष्ट्रीय स्मारकाचे प्रमुख विनायक धुरी यांनी साने गुरुजींच्या जीवनाचा पटच आमच्यापुढे उलघडून दाखवला. सेवा संघाचे अध्यक्ष एस.बी. खराते यांचेही मार्गदर्शन झाले.
साने गुरुजी कोकणातील पालगडचे, शिक्षण घेतल्यानंतर खानदेशात नोकरी निमित्ताने गेले. शिक्षक विद्यार्थी नाते काय असावे हे साने गुरुजींच्याकडून शिकावे. ज्यांना ज्यांना साने गुरुजींच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला ते विद्यार्थी धन्य होत. तो काळ स्वातंत्र्य आंदोलनाचा होता. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांनी आंदोलनात उडी घेतली. ब्रिटिश सरकारने त्यांना अटक केली. वेगवेगळ्या तुरुंगात ठेवल्याचा उल्लेख आहे. एक शिक्षक म्हणून त्यांचे काम सर्वांना प्रेरणादायी आहे. तुरुंगात असताना सहकैदयाना मार्गदर्शन करण्याची भूमिकाही त्यांची होती. तुरुंगात असताना आंदोलनाचा मार्ग स्वीकारला म्हणून त्रिचनापल्ली येथील तुरुंगात हलवले. आंतरभारतीची कल्पना तेथेच सुचली. प्रत्येकाला किमान आपल्या मातृभाषेशिवाय आणखी एखादी भाषा अवगत असावी. आता तर एखादी परकीय भाषा आपणास आली पाहिजे.
पंढरपूरचा पांडुरंगाचे दर्शन सर्वांना घेता येत नव्हते. हरिजन दर्शन घेऊ शकत नव्हते. ते मंदिर सर्वांसाठी खुले करण्याचे काम गुरुजींनी उपोषणाच्या माध्यमातून केले. खऱ्याअर्थाने पंढरीचा पांडुरंग, आपणा सर्वांचा "विठुराया" पांडुरंगाने मुक्त केला. येथे चित्ररुपात प्रदर्शनी पाहायला मिळते. विद्यार्थी दशेपासून अंतापर्यंतचा प्रवास प्रदर्शनीच्या माध्यमातून अधोरेखित केला आहे.
विद्यार्थी मासिकाचे संपादन,असहकार चळवळ, कारावास, दांडी यात्रा, सायमन आयोग विरोध, त्रिचनापल्ली सेंट्रल जेल, कायदेभंग चळवळ, कारागृहातील लेखन, भारतीय संस्कृती, शेतकरी व कामगार , चलेजाव आंदोलन, येरवड्याच्या कारागृहात , पंढरपूर सत्याग्रह,स्वातंत्र्य आणि गांधी हत्या,कर्तव्य आणि साधना, आंतरभारती आणि महानिर्वाण अशा चित्र प्रदर्शनी पाहायला मिळतात. दुपारच्या स्नेह भोजनाचा आस्वाद येथेच घेतला. शिवकृपाच्या महाड शाखेचे शाखाधिकारी जगताप साहेब आणि त्यांचे सहकारी राहुल वीरकर, आकाश जाधव, अमोल कचरे यांनी स्मारकाच्या ठिकाणची व्यवस्था उत्तम केली होती.
दुपारच्या सत्रात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष केलेल्या चवदार तळे येथे भेट दिली. या प्रंसगाची सर्वांना माहिती आहे. नंतर मात्र आम्ही शिवथर घळ या स्थळाला भेट दिली. येथील वास्तव्यात रामदास स्वामीनी दासबोध ग्रंथ कल्याण स्वामींच्या माध्यमातून लिहिला गेला. हे ठिकाण निसर्गाच्या सान्निध्यात पर्वत रांगेत आहे.आजही तेथे जायचे म्हटले तर अनेक अडचणीत येतात. साडेतीनशे वर्षांपूर्वी काय परिस्थिती असेल याची कल्पनाच केलेली बरी. या ठिकाणी ध्यानस्थ बसण्यासाठी जागा आहे. आम्हाला फारसा वेळ नसल्याने आम्ही तेथून मार्गस्थ झालो. आता दिवस लहान असल्याने शिवथर घळ जवळच अंधार पडला.
आमचा परतीचा प्रवास वरंध घाटमार्गे भोर सातारा असा झाला. आजची सहल आम्हाला अतिशय प्रेरणा देऊन गेली. स्वांतत्र्य,समता,बंधुता, ममत्व या गोष्टींचे महत्व पटवून दिले गेले. शिक्षकाने नव्हे तर प्रत्येक नागरिकाने अशा स्थळांना भेटी द्यायला हव्यात असे वाटते.
राजेंद्र पवार
संचालक, शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड, मुंबई
९८५०७८११७८
८१६९४३१३०६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा