दर्जेदार ऊस बियाणे (रोपे)शेतकऱ्यांमध्ये आर्थिक क्रांती घडवतील : चित्रपट निर्माते मानसिंग पवार
काशीळमधील सरस हायटेक नर्सरी ही श्रीकांत घोरपडे यांनी अक्षय माने व समाधान माने यांच्या सहकार्याने सुरु केली आहे. या नर्सरीच्या द्वितीय वर्धापनदिनप्रसंगी कृषीविषयक मालिका तसेच चित्रपट निर्माते मानसिंग पवार म्हणालेकी, दर्जेदार ऊस बियाणे/रोपे असतील तरच शेतकऱ्यांमध्ये आर्थिक क्रांती घडेल. रोपामुळे ऊसाची लागण एकसारखी होते. एकरी ऊसाची संख्या मर्यादित ठेवता येते. आपण थोडी काळजी घेतली तर एकरी १०० टन उत्पादन सहज घेता येते. आयसीएआर ऊस पैदास केंद्र,कोईमतुर येथून बियाणे आणून ही रोपे तयार केली आहेत. सध्या ऊसामध्ये गवताळ वाढीची समस्या उद्भवत आहे. दर्जेदार रोपामुळे या समस्येचे समूळ उच्चाटन होत आहे. ऊस बियाणेबरोबर तांत्रिक मार्गदर्शन श्रीकांत घोरपडे यांचे होत असल्याने या परिसरातील शेतकरी एकरी शंभर टन उत्पादन सहज घेतील. दर्जेदार रोपे पुरवणे, कमीत कमी खर्च, पाण्याचे योग्य नियोजन करुन लोकांचे उत्पादन वाढवणे हा एकमेव उद्देश श्रीकांत घोरपडे यांचा आहे.
याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्र बोरगावचे विषय विशेषज्ञ डॉ. महेश बाबर, डॉ. भूषण यादगिरवार डॉ . संग्राम पाटील ,सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, उद्योजक धनंजय थोरात, प्रशांत कणसे, संजय ढाणे, शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबईचे संचालक राजेंद्र पवार, संचालक प्रविण पाटील , अतीतच्या नवचैतन्य सहकारी पतसंस्थेचे संस्थापक राजेंद्र जाधव, चिंचणेरचे कृषी सहाय्यक धनाजी फडतरे, कृषी सहाय्यक फडतरे मॅडम,प्रगतशील शेतकरी संतोष काळभोर, बाळासाहेब माने, जयवंत माने, सकाळ अग्रोवन समूहाचे विकास जाधव , सुरेश माने, सचिन घोरपडे, नवनाथ घाडगे, उमेश निकम यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना भूषण यादगिरवार म्हणालेकी, उच्चशिक्षित तरुणांनी शेतीत यायला हवे. शास्त्रशुध्द पद्धतीने शेती केली तर ऊसच नव्हे तर प्रत्येक पिकात विक्रमी उत्पादन घेता येते.
श्रीकांत घोरपडे यांनी शेतीत नवनवीन प्रयोग केल्यामुळे त्यांच्या उत्पादनात पर्यायाने उत्पन्नात विक्रमी वाढ झाली आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आम्ही आपणास हवे ते सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत असे अभिवचनही त्यांनी दिले.
प्रास्ताविकात श्रीकांत घोरपडे यांनी आपली शेतीतील वाटचाल यामध्ये कृषी विज्ञान केंद्र, बोरगावचे सहकार्य, मार्गदर्शन याबद्दल ऋण व्यक्त केले. जिल्हा तसेच राज्य, राष्ट्रीय स्तरावरील अनेक सन्मान केवळ कृषी विज्ञान केंद्रामुळे प्राप्त झाले आहेत. आपण सर्वांनीच या कृषी विज्ञान केंद्राचा लाभ घ्यायला हवा असेही ते म्हणाले.
यावेळी डॉ. संग्राम पाटील, डॉ. महेश बाबर, चंद्रकांत जाधव, राजेंद्र जाधव, धनाजी फडतरे यांची समयोचीत भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. भूषण यादगिरवार यांनी केले तर आभार राजेंद्र पवार यांनी मानले. सदरच्या कार्यक्रमास काशिळ परिसरातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा