गुरुवार, २१ जुलै, २०२२

!! भारताचा राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार !! (२२ जुलै )

 !! भारताचा राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार !! (२२ जुलै )

              भारताचा राष्ट्रीय ध्वज हा भगवा (केशरी ), पांढरा आणि हिरवा असा क्षैतिज आयताकृती तिरंगा आहे.त्याच बरोबर अशोकचक्र, त्याच्या मध्यभागी आहे. भारतीय राष्ट्रध्वज (तिरंगा) २२ जुलै १९४७ रोजी, भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी अंगीकारला गेला. २४ मार्च रोजी इंंग्रजांनी लवकरच भारत सोडून जाण्याचा आपला निर्णय जाहीर केला. स्वतंंत्र भारताचा ध्वज कसा असावा हे ठरविण्यासाठी तातडीने एक समिती नेमली गेली. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभृृती होते. त्यांनी ठरवले की काँग्रेसचा ध्वज हाच स्वतंंत्र भारताचा ध्वज म्हणून घोषित करावा, फक्त चरख्याऐवजी अशोकचक्र हे चिह्न ध्वजाच्या मध्यभागी विराजमान व्हावे. घटना समितीने २२ जुलैला या ठरावाला मंंजुरी दिली.आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताच्या अधिपत्याखालील अधिकृत ध्वज झाला.त्यानंतर भारतीय ध्वज म्हणून ध्वज कायम ठेवण्यात आला.

अशोक चक्र

            कायद्याने,हा ध्वज खादीपासून बनवावा आणि खास प्रकारचे हात सूत कापडाचा किंवा रेशीमचा असावा.यासाठी महात्मा गांधी यांनी लोकप्रिय केलेली खादी वापरली जाते.ध्वज निर्मितीची प्रक्रिया व वैशिष्ट्ये भारतीय मानक कार्यालयद्वारे ठरवली जाते. हा ध्वज तयार करण्याचा अधिकार खादी विकास व ग्रामोद्योग आयोगाकडे आहे.तो अधिकार विभागीय गटांना वाटून दिला जातो.२००९ पर्यंत कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ ध्वजाची एकमेव निर्माता होती.

             ध्वजाचा वापर भारतीय ध्वज संहिता आणि राष्ट्रीय चिन्हाशी संबंधित इतर कायद्यांद्वारे केला जातो.मूळ संहिता स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनासारखे राष्ट्रीय दिवस वगळता खासगी नागरिकांकडून ध्वजाचा वापर करण्यास मनाई होती.२००२ मध्ये, नवीन जिंदाल यांनी खासगी नागरिकाकडून केलेल्या अपिलाच्या सुनावणीवर, भारतीय सर्वोच्च न्यायालयाने खासगी नागरिकांकडून ध्वज वापरास परवानगी देण्यासाठी कायद्यांचा संग्रहमध्ये बदल करण्याचे निर्देश भारत सरकारला दिले.त्यानंतर, भारतीय केंद्रीय मंत्रिमंडळाने मर्यादित वापरास परवानगी देण्यासाठी कायद्यांचा संग्रहमध्ये सुधारणा केली.



ध्वजातील गडद भगवा, पांढरा व हिरवा हे तीन रंगीत पट्टे आणि त्यांचे अर्थ 

            भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा, हिरवा, आणि निळा. २२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगी ध्वज' भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला. त्या संबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहे. वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग आहेत. मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे अशोकचक्र (धम्मचक्र) असून ते सारनाथ येथील सिंहमुद्रेवर असलेले अशोकचक्र आहे. चक्राला २४ आरे आहेत. मछलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगाली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे. भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंचीचे व लांबीचे प्रमाण 2:3 असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या एकूण रचनेचे महत्त्व चांगल्या प्रकारे विशद केले आहे. ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे. वरच्या भागात गडद केशरी रंग आहे. या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो. मधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध होतो. खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृद्धीचा बोध होतो.  

            निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राचे व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. त्याला ‘अशोकचक्र' या नावाने ओळखले जाते. त्यात भारतीय कला, तत्त्वज्ञान, इतिहास व संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो. 

फडकवण्याची नियमावली

         भारत देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे. ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी भारतीयांना माहिती असते. संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले जाते. राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला जातो की, तेथून तो ध्वज सगळ्यांना दिसतो.. शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याची प्रथा आहे. रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला जातोच. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक असते.

संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला जातो.. ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविण्याची प्रथा आहे. ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी अथवा दर्शनी भागात आडवा व तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला असतो. प्लॅस्टिकचा ध्वज वापरण्यास मनाई असते.

राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीने फडकाविला गेला पाहिजे की, मान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे पाहिजे व ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे. अथवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे व भिंतीवर आडवा फडकाविला पाहिजे. कुठल्या पुतळ्याचे अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक व वेगळ्या पद्धतीने फडकविला गेला पाहिजे. ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा व त्यावर फडकवावा.

संहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात ध्वज असावा. जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे. फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये. कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये. इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये.

राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी करू नये. केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये. तसेच राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये. ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पद्धतीने बांधला पाहिजे.ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्यासंदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे. त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये. ध्वज कुठलेही वाहन, रेल्वे, जहाजावर लावला जाऊ शकत नाही. ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये. कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही. तसेच राष्ट्रध्वज गादी, रुमालावर काढू नये. राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही. ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही. 

             केवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो. राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत. शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतील. जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल व तो सावधान स्थितीत उभा राहिल. सरकारी अधिकाऱ्यांच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे. आदरणीय व्यक्ती डोक्यावर टोपी न घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊ शकतात. 

आपण सर्वजण राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान करुया.

   संकलक: राजेंद्र पवार

  ९८५०७८११७८

गुरुवार, १४ जुलै, २०२२

!! जागतिक युवा कौशल्य दिवस २०२२ !! (१५ जुलै )

 !! जागतिक युवा कौशल्य दिवस २०२२ !! (१५ जुलै )

               दरवर्षी साजरा होणारा जागतिक युवा कौशल्य दिन तरुणांना रोजगारासाठी, उद्योजक बनण्यासाठी लागणारे कौशल्य  प्राप्त व्हावे यावरच लक्ष केंद्रित करतो. जागतिक युवा कौशल्य दिवस तांत्रिक, व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व आणि स्थानिक आणि जागतिक अर्थव्यवस्थेशी संबंधित व इतर कौशल्यांच्या विकासाबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने १५ जुलै रोजी साजरा केला जातो. तरुणांना रोजगार, योग्य काम आणि उद्योजकता या कौशल्यांनी सुसज्ज करणे गरजेचे आहे. हा दिवस वर्तमान आणि भविष्यातील जागतिक आव्हाने सोडविण्यासाठी कुशल तरुणांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर देखील प्रकाश टाकतो. हा दिवस तरूणामधील संवाद, तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, कंपन्या, इत्यादींसाठी एक खास संधी प्रदान करतो. केंद्र सरकारच्या पुढाकाराने युवा कौशल्याचे सबलीकरण करण्यासाठी स्किल इंडिया मिशन आजच्याच दिवशी सुरु करण्यात आले आहे. या माध्यमातून तरुणांना अधिक रोजगारक्षम बनवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.





           जागतिक युवा कौशल्य दिनाचा इतिहास डिसेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने ठराव स्वीकारून १५ जुलै हा जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केला. आजच्या तरूणांसाठी बेरोजगारी आणि रोजगाराच्या आव्हानांच्या बाबतीत अधिक चांगली सामाजिक-आर्थिक परिस्थिती प्राप्त करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

महत्त्व - २१ व्या शतकातील तरुणांसाठी बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे. युवा २०२० च्या ग्लोबल एम्प्लॉयमेंट ट्रेंड्सच्या अहवालानुसार २०२० पासून नोकरी नसलेले तरुण किंवा अप्रशिक्षित असलेल्या लोकांची आकडेवारी वाढली आहे ही बाब आपल्यासाठी चिंताजनक आहे.

           विद्यार्थ्यांना रोजगाराच्या कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी वर्णे हायस्कूलमध्ये २०१३ मध्येच कौशल्याधिष्टीत अभ्यासक्रम सुरु केलेला आहे. तो मल्टिपल स्किल फौंडेशन कोर्स या नावाने ओळखला जातो. हा कोर्स सातारा जिल्ह्यातील अगदी मोजक्या शाळांमध्ये आहे. याचा आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी फायदा घेतला आहे. आय टी आय सती आरक्षित कोट्यातून प्रवेश मिळून अनेकांनी लगेच नोकरी प्राप्त केली आहे. तसेच अनेकांना स्वताचा व्यवसाय उभारणीसाठी प्रोत्साहन मिळत आहे. हायस्कूलमध्ये असलेल्या संधीचा फायदा  लोकांनी घ्यायला हवा. या अभ्यासक्रमांतर्गत चार उपविषय आहेत.

ते खालीलप्रमाणे....

१)अभियांत्रिकी २) गृह-आरोग्य ३) शेती पशुपालन ४) ऊर्जा- पर्यावरण

  या विषयामध्ये प्रात्यक्षिकावर अधिक भर आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणारास खालील संधी आहेत.

१)आय.टी.आय.साठी २५% जागा राखीव

२) अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी १५% जागा राखीव

३) स्वयंरोजगाराच्या अनेक संधी

      आपला पाल्य भविष्यात स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे यासाठी त्याच्याकडे कोणते ना कोणते कौशल्य असलेच पाहिजे. माध्यमिक ,उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपल्या पाल्याला जाणीवपूर्वक कौशल्य शिक्षण द्यायला हवे असे मला वाटते.

 राजेंद्र पवार

 ९८५०७८११७८

मंगळवार, १२ जुलै, २०२२

!! गुरुपौर्णिमा !! (१३ जुलै )

 !! गुरुपौर्णिमा !! (१३ जुलै )

                  गुरु पौर्णिमेच्या आजच्या या विशेष दिवशी विश्वातील समस्त गुरुजनाना माझा प्रणाम. मानवी जीवनातील गुरूच्या महत्वाला साधू संत आणि ऋषी मुनींनी अनेकदा सांगितले आहे. भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान अतिउच्च आहे. जरी बालकाच्या आई वडिलांना पहिला गुरु म्हटले जाते तरी विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक गुरूच कारणीभूत ठरतो. 

              भविष्यातील एक चांगला नागरिक घडवण्यासाठी बालकाच्या बालमनावर गुरूच प्रभाव टाकतात. आणि म्हणूनच आपल्या शास्त्रामध्ये गुरूंची महती काहीतरी अशा पद्धतीने वर्णिलेली  आहे. 

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा 

गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः.

       अर्थात गुरु म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. गुरु ईश्वराचे दुसरे रूप असतात. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते. ज्या गुरुंनी आपले व्यक्तिमत्त्व घडविले त्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्याचा, त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही संबोधले जाते. कारण आदिगुरू व्यासांचा जन्म या पौर्णिमेलाच झाला होता. 



              ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना 'व्यासांचा मागोवा घे तू' असे व्यास ऋषी बद्दल गौरवोद्गार काढले आहेत. कुंभार ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन मडके बनवतो. त्याचप्रमाणे गुरु सजीव मानव रुपी व्यक्तिमत्त्वाला आपल्या संस्कारांनी आदर्श घडवतात. गुरूचे ज्ञान सागराप्रमाणे अथांग आहे. आपण त्याच्यापुढे नम्र होऊन ज्ञान कण वेचले पाहिजे. कारण शेवटी गुरुविण कोण दाखविल वाट....?

           आपल्या जीवनात गुरूंचे नानाविध रूपे आपणास पहावयास मिळतात. मूल गर्भात असल्यापासून आई त्याच्यावर उत्तम संस्कार करते. आई आपली पहिली गुरु असते. निसर्गातील प्रत्येक कण आपला गुरु असतो, कारण निसर्गा कडून खूप चांगल्या गोष्टी आपल्याला सदैव शिकायला मिळतात. जसे पाणी, झाडे, वेली, पाने, फुले, पशू, पक्षी, समुद्र, नदी, त्याचबरोबर पुस्तके या शिवाय आपले नातलग, मित्र मैत्रिणी हे सुद्धा आपले गुरूच असतात. जे जे लोक आपल्याला जगण्यासाठी नेहमी चांगले संस्कार देतात, ते आपले गुरूच आहेत. गुरुला वयाचे, जातीचे बंधन नसते. आताचा काळ बदललेला आहे. शिक्षण पद्धती बदललेली आहे. गुरु आणि शिष्य यांचे नाते मात्र बदललेले नाही. ते आजही पवित्र मानले जाते. आजपर्यंत जगात ज्या थोर व्यक्ती होऊन गेल्या त्यांच्यावर त्यांच्या गुरूंचाच अधिक प्रभाव होता. आपल्या गुरूंचा ही आपल्यावर खूप प्रभाव असतो. 

            गुरु प्रमाणे शिष्य घडत असतो. म्हणून आपण आपल्या गुरूंच्या आज्ञेचे पालन करायला हवे. त्यांच्या शब्दांचा आदर करायला हवा. चांगला अभ्यास करून गुरूचा, देशाचा, शाळेचा व आई-वडिलांच्या नावलौकिक करायला हवा.

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

 संकलक: राजेंद्र पवार

    ९८५०७८११७८

!! पोळा( बेंदूर ) महाराष्ट्रातील शेतीशी संबंधित सण !! (१२ जुलै )

 !! पोळा( बेंदूर ) महाराष्ट्रातील शेतीशी संबंधित सण !! (१२ जुलै )

              बैल पोळा (बेंदूर )हा सण देशात वेगवेगळ्या वेळी साजरा केला जातो.सातारा जिल्ह्यात हा सण आषाढ महिन्यातील शुध्द त्रयोदशी, चतुर्दशीला साजरा करण्याची परंपरा आहे. यावर्षी तो त्रयोदशीला आहे. काही ठिकाणी हा सण श्रावण किंवा भाद्रपद अमावास्येला साजरा करण्याची प्रथा आहे.

              बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्यप्रदेश व तेलंगण सीमाभागात सुद्धा हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात.

              बेंदराच्या आदल्या दिवशी खांदमळणी असते. यादिवशी बैलाच्या खांद्याला हळद आणि लोणी यांचे मिश्रण करुन ते लावले जाते. यादिवशी बाजरीचे उंडे बैलांना खाऊ घालण्याची परंपरा आहे. बेंदरादिवशी बैलांना आंघोळ घातली जाते. नंतर बैलांना सुंदररित्या सजवले जाते. गळ्यात नवीन कंडा तसेच चाळ बांधला जातो, कासरा देखील नवीन वापरण्याची प्रथा आहे. शिंगे रंगवली जातात, त्यावर पितळी शेंब्या बसवल्या जातात, सर्वांगावर नक्षीदार ठिपके काढले जातात,डोक्याला बाशिंग बांधले जाते, पाठीवर झूल घातली जाते. बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते. बैलाला आज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून तो त्याला खायला दिला जातो. आजच्या दिवशी बैलांना कोणतेही काम लावले जात नाही.शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्त्वाचा मानला गेल्याने तो उत्साहाने साजरा करण्यात येतो.



           आता मात्र परिस्थिती बदलली आहे, ग्रामीण भागात बैलांची संख्या खूपच कमी झालेली आहे. बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्याने बैलांना चांगले दिवस येत आहेत ही एक चांगली बाब आहे. कृषी यांत्रिकीकरण झाल्याने बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतलेली दिसून येते. आपल्या जिल्ह्यात काही गावात तर ट्रॅक्टरची मिरवणूक काढली जाते. खरोखरची बैले नसली तरी मातीच्या बैलाची पूजा करुया. या सणाच्या निमित्ताने जुन्या स्मृतींना उजाळा देऊया.बेंदूर सणाच्या शेतकरी बांधवाना हार्दिक शुभेच्छा.

    संकलक: राजेंद्र पवार

         ९८५०७८११७८

रविवार, १० जुलै, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस विसावा १० जुलै आषाढी एकादशी )

 !! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस विसावा  १० जुलै आषाढी एकादशी )

            आज आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरला वैष्णवांचा मेळा भरला होता. चंद्रभागा नदीवर स्नानाची झुंबड उडाली होती. स्नान करताना एकमेकांच्या अंगावर पाणी उडवणे, एकमेकांना स्नान घालत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. आज रांगेत उभे राहून दर्शन घेणे म्हणजे एक दिव्यच आहे. आम्हीही कळसाचे दर्शन घेतले. पंढरपूर येथे इस्कानचे भव्य मंदिर आहे. पांडुरंगाच्या भेटीसाठी आलेला माणूस इस्कॉनला भेट दिल्याशिवाय परत फिरत नाही अशी सद्यस्थिती आहे. इस्कॉन भगवद्गीतेचा प्रचार व प्रसार संपूर्ण जगभर करते. इस्कॉन मंदिराजवळ नदीवर सुंदर घाट बांधला आहे. येथे वर्षभर भाविकांची वर्दळ असते. आजच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे  यांच्या शुभहस्ते इस्कॉन मंदिर परिसरात भूवैकुंठ भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. या स्थळाला आपण एकदा तरी भेट द्यायला हवी असे वाटते.

          आज रात्री पांडुरंग महाराज घुले यांचे कीर्तन झाले. त्यांनी कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग खालीलप्रमाणे....

  नामाचे चिंतन प्रगट पसारा!

 असाल ते करा जेथें तेथें !!१ !!

 सोडविल माझा स्वामी नीस्चेयेशी !

प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही !! धृ !!

 गुणदोष नाही पाहत कीर्तनी!

प्रेमे चक्रपाणी वश्य होय !!३ !!

 तुका म्हणे कडु वाटतो प्रपंच!

 रोकडे रोमांच कंठ दाटे !!४ !!

              निरुपण करताना महाराज म्हणाले की, आपण जेथे कोठे असु तेथे नामाचे चिंतन केले पाहिजे. मग ते ऑफिस असो, कंपनी असो, शेतात असो, घर कामात असो, तेथे आपण नामस्मरण करायला हवे. नामामुळे आपला तर फायदा होणार आहेच. पण ऐकणाराचेही भले होते. हे नामच आपल्या समस्या सोडवित असते. येथे त्यांनी अनेक उदाहरणे दिली.









            तुकाराम महाराज म्हणतात ,आम्ही मालक नसून दास आहोत. दासांनी केलेली प्रतिज्ञा परमेश्वर कधीच खाली पडू देत नाही. प्रपंचात कितीही अडचणी आल्या, कटु अनुभव तरी त्यापासून आपण दूर जात नाही हे खरं आहे. थोडक्यात काय आपण आपले काम करत असताना परमेश्वराचे नामस्मरण करावे. त्याला स्थळ काळाचे कोणतेही बंधन नाही.त्याला कोठे जाण्याची गरज नाही.

           आपण आपलं काम संत सावता माळी सारखे  देवाचे नामस्मरण करत करावे त्यामध्ये आपले तसेच इतरांचेही  हित असते. यामध्ये आपोआपच सत्संग लाभतो तोच आपणास प्रगतीपथाकडे नेहतो असे मला वाटते.

    राजेंद्र पवार 

    ९८५०७८११७८

शनिवार, ९ जुलै, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस एकोणिसावा ९ जुलै )

 !! वारी पंढरीची २०२२ !!  (दिवस एकोणिसावा ९ जुलै )

            आज ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान अडीच वाजता वाखरीहून झाले. प्रत्यक्ष प्रस्थान सुरु होण्यापूर्वीच वरुण राजाने वारकऱ्यांवर जलाभिषेक सुरु केला, तो काही थांबलाच नाही. तसं पाहिलं तर काल दुपारपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. प्रत्येक वारकरी ओलाचिंब झाला होता. अशाही परिस्थितीत वारकरी खेळाचा आनंद लुटत होते. बऱ्याचशा पालख्या वाखरी येथे एकत्र येतात. नामदेव महाराज, संत मुक्ताबाई, चांगावटेश्वर,संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर असा पालख्यांचा क्रम असतो. रात्री आम्ही पंढरपूरमध्ये मुक्कामाला होतो. आज पुन्हा वाखरीला जाताना सर्वच संतांच्या पालख्या पाहता आल्या, दर्शन घेता आले.

            वाखरी ही पंढरपूरची वेस आहे. या वेशीवर ज्ञानेश्वर आले असताना प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्यासाठी रथ पाठवतात. हा रथ वाखरीजवळ आल्यानंतर ज्ञानेश्वर पांडुरंगाच्या रथात बसतात. याठिकाणी देवच भक्ताच्या भेटीसाठी जातात. येथे देव तोचि भक्त, भक्त तोचि देव असे  साक्षात दिसून येते. येथे कोणीही लहान नाही, कोणी मोठा नाही, सगळेजण सारखेच आहेत. (No leader, No follower, All equal )






           आज ज्ञानेश्वर शिंदे माऊलींच्यामुळे वारकरी शिक्षण संस्थेस भेट देण्याचा योग आला. मामासाहेब दांडेकर यांच्या स्मृती स्थळाला भेट द्यायची संधी मिळाली. पंढरपूर येथील वारकरी शिक्षण संस्थेत भोजन घेतले. वारकरी शिक्षण संस्थेची कार्यपद्धतीही जवळून पाहता आली.

           आज प्रत्येक वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी बेभान झालेला होता. मृदंग आणि टाळाच्या तालावर नाचत होता. ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाही त्याप्रमाणे सर्वच वारकऱ्यांना पांडुरंग भेटीची ओढ लागली होती.  वारकऱ्यांना पांडुरंग भेटीची ओढ असते त्या भेटीसाठी होणाऱ्या त्रासाची तो पर्वा करत नाही. त्याचप्रमाणे आपलं ध्येय साध्य करण्यासाठी आपणही अडचणीची तमा न बाळगता ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावेत असे वाटते.

   राजेंद्र पवार

९८५०७८११७८

!!वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस अठरावा ८ जुलै )

 !!वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस अठरावा ८ जुलै )

            आज भंडीशेगावहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे दुपारी एक वाजता वाखरीच्या दिशेने प्रस्थान झाले. सुरुवातीपासूनच पावसाच्या हलक्या सरी कोसळायला सुरुवात झाली. मध्ये कधीतरी पावसाची उघडीप असायची. आज वाखरीपर्यंत दोन रिंगणे झाली. उभे रिंगण प्रथम झाले. महामार्गावर रिंगण झाल्यामुळे सगळ्यांनाच अधिक आनंद लुटता आला. रस्ता डांबरी असल्याने फुगड्या तसेच अन्य खेळ खेळण्याचा आनंद  वारकऱ्यांनी लुटला.  रिंगणात स्वार असलेला अश्व व माऊलींचा अश्व धावताना प्रत्येक जनाच्या तोंडातून माऊली, माऊली असा जयघोष होत होता. दिंड्या हळूहळू पावसाच्या सरी झेलत पुढे मार्गक्रमण करत होत्या.

                थोड्याच अंतरावर वाखरी पालखी तळ आला. तो भाग बाजीरावाची विहीर म्हणून ओळखला जातो. येथे गोल रिंगण झाले. रिंगणाच्या ठिकाणी बऱ्यापैकी चिखलाचे साम्राज्य होते.तशाही परिस्थितीत रिंगणाचा लोकांनी आनंद लुटला. बऱ्याच लोकांचे कपडे चिखलाने माखले होते. अशा चिखलमय स्थितीत वारकऱ्यांनी अनेक खेळ खेळले. रिंगण म्हटलेकी परिसरातील लोकांची मोठी यात्राच असते. लोक खऱ्याअर्थाने यात्रेचा आनंद लुटत होते.









               रिंगणाजवळ बागल वस्तीवर थोडा वेळ आम्ही थांबलो होतो. यावेळी ज्ञानेश्वर शिंदे माऊली, वैष्णव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विजय कासुर्डेआणि उद्योजक गोरख चव्हाण यांची अध्यात्म, शिक्षण, समाजसेवा या विषयावर भरपूर चर्चा झाली. त्या चर्चेत मलाही भाग घेण्याची संधी मिळाली. कोणतीही संस्था नावारुपाला यायची असेल तर निरपेक्ष भावनेने काम करणारी टीम असायला हवी. वैष्णव चॅरिटेबलची निर्मिती सेवाभावातून  झाली आहे. या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष विजय कासुर्डे आळंदी ते पंढरपूर पायी वारी करतअसत. या वारीत आरोग्याविषयी कोणतीच काळजी घेतली जात नाही हे त्यांच्या लक्षात आले. आपणच यासाठी काही तरी केलं पाहिजे, यातूनच वैष्णव चॅरिटेबल ट्रस्टचा जन्म झाला. वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट गेली २९ वर्षे वारकऱ्यांना आरोग्यविषयक सुविधा पुरवत आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सोपानदेव या तिन्हीही पालखी मार्गावर या ट्रस्टच्या माध्यमातून सेवा पुरवली जाते. याशिवाय आदिवासी भागासाठी वर्षभर काम चालूच असते. देहू संस्थानसाठीही प्रासंगिक सेवा पुरवली जाते. या संस्थेचा ८०ते ९० लाखापर्यंतचा टर्नओव्हर आहे. ही सर्व रक्कम तसेच औषधे देणगी स्वरुपात मिळवली जातात. या संस्थेने कोविडच्या काळात मोफत लसीकरणाचे काम केले आहे. सेवाभावी कार्य असेल तर समाज अशा संस्थांना भरभरुन सहकार्य करत असतो.

                आपण प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या संस्थेशी संबधीत असतो. आपण त्या संस्थेत निरपेक्ष भावनेने, सेवाभावी वृत्तीने काम करावे, आपण संबधित असलेली संस्था नावारुपाला आणावी असे मला वाटते.

 राजेंद्र पवार

  ९८५०७८११७८

गुरुवार, ७ जुलै, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस सतरावा ७ जुलै )

 !! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस सतरावा  ७ जुलै )

            आज सकाळी साडेसहा वाजता  वेळापूरहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान झाले. लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून माऊली, माऊली असे म्हणत स्वागत करत होते. सकाळी नऊ वाजताच उघडेवाडी (ठाकूर बुवा) येथे पालखीचे आगमन झाले. याठिकाणी गोल रिंगण असते. या रिंगणाचे वैशिष्ट्य असेकी, येथे वारकरी मोठ्या प्रमाणात खेळ खेळत असतात. दिंड्या क्रमाक्रमाने सोडल्या जातात. येथे वारकरी मोठ्या प्रमाणावर धावताना दिसून आले, मीही रिंगणात धावण्याचा आनंद लुटला. महिला फुगड्या तसेच अन्य खेळ खेळताना दिसल्या. वारीचा आनंद लुटताना लोक दिसून आले.










             प्रथम प्रत्यक्ष रिंगणाची पाहणी केली जाते. इशारा मिळताच स्वार असलेला अश्व व माऊलींचा अश्व धावताना दिसले. रिंगणाच्या ठिकाणी मध्यभागी पालखीसाठी मंडप उभारला होता.रिंगण स्थळापासून साधारण चार किलोमीटर अंतरावर तोंडले-बोंडले जवळ संत तुकाराम व ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या एकाचवेळी आल्या. आज दिवसभर अतिशय आल्हाददायक वातावरण होते. दुपारी पावसाची हलकी सर आल्याने वारकरीही आनंदित झाले. तोंडले गावाजवळ नंदाचा ओढा आहे. तेथे ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंडे  पाण्यात खेळत असत. सध्या याठिकाणी पूल झालेला आहे. येथे स्प्रिंकलरच्या साह्याने वारकऱ्यांना भिजवले जात होते.



                येथील विसाव्याच्या ठिकाणी परिसरातील लोक वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करतात. दुपारी पंढरपूर तालुक्यातील नांदुरे गावच्या अरुण भिंगारे यांनी तोंडले येथे भोजनाची व्यवस्था केली होती. तोंडले येथे प्रवेशद्वारावर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा आहे. तोंडलेपासून संत तुकाराम, संत सोपानदेव व ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या एकत्र आल्याने जणू काही भक्तीचा महासागरच रस्त्यावर उतरला होता. पिराची कुरोली येथे सोपानदेव व ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्यांची भेट होते हा सोहळा खूपच रमणीय असतो. आजचा मुक्काम भंडीशेगाव येथे ज्ञानेश यलमार यांचे घरी आहे. 

       पालखी सोहळ्यात वाहनांची संख्या प्रचंड असते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस तसेच गृहरक्षक दल प्रयत्न करत असतात. कितीही प्रयत्न केले तरी मनुष्यबळ कमीच पडते. वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे पार पडावी यासाठी पुणेस्थित असणारे पण मूळचे कठापूरचे नाथाजी केंजळे यांनी स्थापन केलेले वाहतूक मुक्ती दल पोलिसांना मदत करत असते. नाथाजी यांच्याबरोबर २० लोकांची टीम आहे. ते आळंदीपासून वाहतूक सुरक्षित होण्यासाठी कार्यरत आहेत.

      अनेक स्वयंसेवी संस्था हा पालखी सोहळा व्यवस्थित पार पडावा यासाठी आपापल्या परीने सहकार्य करीत असतात. आपणही आपल्या परिसरात होणारे सार्वजनिक कार्यक्रम सुरळीतपणे पार पडावेत यासाठी जे शक्य असेल ते

सहकार्य करावे असे वाटते.

     राजेंद्र पवार 

 ९८५०७८११७८

बुधवार, ६ जुलै, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस सोळावा ६ जुलै)

 !! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस सोळावा ६ जुलै)

              आज सकाळी साडेसहा वाजता माळशिरसहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान झाले. जसजसी पालखी पुढे पुढे जात आहे तसतसा वारकऱ्यांचा प्रवाह मोठा बनत चालला आहे. आजही खुडूस या गावी गोल रिंगण झाले. दरम्यानच्या काळात पावसानेही हजेरी लावली. यावेळी वारकऱ्यांनी चिखलाचाही आनंद लुटला. हरिनामात दंग झाल्यानंतर कपड्याकडेही पाहिले जात नाही याचा प्रत्यय आज आला.  रिंगणानंतर आम्ही एका पत्र्याच्या शेडमध्ये विश्रांती घेत होतो. त्यावेळी मूळच्या जर्मन असणाऱ्याआणि आता भारतीय  झालेल्या अर्पणा घोष यांची भेट झाली. त्या रथामागे ३० क्रमांकाच्या दिंडीत चालत आहेत. पाश्चिमात्य असूनदेखील भारतीय संस्कृतीची ओढ त्यांना लागली आहे. पांडुरंगाच्या ओढीने वारीतला सगळा त्रास आनंदाने सहन करत आहेत.

             आज दुपारचा विसावा विझोरी येथे होता.आम्हाला या वारीत वैष्णव चॅरिटेबल ट्रस्टचे वारंवार सहकार्य झाले आहे. किंबहुना त्यांच्यामुळेच आमची वारी सुकर होत आहे.विजय कासुर्डे यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. आजचा मुक्काम वेळापूर येथे आहे.  





             वेळापूर गाव जवळ येताच तीव्र उतार आहे. येथे येताच संत तुकाराम महाराजांना पंढरपूर येथील मंदिराचे शिखर दिसले. पांडुरंगाला भेट घेण्यासाठी ते धावत सुटले. वेळापूर येथे एक भारुडाचा कार्यक्रम होतो. हा मान शेडगे दिंडीला आहे. भारुडाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन होते. उदाहरणादाखल एक भारुड देत आहे.

    बया बया बया!

    काय झालं बया?

    दादला नको ग बाई

    मला नवरा नको ग बाई!

    मोडकच घर, तुटकेचं छप्पर

    पन रहायला जागा नाही

   मला दादला नको ग बाई!

   फाटकेच लुगडं,तुटकीच चोळी

   पण शिवायला दोराच नाही

    मला दादला नको ग बाई!

     अशी अनेक भारुडे आपण ऐकलीत.

  वारी हे प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे.

           आज पंढरपूरमधील सिंहगड कॉलेजच्या  कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या सेकंड इअरला असणाऱ्या अंजली बाबर, आकांक्षा मिरगणे,राशेश्वरी मेनकुदळे, रुचिता फासे या विद्यार्थ्यांनी भेटल्या. त्या प्लॅस्टिकचा वापर वारकऱ्यांनी टाळावा यासाठी प्रबोधन करत होत्या. प्लॅस्टिक पत्रावळी वापरु नये, ग्लास वापरु नये. प्लॅस्टिक कॅन्सरला निमंत्रण देते. प्लॅस्टिक कुजत नाही. आपण झाडांच्या पानांची पत्रावळी वापरावी. प्लॅस्टिक वापराचे दुष्परिणाम त्या मुलींनी सहज सांगितले. आजही बऱ्याच ठिकाणी प्लॅस्टिकचा वापर होताना दिसतो.

           कोणतीही नवीन गोष्ट समाजात रुजवायची असेल तर त्यासाठी सक्षम पर्याय द्यावा लागतो. उदाहरण द्यायचे झाले तर वृक्षतोंडीस पर्याय म्हणून गॅस वापराचे देता येईल. ५० मायक्रॉंनच्या आतील प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे टाळला पाहिजे. आपणही प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे टाळूया. प्लॅस्टिकचा पुनर्वापर करुया.जनतेचे आरोग्य अबाधित राहील याची काळजी घेऊया.

     राजेंद्र पवार

   ९८५०७८११७८

मंगळवार, ५ जुलै, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस पंधरावा ५ जुलै )

 !! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस पंधरावा ५ जुलै )

           आज सकाळी साडेसहा वाजता ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे नातेपुतेहून माळशिरसच्या दिशेने प्रस्थान झाले. पालखीच्या मार्गावर सर्वच ठिकाणी  वारकऱ्यांची उत्तम व्यवस्था होते.अनेक ठिकाणी खाद्यपदार्थांचे स्टॉल होते. सकाळी रस्त्यावर बऱ्यापैकी चिखलमय वातावरण होते. आज पहिला विसावा मांडवे गावात होता. 

              नातेपुते ते माळशिरस मार्गावर सर्वत्र परिसरातल्या लोकांनी माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.आज सदाशिवनगरला पहिले गोल रिंगण होते.रिंगण पाहण्यासाठी खूप लांबून लोक आले असावेत. आपापसात बोलणाऱ्या लोकांची बोली भाषा वेगळी वाटत होती. रिंगणात एक घोडेस्वार विराजमान झाले असतात. एका घोड्यावर माऊली विराजमान झाल्या आहेत असे मानले जाते. रिंगणात मार्गावर रांगोळी काढली होती. प्रत्यक्ष रिंगणात अश्व धावताना घोडेस्वार असणारा अश्व पुढे व माऊलींचा अश्व मागे अशी परिस्थिती असते. रिंगण सोहळा संपल्यानंतर अश्वाच्या पायाखालची माती लोक घरी घेऊन जात होते.दुपारनंतर येळीव याठिकाणी पालखीने विसावा घेतला होता.







         आज दुपारी पुरंदावडे येथे प्रशांत कुंभार यांचेकडे भोजन घेतले. तेथेच हरे कृष्ण संप्रदायाचा कार्यक्रम चालू होता. सर्वजण वाद्यांच्या तालासुरावर नाचत होते. महिलांही नृत्यात सहभागी झाल्या होत्या. फुगड्यांचाही आस्वाद घेतला होता. 

            आपणास मानसिक स्वास्थ्य अध्यात्मामुळे मिळते. हरे कृष्ण संप्रदायाने जगात भगवदगीतेचा प्रचार व प्रसार करण्याचे उत्तम काम केले आहे. मानसिक स्वास्थ्य ,कुटुंबाची तसेच समाजाची प्रगती व्हायची असेल तर  अध्यात्म हाच मार्ग आहे. आपणही अध्यात्माचा आधार घेऊन आपली प्रगती करावी असे वाटते.

   राजेंद्र पवार 

 ९८५०७८११७८

सोमवार, ४ जुलै, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस चौदावा ४ जुलै )

 !! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस चौदावा ४ जुलै )

              आज सकाळी साडेसहा वाजता ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान बरडहून झाले. गावातून रथ आणणे अवघड असल्याने नुसती पालखीच गावात नेली जाते. यामुळे ग्रामस्थांना, भाविकांना माऊलींच्या पादुकांचे जवळून दर्शन घेता येते. आज पहिला विसावा संत साधुबुवा महाराज मंदिर, राजुरी येथे होता. या स्थानाला साधूबुवाचा ओढा असेही म्हटले जाते. या मंदिरात टाळ, मृदंगाच्या तालावर वारकरी नुसते माऊली, माऊली म्हणत नाचत असतात. याठिकाणी मठाचीवाडी येथील दत्ता पवार यांनी आमच्या अल्पोपहाराची व्यवस्था केली होती.

                मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर सोलापूर जिल्ह्याची हद्द सुरु होते. हद्द सुरु होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे नीरा नदीपासून विशेषतः लोणंदपासून बंदोबस्त सुरु होतो. सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत सातारा पोलिसांची जबाबदारी असते. सातारा जिल्हा पोलीस दल पालखी सोलापूर जिल्हा पोलीस दलाकडे सुपूर्त करते. चार्ज हँडओव्हर करण्याची प्रक्रिया ही नजरेचे पारणे फेडणारी असते. सोलापूर जिल्ह्यात कारुंडे येथे पहिला विसावा होता. याठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने, स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. प्रत्येक विसावा स्थळाला यात्रेचे स्वरुप आलेले असते. थोडे दुर्लक्ष झाले तरी आपल्या माणसापासून आपण भरकटतो. विशेषतः महिला, लहान मुलांना पोलिसांच्या सहकार्याशिवाय आपल्या माणसापर्यंत पोहचताच येत नाही. दुपारनंतर मोरोची येथे पालखीने विसावा घेतला. सकाळी उन्हाचा तडाखा तर दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी आल्या. सकाळी उकाड्याने हैरान तर दुपारनंतर आम्हास पावसाने दिलासा दिला. पाऊस परवडला पण उन्ह नको असेच आम्हाला वाटते. उन्हात काम न करण्याच्या सवयीने तसे वाटत असावे.  काही मेंढ्या वारी करताना दिसून आल्या.एक वारकरी तर आपल्या सोबत कुत्रा घेऊन चालले होते.








              वारीत लोक संस्कृतीला चालना मिळते. बऱ्याच वेळा डोंबारी आपला खेळ दाखवताना दिसत होते.तर मरीआईचा गाडापण  आपणास दिसतो. बऱ्याचशा कला सामाजिक आश्रयाच्या अभावाने बंद पडत आहेत. वारीत लाखो लोक सहभागी होतात त्यामुळे अशा पारंपरिक कलांना उर्जितावस्था प्राप्त होत आहे असे वाटते.

             आज आमच्या निवासाची व्यवस्था ज्ञानदीप क्रेडिट सोसायटीच्या नातेपुते शाखेने केली होती तर भोजनाची व्यवस्था याच गावातील भीमराव दादा बर्वे यांनी केली होती. या मंडळींचा सेवाभाव बऱ्याच गोष्टी शिकवून जातो. आज दुपारी कारुंडे गावापासून पावसाला सुरुवात झाली. काही वेळा चांगल्या सरी आल्या. पाऊस आलाकी

सर्व वारकरी प्लॅस्टिकच्या कागदाची खोळ डोक्यावर घेतात. हा कागदच बहूउद्देशीय आहे. जेवायला बसायचं असेल तर हा कागद बस्कर म्हणून वापरता येतो, झोपायचं असेल तर हाच कागद अंथरूण म्हणून वापरता येतो. पाऊस आलाकी डोक्यावर घेतला जातो.

     एखादी वस्तू जर अशी अनेक प्रकारे वापरता येते तर माणसाच्या बाबतीतही गोष्ट तंतोतंत लागू पडते. जर या गतिमान जगात टिकायचे असेल तर व्यक्तीही मल्टिस्किल असली पाहिजे. थोडक्यात एखाद्या व्यक्तीला अधिकाधिक गोष्टी आत्मसात करायला आल्या पाहिजेत आणि त्याप्रमाणे  समाजाला सेवा देता आली पाहिजे असे मला वाटते.

  राजेंद्र पवार 

 ९८५०७८११७८

रविवार, ३ जुलै, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस तेरावा ३ जुलै )

 !! वारी पंढरीची २०२२ !!   (दिवस तेरावा ३ जुलै )

              आज सकाळी साडेसहा वाजता फलटणहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान झाले. सुरुवातीचा काही वेळ शहरातूनच पालखीचे मार्गक्रमण होते. रस्त्याच्या दुतर्फा लोक उभे राहून मुखाने माऊली, माऊली असा गजर करीत पालखीचे स्वागत करीत होते. फलटणनगरीत अनेक ठिकाणी खाऊचे तसेच पाण्याचे वाटप होत असताना दिसून आले. आज मार्गात विडणी, निंबळक असे छोटे विसावे होते. तर पिंप्रद येथे मोठा विसावा होता. विडणी, पिंप्रद, निंबळक या सर्वच ठिकाणी अल्पोपहार व भोजनाची उत्तम व्यवस्था केलेली होती. 

                आज पालखीचा मुक्काम बरड येथे आहे. बरड पासून जवळ असणाऱ्या निंबळकच्या हद्दीतील पवारवस्तीवर आजची निवासाची व्यवस्था ज्ञानेश्वर पवार यांनी केली आहे. एखाद्या हिलस्टेशनला राहिल्यासारखे वाटत आहे. व्यवस्था लयच भारी असल्याने वारी व्यतिरिक्त अन्यवेळीदेखील भेट द्यायला हवी असं वाटतंय. फलटण  ते बरड मार्गावर आसपासच्या गावातील लोकांनी माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. आज विडणी येथील विसाव्याच्या ठिकाणी केलेले डेकोरेशन खूपच लक्षवेधक होते. पुणेपासून आत्तापर्यंत ज्या ज्या ठिकाणी विसावे होते त्यामध्ये सर्वात सुंदर सजावट केली होती. विडणी येथे माऊलींच्या पालखीवर जोरदार पुष्पवृष्टी करण्यात आली.






             वारीत एक लहान मुलांची दिंडी आढळून आली. सगळीकडे दिंडीत मोठे वारकरी पाहायला मिळतात.पण लहान मुलांची  दिंडी सहसा आढळून येत नाही. मुलांच्यात अपेक्षित बदल हवा असेल तर लहानपणीच संस्कार होणे गरजेचे आहे. मोठया माणसावर काही प्रयोग करायचं म्हटले तर त्यामध्ये फारसे यश येत नाही. आपण मुलांच्यावर जाणीवपूर्वक काही प्रयोग केले तर यश निश्चितच येते. आपण संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी लहान मुलांच्यावर काही प्रयोग करुया,चांगली पिढी निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील राहूया.

   राजेंद्र पवार 

 ९८५०७८११७८

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...