शनिवार, ३१ जुलै, २०२१

!! मा.खासदार श्रीनिवास पाटीलसाहेब यांची वर्णे गावच्या विकास कामासंदर्भात भेट !! (३१ जुलै )

 !! मा.खासदार श्रीनिवास पाटीलसाहेब यांची वर्णे गावच्या विकास कामासंदर्भात भेट !! (३१ जुलै )






    आज वर्णे येथील अंतर्गत रस्ते खडीकरण ,डांबरीकरण, काँक्रीटीकरण कामासंदर्भात त्यांची गोटे (कराड ) येथील कार्यालयात भेट घेतली.त्यांना या कामासंदर्भात  ग्रामपंचायतीच्यावतीने प्रस्ताव सादर केला.
  पाटीलसाहेबांना सुचवलेली कामे...
१)वरची काळंगे वस्ती - विनोद पवार यांचे घर ते वामन काळंगे यांचे घर खडीकरण, डांबरीकरण
२) खालची काळंगे वस्ती - प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ते क्रांतीनगर कमान खडीकरण, डांबरीकरण
३)भवानीनगर-(वर्णे) विठ्ठल मंदिर ते शंकर नाथा पवार यांचे घर खडीकरण, डांबरीकरण
४)जानाईनगर-जानुबाई मंदिर ते हनुमान मंदिर परिसर काँक्रीटीकरण
यावेळी खालील ग्रामस्थ उपस्थित होते.
१)विकास साहेबराव पवार
२)दादासाहेब काळंगे
३)किशोर काळंगे (ग्रामपंचायत सदस्य)
४)राजेंद्र पवार (सर )
५) रामचंद्र पवार (नाना )
६)सदाशिव काळंगे
७)विनोद पवार
८)हणमंत पवार (सचिव )
९)लालासाहेब पवार
१०)संजय गायकवाड
११)पोपट यशवंत पवार
१२) उमाकांत धस्के
१३)शिवाजी बाजीराव पवार
१४)नरेंद्र मदने
      सदरच्या कामाची शिफारस खासदार साहेबांनी केली आहे,थोडक्यात हे काम त्यांनी मंजूर केले आहे. मात्र हे काम पुढच्या वर्षी होईल असे सांगितले गेले. आपल्या गावच्या कामासंदर्भात मा.आमदार शशिकांत शिंदेसाहेब यांच्याबरोबर देखील फोनवर  खासदार साहेबांनी चर्चा करून हे काम मार्गी लावत असल्याचे त्यांनादेखील सांगितले.
      साहेबांनी प्रशासनात काम केल्यामुळे
काम करुन घेण्याची पद्धत कशी असावी, कोणत्याही कामाचे प्रस्ताव सादर कसे करावेत. जनसंपर्क कसा ठेवावा. गावच्या विकासासंदर्भात ग्रामस्थांची भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. संसदेत असे लोक प्रतिनिधी असतील तर देशाचा कायापालट होण्यास फारसा विलंब लागणार नाही. आजच्या बैठकीत आपल्या राज्याचे भूतपूर्व उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांच्या कामाचीही चर्चा झाली.
      एकंदरीत आजचा दिवस आपल्या गावच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण ठरलेला आहे. वर्णे ग्रामस्थांच्या
वतीने पाटील साहेबांना मानाचा मुजरा.
    राजेंद्र पवार
९८५०७८११७८
 

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी !! (१ऑगस्ट )

 

!! लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी !! (१ऑगस्ट )



        ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ अशी घोषणा करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त.. 
          टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी  जिल्ह्यातील  चिखलगांवी झाला. स्वातंत्र्यसाठी लढणारी जी अनेक रत्ने होती. त्यांतील हे रत्नागिरीचे ‘रत्न’ होते. त्यांचे ‘केशव’ हे नांव ठेवण्यात आले होते. पण ते ‘बाळ’ या टोपण नावाने प्रसिद्ध झाले. वडील शिक्षण खात्यात सेवेस होते. लहानपणी आई वारल्याने संगोपन चुलतीनेच केले. वडिलांची पुणे येथे बढती मिळाल्याने बदली झाली. वडिलांचे छत्र १९ व्या वर्षी निवर्तले. १६ व्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा पास झाल्याने टिळकांचे लग्न १७ व्या वर्षी झाले. उच्च शिक्षणासाठी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांना पदवीधर होण्यासाठी पैशाची फारशी अडचण भासली नाही. १८७६ साली टिळक बी. ए. ची परीक्षा गणित विषय घेऊन पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्यांचे गणित व संस्कृत हे दोन विषय उत्तम होते. पुढे टिळकांनी एल. एल. बी. पर्यंत मजल मारली. 
              महाविद्यालयामध्ये टिळक असतांना गोपाळ गणेश आगरकर या तरुण मित्राशी मैत्री जमली. दोघेही वैचारिक चर्चा करीत. देशात सामाजिक सुधारणा की राजकीय स्वातंत्र्य मिळाले
पाहिजे. आगरकरांचा विषय तत्त्वज्ञान तर टिळक गणितवाले ‘जोडणारे तोडणारे’ पण मातृभूमीबद्दल खळबळ आंतरिक एकत्र आले की चर्चा असे विद्यार्थी हवे आहेत. असतीलही कदाचित. दोघांवर पाश्चात्य विचारवंत मिल व स्पेन्सर यांचा प्रभाव होता. यातूनच २ जानेवारी १८८० ला पुन्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना करण्यात आली. 
            टिळक-आगरकर यांच्यासमवेत तिसरे सहकारी चिपळूणकर मिळाले व लोकशिक्षण प्रभावी करण्याच्या दृष्टीने ‘केसरी’ आणि ‘मराठा’ ही वृत्तपत्रे सुरू करण्याचे ठरले. ‘केसरी’ मधून टिळकांनी आपले जहाल विचार व्यक्त करणे सुरू केलेने  हे साप्ताहिक महाराष्ट्रात सर्वत्र परिचित झाले. सामाजिक प्रश्नावर आगरकर लिहू लागले. आधी सामाजिक की आधी राजकीय यावर आगरकर आधी सामाजिक तर टिळक आधी राजकीय असे विचार पर्यायाने मतभेद होऊ लागले. टिळक म्हणायचे सामाजिक प्रश्न ही हृदयाची जखम आहे तिला सावकाशपणे हाताळले पाहिजे. राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यावर सामाजिक प्रश्न सोडविणे सोपे जाते. यातूनच मतभेद विकोपाला गेला व आगरकरांनी केसरीचे संपादकत्व सोडले. आगरकरांनी सामाजिक प्रश्नासाठी ‘सुधारक’ हे वृत्तपत्र काढले. त्यातून टिळकांकडे केसरीचे संपादकत्व आले. टिळकांनी शैक्षणिक संस्थांचा राजीनामा दिला व पूर्णवेळ केसरीकडे दिला. अल्पावधीत ‘केसरी’ प्रसिद्धीस आला.
                  टिळकांनी गणपती उत्सवास सार्वजनिक स्वरूप दिले. ते एक लोकशिक्षणाचे प्रभावी व्यासपीठ निर्माण व्हावे अशी त्यांची इच्छा होती. महाराष्ट्रात अनेक गावी सार्वजनिक गणपती उत्सव त्या अनुषंगाने व्याख्याने, मेळे, लेझीम, पथके आदींमुळे लोक एकत्रित येऊ लागले. त्यापुढे जाऊन ‘शिवजयंती’ सार्वजनिक स्वरूपात सुरू केली. हे महत्त्वाचे पाऊल टिळकांनी उचलले. आपली भूमिका या उत्सवाच्या रूपाने केसरीतून व्यक्त केली. ‘राष्ट्रपुरूषाचे स्मरण’ व त्यातून कृतज्ञता व्यक्त करणे. महापुरूषाचे चरित्र सर्वसामान्यार्पंत पोहोचवणे हा असा हेतू स्पष्ट केला. १८७६-७७ साली पडलेल्या दुष्काळानंतर सरकारने ‘फॅमिन रिलिफ कोड’ पास केला. त्याचे मराठी भाषांतर पुस्तिका रूपाने प्रसिद्ध केले. ‘कर्ज काढून सारा भरू नका’ असे सांगितले गेले. यामुळे  ठाणे-कुलाबा येथील कार्यकर्त्यांवर खटले भरले गेले. कायद्याच्या  चौकटीत राहून सरकारवर दबाव आणणे हे कार्य टिळकांनी प्रभावीपणे केले. पुण्यात १८९७ मध्ये प्लेगची आपत्ती आली. सरकारने रँड या अधिकार्‍याची नेमणूक केली. पण हा अधिकारी म्हणजे कर्दन काळ ठरला. रँडचा खून चाफेकर बंधूंनी केला. टिळकांनी अग्रलेख लिहिला. ‘राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे’ याबद्दल टिळकांना १८ महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली. 
                १९०७ मध्ये सुरतला काँग्रेसचे अधिवेशन झाले. तिथे जहाल व मवाळ गट असे होऊन अधिवेशन उधळले गेले. टिळकांनी तरुणांना साहसी कृत्ये  करण्याची, किंग्ज फोर्डला धडा शिकविण्याचा सल्ला दिला. पुढे पां. म. बापट यांचे  बॉम्बचे मॅनुअल बंगालमधील तरुणांना मिळाले. त्याचे पडसाद उमटले. शेवटी टिळकांवर राजद्रोहाचा खटला होऊन टिळकांना ६ वर्षे ब्रह्मदेशातील मंडाले येथे नेले. टिळकांनी कारागृहात रामायण, महाभारत, तुकाराम, ज्ञानेश्वरी, दासबोध आदी ग्रंथांचे वाचन केले व ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ केवळ चार महिन्यांत पूर्ण केला. 
मंडाले येथून सुटल्यावर ‘पुनश्च हरी ओम्’ ची गर्जना करून टिळकांनी कार्य सुरू केले. लखनौ करार घडवून हिंदू-मुस्लिम ऐक्य दाखवून दिले. अशा जहाल विचारसरणीच्या देशभक्ताची १ ऑगस्ट १९२० रोजी मुंबई येथील सरदारगृहात प्राणज्योत मालवली. 
     लोकमान्य टिळकांना भावपूर्ण आदरांजली
संकलक :राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८

शुक्रवार, ३० जुलै, २०२१

!! मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकरशेठ स्मृतिदिन !!(३१जुलै )

 

!! मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकरशेठ
स्मृतिदिन !!(३१जुलै )




जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ मुरकुटे जन्म :  १० ऑक्टोबर १८०० मृ्त्यू : ३१ जुलै १८६५ हे मराठी शिक्षणतज्ज्ञ, उद्योगपती होते. मुंबई शहराच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा होता.
             जगन्नाथ शंकरशेठ यांचा जन्म मुंबईत दैवज्ञ ब्राह्मण कुटुंबात झाला. पूर्वजांप्रमाणे त्यांनी व्यापार केला व अतिशय विश्वासू आणि प्रामाणिक व्यापारी असल्याची ख्याती मिळविली. अनेक अरब, अफगाणी तसेच इतर परदेशी व्यापारी आपली भारतातील मालमत्ता बॅंकांकडे न देता शंकरशेठ यांच्या हवाली करीत.  त्यांच्या वडिलांनी व्यापारामध्ये मोठी संपत्ती मिळवलेली होती. त्यामुळे नानांचा बालपण हे अतिशय संपन्न स्थितीमध्ये गेलं एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील मुंबई इलाख्याच्या सार्वजनिक जीवनात त्यांना महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले होते.  त्यांनी अनेक सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आपल्या संपत्तीची खरी गरज ही सामान्य माणसाच्या उद्धारासाठी व्हावी या हेतूने त्यांनी लोकसेवेचे व्रत घेऊन सामाजिक सुधारणेच्या पायाभरणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे.
                स्वतः मिळवलेल्या अमाप संपत्तीपैकी मोठा हिस्सा दान केला तसेच सार्वजनिक कामांकरीता खर्च करून टाकला.एक थोर समाजसेवक, शिक्षणप्रेमी व आधुनिक मुंबईच्या शिल्पकारांपैकी एक.  त्यांचे वडील व्यापारासाठी मुंबईस आले. म्हैसूरच्या १७९९ च्या टिपू-इंग्रज युद्धात वडिलांना अमाप पैसा मिळाला. आई भवानीबाई नानांच्या लहानपणीच वारली. नानांनी तिच्या स्मरणार्थ पुढे भवानी शंकर मंदिर व एक धर्मशाळा गोवालिया तलावाजवळ बांधली. नानांचे वडील १८२२ मध्ये वारले व तरुणपणीच त्यांच्यावर प्रपंचाची व व्यापाराची सर्व जबाबदारी पडली.नाना शंकरशेठ यांनी जवळजवळ अर्धशतकाच्या कालावधीत मुंबईच्या व पर्यायाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचा, राजकीय चळवळीचा आणि अनेकविध अशा लोककल्याणकारी सुधारणांचा पाया घातला. त्यांच्यावर सर जमशेठजी जिजीभाईंची छाप पडली होती. हिंदवासियांत शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे, यासाठी एल्‌फिन्स्टनने १८२२ मध्ये हिंदशाळा व शाळापुस्तक मंडळी काढली, त्यांचे आधारस्तंभ नानाच होते. ही पहिली शैक्षणिक संस्था स. का. छत्रे यांच्या साह्याने स्थापिली. पुढे हिचे १८२४ मध्ये बॉंम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत रूपांतर झाले. एल्‌फिन्स्टननंतर उच्च शिक्षणाच्या सोयीसाठी ४,४३,९०१ रुपयांचा एल्‌फिन्स्टन फंड जमविण्यात आला. त्याचे नाना हे विश्वस्त राहिले. या संस्थेचे एल्‌फिन्स्टन कॉलेज झाल्यावर (१८३७) तिला एल्‌फिन्स्टन इन्स्टिट्यूट म्हणण्यात येऊ लागले. १८५६ मध्ये महाविद्यालय व विद्यालय वेगळे झाले.बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना १८४१ मध्ये झाली. बोर्डातील तीन एतद्देशीय सभासदांत सतत सोळा वर्षे नाना निवडून आले. स्ट्यूडंट्‍स लिटररी व सायन्टिफिक सोसायटी (१८४५) आणि जगन्नाथ शंकरशेठ मुलींची शाळा (१८४८) या त्यांनी स्वतःच्या वाड्यात चालू केल्या; १८५७मध्ये, द जगन्नाथ शंकरशेठ फर्स्ट ग्रेड ॲंग्लो व्हर्नाक्युलर स्कूल सुरू केले. १८५५मध्ये त्यांनी विधी महाविद्यालयाचा पाया घातला. सर ग्रॅंटच्या मृत्यूनंतर ग्रॅंट मेडिकल कॉलेजची १८४५मध्ये स्थापना करून येथे आंग्ल वैद्यक-शिक्षणाची सोय त्यांनी केली व तेही पुढे मराठीतून देण्याची व्यवस्था केली.  
        अ‍ॅग्रि-हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया व जिऑग्रॅफिकल सोसायटी या संस्थांचे प्रमुख व अध्यक्ष नाना शंकरशेठ होते. या शैक्षणिक कामाशिवाय त्यांनी १८५२मध्ये द बॉंबे असोसिएशन स्थापण्यात पुढाकार घेतला. मुंबई कायदे मंडळाच्या आरंभीच्या सभासदांत ते प्रमुख होते.नानांचे सामाजिक कार्यही मोठे आहे. त्यांनी सतीच्या चालीस बंदी घालणाऱ्या कायद्यास पाठिंबा दिला. सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे, या तत्त्वावर स्त्रीशिक्षणास प्राधान्य दिले.
                 भारतीयांना कलाशिक्षण मिळावे, म्हणून सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेत सक्रिय भाग घेतला. याशिवाय ग्रॅंड ज्यूरीत भारतीयांचा समावेश व्हावा, तसेच जस्टिस ऑफ द पीस अधिकार भारतीयांस मिळावा, यासाठी त्यांनी खटपट केली व काही अधिकार मिळविले. महानगरपालिकेत आयुक्त असताना त्यांनी आरोग्यव्यवस्था, विहिरी, तलाव वगैरे योजना अंमलात आणल्या. गॅंस कंपनी सुरू केली; धर्मार्थ दवाखाना काढून तसेच पुढे जे.जे. हॉस्पिटलचा पाया घालून त्यांनी रुग्णसेवेस चालना दिली.
              बॉंबे स्टीम नेव्हिगेशन कंपनीची स्थापना, मुंबई-ठाणे रेल्वेचा प्रारंभ, नाटकांचे प्रेक्षागृह, सोनापूरच्या स्मशानभूमीचे रक्षण याही गोष्टींचे श्रेय नानांनाच द्यावे लागेल. नानांनी रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई शाखा, व्हिक्टोरिया ॲन्ड अल्बर्ट वस्तुसंग्रहालय,  जगन्नाथ शंकरशेट स्कूल, जिजामाता (राणीच्या) बागेसाठी,एलफिन्स्टन शिक्षण निधीस भरघोसआर्थिक सहकार्य केले.
          देशाच्या सर्वांगीण सुधारणेच्या सार्‍या चळवळींत पुढाकार घेणाऱ्या या थोर पुरुषाचा पुतळा जिजामाता बागेत उभारण्यासाठी लोकांनी स्वेच्छेने २५,००० रु जमविले होते.  नानांचे वयाच्या बासष्टाव्या वर्षी मुंबईत देहावसान झाले. नानांच्या स्मरणार्थ मॅट्रिकला संस्कृत विषयात पहिला येणार्‍या विद्यार्थास शंकरशेठ शिष्यवृती देण्यात येऊ लागली.
        नानांनी स्कूल ऑफ इंडस्ट्रीज (बालसुधारगृह),कन्या शाळा,जे.जे.स्कुल ऑफ आर्ट,ग्रँट मेडिकल कॉलेज, नॅचरल हिस्ट्री सोसायटी, ग्रंथालय, वस्तुसंग्रहालय, धर्मार्थ दवाखाना यासाठी स्वतःच्या जमिनी, इमारती तसेच खूप मोठ्या देणग्या दिल्या.
!जगन्नाथ शंकरशेठ यांनी भूषवलेली पदे!
१) संस्थापक अध्यक्ष - बॉंम्बे असोसिएशन २) सभासद - बोर्ड ऑफ कॉन्झरवंसी ३) उपाध्यक्ष -स्कुल ऑफ इंडस्ट्रीज ४) अध्यक्ष - डेव्हिड ससून रिफॉर्मेटरी इन्स्टिटयूट ५) सदस्य - सिलेक्ट समिती (म्युनसिपल कायदा व बिल) ६) सदस्य - बोर्ड ऑफ एज्युकेशन ७) सदस्य- नेटिव्ह स्कुल बुक सोसायटी ८) विश्वस्त - एल्फिन्स्टन फंड. ९) अध्यक्ष - पोटसमिती (शिक्षण प्रसार समिती ) १०) संस्थापक - जगन्नाथ शंकरशेठ स्कुल ११) संस्थापक सभासद - जे. जे. आर्टस् कॉलेज १२) सदस्य - मुंबई विद्यापीठ व्यवस्थापक मंडळ १३) फेलो -मुंबई विद्यापीठ १४) अध्यक्ष - हॉर्टिकल्चर सोसायटी १५) अध्यक्ष - जिओग्राफिकल सोसायटी १६) डायरेक्टर - बॉंम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी १७) ट्रस्टी - बॉंम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी १८) सदस्य - द इनलॅंड रेल्वे असोसिएशन १९) संचालक /सदस्य - ग्रेट ईस्टर्न रेल्वे २०) आद्य संचालक - रेल्वे (मुंबई ते ठाणे पहिला रेल्वे प्रवास गोल्डन पासने) २१) संचालक - बॅंक ऑफ वेस्टर्न इंडिया २२) संचालक - कमर्शिअयल बॅंक ऑफ इंडिया २३) संस्थापक - द मर्कंटाईल बॅंक ऑफ इंडिया २४) संचालक/अध्यक्ष - बॉम्बे नेटिव्ह डिस्पेन्सरी (पहिला धर्मार्थ दवाखाना ) २५) अध्यक्ष - बादशाही नाट्यगृह ६) पहिले देशी मॅजिस्ट्रेट  "जस्टिस ऑफ द पीस".
मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकरशेठ यांना विनम्र अभिवादन.
        संकलक : राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८

गुरुवार, २९ जुलै, २०२१

माळीण गावातील दरड दुर्घटना (३० जुलै )

 


माळीण गावातील दरड दुर्घटना
(३० जुलै )



माळीण गावातील दरड दुर्घटना -३० जुलै २०१४
     पाऊस पडावा म्हणून वरूण राजाची प्रार्थना करणारे मौजे माळीण गावातील ग्रामस्थ आदल्या दिवशी मंगळवारी रात्री गाढ झोपी गेले होते. परंतु त्याच दिवशी रात्री एवढी अतिवृष्टी झाली की गावातील जीवनच संपुष्टात आले.
       दिनांक ३० जुलै, बुधवारची नुकतीच उजाडू लागलेली सकाळची वेळ, माळीण गावच्या डोंगरात स्फोटकसदृष्य आवाज झाला, मातीचा ढिगारा, चिखल व उन्मळलेली झाडे अचानक खाली घसरून येवू लागली. डोंगर कोसळला, दरड कोसळली आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली मूळ गावातील ७४ पैकी ४४ घरे दाबली गेली. जवळजवळ संपूर्ण गाव क्षणार्धात गायब!
          माळीण गाव पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील एक आदिवासी गाव. भिमाशंकर पासून २०कि.मी आणि पुण्यापासून ७५ कि.मी अंतरावर वसलेल्या या गावची ७ वाड्यासहित लोकसंख्या ७१५. मूळ गावामधील ७४ घरांपैकी ४४ घरे, त्यातील १५० ते १६५ पुरूष, स्त्री, लहान मुले, गाई, म्हशी, शेळ्यासहित मातीच्या ढिगाऱ्याखाली. गावाचे हे दु:खद आणि विदारक चित्र, क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले.
आहुपे - मंचर ही एस.टी. बस रात्री आहुपे मुक्कामी. ही बस सकाळी अतिदुर्गम आदिवासी आहुपे मुक्कामाचे गाव सोडून साडे वाजेपर्यंत कोंढरे घाटापर्यंत पोहचली. तेथे एस.टी चालकाला माळीण गाव दरड कोसळ्याने मातीच्या ढिगाऱ्यात गायब झाल्याचे समजले. माळीण गाव परिसरात मोबाईल - इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्याने तेथील परिसरातील घडामोडीची देवाणघेवाण करणारी एस.टी बस हीच एकमेव सेवा. एस.टी बस जेथे उभी होती त्या कोंढरे घाटाच्या वरच्या बाजूस मोबाईल रेन्ज असल्याने बसचालकाने त्वरित आपल्या मंचर येथील भावाला, भावाने त्वरित भिमाशंकर सहकारी साखर कारखान्यास व कारखान्याने प्रशासनास सदर दुर्घटनेची माहिती पोहचविली.
एकसारखा दमदार पाऊस, अरूंद रस्ता, वाहनांची व बघ्यांची गर्दी व इतर अडचणींना तोंड देत पुण्याहून एनडीआरएफ (National Disaster Response Force) टीम ४०० जवान, डॉक्टर्स, नर्सेससहित माळीण येथे दाखल झाली. अहोरात्र प्रयत्नांती सहाव्या दिवसाखेर १२१ मृतदेह बाहेर काढण्यात आले. सुरूवातीस ९ जणांचे प्राण वाचविण्यात यश आले. आणखी ४०-५० मृतदेह मातीच्या ढिगाऱ्यात असण्याची शक्यता. डोंगर कोसळून एवढी मोठी क्षणार्धात झालेली जीवित हानीची राज्यातील ही पहिलीच दुर्घटना. माळीण गाव भूगोलाच्या नकाशावरून कायमचे पुसले गेले.
       माळीणची  पुनरावृत्ती यावर्षी घडली. याच महिन्यात २२ जुलै रोजी सातारा, रायगड,रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली,पालघर या जिल्ह्यात पावसानं हाहाकार माजवला. माळीण सारख्या दुर्घटना अनेक जिल्ह्यात घडल्या. बऱ्याच ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडले. अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. सर्व मृतदेह काढता आले नाहीत. अनेक जनावरेही कायमची गाडली गेली. सातारा जिल्ह्यापुरता विचार करायचा म्हटले तरी पाटण ,वाई,जावली, महाबळेश्वर तालुक्यात दरडी कोसळून कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.रायगड जिल्ह्यात महाड जवळील तळये गावातही दरड कोसळून फार मोठे नुकसान झाले आहे. भविष्यात तळये,आंबेघर, मिरगाव, देवरुखवाडी सारख्या घटना घडू नयेत यासाठी शासनाने या गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणे गरजेचे आहे. लोकांनीही प्रशासनास साथ द्यायला हवी.
     आजच्या या दिवसाच्या निमित्ताने माळीणबरोबर राज्यातील दरड दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या बंधू भगिनींना विनम्र अभिवादन.
        राजेंद्र पवार
     ९८५०७८११७८



बुधवार, २८ जुलै, २०२१

! जागतिक व्याघ्र दिन !! (२९ जुलै )

 

!! जागतिक व्याघ्र दिन !! (२९ जुलै )




         जागतिक व्याघ्र दिन दरवर्षी २९ जुलै रोजी जगभर साजरा केला जातो. २९ जुलै २०१० रोजी रशियामधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला.
               या दिवसाचा उद्देश वाघांच्या नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करणे, तसेच त्याबद्दल जनजागृती करणे आणि वाघांच्या संवर्धनासाठी येणाऱ्या समस्यांवर विचार करणे असा आहे.
          विसाव्या शतकाच्या सुरूवातीला जगभरात सुमारे १,००,००० वाघ होते, सध्या ही सध्या सुमारे ३०६२ ते ३९४८ इतकी असल्याचा अंदाज आहे. यापैकी सुमारे २००० वाघ भारतीय उपखंडात आहेत. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व भारतासाठी विशेष आहे. वाघांची संख्या झपाट्याने कमी होण्याची कारणे नैसर्गिक अधिवास नष्ट होणे, चोरटी शिकार इ. आहेत.
           सरकारी पातळीवरून जागतिक व्याघ्रदिनाच्या निमित्ताने कार्यक्रम घेतले जातात. तसेच व्याघ्र संवर्धनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था सुद्धा या निमित्ताने जनजागृतीसाठी कार्यक्रम करतात. भारतात अनेक ठिकाणी व्याघ्रप्रकल्प आहेत.महाराष्ट्रातही ताडोबा, मेळघाट,  पेंच ,सह्याद्री, नवेगाव असे व्याघ्रप्रकल्प आहेत. वाघांचे संरक्षण, संवर्धन करणेसाठी समाजात जागृती करुया.
    संकलक: राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८

मंगळवार, २७ जुलै, २०२१

! जागतिक हेपटायटीस दिन !! (२८ जुलै) जागतिक कावीळ दिन

 


!! जागतिक हेपटायटीस दिन !! 

 (२८ जुलै)

 जागतिक कावीळ दिन 



         हेपटायटिस म्हणजेच कावीळ हा आजार आजही भारतात चिंतेचा विषय आहे. सर्वात जास्त मृत्यू होण्यामध्ये कावीळ या आजाराचा तिसरा क्रमांक लागतो. २८ जुलै हा दिवस जागतिक कावीळ दिन म्हणून पाळला जातो. पण, आजही कावीळबाबत लोकांमध्ये तितकीशी जनजागृती पहायला  मिळत नाही. खरंतर, दुषित पाण्यामुळे, उघड्या वरच्या खाल्लेल्या अन्नपदार्थांमुळे कावीळ होते. पण, आजही लोकांचा या आजारासाठी गावठी औषधे म्हणजेच झाडपाल्यांच्या औषधांकडे जास्त कल असल्याचे समोर आले आहे. भारतात ५० टक्के नागरिक आजही कावीळसाठी झाडपाल्यांची औषधे वापरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

            जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगभरात प्रत्येक ३० ते ४० सेंकदाला एका व्यक्तीचा मृत्यू हा यकृताच्या आजाराने होतो. पण, तरीही आपल्या शरीरामधील पाचशेहुन अधिक कार्य करणाऱ्या आणि अनेक रोगांना दूर ठेवणाऱ्या यकृताच्या आजाराबद्दल अजूनही जागरूकता आलेली नाही. कावीळबाबत भारतामध्ये बरेच गैरसमज आहेत.

         पावसाळा सुरू झाल्यावर दुषित पाण्याचे प्रमाण वाढते आणि हे पाणी शरीरात गेल्यावर कावीळचे रुग्ण वाढू लागतात. कावीळसाठी झाडपाल्याच्या औषधांकडे लोकांचा झुकता कल आहे. हेपटायटीस (कावीळ ) म्हणजे लिव्हरला आलेली सूज असते. हेपटायटीस ए, हेपटायटीस बी, हेपटायटीस सी, हेपटायटीस ई हे त्याचे सर्वसाधारण प्रकार आहेत. हिपेटायटिस ए आणि हिपेटायटिस ई व्हायरस – हे व्हायरस दूषित पाणी किंवा दूषित अन्नातून आपल्या पोटात जातात. ते यकृतावर हल्ला करतात आणि आपण जी कावीळ म्हणतो ती याचमुळे होते. यामध्ये रुग्णाला थकवा आणि ताप येतो. डोळे पिवळे होतात आणि लघवी पिवळसर लाल होते. यकृताला सूज येते. काविळचे निदान लवकरात लवकर होणं आवश्यक असते.

            जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार, आतापर्यंत जगातील २ अब्ज लोक काविळीने बाधित झाले आहेत. जगातली प्रत्येक पंधरावी व्यक्ती या विषाणूने बाधित होत असते. जगभरात दरवर्षी ७ लाख लोक या रोगाच्या गंभीर दुष्परिणामामुळे मृत्युमुखी पडतात. हेपेटायटिसच्या बाबतीत जागतिक क्रमवारीत भारत देश पहिल्या १० मध्ये येत असून ४ ते ८ टक्के लोक दरवर्षी या विषाणूने बाधित होतात. मुंबईत ‘ए’ आणि ‘ई’ प्रकारच्या काविळीच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. या काविळीच्या व्हायरसचा दूषित पाण्यातून प्रसार होतो, असे गेल्या १० वर्षाच्या निरीक्षणांमधून सिद्ध झाले आहे.

 संकलक: राजेंद्र पवार

    ९८५०७८११७८


 


सोमवार, २६ जुलै, २०२१

!! ए.पी.जे. अब्दुल कलाम स्मृतिदिन !!(२७ जुलै )

!! ए.पी.जे. अब्दुल कलाम  स्मृतिदिन !!(२७ जुलै )



         डॉ. अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम तथा ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर येथे झाला होता. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत होते. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍.सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

            १९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्‍यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

        विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पदमविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणार्‍या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.

        अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.

      ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रकृती शिलाँग येथील आय.आय.एम.च्या कार्यक्रमात व्याख्यान देताना  बिघडली. शिलाँगमधीलच एका रुग्णालयात त्यांनी २७ जुलै २०१५ रोजी अखेरचा श्वास घेतला.कलाम यांनी केलेल्या कार्याचा उपयोग भारतासाठी विविध कार्यात झाला आहे.

डॉ.ए. पी.जे. अब्दुल कलाम यांचे विचार ऐकण्यासाठी खाली लिंक देत आहे.


https://youtu.be/5g16qO6v4tQ

   


डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांना विनम्र अभिवादन.

  संकलक: राजेंद्र पवार

       ९८५०७८११७८




रविवार, २५ जुलै, २०२१

!! कारगिल विजय दिन !!(२६ जुलै )

 

!! कारगिल विजय दिन !!(२६ जुलै )




     दरवर्षी २६ जुलै हा कारगिल युद्धाच्या नायकांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.कारगिल विजय दिवस हा स्वतंत्र भारतासाठी महत्वाचा दिवस आहे . 
दरवर्षी २६ जुलै रोजी हा उत्सव साजरा केला जातो. कारगिल युद्ध सुमारे ६० दिवस चालले आणि २६ जुलै रोजी संपले. यामध्ये भारताचा विजय झाला. कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 
                  १९७१ च्या भारत-पाक युद्धानंतरही अनेक सैन्य संघर्ष सुरूच होते. दोन्ही देशांच्या आण्विक चाचण्यांमुळे तणाव आणखी वाढला होता. परिस्थिती शांत करण्यासाठी दोन्ही देशांनी फेब्रुवारी १९९९ मध्ये लाहोरमध्ये एका घोषणेवर स्वाक्षरी केली. ज्यामध्ये काश्मीर प्रश्न द्विपक्षीय चर्चेद्वारे शांततेने सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण पाकिस्तानने आपले सैन्य आणि निमलष्करी दले लपवून ठेवली आणि त्यांना नियंत्रण रेषा ओलांडून पाठवले आणि या घुसखोरीला “ऑपरेशन बद्र” असे नाव दिले. काश्मीर आणि लडाखमधील संबंध तोडणे आणि सियाचीन ग्लेशियरपासून भारतीय सैन्य हटविणे हे त्याचे मुख्य उद्दीष्ट होते. पाकिस्तानला असा विश्वास आहे की या प्रदेशात कोणत्याही प्रकारचे तणाव काश्मीरच्या समस्येस आंतरराष्ट्रीय मुद्दा बनविण्यात मदत करेल.
सुरुवातीला ही एक घुसखोरी मानली जात होती आणि दावा केला जात होता की ते काही दिवसांत काढून टाकले जातील. पण नियंत्रण रेषेत शोध घेतल्यानंतर आणि या घुसखोरांनी राबविलेल्या युक्तींमध्ये मतभेद झाल्यावर भारतीय सैन्याला समजले की हा हल्ला अत्यंत मोठ्या प्रमाणावर आखण्यात आला होता. यानंतर भारत सरकारने ऑपरेशन विजय या नावाने २००,००० सैनिक पाठविले. २६ जुलै १९९९ रोजी अधिकृतपणे युद्ध संपले. या युद्धादरम्यान ५२७ सैनिकांनी आपले बलिदान दिले.अनेक सैनिक जखमी झाले. आपल्या वर्णे गावातील योगेश पवार  हे या युध्दात जखमी झाले होते.
           योगेश आप्पाशी चर्चा करताना भारतीय सैन्याने केलेल्या अतुलनीय कामगिरीचा पटच त्यांनी उलघडून दाखविला. आम्हाला आजजरी देशसेवेसाठी बोलावले तर आम्ही जायला तयार आहोत असे त्यांनी सांगितले. आम्हाला ऑपरेशन विजय मध्ये भाग घेण्याची संधी मिळाली हे आम्ही आमचे भाग्य समजतो अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. योगेश पवार  यांना कारगिल
सैनिक म्हणूनच परिसरात ओळखले जाते.
    कारगिल युध्दात शहीद झालेल्या जवानांना विनम्र अभिवादन.
   संकलक : राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८

शुक्रवार, २३ जुलै, २०२१

सुधीर फडके जन्मदिन !! (२५ जुलै )

 

!! सुधीर फडके जन्मदिन !! (२५ जुलै )



रामचंद्र विनायक फडके उर्फ सुधीर फडके जन्म: २५जुलै  १९१९ मृत्यू :२९ जुलै  २००२ हे महाराष्ट्रातील संगीतकार व गायक होते. त्यांना त्यांचे चाहते बाबूजी या नावाने ओळखतात. त्यांनी जवळपास ५० वर्षे मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. तसेच मराठी सुगम संगीतावरील त्यांचे प्रभुत्व वादातीत आहे.
            बाबूजींनी शास्त्रीय गायनाचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरच्या कै. वामनराव पाध्ये यांचेकडे घेतले. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरवात १९४१ साली एच्.एम्.व्ही या संगीत क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेतून केली. १९४६ साली ते पुण्याच्या 'प्रभात चित्र संस्थे'त संगीत दिग्दर्शक म्हणून रुजू झाले. तिथे त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांना संगीत दिले. तसेच अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायनसुद्धा केले.
      त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोच्च क्षण म्हणजे त्यांनी १९६० च्या दशकात स्वरबद्ध केलेले 'गदिमां'चे गीत रामायण. गीत रामायणाचे कार्यक्रम तेव्हा रेडियोवर (All India Radio) वर्षभर प्रसारित होत होते. आजही याचे प्रयोग अफाट गर्दी खेचत आहेत.
         आपल्या कारकीर्दीच्या अखेरीस त्यांनी 'वीर सावरकर' या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील हिंदी चित्रपटाच्या निर्मितीत लक्ष घातले होते. हा चित्रपट जनतेकडून जमा केलेल्या वर्गणीतून निर्माण करण्यात आला होता. बाबूजींनी पार्श्वगायन केलेला व संगीत दिलेला हा शेवटचा चित्रपट. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुधीर फडके यांनी अफाट श्रम केले. या सर्व इतिहासाची माहिती देणारे पुस्तक - प्रभाकर मोने यांनी लिहिले आहे. पुस्तकाचे नाव - स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट - एक शिवधनुष्य (परचुरे प्रकाशन - २००४)
     कै. सुधीर फडके हे 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'त जवळजवळ ६० वर्षे होते. तसेच अमेरिकेमध्ये 'इंडिया हेरिटेज फाउंडेशन'च्या स्थापनेमागे त्यांचीच प्रेरणा होती.बाबूजींनी एकूण १११ चित्रपटांना संगीत दिले. त्यांपैकी २१ चित्रपट हे हिंदी भाषेतील आहेत. त्यापैकी काही गाजलेले चित्रपट पुढीलप्रमाणे  :
गोकुळ (१९४६)
आगे बढो (१९४७)
सीता स्वयंवर (१९४८)
अपराधी (१९४९)
जय भीम (१९४९)
माया बाजार (१९४९)
राम प्रतीज्ञा (१९४९)
संत जनाबाई (१९४९)
श्रीकृष्ण दर्शन (१९५०)
मालती माधव (१९५१)
मुरलीवाला (१९५१)
पहली तारीख (१९५४)
रत्न घर (१९५४)
शेवग्याच्या शेंगा (१९५५)
देवघर (१९५६)
सजनी (१९५६)
गज गौरी (१९५८)
गोकुल का चोर (१९५९)
भाभी की चूडियां (१९६१)
प्यार की जीत (१९६२)
एकटी (१९६८)
आधार (१९६९)
दरार (१९७१)
शेर शिवाजी (१९८१)
रुक्मिणी स्वयंवर
आम्ही जातो आमुच्या गावा
पुढचे पाऊल
जगाच्या पाठीवर
सुवासिनी
प्रपंच
मुंबईचा जावई
       एक गायक म्हणून बाबूजींनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले. त्यापैकी काही अतिशय गाजलेली मराठी गीते पुढे दिली आहेत. यांतील काही चित्रपटांत नसलेली भावगीतेही आहेत :
अंतरीच्या गूढ गर्भी (भावगीत)
अशी पाखरे येती (भावगीत)
आकाशी झेप घेरे पाखरा (चित्रपट- आराम हराम आहे)
ऊठ ऊठ पंढरीनाथा (चित्रपट- झाला महार पंढरीनाथ)
कुठे शोधिसी रामेश्वर (भावगीत)
जग हे बंदीशाळा (चित्रपट- जगाच्या पाठीवर)
डाव मांडून मांडून मोडू नको (भावगीत)
तुज सगुण म्हणू की निर्गुण रे (संत-गीत)
तुझे गीत गाण्यासाठी (भावगीत)
तुझे रूप चित्ती राहो (चित्रपट- गोरा कुंभार)
तोच चंद्रमा नभात (भावगीत)
दिसलीस तू फुलले ऋतू (भावगीत)
देव देव्हाऱ्यात नाही (चित्रपट- झाला महार पंढरीनाथ)
देवा तुला दया येईना कशी (चित्रपट- पाटलीण)
देहाची तिजोरी (चित्रपट आम्ही जातो अमुच्या गावा)
धीरे जरा गाडीवाना (चित्रपट- नरवीर तानाजी)
नवीन आज चंद्रमा (चित्रपट- उमज पडेल तर)
प्रिया आज माझी नसे साथ द्याया (भावगीत)
बाई मी विकत घेतला शाम (चित्रपट- जगाच्या पाठीवर)
बोलत नाही वीणा (चित्रपट- पडदा)
मानवतेचे मंदिर माझे (चित्रपट- ते माझे घर)
यशवंत हो जयवंत हो (चित्रपट- भिंतीला कान असतात)
लाडकी शकुंतला (चित्रपट- सुवासिनी)
वज्र चुड्याचे हात जोडता
विठ्ठला तू वेडा कुंभार (चित्रपट- प्रपंच)
सखि मंद झाल्या तारका (भावगीत)
स्त्री जन्मा ही तुझी कहाणी (चित्रपट- बाळा जो जो रे)
स्वर आले दुरुनी (भावगीत)
       सुधीर फडके यांच्या कारकीर्दीतील मानाचा बिंदू म्हणजे त्यांनी स्वरबद्ध केलेले गदिमांचे गीतरामायण. गीतरामायणात एकूण ५६ गाणी आहेत. त्यामध्ये गदिमांनी रामायणातले सर्व प्रसंग अतिशय ओघवत्या भाषेत वर्णिले आहेत.
      गीतरामायणाचे आजपर्यंत हिंदी, गुजराती, कन्नड, बंगाली, असामी, तेलुगू, मल्याळी, संस्कृत, कोकणी अशा विविध भाषांमध्ये भाषांतरे झालेली आहेत. या सर्व भाषांतरांचे वैशिष्ट्य म्हणजे भाषांतरकर्त्यांनी अर्थामध्ये एका मात्रेचाही फरक केलेला नाही. ही सर्व भाषांतरे मूळ बाबूजींनी दिलेल्या चालीवरच गायली जातात.
बाबूजींनी स्वतः त्यांच्या आयुष्यात गीतरामायणाचे जवळजवळ १८०० प्रयोग केले. हे प्रयोग त्यांनी स्वदेशात तसेच परदेशांत केले.
मिळालेले पुरस्कार.....
१. राष्ट्रपती पदक (१९६३) - हा माझा मार्ग एकला या चित्रपटासाठी.
२. सह्याद्री स्वररत्न पुरस्कार (२००२)
३. दिनानाथ मंगेशकर पुरस्कार (१९९८)
४. लता मंगेशकर पुरस्कार (२००१)
५. अल्फा जीवन गौरव पुरस्कार (२००१)
सुधीर फडके (बाबूजी )यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
     संकलक: राजेंद्र पवार
    ९८५०७८११७८

गोविंदभाई श्रॉफ जन्मदिन !!(२४जुलै )

 

!! गोविंदभाई  श्रॉफ जन्मदिन !!(२४जुलै )



गोविंदभाई श्रॉफ  जन्म:२४जुलै १९११ मृत्यू :२१नोव्हेंबर २००२ हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते एक प्रमुख समर्थक म्हणून गणले जात.
         स्वातंत्र्य लढ्याबरोबरच त्यांनी मराठवाड्यातिल व आंध्रातील शिक्षण क्षेत्रातही मोलाची कामगिरी बजावली आहे.बिटिशांकित हिंदुस्थानातील हैदराबाद संस्थानातील जनतेच्या मुक्तिलढयाचे एक नेते व स्वामी रामानंद तीर्थ यांचे निकटचे सहकारी. त्यांचा जन्म  कर्नाटक राज्यातील विजापूर  येथे झाला. औरंगाबाद येथे शासकीय प्रशालेत शिकत असताना गणेशोत्सवात पुढाकार घेतल्यामुळे हेडमास्तरांनी केलेल्या शिक्षेच्या निषेधार्थ ते औरंगाबाद सोडून पुढील शिक्षणासाठी हैदराबादच्या चादरघाट हायस्कूलमध्ये आले. मॅट्रिकच्या परीक्षेत संस्थानात सर्वप्रथम. मद्रास विदयापीठाची इंटरमिजिएटची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर स्वातंत्र्य-चळवळीत भाग घेण्यासाठी शिक्षण स्थगित केले; परंतु चळवळ थांबल्यामुळे पुन्हा शिक्षण सुरू केले.
                कार्ल मार्क्सच्या विचारांचे अभ्यासमंडळात अध्ययन. कोलकाता येथील सिटी कॉलेजमधून गणित विषय घेऊन बी.एस्सी. ( ऑनर्स ). पुण्याच्या फर्ग्युसन महाविदयालयातून १९३५ मध्ये त्यांना गोखले स्कॉलर म्हणून गौरविण्यात आले. गणित विषय घेऊन ते एम्.एस्सी. झाले आणि नंतर १९३६ मध्ये त्यांनी एल्एल्.बी. पदवी घेऊन काही काळ औरंगाबादच्या शासकीय विदयालयात अध्यापन केले. याच सुमारास त्यांचा विवाह मुरादाबादच्या मेहता घराण्यातील सत्यवती ऊर्फ सत्याबेन या सुविद्य मुलीशी  १९३७ मध्ये झाला. त्यांना डॉ. अजित, डॉ. संजीव व राजीव हे तीन मुलगे असून डॉ. उषा सुरीया या त्यांच्या स्नुषा होत.
       हैदराबाद राज्याचे त्रिभाजन करून भाषिक राज्ये निर्माण करावीत, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मराठवाडयाच्या विकासप्रश्नांसाठी त्यांनी विविध आंदोलने केली. शिक्षण आणि खादी या दोन क्षेत्रांत त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. श्री सरस्वती शिक्षण संस्था, औरंगाबाद; स्वामी रामानंद तीर्थांनी स्थापिलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटी आणि योगेश्वरी शिक्षण संस्था, आंबेजोगाई इ. शिक्षणसंस्थांचे ते एक मार्गदर्शक व पदाधिकारी होते. मराठवाडा खादी ग्रामोदयोग समितीचे संस्थापक तसेच संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते एक महत्त्वाचे नेते होते. मराठवाडयासाठी राज्यघटनेतील तरतुदीनुसार वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्याचा आग्रह त्यांनी धरला व त्यात यश संपादन केले.सदरचे महामंडळ १९७० मध्ये स्थापन करण्यात आले. मराठवाडा विदयापीठाच्या स्थापनेसाठी, औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे एक न्यायपीठ स्थापन करण्यासाठी आणि औरंगाबादला  ब्रॉडगेज रेल्वे आणण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे प्रयत्न केले. त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
श्रॉफ यांचे वृद्धापकाळाने औरंगाबाद येथे निधन झाले.
गोविंदभाई श्राफ यांना विनम्र अभिवादन.
   संकलक: राजेंद्र पवार
             ९८५०७८११७८

गुरुवार, २२ जुलै, २०२१

! गुरुपौर्णिमा !! (२३ जुलै )

 

!! गुरुपौर्णिमा !! (२३ जुलै )



        गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥ भारतात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते. गुरुपौर्णिमा निमित्ताने जाणून घेऊया गुरुपूजन, गुरुमहती आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व यांबाबत...
        गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥, आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ व्यासांनी लिहिला. तर, जगाला प्रज्ञा, करुणा आणि मैत्रीचे शिक्षण देणारे भगवान बुद्ध यांना विहारात जाऊन वंदन केले जाते. गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या, प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जाणारी वंदनीय व्यक्ती. गुरूपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. गुरूपौर्णिमेला गुरूपूजनही केले जाते. भारतात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते.
        पूर्वी गुरुकूल पद्धत रुढ होती. गुरुकडून ज्ञानप्राप्ती केल्यानंतर स्वगृही परतण्यापूर्वी गुरुदक्षिणा देण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जात असे, असे सांगितले जाते.
            भारतात पुराण काळापासून गुरु-शिष्य परंपरा आहे. पूर्वीच्या काळी शिष्य गुरुकडे आश्रमात राहत असत. ज्ञानसंपादनासाठी शिष्याला सुखवस्तू जीवनाचा त्याग करावा लागत असे. आता मात्र गुरुकुल परंपरा कमी झाली आहे. मात्र गुरुकडून ज्ञान घेण्याची प्रथा आजही तशीच आहे. तिथीनुसार आषाढ पौर्णिमेला महर्षी व्यासांचा जन्म झाल्याची मान्यता असल्यामुळे गुरुपौर्णिमेला व्यासपूजन केले जाते. जीवनातील चांगल्या अथवा कठीण प्रसंगी आपल्या गुरुकडून मार्गदर्शन घेण्यासाठी शिष्य आपल्या गुरुंची भेट घेतात.
            ​आई पहिला गुरु
बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचा पहिला गुरु त्याची आई असते. अगदी चालण्या-बोलण्यापासून ते संस्कार करेपर्यंत अनेक गोष्टी आई शिकवत असते. म्हणूनच 'आई माझा गुरु, आई माझा कल्पतरु, सौख्याचा सागरु, आई माझी', असे म्हटले जाते. आईसोबत वडीलही अनेक गोष्टी शिकवत असतात. त्यामुळे 'मातृदेवो भव:, पितृदेवो भव:', असेही म्हटले जाते. घरातून बाहेर पडल्यानंतर शिक्षक, वडील मंडळी, मित्रमंडळी, तज्ज्ञ मंडळी असे अनेक जण आपल्याला गुरु, मार्गदर्शक म्हणून लाभतात. आयुष्यात चांगला गुरु मिळणे भाग्याचे लक्षण समजले जाते.
      कलीने ब्रह्मदेवांना गुरु शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितला की, 'ग' कार म्हणजे सिद्ध होय. 'र' कार म्हणजे पापाचे दहन करणारा. 'उ' कार म्हणजे विष्णूंचे अव्यक्त रूप. तसेच गुरु हाच ब्रह्मा, विष्णू, महेश. हे त्याचे त्रिगुणात्मक रूप आहे. या पलीकडे जे परब्रह्म तत्त्व आहे, ते जाणण्यासाठी गुरुंचा आश्रय घ्यावा लागतो. ईश्वर जरी प्रसन्न झाला तरी त्याला ओळखणारा गुरुच असतो व गुरु स्वत: प्रसन्न झाला तर ईश्वर आपल्या अधीन होतो. भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या अनेक जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, कृष्ण, सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु-शिष्य परंपरा आहे. संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत. त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर. भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे.
        गुरुपौर्णिमेला गुरुपूजन करण्याची पद्धत आहे. गुरुपूजन म्हणजे गुरुंची पाद्यपूजा करणे. मात्र, गुरुपूजन म्हणजे केवळ गुरुची पाद्यपूजा करणे अथवा गुरुला वाकून नमस्कार करणे, असे मूळीच नाही. खऱ्या गुरुला अशा दिखाव्यांची गरज नसते. गुरुपूजनाचा खरा अर्थ आपल्या गुरूने दिलेले ज्ञान आत्मसात करणे. गुरुंकडून मिळवलेले ज्ञान आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे. गुरुने दिलेल्या ज्ञानामुळे आपले जीवन यशस्वी झाले यासाठी सतत गुरुबद्दल कृतज्ञ असणे. या कृतज्ञतेपोटी गुरुंची सेवा आणि आदर करणे म्हणजे खरे गुरुपूजन. अशा प्रकारच्या गुरुपूजनातून गुरुला खरी गुरूदक्षिणा मिळत असते. कारण जेव्हा शिष्याची प्रगती होते, तेव्हा ती पाहून गुरुला खरा आनंद होत असतो. खऱ्या गुरुसाठी हा एक प्रकारचा सन्मानच असतो.
           गुरुचे कार्य महान कार्य आहे. आपल्या शिष्यांच्या चांगल्याचा विचार करून त्यांना आपल्याजवळील ज्ञान आणि अनुभव निरपेक्षपणे आणि प्रामाणिकपणे देणे हे गुरुचे खरे कार्य असते. ज्ञान देताना गुरूची भावना ही अहंकाराची नसावी. गुरुने दिलेल्या ज्ञानाने शिष्याची प्रगती होते, तेव्हा ती प्रगती पाहून जर गुरुला आनंद आणि समाधान झाले, तरच तो खरा गुरु जाणावा. गुरुकडून मिळालेले ज्ञान नम्रपणे स्विकारतो, त्या शिष्याला गुरुकडून मिळालेले ज्ञान जसेच्या तसे मिळते. कारण ज्ञान ग्रहण करताना शिष्याकडे नम्रपणा नसेल, तर गुरुकडे शिष्याबद्दल प्रेम आणि आपलेपणा असूनही शिष्याला समजावणे गुरुला कठीण जाते. कारण ज्ञानप्राप्तीमध्ये शिष्याचा अंहकार अडथळा निर्माण करत असतो. यासाठीच शिष्याची गुरुवर मनापासून श्रद्धा असणे गरजेचे आहे. त्याचसोबत गुरुकडून मिळालेले ज्ञान आपल्या जीवनात आचरणात आणण्याचा शिष्याने तंतोतंत प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे केल्यास शिष्याच्या पाठी गुरुच्या ज्ञानाचे बळ आणि साधना निर्माण होते आणि त्याची आयुष्यात प्रगती होत जाते.
        गुरु त्यांच्याजवळील ज्ञान आणि अनुभवातून शिष्याला मार्गदर्शन करत असतात. जीवन जगत असताना या ज्ञान आणि अनुभवाची प्रत्येकाला गरज असते. स्वानुभवातून शिकण्यापेक्षा एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेतल्यामुळे जीवनातील समस्या लवकर सोडवता येतात आणि जीवन सुखी-समाधानी होते. जीवनात गुरुशिवाय तरणोपाय नाही. म्हणूनच जन्म देणारी आई असो अथवा आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे सद्गुरु असोत, शिष्याला गुरुप्रती कृतज्ञता आणि श्रद्धा असणे गरजेचे आहे. यासाठीच गुरुपौर्णिमेचे महत्त्व प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे.
    गुरुपौर्णिमेनिमित्ताने आम्हाला घडवणाऱ्या सर्वच गुरुंना वंदन.
संकलक: राजेंद्र पवार
   ९८५०७८११७८



बुधवार, २१ जुलै, २०२१

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जन्मदिन !! (२२ जुलै )

 !! महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जन्मदिन !!   (२२ जुलै )



         अजितदादा  पवार जन्म: २२ जुलै १९५९ हे महाराष्ट्र राज्यातील एक परखड राजकारणी आहेत ,  ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे पुतणे आहेत . 

         अजित अनंतराव पवार यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. त्यांनी प्रवरा येथील देवळाली येथे आपले शिक्षण पूर्ण केले. 

     अजित पवार हे शरद पवार यांचे थोरले भाऊ अनंतराव पवार यांचे पुत्र आहेत.अजित पवार आपल्या पदवीचे शिक्षण घेत होते परंतु वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांना औपचारिक शिक्षण सोडावे लागले, आणि आपल्या कुटुंबाची देखभाल करण्यास  त्यांनी सुरवात केली. 

अजित पवार  देवळाली प्रवरा येथे प्राथमिक शिक्षण घेत असताना त्यांचे काका शरद पवार हे सत्ताधारी कॉंग्रेसमधील एक राजकीय नेते बनले होते.  १९८२  मध्ये   अजितदादांची साखर  संघावर निवड झाली.त्याचवेळी खऱ्याअर्थाने त्यांनी राजकारणात प्रवेश केला . १९९१ मध्ये ते पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि ते १६ वर्षे या पदावर राहिले. या काळात  बारामती लोकसभा मतदार संघातून ते लोकसभा सदस्य म्हणूनही निवडून आले.नंतर त्यांनी आपली जागा काकांसाठी सोडली.  लोकसभा सदस्य म्हणून शरद पवार निवडून आल्यानंतर पी.व्ही.नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात  ते संरक्षणमंत्री  बनले.त्यानंतर  अजित पवार हे बारामती येथून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून  १९९५,१९९९,२००४,२००९ आणि २०१४,२०१९  मध्ये  त्याच मतदारसंघातून पुन्हा पुन्हा निवडून आले आहेत. त्यांची आपल्या मतदारसंघावर प्रचंड कमांड आहे.

            अजितदादांनी कृषी,ऊर्जा, मृदसंधारण,नियोजन, जलसंपदा ही खाती  सुधाकरराव नाईक,विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे,अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात सांभाळली. ते सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री म्हणून काम पाहत आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत.

          अजितदादा पवार प्रचंड संघटन कौशल्य असणारी व्यक्ती आहे. कोणत्याही परिस्थितीत मनात आलेली गोष्ट करणारच. कडक शिस्त असणारे, प्रशासनावर पकड असणारे, एक अभ्यासु 

व्यक्तिमत्व म्हणून सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहेत.

    अजितदादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेवतीने

"राष्ट्रवादी जीवलग" हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. कोरोनामुळे ज्या मुलांनी आपल्या पालकांना गमावले आहे

त्यांच्यासाठी हा उपक्रम असणार आहे. अशा मुलांना आधाराची गरज आहे ती गरज पूर्ण करण्यासाठी पक्षाच्यावतीने मुलगा असेल तर पुरुष "राष्ट्रवादी दूत" आणि मुलगी असेल तर स्त्री "राष्ट्रवादी दूत" म्हणून काम करणार आहे. थोडक्यात या मुलांना आधार देण्याचे काम पक्षाच्या वतीने केले जाणार आहे. या उपक्रमाला आपले सहकार्य अपेक्षित आहे.

         संपूर्ण सातारा जिल्हावासीयांच्या वतीने अजितदादा यांना वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.

    संकलक: राजेंद्र पवार

                    उपाध्यक्ष

            सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस 

             पार्टी,सातारा.




!! पोळा( बेंदूर ) महाराष्ट्रातील शेतीशी संबंधित सण !! (२२ जुलै )

 

!! पोळा( बेंदूर ) महाराष्ट्रातील शेतीशी संबंधित सण !! (२२ जुलै )



            बैल पोळा (बेंदूर )हा सण देशात वेगवेगळ्या वेळी साजरा केला जातो.सातारा जिल्ह्यात हा सण आषाढ महिन्यातील शुध्द त्रयोदशी, चतुर्दशीला
साजरा करण्याची परंपरा आहे. यावर्षी तो त्रयोदशीला आहे. काही ठिकाणी हा सण श्रावण किंवा भाद्रपद अमावास्येला साजरा करण्याची प्रथा आहे.
           बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्यप्रदेश व तेलंगण
 सीमाभागात सुद्धा हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात.
            बेंदराच्या आदल्या दिवशी खांदमळणी असते. यादिवशी बैलाच्या खांद्याला हळद आणि लोणी यांचे मिश्रण करुन ते लावले जाते. यादिवशी बाजरीचे उंडे बैलांना खाऊ घालण्याची परंपरा आहे. बेंदरादिवशी बैलांना आंघोळ घातली जाते. नंतर बैलांना सुंदररित्या सजवले जाते. गळ्यात नवीन कंडा तसेच चाळ बांधला जातो, कासरा देखील नवीन वापरण्याची प्रथा आहे. शिंगे रंगवली जातात ,त्यावर पितळी शेंब्या बसवल्या जातात, सर्वांगावर नक्षीदार ठिपके काढले जातात,डोक्याला बाशिंग बांधले जाते, पाठीवर झूल घातली जाते. बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते. बैलाला आज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून तो त्याला खायला दिला जातो. 
          आजच्या दिवशी बैलांना कोणतेही काम लावले जात नाही.शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्त्वाचा मानला गेल्याने तो उत्साहाने साजरा करण्यात येतो.
           आता मात्र परिस्थिती बदलली आहे,
ग्रामीण भागात बैलांची संख्या खूपच कमी झालेली आहे. कृषी यांत्रिकीकरण झाल्याने बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. काही ठिकाणी तर ट्रॅक्टरची मिरवणूक काढली जाते.  गतवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील कोरोना  (कोविड-१९) या विषाणूजन्य आजारामुळे मिरवणूक काढायला देखील परवानगी नाही. आपण हा सण साधेपणाने साजरा करुया. बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करुया.
    संकलक: राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८

मंगळवार, २० जुलै, २०२१

! बकरी ईद !! (२१ जुलै )

 

!! बकरी  ईद !! (२१ जुलै )



ईद-उल-अधा (Eid al-Adha, ईद-उल-अजहा) किंवा बकरी ईद हा एक मुस्लिम सण आहे. हा सण जगभर साजरा केला जातो. या दिवशी कुराणमधील बळीची घटना साजरी केली जाते. हा सण मुसलमानी जिल्हेज महिन्याच्या १०व्या तिथीला किंवा त्याच्या आसपासच्या दिवशी साजरा होतो.
इस्लामच्या तीन मुख्य ईदपैकी हा एक दिवस आहे.
बकरी ईद ला ईद-उल-अज़हा अथवा ईद-उल-अद्'हा, ईद-उल-झुआ, ईद-ए-कुर्बां असेही म्हणतात. हा सण कुर्बानीचा सण किंवा पवित्र हज यात्रेचा सण म्हणूनही ओळखला जातो.
     संकलक : राजेंद्र पवार
          ९८५०७८११७८

सोमवार, १९ जुलै, २०२१

!! आषाढी एकादशी !! (२० जुलै ) आषाढ शुक्ल पक्षाच्या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. देवशयनी एकादशीचे व्रत खूप प्रभावी मानले जाते. भगवान विष्णूचा निद्रा कालावधी देवशयनी एकादशीच्या दिवसापासून सुरू होतो, म्हणूनच त्याला देवशयनी एकादशी म्हणतात. देवशयनी एकादशीला पद्म एकादशी, आषाढी एकादशी आणि हरिशयनी एकादशी असेही म्हणतात. देवशयनी एकादशी प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेनंतर येते. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार देवशयनी एकादशीचे व्रत दरवर्षी जून किंवा जुलै महिन्यात येते. देवशयनी एकादशीच्या चार महिन्यांनंतर भगवान विष्णू प्रबोधिनी एकादशीला जागे होतात. हिंदु दिनदर्शिकेनुसार चार महिन्यांचा आत्मसंयम कालावधी असलेल्या चातुर्मास देवशयनी एकादशीपासून सुरू होतो. यावर्षी देवशयनी एकादशी २० जुलै २०२१ रोजी आहे. देवशयनी एकादशीचे महत्व भगवान विष्णू योग निद्रेत गेल्यानंतर चार महिन्यांपर्यंत मांगलिक कार्य केले जात नाही. निसर्गात या चार महिन्यांत सूर्य, चंद्र आणि निसर्गाचं तेज कमी राहते. या काळात शुभ शक्ती कमकुवत असतात. त्यामुळे केलेल्या कार्याचे परिणाम देखील शुभ प्राप्त होत नाहीत. म्हणूनच या चार महिन्यांत म्हणजेच चातुर्मासात संत आणि महात्मे एकाच ठिकाणी राहतात आणि जप, तपश्चर्या व पूजा अर्चा करतात. असे मानले जाते की चातुर्मासात सर्व धाम ब्रज येथे येतात. त्यामुळे या काळात ब्रज यात्रा खूप शुभ माणली जाते. एकादशी आरंभ तिथी - १९ जुलै २०२१ रोजी रात्री ९.५९ वाजता एकादशी समाप्ती तिथी - २०जुलै २०२१ रोजी सायंकाळी ०७.१७वाजता द्वादशीलाच व्रत पारण करणे महत्त्वाचे एकादशीच्या व्रताच्या समाप्तीला पारण म्हणतात. एकादशीचे व्रताच्या पुढील दिवशी सूर्योदयानंतर पारण केले जाते. द्वादशीची तिथी संपण्यापूर्वी एकादशी व्रताचे पारण करणे फार महत्वाचे आहे. जर सूर्योदयाच्या अगोदर द्वादशी तिथी संपली असेल तर एकादशी व्रताचे पारण सूर्योदयानंतरच होते. द्वादशी तिथीमध्ये पारण न करणे हे पाप करण्यासारखे आहे. आपणास आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. संकलक: राजेंद्र पवार ९८५०७८११७८

 

!! आषाढी एकादशी !! (२० जुलै )




      आषाढ शुक्ल पक्षाच्या एकादशीला देवशयनी एकादशी  म्हणतात. देवशयनी एकादशीचे व्रत खूप प्रभावी मानले जाते. भगवान विष्णूचा निद्रा कालावधी देवशयनी एकादशीच्या  दिवसापासून सुरू होतो, म्हणूनच त्याला देवशयनी एकादशी म्हणतात. देवशयनी एकादशीला पद्म एकादशी, आषाढी एकादशी  आणि हरिशयनी एकादशी  असेही म्हणतात. देवशयनी एकादशी प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेनंतर  येते. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार देवशयनी एकादशीचे व्रत  दरवर्षी जून किंवा जुलै महिन्यात येते.
          देवशयनी एकादशीच्या चार महिन्यांनंतर भगवान विष्णू प्रबोधिनी एकादशीला जागे होतात. हिंदु दिनदर्शिकेनुसार चार महिन्यांचा आत्मसंयम कालावधी असलेल्या चातुर्मास देवशयनी एकादशीपासून सुरू होतो. यावर्षी देवशयनी एकादशी २० जुलै २०२१ रोजी आहे.
       देवशयनी एकादशीचे महत्व
भगवान विष्णू योग निद्रेत गेल्यानंतर चार महिन्यांपर्यंत मांगलिक कार्य केले जात नाही. निसर्गात या चार महिन्यांत सूर्य, चंद्र आणि निसर्गाचं तेज कमी राहते. या काळात शुभ शक्ती कमकुवत असतात. त्यामुळे केलेल्या कार्याचे परिणाम देखील शुभ प्राप्त होत नाहीत. म्हणूनच या चार महिन्यांत म्हणजेच चातुर्मासात संत आणि महात्मे एकाच ठिकाणी राहतात आणि जप, तपश्चर्या व पूजा अर्चा करतात. असे मानले जाते की चातुर्मासात सर्व धाम ब्रज येथे येतात. त्यामुळे या काळात ब्रज यात्रा खूप शुभ माणली जाते.
एकादशी आरंभ तिथी - १९ जुलै २०२१ रोजी रात्री ९.५९ वाजता
एकादशी समाप्ती तिथी - २०जुलै २०२१ रोजी सायंकाळी ०७.१७वाजता
      द्वादशीलाच व्रत पारण करणे महत्त्वाचे
एकादशीच्या व्रताच्या समाप्तीला पारण म्हणतात. एकादशीचे व्रताच्या पुढील दिवशी सूर्योदयानंतर पारण केले जाते. द्वादशीची तिथी संपण्यापूर्वी एकादशी व्रताचे पारण करणे फार महत्वाचे आहे. जर सूर्योदयाच्या अगोदर द्वादशी तिथी संपली असेल तर एकादशी व्रताचे पारण सूर्योदयानंतरच होते. द्वादशी तिथीमध्ये पारण न करणे हे पाप करण्यासारखे आहे.
   आपणास आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
   संकलक: राजेंद्र पवार
     ९८५०७८११७८

रविवार, १८ जुलै, २०२१

बँकांचे राष्ट्रीयीकरण !! (१९ जुलै )

 

!! बँकांचे राष्ट्रीयीकरण !! (१९ जुलै )




         भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशाची आर्थिक परिस्थिती गंभीर होती. इंग्रजांद्वारे करण्यात आलेल्या आर्थिक शोषणाचे विपरित परिणाम स्पष्ट दिसत होते. देशातील मूठभर लोकांजवळ अमाप संपत्ती होती. उरलेला ९० टक्के समाज गरीबीचे जीवन जगत होता. ताशकंद करारानंतर लाल बहाद्दुर शास्त्री यांचा मृत्यू झाला. १९६७ साली इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या. स्वतःच्या क्षमतेची ओळख पटविण्यासाठी इंदिराजींना कठोर निर्णय घ्यावे लागले.
    देशाची आर्थिक स्थिती :
         त्या काळात देशातील कमर्शिअल बँक सामाजिक उत्थानासाठी पाहिजे तितकी सहायक नव्हती. देशातील १४ मोठ्या बँकांजवळ देशातील ८०% संपत्ती होती. यावर काही मूठभर श्रीमंत लोकांचा ताबा होता. सामान्य व्यक्तीला बँकेकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नव्हती.
          १९६७ मध्ये इंदिरा गांधी यांनी काँग्रेस पार्टीमध्ये १० सूत्रीय कार्यक्रम सादर केले. बँकेवर शासनाचे0 नियंत्रण असावे हा यामागील मुख्य हेतू होता. राजा-महाराजांना मिळणारा आर्थिक लाभ बंद करणे, किमान मजुरीचे धोरण ठरविणे, पायाभूत संरचणेचा विकास, कृषी, लघु उद्योग आणि निर्यातीत गुंतवणूक वाढविणे हा यामागील मुख्य हेतू होता. इंदिरा गांधींनी १९ जुलै १९६९ रोजी एक सूचना काढून देशातील १४ मोठ्या खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. या सूचनेला ‘बँकिंग कंपनीज ऑर्डिनन्स’ म्हटले जाते. पुढे याच नावाने विधेयक पारित करण्यात आले. यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर झाले.
          राष्ट्रीयीकरण होण्याच्या आधी देशामध्ये केवळ स्टेट बँक ऑफ इंडिया ही एकमात्र शासकीय बँक होती. याचे राष्ट्रीयीकरण १९५५ साली करण्यात आले होते.
               राष्ट्रीयीकरण होण्यापूर्वी व्यावसायिक बँक ‘क्लास बँकिंग’ नीतीचा वापर करायचे. याअंतर्गत केवळ श्रीमंतांनाच बँकेद्वारे कर्ज आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जायच्या. राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर क्लास बँकिंगचे रुपांतरण मास बँकिंगमध्ये झाले. ग्रामीण क्षेत्रांमध्येही शाखांचा विस्तार झाला.
१) बँकेतून श्रीमंत लोकांचा प्रभाव नष्ट करणे.
२) कृषी, लघु आणि मध्यम उद्योगांसोबत छोटे व्यापाऱ्यांना सरळ अटींवर आर्थिक लाभ मिळवून देणे, सामान्य नागरिकांना बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणे हा यामागील मुख्य हेतू होता.
३) बँक व्यवस्थापनात प्रोफेशनॅलिटी आणणे.
४) देशातील आर्थिक शक्तींचे संकेंद्रण थांबविणे, उद्योगांसाठी नवीन वर्गास प्रोत्साहन देणे. हे राष्ट्रीयीकरणाचे मुख्य उद्देश होते.
बँकांवरील राष्ट्रीयीकरणाचे परिणाम :
१) बँकेकडे पडून असलेला अनावश्यक पैसा आवश्यक क्षेत्रामध्ये गुंतविण्यात आला. यात प्राथमिक सेक्टर, छोटे उद्योग, कृषी आणि छोटे ट्रान्सपोर्ट यांचा समावेश होता.
२) शासनाने राष्ट्रीय बँकांना दिशानिर्देश देत लोन पोर्टफोलियोमध्ये ४०% कृषी कर्ज देणे अनिवार्य केले. सोबतच प्राथमिकताप्राप्त इतर क्षेत्रातही कर्ज देण्यात आले. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला.
३) राष्ट्रीयीकरणानंतर बँकांच्या शाखांचा वेगाने विस्तार झाला. बँकांनी त्यांचा व्यवसाय गाव, शहरा-शहरांपर्यंत पोहोचविला. आकडेवारीनुसार जुलै, १९६९ मध्ये देशात बँकांच्या केवळ ८३२२ शाखा होत्या. १९९४ सुरुवातीला या शाखा ६० हजारांच्या पलीकडे पोहोचल्या.
बँकांच्या राष्ट्रीयीकरणात प्रथम टप्प्यात मिळालेल्या यशानंतर १९८० मध्ये दुसरा टप्पा हाती घेण्यात आला. यामध्ये इतर ६ खासगी बँकांना शासनाच्या ताब्यात घेण्यात आले. थोडक्यात सांगायचे झाल्यास इंदिरा गांधींच्या शासनाद्वारे १९६९ मध्ये १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. देशहिताच्या दृष्टीने उचलण्यात आलेले हे देशाच्या आर्थिक क्षेत्रातील सर्वांत मोठे पाऊल मानले जाते. यामुळे देशाचा चौफेर विकास करणे शक्य झाले.
   राष्ट्रीयीकरण करण्यात आलेल्या बँका..
१)बँक ऑफ इंडिया
२)बँक ऑफ महाराष्ट्र
३)कॅनरा बँक
४) पंजाब नॅशनल बँक
५)युनियन बँक ऑफ इंडिया
६)युनायटेड बँक ऑफ इंडिया
७)बँक ऑफ बडोदा
८)इंडियन बँक
९)इंडियन ओव्हरसिज बँक
१०)सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया
११)सिंडिकेट बँक
१२)युनायटेड कमर्सिअल बँक
१३)अलाहाबाद बँक
१४)देना बँक
    संकलक : राजेंद्र पवार
     ९८५०७८११७८

शनिवार, १७ जुलै, २०२१

नेल्सन मंडेला जन्मदिन !! (१८ जुलै )

 !! नेल्सन मंडेला जन्मदिन !! (१८ जुलै )



जन्म:१८ जुलै १९१८ मृत्यू: ५ डिसेंबर २०१३

               १८ जुलै १९१८ला जन्मलेल्या मंडेलांनी साम्राज्यवाद, गरिबी आणि वंशभेदाचं उच्चाटन करण्यासाठी जो अतुलनीय लढा दिला त्याचं खरंतर शब्दांत वर्णन करणं शक्य नाही. ‘प्रदीर्घ वाटचाल-स्वाधीनतेकडे’ हे त्यांचं आत्मचरित्र म्हणजे त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबरोबरच दक्षिण आफ्रिकेचा आणि जागतिक पातळीवरील अनेक लढ्यांचा पट आहे.

              मंडेला १९९४ ते १९९९ या काळात दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष होते. वर्षानुवर्षे ‘काळे’ म्हणून हिणवल्या गेलेल्या समूहातील ते पहिले राष्ट्राध्यक्ष. शांततेचं नोबेलही त्यांना १९९३मध्ये प्रदान करण्यात आलं. त्याआधी २५० पेक्षाही अधिक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं होतं. मात्र, जागतिक पातळीवर एक आयकॉन बनलेल्या मंडेला यांचा बालपणापासूनचा काळ, शिक्षण, वकिलीतील संघर्ष, रोबेन बेटावरील कोठडी आणि स्वातंत्र्य मिळण्यापर्यंतचा कालखंड त्यांच्यासाठी अत्यंत प्रतिकूल होता. या प्रदीर्घ कालखंडाबद्दल मंडेला यांनी सविस्तर लिहिलं आहे. रोबेन आयलंड या बेटावर कारावासात असताना, १९७४मध्ये त्यांनी हे पुस्तक लिहायला घेतलं. त्याच्या काही प्रती तुरुंगाधिकाऱ्यांनी नष्टही केल्या; पण सहकाऱ्यांच्या मदतीमुळे, त्यातील बराचसा भाग सुरक्षित ठिकाणी पोहोचला. मंडेला १९९०मध्ये तुरुंगातून बाहेर पडले आणि त्यानंतरचा काळ त्यांनी रेखाटला. असा या पुस्तक लेखनाचाही प्रवास खडतर आहे. बालपणीच्या आठवणी लिहिताना अगदी सुरुवातीला, मंडेलांनी लिहिलंय, ‘माझं नाव – रोलिल्हाल्हा; खोसा भाषेत झाडाची फांदी ओढणारा, उपद्व्यापी.’ त्यांनी लिहिलेल्या वाक्याची प्रच‌िती आपल्याला त्यांच्या चरित्रात येते हे नक्की.

वकील झाल्यानंतर आणि शहरात आल्यानंतर मंडेलांना परिस्थितीची अधिकच गांभीर्याने जाणीव झाली. आफ्रिकन नॅशनल कॉँग्रेसचे (एएनसी) तत्कालीन नेते वॉल्टर सिसुलू यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. त्यातूनच त्यांनी ‘एएनसी’त उमेदवारी सुरु केली. ही घटना म्हणजे त्यांच्यातील ‘स्वातंत्र्ययोद्ध्याचा जन्म’ होता. या टप्प्यावर मंडेला यांनी आफ्रिकेतील भारतीय समाज, महात्मा गांधींची अहिंसा चळवळ, गोऱ्या लोकांचा जाच, जागतिक चळवळी आदींचा व्यापक अभ्यास केला.

‘लढा हे माझे जीवन आहे’ यात विविध लढे, त्याची पार्श्वभूमी, वर्णभेदावर शिक्कामोर्तब करणारा ‘बांटू एज्युकेशन ऍक्ट (१९५३), ‘पश्चिमेकडील वस्ती पुनर्वसन’, सविनय कायदेभंगाचे यशापयश, यां‌विषयी त्यांनी सविस्तर लिहिलंय. एएनसीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत १९५२च्या अखेरीस नेतृत्वबदल झाला. त्यात मंडेलांवरही प्रथम साहाय्यक अध्यक्ष अशी जबाबदारी देण्यात आली. कार्य अधिकच वाढलं. त्यातून नेतृत्व करणाऱ्यांवर बंदीची शक्यता लक्षात घेऊन भूमिगत चळवळ अधिक प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी मंडेलांवर सोपवण्यात आली, ती त्यांनी सक्षमपणे पूर्ण केली. या योजनेला नंतर मंडेला प्लॅन किंवा फक्त ‘एम प्लॅन’ म्हणून ओळखलं गेलं.

         समोर होऊ न शकलेलं भाषण, वाचून दाखविण्यात आलं. या भाषणाला पुढे ‘नो इझी वॉक टू फ्रीडम’ या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या एका वाक्याचं नामाभिधान मिळालं. या पुस्तकातील अनेक संदर्भ भारतीय स्वातंत्र्य लढा आणि आफ्रिकेचा लढा यातील दुवे सांधणारे वाटतात. पुस्तकात ४६ पेक्षा अधिक दुर्मीळ कृष्णधवल छायाचित्रं आहेत. त्यामुळे ऐतिहासिक लढ्याचे महत्त्वाचे प्रसंग डोळ्यांसमोर येतात. त्यामुळे पुस्तकाचं संग्राह्य मूल्य निश्चितच वाढलं आहे. नेल्सन मंडेला यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.

 मंगेश कुलकर्णी  यांच्या लेखातून

 संकलक: राजेंद्र पवार

       ९८५०७८११७८



शुक्रवार, १६ जुलै, २०२१

शांता हुबळीकर स्मृतिदिन !!(१७ जुलै )

 


शांता हुबळीकर स्मृतिदिन !!(१७ जुलै )



शांता हुबळीकर जन्म १४ एप्रिल १९१४:अदरगुंची, कर्नाटक मृत्यू - १७ जुलै१९९२:पुणे, महाराष्ट्र  या एक मराठी/हिंदी/कानडी चित्रपट अभिनेत्री/गायिका होत्या. त्यांना उस्ताद अब्दुल करीमखाँसाहेबांकडून चार वर्षे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेण्याचे भाग्य लाभले. होते. शांता हुबळीकर यांचे लग्न लहानपणीच ७५ वर्षांच्या पुरुषाशी ठरत असल्याचे कळल्यावर त्या घरातून निघून गेल्या. शाळेतील मैत्रिणीच्या पतीच्या शिफारशीने त्या गदग येथील गुब्बी नाटक कंपनीमध्ये काम करू लागल्या. पुढे त्यांनी बाबूराव पेंढारकर यांच्या कोल्हापूर सिनेटोनमध्ये नोकरी केली. हुबळीकर यांनी भालजी पेंढारकर दिग्दर्शित कान्होपात्रा या चित्रपटात कान्होपात्राच्या आईची भूमिका केली होती.
१९३७मध्ये त्यांनी प्रभात फिल्म कंपनीमध्ये काम सुरू केले. त्यांनी 'माणूस'मध्ये गायलेले आता कशाला उद्याची बात हे गाणे प्रसिद्ध झाले होते. त्यांनी याच नावाने आत्मचरित्र लिहिले आहे.
  शांताबाई हुबळीकर यांची भूमिका असलेले चित्रपट
कान्होपात्रा
कुलकलंक (हिंदी, १९४५)
घर की लाज (हिंदी, १९४१)
घरगृहस्थी (हिंदी, १९५८)
घरसंसार (१९४२)
जीवन नाटक (हिंदी, १९३५)
पहिला पाळणा (१९४२)
प्रभात (हिंदी, १९४१)
माझा मुलगा (हिंदीत मेरा लडका, १९३८)
माणूस (हिंदीत आदमी, १९३९)
मालन (हिंदी, १९४२)
सौभाग्यवती भव (हिंदी, १९५७)शांता हुबळीकर यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
संकलक:राजेंद्र पवार
        ९९८५०७८११७८

गुरुवार, १५ जुलै, २०२१

!! धनराज पिल्ले जन्मदिन !! (१६ जुलै ) जन्म : १६ जुलै १९६८

 


!! धनराज पिल्ले जन्मदिन !! (१६ जुलै )
जन्म : १६ जुलै १९६८ 



       धनराज पिल्ले यांचा जन्म सामान्य कुटुंबात झाला पण आपल्या जिद्दीच्या व कौशल्याच्या जोरावर ते भारतीय हॉकी संघाच्या कर्णधारपदापर्यंत पोचले.. आघाडीवर खेळणार्‍या धनराजने आतापर्यंत चारशेहून जास्त सामने खेळले असून दोनशेच्या आसपास गोल केले आहेत.
         भारताकडून सर्वांत जास्त गोल करणारे ते खेळाडू आहेत. चार ऑलिम्पिक, चार जागतिक हॉकी करंडक, चार चॅम्पियन्स चषक व चार आशियाई स्पर्धांत  त्यांनी भाग घेतला आहे. २००२ मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देणार्‍या संघाचे ते कर्णधार होते.ते सध्या इंडियन एअरलाइनमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आहेत.
धनराज पिल्ले आतापर्यंत इंडियन जिमखाना, एफ सी लॉन, सिलंगूर (मलेशिया), अभाहानी (बांगला देश), स्टुटगार्ट किकर्स, बॅंक सिंपानाम नॅशनल (मलेशिया), आर्थर ॲंडरसन (कुआलालंपूर) अशा वेगवेगळ्या जागतिक हॉकी क्लबांकडून खेळले आहेत.
धनराज पिल्ले यांना मिळालेले पुरस्कार
१)अर्जुन पुरस्कार (१९९५)
२)के. के. बिर्ला पुरस्कार (१९९८-९९)
३)राजीव गांधी खेलरत्‍न पुरस्कार
    (१९९९)
४)पद्मश्री (२०००)
५)क्रीडा महर्षी हरिभाऊ साने पुरस्कार
   (२०१६)
  धनराज पिल्ले यांना जन्मदिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.
       राजेंद्र पवार
    ९८५०७८११७८


बुधवार, १४ जुलै, २०२१

जागतिक युवा कौशल्य दिन !! (१५ जुलै )

 

!!  जागतिक युवा कौशल्य दिन !!
  (१५ जुलै )




       १५ जुलै हा दिवस सन २०१५ पासून जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा केला जातो. नोव्हेंबर २०१४ मध्येच संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने तसा ठराव मंजूर केला.आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जगाची कौशल्य राजधानी बनवण्याचा संकल्प केला.
       देशातील तरुणांना उत्तम व दर्जेदार कुशल प्रशिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये आय. टी. आय;कृषीतंत्र विद्यालय, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ यांची भूमिका अतिशय महत्वपूर्ण आहे. आगामी काळात प्रत्येक युवकाच्या हाताला काम मिळावे यासाठी कौशल्य विभाग कटिबद्ध आहे.
         बेरोजगारी समस्येमागचे मुख्य कारण अकुशलता हे आहे. रोजगाराची निर्मिती कौशल्यावर आधारित आहे. कौशल्य आहे त्यांनाच नोकरी वा काम मिळणार आहे.
अशाचप्रकारे कौशल्य शिक्षणाचे महत्त्व जाणून  कौशल्याधारित युवा पिढी  निर्माण करण्यासाठी वर्णे येथील  विद्यालयात कौशल्य शिक्षण  देण्याची सोय अगोदरच केलेली आहे. या विद्यालयात एम.एस.एफ.सी.(मल्टीकल स्किल फौंडेशन कोर्स ) हा अभ्यासक्रम ९वी,१० वीला शिकवला जातो. या विषयाचा दहावीला १०० गुणांचा पेपर आहे.याविषयांतर्गत चार उपविषय आहेत.१)अभियांत्रिकी.२) ऊर्जा- पर्यावरण.३) शेती- पशुपालन.४)गृह आरोग्य.
      या विषयाचे फायदे--
१)आय.टी. आय.साठी २५% जागा राखीव.
२)अभियांत्रिकीसाठी १५% जागा राखीव.
३) एम.सी.व्ही.सी.(Minimum Competency Vocational Course ) ला
  ४०% जागा राखीव.
४) स्वयंरोजगार करता येतो.
            सद्या राज्यात उद्योगाला चालना देण्याचे काम चालू आहे. स्किल इंडिया, स्टार्टअपसारख्या योजना आहेत. याचा फायदा घेतला पाहिजे. हा फायदा घेण्यासाठी पायाभूत शिक्षण असणे गरजेचे आहे. आणि असे शिक्षण मिळण्याची सुविधा वर्णेसारख्या गावात उपलब्ध असल्याचा मला अभिमान वाटतो. कौशल्य शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी लेंड अ हँड इंडिया या स्वयंसेवी सामाजिक संस्था  तसेच साताऱ्यातील उद्योजक तथा संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत पवार यांचे योगदान मोठे आहे त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. लेंड अ हँड इंडिया ही संस्था देशभर कौशल्य शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे. या संस्थेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील  अनेक शाळांना कौशल्यशिक्षण उपक्रम शाळापातळीवर राबवण्यासाठी आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य केले जात आहे. लाही संस्थेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात कौशल्य शिक्षण देण्याचे कार्य अतिशय जोमाने सुरु आहे.
       कौशल्य शिक्षण मिळण्यासाठी  वर्णे येथील माध्यमिक विद्यालयात आपण शिक्षण घेतले तर भविष्यात रोजगाराचा प्रश्नच येणार नाही.चला तर चांगले भविष्य घडवण्यासाठी स्थानिक शाळेतच प्रवेश घेऊया.देशाला  कौशल्यपूर्ण मनुष्यबळ देऊया.
आणि या वर्षीचा जागतिक युवा कौशल्य दिवस हा गाव पातळीवर तसेच  कौटुंबिक पातळीवर उत्साहाने साजरा करुया.कौशल्य शिक्षणाचा वसा घेवूया आणि याचा प्रचार आणि प्रसार करुया.आणि आपला विकास साधूया,देशालाही प्रगतीपथावर नेऊया.🙏🏻
     राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८

मंगळवार, १३ जुलै, २०२१

!! फ्रान्स राज्यक्रांती !! (१४ जुलै )

 

!! फ्रान्स राज्यक्रांती !! (१४ जुलै )




       सन १७८९ साली फ्रान्समध्ये प्रचंड उलथापालथ झाली. तेथे सामान्य जनतेने उठाव केला. राजसत्ता कोलमडून पडली. राज्यक्रांती घडून तरी का आली?
         फ्रान्समध्ये राजेशाही होती. समाजरचनेचा विचार केला तर ती रचना त्रिस्तरीय होती. पहिला वर्ग धर्मगुरूंचा,दुसरा उमराव व सरदारांचा तिसरा वर्ग सामान्य जनतेचा. पहिल्या दोन वर्गाची टक्केवारी ४% तर उर्वरित जनता ९६%,पहिल्या दोन्ही वर्गाला कोणतेही कर नाहीत आणि भरपूर सवलती, राजासुध्दा पहिल्या दोन वर्गाच्या बाजूने असल्याने खरी क्रांती झाली.
       विषमतापूर्ण समाजजीवनामुळे सामान्य जनतेत प्रचंड असंतोष वाढीस लागला आणि तिसऱ्या वर्गाच्या असंतोषाचा प्रचंड उद्रेक १७८९ मध्ये झाला. राज्यक्रांती घडवून आणण्यासाठी मॉंटेंस्कु, व्हॉटेअर, रुसो या विचारवंतांनी फार मोठे काम केले.सामान्य जनतेने (तिसऱ्या वर्गाने ) क्रांती केली.राजा प्रतिनिधी विरोधात काही करु शकला नाही. हळूहळू क्रांतीचे लोन सर्वत्र पोहोचले.१४ जुलै १७८९ रोजी पॅरिसमधील बॅस्टीलच्या तुरुंगावर सामान्य जनतेनं हल्ला केला. दारुगोळा हस्तगत केला. कैद्यांना मुक्त केले. बॅस्टीलचा पाडाव स्वातंत्र्याचे प्रतीक बनले.
       मानवी इतिहासात फ्रान्सच्या राजक्रांतीचा उल्लेख जनतेचा एक यशस्वी उठाव असाच केला जातो.अनियंत्रित राजसत्ता ही अनैतिकचअसते हे तत्वही या क्रांतीने कायमचे प्रस्थापित केले. स्वातंत्र्य, समता, बंधुता,घटनात्मकता,लोकशाही ही मूल्ये या राज्यक्रांतीने जगाला दिली.
        जगातील पारतंत्र्यात असलेल्या राष्ट्रांना,विविध बंधनात जखडलेल्या समाजाला ही राज्यक्रांती प्रेरणादायी ठरली आहे.आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यामध्येही  या राज्यक्रांतीचा फार मोठा वाटा आहे.
    संकलक: राजेंद्र पवार
       ९८५०७८११७८
  

सोमवार, १२ जुलै, २०२१

!! वीर शिवा काशीद स्मृतिदिन !! (१३ जुलै )

 

!! वीर शिवा काशीद  स्मृतिदिन !!
(१३ जुलै )




           वीर शिवा काशिदांचा जन्म पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापूर या गावातील नाभिक कुटुंबात झाला. बारा बलुतेदारांना व्यवसायाचे शिक्षण घरातूनच दिले जायचे. मेहनतीने शरीर कमावणे, लाल मातीत कुस्ती खेळणे, दांडपट्टा चालविणे, गड चढणे, उतरणे, लढाई करणे हा दिनक्रम असे. मजबूत बांधा, सरळ नाक, तेजस्वी नजर, शत्रूंच्या गोटातून माहिती काढण्यातही ते पटाईत होते. शिवा काशिदांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते हुबेहूब शिवाजी महाराजांसारखे दिसत होते.
दि. २ मार्च १६६० रोजी आदिलशाहने अफजलखानाच्या वधानंतर सिद्दी जोहरला विजापूरहून स्वराज्यावर आक्रमणास धाडले. तर दुसरीकडे मुघल सैन्य औरंगजेब बादशहाचा मामा शाहिस्तेखान याच्या नेतृत्वाखाली पुण्यातील लालमहालात तळ ठोकून होता; स्वराज्यावर दुहेरी संकट आले होते. त्यावेळी शिवराय पन्हाळा किल्ल्यावर होते. जौहरने ३५ हजार पायदळ, २० हजार घोडदळ अशा प्रचंड सैन्यानिशी पन्हाळगडाला वेढा दिला, महाराज गडावर अडकून पडले. पावसाळ्याचे दिवस होते पन्हाळा किल्ल्यावर जास्त दिवस थांबणे धोक्याचे होते.
वेढ्यातून बाहेर पडण्याची शिवाजी महाराजांनी एक युक्ती केली, हा वेढा फोडून विशालगडाकडे जाण्याचे ठरविले होते. विशालगडाकडे कूच करणार त्या दिवशी शिवा काशीदांनी शिवरायांचा पोशाख चढविला. शिवा काशीदांचा चेहरा हुबेहूब शिवरायांसारखा दिसू लागला. खरे शिवराय कोण हेच कळणे थोडे अवघड झाले.दि. १२ जुलै १६६० आषाढी पौर्णिमेची रात्र, रात्री दहाचा सुमार होता. शिवराय पन्हाळगडाहून निघाले; पालखीत बसले, पालखी मावळ्यांनी उचलली. रायाजी बांदल, फुलाजी प्रभू आणि बाजीप्रभू देशपांडे सोबत ६०० निवडक मावळेही निघाले आणी सोबत आणखी एका पालखीत शिवा काशीद निघाले.पाऊस, वादळ, विजा अखंड चालूच होत्या. पालखी जरा आडवाटेने गडाखाली उतरत होती. हेर रस्ता दाखवायला पुढे चालले होते. शिवाजी महाराज उद्याच शरण येणार आहे! मग कशाला या वादळी पावसापाण्यात मोर्चावर उभे राहा? करा उबदार आराम! अगदी असाच गाफील विचार करून शाही मोर्चेवाले ढिले पडले होते.
              झाडाझुडपातूंन अन् खाच खळग्यांतून महाराजांची पालखी विशालगडाच्या दिशेने धावत होती. पाऊस पडत होता, आभाळ गडगडत होते, छाताडे धडधडत होती, विजा लखाकत होत्या, पालखी धावतच होती, नजरा धास्तीने भिरभिरत होत्या. छावणीच्या सांदिसपाटीतून ती पालखी बेमालूमपणे वेढा भेदून गेली. वेढापासून पालखी पुष्कळच दूर गेली.
     जौहरच्या गस्ताच्या सैनिकांनी त्यांना पाहिले. आरडाओरडा करीत ते तंबूच्या दिशेने धावले. काही वेळातच सगळा तळ जागा झाला. जौहर रागाने लालेलाल झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला मुर्ख बनविल्याची भावना त्याला क्षणाक्षणाला झाली. जौहरच्या हत्यारबंद सैनिकांच्या तुकडीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील गुप्तहेर शिवाजी काशिद यांना पकडले.
शिवा काशीद यांची पालखी सिद्धी जौहरच्या समोर नेण्यात आली इकडे सिद्धी जौहरच्या तंबूत छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखणारा अफ़जलखानाचा मुलगा फ़ाजलखान होता. क्रुष्णा भास्कर कुलकर्णीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावर तलवारीचा वार केला होता हे फ़ाजलखानास माहीती होते. म्हणुन फ़ाजलखान गुप्तहेर शिवाजी काशिद यांना म्हणाला ’क्या आप सचमुच शिवाजी महाराज है ? अगर आपको जान प्यारी है तो सच बत’,यावर शिवाजी काशिद म्हणाले, ’हॉं मै शिवाजी महाराज हू’ आणि फ़ाजलखानाने शिवरायांचा जिरेटोप मागे सारला आणि पाहतो तर काय कपाळावर क्रुष्णा भास्कर कुलकर्णीने दिलेल्या तलवारीचा वर्मी बसलेल्या घावाचा व्रण काही दिसला नाही.त्याने तात्काळ ही बाब सिद्धी जौहरच्या नजरेत आणून दिली. सिद्धी जौहरला कळून चुकले की आपणास छत्रपती शिवाजी महाराजांनी चकवा दिला आहे.यावर शिवाजी महाराज म्हणजेच शिवाजी काशिद यांच्या जवळ संशयाच्या नजरेने न्याहाळत विचारले, तू छत्रपती शिवाजी महाराज नाहिस तर कोण आहेस ? यावर शिवाजी काशिद हसत म्हणाले,मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा एक चाकर आहे,यावर सिद्धी म्हणाला हं.. कसलं स्वराज्य? कसाला शिवाजी राजा? जौहर संतापलेला होता. शिवाजी काशिद यांना जौहरचे बोलणे आवडले नाही. त्यांचे डोळे रागाने लालेलाल झाले आणि जौहरच्या नजरेला नजर भिडवित शिवाजी काशिद ओरडले.
खामोश! माझ्या राजाबद्दल एक शब्द जरी वावगा बोललास तर याद राख! तुला शिवरायांचं मोठंपण काय समजणार ? आमचा राजा लाखमोलाचा आहे,पोशिंदा आहे.लाख मरोत पण माझा राजा जगो,असंच मी म्हणणार! हे सारं ऐकून सिद्धी जौहर गांगरला. थोड्याच वेळात स्वत:स सावरून म्हणाला,वैसाही होगा. मरने को हो तैयार..तेरे राजा के वास्ते तू मरेगा ? अब यहॉं इसी वक्त ? शिवाजी काशिद हसत म्हणाले, मरणाचे भय मला घालतोस ? मरणाचे भय तुझ्यासारख्यांना वाटावं, आम्हाला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा स्वराज्याचा भगवा हाती घॆतला, त्याच वेळी या मर्द मराठा मावळ्याने छातीवर मरण गोंदवून घेतलं. स्वराज्यासाठी मरण कुठेही येवो,कसंही येवो. मरणाला भिऊन पळणारा हा शिवाजी काशिद नाही.मेला तरी स्वराज्यासाठी मरण! स्वराज्यासाठी जगणं आणि स्वराज्यासाठी मरणं स्वराज्याचा चंग बांधला आहे आम्ही. तेंव्हा मरणाचं भय या गड्याला घालू नकोस समजलं ? जौहर पिसाळला शिवाजी काशिद यांचे बोलने त्याच्या जिव्हारी झोंबलं, छत्रपती शिवाजी महाराज हातून निसटल्याने तो बिथरला होता, शिवाजी काशिद हे देखील वस्तादों के वस्ताद होते. त्यांना ना मरणाचे भय, ना खेद, ना खंत यांचे बोलणे आणि विचार म्हणजे फ़क्त छत्रपती शिवाजी महाराज रयतेच्या स्वराज्याचे. शिवाजी काशिद यांची स्वराज्यनिष्ठा पाहून सिद्धी जौहरने शिवाजी काशिद यांना ठार मारण्याचा आदेश दिला.
      राजे म्हणून जन्माला नाही आलो पण शिवाजीराजे म्हणून मरण्याचे भाग्य मिळाले म्हणून हसत हसत मरणाच्या दारी जाणारे वीर शिवा काशीद शिवरायांचा पन्हाळा ते विशाळगड प्रवास, वीर शिवा काशीद यांचे बलिदान, वीर बाजीप्रभू आणि मावळ्यांचा पराक्रमी बलिदान अखंडस्मरणात राहो. इतिहास शिवा काशिदांचे धाडस, प्राणाची आहुती कदापि विसरु शकणार नाही, कारण शिवा काशिद सारख्या मावळ्यांच्या बलिदानामुळेच स्वराज्याचे देखणे स्वप्न शिवराय साकार करु शकले.
वीर शिवा काशीद यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
संकलक: राजेंद्र पवार
    ९८५०७८११७८

रविवार, ११ जुलै, २०२१

वर्णे येथील नक्षत्रवन पर्यटकांसाठी पर्वणी ठरेल. डीएफओ किरण कांबळे

 वर्णे येथील नक्षत्रवन पर्यटकांसाठी पर्वणी ठरेल. डीएफओ किरण कांबळे






           वर्णे येथे नव्याने तयार होत असलेले नक्षत्रवन पर्यटकांसाठी, भाविकांसाठी पर्वणी ठरेल असे उदगार सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी किरण कांबळे यांनी नक्षत्रवन कामाच्या शुभारंभप्रसंगी काढले. याप्रसंगी श्री काळभैरव देवस्थानचे शिवकळा अधिकारी  श्रीप्रकाश कुलकर्णी (नाना) यांच्यासह अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन बळवंत काळंगे, विश्वस्त हणमंत पवार, एन. जी. पवार, अजिंक्यतारा कारखान्याचे माजी संचालक रामचंद्र पवार (नाना ), दीपक पवार,  ग्रामपंचायत सदस्य रमेश पवार (काका), वन विभागातील सेवानिवृत्त अधिकारी बाळासाहेब साळुंखे, दादासाहेब पवार, सुनील पवार (आबा), शशिकांत पवार, संदीप पवार, आबासाहेब कुंभार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
      ईश्वर पार्वती मंदिरासमोर साधारण दीड एकर जागेत नक्षत्रवनाची निर्मिती होत आहे. नक्षत्रावनात लावले जाणारे वृक्ष हे दुर्मिळ वृक्ष असतात. या वृक्षाच्या सानिध्यात आल्यानंतर आपणास सकारात्मक ऊर्जा मिळते. ग्रामस्थांनी मनावर घेतलं तर किती मोठं काम होऊ शकते याची आज मला प्रचिती आली असेही कांबळेसाहेब म्हणाले. मंदिर परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले आहे, सोलर वीज, तसेच पाण्यासाठी हाफशी बसवण्यात आली आहे. सोलर वीज व हात पंप बसवण्यासाठी ग्रामपंचायतीचे मोठे सहकार्य झाले आहे. परिसर देखणा व्हावा यासाठी मुंबईकरांचे योगदान खूपच मोठे आहे. मंडपात बसवलेली फरशी, टाईल्स अमर शेठ यांनी दिली आहे याशिवाय मंडपात बसवण्यासाठी कासवदेखील  तेच देणार आहेत. दादा शेठ, विकास शेठ, सुनील शेठ ही मंडळी तरी कशी पाठीमागे राहतील. या सर्वांनी खुपच मोठे आर्थिक सहकार्य केले आहे. गावकरी देखील काकणभर सरसच आहेत. या ठिकाणी राहुल सुतारचा आवर्जून उल्लेख करावाच लागेल. राहुलने शेडच्या बांधकामासाठी एक रुपयाही मोबदला घेतला नाही. कुणी ट्रॅक्टर दिले, कुणी जेसीबी दिला, कुणी श्रमदान केले यामुळे परिसर देखणा झाला. या नक्षत्रवनासाठी लागणारी सर्व रोपे बाळासाहेब साळुंखे देणार आहेत. सगळ्यांनी थोडी थोडी मदत केली की खूप मोठं काम उभं राहतं हेच याठिकाणी दिसून येते.या कामात तरुणांचे योगदान खूपच मोठे आहे. तरुणांच्या शक्तीला विधायक वळण दिले तर अशी मोठी कामे होतात हेच याठिकाणी प्रकर्षाने जाणवते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी (राजेंद्र पवार ) पाहुण्यांचे स्वागत तसेच प्रास्ताविक केले, सर्वच उपस्थिताबद्दल ऋणनिर्देश व्यक्त केला.
       वर्णे गावातील प्रत्येक नागरिकांनी या परिसराला भेट द्यायला हवी. हा परिसर वृक्षराजीने नटावा यासाठी आर्थिक योगदान द्यायला हवे, वेळ द्यायला हवा असे  मला वाटते.
    राजेंद्र पवार
    ९८५०७८११७८

!! राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची स्थापना !!(१२ जुलै )

 

!! राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची
  स्थापना !!(१२ जुलै )



कृषी व ग्रामीण गैर कृषी विभागाला वित्तपुरवठा करून ग्रामीण भारताचा विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने संसदेच्या विशेष कायद्याने नाबार्डची स्थापना रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया व भारत सरकारने केली. कृषी पतपुरवठयासाठी रिझर्व्ह बॅंकेचे कृषी पत विभाग व ग्रामिण नियोजन आणि पतकक्ष कार्यरत होते . तसेच रिझर्व्ह बॅंकेने १९६३ मध्ये कृषी पुनर्वित्तची स्थापना केली होती, १९७५ मध्ये रिझर्व्ह बॅंकेने कृषी पुनर्वित्त मंडळाचे रूपांतर कृषी पुनर्वित्त व विकास  महामंडळ असे केले केले . १९७९ मध्ये अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पुनर्विलोकन समिती श्री.बी. शिवरामन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती , या शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार नाबार्ड कायदा १९८१ संसदेत पास करण्यात आला ,वरील कृषी पतविभाग ,ग्रामीण नियोजन आणि पतकक्ष व कृषी पुनर्वित्त व विकास महामंडळ यांच्या एकत्रीकरणातुन १२ जुलै १९८२ मध्ये भारतात नाबार्ड (इंग्लिश NABARD National Bank for Agriculture and Rural Development) या शिखर बॅंकेची स्थापना करण्यात आली .पूर्वी शेतकी व ग्रामीण पतपुरवठ्यासंबंधीची जी कामे भारतीय रिझर्व बॅंक करीत असे ती सर्व कामे नाबार्डकडे सोपविण्यात आली. ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेला वित्तपुरवठा करणारी नाबार्ड ही एकमेव शिखर संस्था आहे.
नाबार्डचे उद्देश
१)कृषी,लघुउद्दोग ,कुटीरउद्दोग ,ग्रामोद्दोग व इतर ग्रामिण अर्थव्यवस्थाना वित्तपुरवठा होण्याच्या उद्देशाने पतनियोजन करणे.
२) ग्रामीण क्षेत्राला लघुमुदतीची व दीर्घमुदतीची कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांना पुर्नवित्तपुवठा करणे .
३) भारत सरकारने निर्देशित  एखाद्या  वित्तीय संस्थेला प्रत्यक्ष कर्जपुरवठा करणे .
भांडवल
१) स्थापनेवेळी नाबार्डचे भांडवल १०० कोटी रु . होते नंतर ते २००० कोटी रु. करण्यात आले.
२) नाबार्डमध्ये सर्वाधिक भांडवल रिझर्व्ह बॅंकेचे  होते अलीकडे रिझर्व बॅंकेने या भांडवलातील ७१.५%वाटा (१४३०कोटी रु. ) भारत सरकारकडे वर्ग केला आहे ,तर रिझर्व्ह बॅंकेकडे फक्त १% वाटा राहिला आहे.
नाबार्डचीकामे
१)शेतीक्षेत्र, लघुउद्योग, ग्रामीण व कुटीरोद्योग, हस्तोद्योग या क्षेत्रांना गुंतवणूक व उत्पादनकार्यासाठी वित्तपुरवठा करणे.
२) राज्य सहकारी बॅंक, क्षेत्रीय ग्रामीण बॅंका, भूविकास बॅंका इत्यादींना अल्प मुदत, मध्यम व दीर्घमुदतीची कर्जे देणे.
३)सहकारी सोसायट्यांचे भागभांडवल पुरविण्यासाठी नाबार्ड घटक राज्यसरकारांना वीस वर्षे मुदतीपर्यंतची दीर्घ मुदतीची कर्जे देऊ शकते.
४)सहकारी बॅंका, राज्य सहकारी बॅंका व क्षेत्रीय ग्रामीण बॅंकांच्या कार्याची तपासणी करण्याचे अधिकार नाबार्डला देण्यात आलेले आहेत.
५) शेतीक्षेत्राशी व ग्रामीण भागाच्या विकासाशी संबंधित व मध्यवर्ती सरकारची मान्यता असलेल्या कोणत्याही संस्थेला दीर्घ मुदतीची कर्जे नाबार्ड देऊ शकते. किंवा अशा संस्थांचे भागभांडवल विकत घेऊन अशा संस्थांमध्ये गुंतवणूक करु शकते.
६) ग्रामीण परिक्षेत्रात विकासात्मक पतपुरवठा करणाऱ्या सर्व वित्तीय संस्थाची शिखर संस्था म्हणून काम करणे .
      नाबार्डचे मुख्यालय मुंबईत असून २८ प्रादेशिक कार्यालये व एक उपकार्यालय आहे , नाबार्डची ६ प्रशिक्षण केंद्रे कार्यरत आहेत . नाबार्डचा कारभार संचालक मंडळाकडून पाहिला जातो.नाबार्डच्या २ संलग्न संस्था नाबार्ड कंसल्टंसी सर्व्हिसेस आणि नाबार्ड फायनशिल सर्व्हिसेस कार्यरत आहेत
             रिझर्व्ह बॅंकेचा डेपोटी गव्हर्नर हा नाबार्डचा चेअरमन [अध्यक्ष] असतो.
या शिवाय रिझर्व्ह बॅंक तीन संचालक नेमते.
केंद्रसरकार तीन संचालक नियुक्त करते.
सहकारी बॅंकामधील दोन आणि व्यापारी बॅंकामधील एक तज्ञ संचालक नेमले जातात.
ग्रामीण अर्थव्यवस्था व ग्रामीण विकास यांच्याशी संबधित दोन संचालक नियुक्त केले जातात.
राज्य सरकार दोन संचालक नियुक्त करते.
    ग्रामीण भागाचा विकास करण्यात नाबार्डचा  खूप मोठा  वाटा आहे.
    संकलक: राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८



!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...