शनिवार, १७ जुलै, २०२१

नेल्सन मंडेला जन्मदिन !! (१८ जुलै )

 !! नेल्सन मंडेला जन्मदिन !! (१८ जुलै )



जन्म:१८ जुलै १९१८ मृत्यू: ५ डिसेंबर २०१३

               १८ जुलै १९१८ला जन्मलेल्या मंडेलांनी साम्राज्यवाद, गरिबी आणि वंशभेदाचं उच्चाटन करण्यासाठी जो अतुलनीय लढा दिला त्याचं खरंतर शब्दांत वर्णन करणं शक्य नाही. ‘प्रदीर्घ वाटचाल-स्वाधीनतेकडे’ हे त्यांचं आत्मचरित्र म्हणजे त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबरोबरच दक्षिण आफ्रिकेचा आणि जागतिक पातळीवरील अनेक लढ्यांचा पट आहे.

              मंडेला १९९४ ते १९९९ या काळात दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष होते. वर्षानुवर्षे ‘काळे’ म्हणून हिणवल्या गेलेल्या समूहातील ते पहिले राष्ट्राध्यक्ष. शांततेचं नोबेलही त्यांना १९९३मध्ये प्रदान करण्यात आलं. त्याआधी २५० पेक्षाही अधिक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं होतं. मात्र, जागतिक पातळीवर एक आयकॉन बनलेल्या मंडेला यांचा बालपणापासूनचा काळ, शिक्षण, वकिलीतील संघर्ष, रोबेन बेटावरील कोठडी आणि स्वातंत्र्य मिळण्यापर्यंतचा कालखंड त्यांच्यासाठी अत्यंत प्रतिकूल होता. या प्रदीर्घ कालखंडाबद्दल मंडेला यांनी सविस्तर लिहिलं आहे. रोबेन आयलंड या बेटावर कारावासात असताना, १९७४मध्ये त्यांनी हे पुस्तक लिहायला घेतलं. त्याच्या काही प्रती तुरुंगाधिकाऱ्यांनी नष्टही केल्या; पण सहकाऱ्यांच्या मदतीमुळे, त्यातील बराचसा भाग सुरक्षित ठिकाणी पोहोचला. मंडेला १९९०मध्ये तुरुंगातून बाहेर पडले आणि त्यानंतरचा काळ त्यांनी रेखाटला. असा या पुस्तक लेखनाचाही प्रवास खडतर आहे. बालपणीच्या आठवणी लिहिताना अगदी सुरुवातीला, मंडेलांनी लिहिलंय, ‘माझं नाव – रोलिल्हाल्हा; खोसा भाषेत झाडाची फांदी ओढणारा, उपद्व्यापी.’ त्यांनी लिहिलेल्या वाक्याची प्रच‌िती आपल्याला त्यांच्या चरित्रात येते हे नक्की.

वकील झाल्यानंतर आणि शहरात आल्यानंतर मंडेलांना परिस्थितीची अधिकच गांभीर्याने जाणीव झाली. आफ्रिकन नॅशनल कॉँग्रेसचे (एएनसी) तत्कालीन नेते वॉल्टर सिसुलू यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. त्यातूनच त्यांनी ‘एएनसी’त उमेदवारी सुरु केली. ही घटना म्हणजे त्यांच्यातील ‘स्वातंत्र्ययोद्ध्याचा जन्म’ होता. या टप्प्यावर मंडेला यांनी आफ्रिकेतील भारतीय समाज, महात्मा गांधींची अहिंसा चळवळ, गोऱ्या लोकांचा जाच, जागतिक चळवळी आदींचा व्यापक अभ्यास केला.

‘लढा हे माझे जीवन आहे’ यात विविध लढे, त्याची पार्श्वभूमी, वर्णभेदावर शिक्कामोर्तब करणारा ‘बांटू एज्युकेशन ऍक्ट (१९५३), ‘पश्चिमेकडील वस्ती पुनर्वसन’, सविनय कायदेभंगाचे यशापयश, यां‌विषयी त्यांनी सविस्तर लिहिलंय. एएनसीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत १९५२च्या अखेरीस नेतृत्वबदल झाला. त्यात मंडेलांवरही प्रथम साहाय्यक अध्यक्ष अशी जबाबदारी देण्यात आली. कार्य अधिकच वाढलं. त्यातून नेतृत्व करणाऱ्यांवर बंदीची शक्यता लक्षात घेऊन भूमिगत चळवळ अधिक प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी मंडेलांवर सोपवण्यात आली, ती त्यांनी सक्षमपणे पूर्ण केली. या योजनेला नंतर मंडेला प्लॅन किंवा फक्त ‘एम प्लॅन’ म्हणून ओळखलं गेलं.

         समोर होऊ न शकलेलं भाषण, वाचून दाखविण्यात आलं. या भाषणाला पुढे ‘नो इझी वॉक टू फ्रीडम’ या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या एका वाक्याचं नामाभिधान मिळालं. या पुस्तकातील अनेक संदर्भ भारतीय स्वातंत्र्य लढा आणि आफ्रिकेचा लढा यातील दुवे सांधणारे वाटतात. पुस्तकात ४६ पेक्षा अधिक दुर्मीळ कृष्णधवल छायाचित्रं आहेत. त्यामुळे ऐतिहासिक लढ्याचे महत्त्वाचे प्रसंग डोळ्यांसमोर येतात. त्यामुळे पुस्तकाचं संग्राह्य मूल्य निश्चितच वाढलं आहे. नेल्सन मंडेला यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.

 मंगेश कुलकर्णी  यांच्या लेखातून

 संकलक: राजेंद्र पवार

       ९८५०७८११७८



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...