शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१९

!! राजस्थान सहल !! (५ ) प्रवास वर्णन

!!  राजस्थान सहल !! (५ )

    आज ३० नोव्हेंबर, आज आम्ही सकाळी बिकानेरहून ६.:४५ लाच निघालो. बिकानेर ते जैसलमेर हे अंतर ३५५ कि.मी. एवढे असल्याने आजसुध्दा प्रवासात बराचसा वेळ गेला. वाटेतच रामदेवरा हे धार्मिकस्थळ लागले.येथे रामदेवबाबा यांची समाधी आहे. हे ठिकाण राजस्थान ,गुजरात आणि मध्यप्रदेशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे.याठिकाणी जवळपास दोन महिने यात्रा चालते असे सांगण्यात आले.येथील मार्केटसुध्दा खूपच मोठे आहे.
            याच मार्गावर सरंक्षण क्षेत्राच्या दृष्टीने महत्वाचे असणारे पोखरण हे गाव लागले.पोखरण येथे अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान असताना अनुचाचणी घेण्यात आली होती. जैसलमेर येथे मिलीटरीचा मोठा कॅम्प आहे. या परिसरात मिलिटरीच्या गाड्यांची मोठया प्रमाणात येजा दिसत होती.आम्ही दुपारी ४ वाजता जैसलमेर याठिकाणी पोहोचलो.
  जैसलमेरविषयी थोडेसे --
     भारतीय इतिहासातील मध्ययुगीन काळाच्या सुरुवातीला जैसलमेरची स्थापना भारताच्या पश्चिमेकडील  थर वाळवंटात यदुवंशीय भाटिचे वंशज रावळ जैसल यांनी केली होती.या भागात वाळूच्या मोठ्या मोठ्या टेकड्या पाहायला मिळतात. येथील पावसाचे गोळा केलेले पाणी गोड तर इतर पाण्याला खारट चव लागते. येथील हवामानाचा विचार केला तर हिवाळ्यात भरपूर थंडी आणि उन्हाळ्यात तापमान ४५ डिग्री सेल्सिअस पर्यंत. आजचाच विचार करावयाचा झाला तर सकाळी १० पर्यंत धुके होते तर दिवसभर जीवघेणी थंडी जाणवत होती.जैसलमेर येथे आपणास शाही इमारती पाहायला मिळतात. या शहराला गोल्डन सिटी असेदेखील म्हटले जाते.
                जैसलमेर येथे आमची हॉटेल रॉयल प्रिन्समध्ये निवासव्यवस्था करण्यात आली होती. तिथे  आम्ही फ्रेश होऊन   लगेचच ४० कि. मी. दूर असणाऱ्या "सम "या वाळवंटात गेलो. हे ठिकाण कला केंद्र  म्हणून राजस्थानात प्रसिध्द आहे.ओऍसिस कॅम्प सम यांनी सादर केलेली राजस्थानी कला  आम्हास पहावयास मिळाली. कलाकारांनी नृत्यांचे तसेच गीतांचे सुंदर सादरीकरण केले.  नृत्यात  आमच्या सहलीमधील लोकांनीही आनंद लुटला.      
           सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होण्यापूर्वी उंट सफारीचा आनंदही माझ्यासह सर्वांनीच लुटला.जैसलमेरने मूळ भारतीय संस्कृती कला,संगीत,साहीत्य यांची सुंदर जपणूक केली आहे. आज बऱ्याच ठिकाणी लोकाश्रय न मिळाल्याने काही कला लोप पावत चालल्या आहेत.
         अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच ज्ञान आणि करमणूक यांचीही मानवाला गरज आहे. करमणुकीसाठी साहित्य, संस्कृती, कला यांची जपणूक होणे गरजेचे आहे. आपण आपल्यापरीने लोप पावत चाललेल्या साहित्य,कला, संस्कृतीची जपणूक करण्यासाठी प्रयत्न करुया असे मला वाटते.
       प्रवासवर्णन -- राजेंद्र पवार
              ९८५०७८११७८




शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०१९

राजस्थान सहल Rajasthan Tour !! (४ )

!! राजस्थान सहल !! (४ )
     आज २९ नोव्हेंबर, आजचा प्रवास पुष्कर ते बिकानेर असा होता. पुष्कर ते बिकानेर हे अंतर २६५ कि. मी. चे असल्याने प्रवासात बराचसा वेळ गेला. आज अजमेर, नागोर व बिकानेर असा तीन जिल्ह्यांतून प्रवास करावा लागला.अंतर जास्त असल्याने प्रवासास सकाळी ७:१० लाच सुरुवात केली. वाटेत नागोर जिल्हा लागला.नागोर  जिल्ह्यात दोन ठिकाणी गोशाळा दिसुन आल्या.वाटेत मुंडवा नावाचे सुंदर शहर लागले.मुंडवा शहरात शहीद जवानांचे लक्षवेधक स्मारक होते.या तीन जिल्ह्यातील बरीचशी जमीन सपाट होती. विशेष म्हणजे जमीनीला सर्वत्र कुंपणे  दिसत होती. सर्वत्र काटेरी झुडपेच जास्त प्रमाणात दिसत होती. शेतीचे उत्पन्न फारसे दिसत नाही.काही ठिकाणी तेलबिया व बाजरीची पिके घेतली जातात.
           दुपारी बिकानेर जिल्ह्यातील देशनोक येथील  "करणीमाता" मंदिरात पोहोचलो. या मंदिरात सर्वत्र उंदिरांचे साम्राज्य दिसत होते. आपण जिकडे पाहू तिकडे उंदिरचउंदीर दिसत होते. भाविक उंदिरासाठी प्रसाद देत होते. येथे पारवेदेखील मोठ्या प्रमाणात दिसत होते. नंतर राष्ट्रीय महामार्ग क्र.८९ वर पलाना येथे दुपारचे भोजन घेऊन  आम्ही बिकानेरकडे मार्गस्थ झालो.
           बिकानेर किल्याची स्थापना राजा बिका यांनी केली. त्यांच्यामुळेच या शहराला बिकानेर असे नाव पडले.एकेकाळी हा जंगली प्रदेश होता. हा थरच्या वाळवंटाचाच एक भाग होता. जुनागढ किल्ल्याचे आग्रा किल्ल्याशी साम्य आहे. हा किल्ला दीडकिलोमीटर परिसरात बांधलेला आहे.हा किल्ला मोगल,गुजराती, राजपूत कलांचे अनोखे मिश्रण आहे. किल्ल्यावर ३७ बुरुज आहेत. लाल दगडाचे कोरीव काम आहे. हा किल्ला एकाचवेळी बांधला नसुन दहा राजानी आपापल्या काळात त्याचा विस्तार केला आहे. किल्ल्याच्या पूर्वेस व पश्चिमेस असणाऱ्या दरवाज्यांना विविध नावे आहेत. उदा. करणा प्रोल, सुरज प्रोल,चांद प्रोल,दौलत प्रोल,फतह प्रोल,तरण प्रोल,ध्रुव प्रोल इत्यादी. येथे अनेक महल आहेत .उदा. चंद्र महल, पूल महल, सरदार महल मोती महल, अनुप महल, रंग महल.अनुप महल सर्वात मोहक व सुंदर आहे.
          याठिकाणी प्राचीना बिकानेर सांस्कृतिक संग्रहालय असून येथे आपणास शस्त्रास्त्रे, वस्त्रे, दैनंदिन जीवनातील वस्तू, भांडीकुंडी, फर्निचर आदि पहावयास मिळते. सध्या या राजाचे २३ वे वंशज आहेत. ते लालगढ किल्यावर राहतात. या वंशजांपैकी करण सिंह हे सलग पाच वेळा संसद सदस्य राहिले आहेत. आजही राज्याच्या राजकारणात या कुटुंबातील सदस्यांचा प्रभाव दिसुन येतो.
      हा किल्ला एका राजाने बांधला नसून सलग दहा राजांनी त्याचा विस्तार केला आहे. आपल्या पूर्वजांनी हाती घेतलेले काम पुढे नेण्यासाठी वंशजानी प्रयत्न केले आहेत.  पुढील पिढ्यांनी चांगले काम नेहमीच पुढे न्यायचे असते हाच संदेश या किल्ला भेटीतून मिळतो असे मला वाटते.
        प्रवासवर्णन-- राजेंद्र पवार
          ९८५०७८११७८







गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०१९

!! राजस्थान सहल - प्रवास वर्णन !! (३ ) Rajasthan Tour

!! राजस्थान सहल - प्रवास वर्णन  !! (३ )
   आज २८ नोव्हेंबर, आम्ही सकाळी ८ वाजताच जयपूरमधील हॉटेल सोडले आणि अजमेरच्या दिशेने प्रस्थान केले. जयपूर ते अजमेर हे अंतर १२१ कि. मी.आहे. या मार्गावर किसनगढ हे औद्योगिक क्षेत्र दिसुन आले. किसनगढमध्ये सर्वत्र मार्बलचे साठे दिसत होते. इतकेच नव्हे तर डोंगररांगांमध्ये देखील संगमरवरी दगड गोठे  दिसत होते. इथूनच  संपूर्ण देशात मार्बल जातो. मार्बल कटींगच्या अनेक कंपन्यांचे बोर्ड पहावयास मिळाले.
         दुपारच्या भोजनानंतर देशातील प्रसिद्ध असा अजमेर दर्गा पाहण्यासाठी गेलो. सुफी पंताचे थोर संत ख्वाजा मोईनद्दीन चिस्ती यांच्या मुळे या दर्ग्याची निर्मिती झाली आहे. हा काळ राजा पृथ्वीराज यांच्या समकक्ष आहे. हा दर्गा ख्वाजा हजरत गरीब नवाज दर्गा म्हणून ओळखला जातो.  येथे मुस्लीम बांधवाबरोबर अन्य धर्मातील लोकही भेट देतात. मोईनद्दीन चिस्ती हे गरिबांचे तारणहार होते. त्याचा परिणाम म्हणून आजही येथे गरीबांना अन्नदान केले जाते.
          नंतर अजमेरपासून ११ कि. मी. वर असणाऱ्या पुष्कर येथे गेलो. पुष्कर येथे ब्रम्ह  देवाचे मंदिर आहे. भारतात केवळ एकच ब्रम्हदेवाचे मंदिर आहे. मंदिराला पूर्ण लाल रंग दिलेला आहे. या मंदिरात हंसाच्या आकाराच्या अनेक आकृत्या पहायला मिळतात. जवळच पुष्करचा जगप्रसिध्द तलाव आहे.  या तलावाजवळ भाविक आपल्या सुख समृध्दी साठी संकल्प करतात. तलावाचा परिसर स्वच्छ तसेच विलोभनीय आहे. येथील सर्व देखरेख राजस्थान सरकारमार्फत केली जाते. पुष्करचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते उंटाच्या व्यापारासाठी प्रसिध्द आहे. येथे आपण उंटाच्या खास गाडीतुन सफर करु शकतो. येथे आम्हास अनेक उंट पहायला मिळाले.
         आज आम्हास मुस्लिमांचे अजमेर येथील तसेच हिंदूंचे  पुष्कर येथील जगप्रसिध्द तीर्थक्षेत्र पहावयास मिळाले. दोन्हीही ठिकाणी सर्वधर्माचे लोक भेट देताना दिसून आले. आपणही प्रत्येक धर्मातील चांगल्या बाबींचा स्वीकार करायला हवा व  त्याप्रमाणे आपण वर्तन करावयास हवे असे मला वाटते.
     प्रवासवर्णन--राजेंद्र पवार
          ९८५०७८११७८





बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१९

!! राजस्थान सहल - प्रवास वर्णन !! ( २ ) Rajasthan Tour

!! राजस्थान सहल - प्रवास वर्णन  !! ( २  )




     आज सकाळी लवकरच  तयार झालो आणि साईट सीनसाठी मार्गस्थ झालो.  बिर्ला ग्रुपच्यावतीने जयपूरमध्ये लक्ष्मी नारायण मंदिर बांधलेले आहे. हे मंदिर बिर्ला मंदिर म्हणूनही ओळखले जाते.सदरचे मंदिर पूर्णपणे संगमरवरी आहे. हे मंदिर तीन शैलीत बांधलेले दिसून आले. पाश्चात्य, मुस्लीम, हिंदू शैलीचा प्रभाव येथे स्पष्टपणे जाणवतो. बिर्ला ग्रुपच्या वतीने देशात १७ ठिकाणी मंदिरे बांधलेली आहेत. आणि देशात कोठेनाकोठे  मंदिराचे बांधकाम  ग्रुपच्यावतीने चाललेले असते. मंदिराचे बांधकाम त्यांच्या व्यवसायाच्या प्रगतीशी जोडलेले असल्याचे सांगण्यात आले. मंदिर परिसरात अप्रतिम स्वच्छता दिसुन आली. त्या मंदिरापासून वरच्या बाजूला डोंगरावर मोती डुंगरी मंदिर आहे. ते शिवमंदिर असून फक्त महाशिवरात्रीस आमजनतेला दर्शनासाठी खुले असते. शेजारीच भव्य असे गणेश मंदिर आहे येथेही आम्ही दर्शनाचा लाभ घेतला.
          मंदिर दर्शनानंतर आम्ही अमेर फोर्टकडे जाण्यास निघालो. वाटेतच जलमहाल दिसून आला. हा महाल ५ मजली असून त्यातील तीन मजले पाण्याखाली आहेत तर दोन मजले पाण्याच्यावर आहेत. सर्व भाग पाण्याने वेढला आहे. शेजारी सुंदर बाग आहे. संपूर्ण परिसर पाण्याने वेढलेला असल्याने शेजारील बागेतील वातावरण खूपच आल्हाददायक असते असे सांगण्यात आले.
            थोड्याच वेळात आम्ही अमेर फोर्टच्या पायथ्याशी पोहोचलो. फोर्टवर मोठे वाहन जात नसल्याने काही अंतरासाठी भाड्याने जीप कराव्या लागतात. अमेर फोर्ट हा तीन विभागात विभागला आहे. पहिला भाग दिवाण-ए-आम, दुसरा भाग दिवाण-ए-खास तर तिसरा भाग मानसिंह महाल असा आहे. पहिल्या भागापूरता विचार करावयाचा झाला तर हा भाग आम जनतेसाठी खुला असून येथे जनता दरबार भरवला जात असे. जनतेचे गाऱ्हाणे ऐकून घेऊन त्यांना न्याय देण्याचे काम  येथे चालत असे. दुसरा भाग खास लोकांसाठी राखीव असे. राज्य कारभारासाठी आवश्यक विचारविनिमय येथे चालत असे.तिसरा भाग मानसिंहच्या राण्यासाठी होता. राजा मानसिंह यांना बारा राण्या होत्या. प्रत्येक राणीसाठी स्वतंत्र महाल होता. इमारतीची रचना अशी आहे की, राजा नेमका कोणत्या राणीकडे गेला आहे हे कळून येत नाही. या किल्ल्याचा घेरा दहा किलोमीटरचा आहे. या संपूर्ण किल्याला तटबंदी आहे, ठिकठिकाणी निरीक्षणासाठी बुरुज आहेत. थोडक्यात काय तर या किल्ल्याचा परिसर खूपच विलोभनीय आहे. येथे अनेक विदेशी पर्यटक भेटीसाठी आल्याचे दिसून आले. या किल्ल्यावर नेहमी वेगवेगळ्या चित्रपटाचे चित्रीकरण चालते. येथे पावलापावलावर राजस्थानी कलाकुसरीच्या वस्तू दिसून येत होत्या. राजस्थानी पोशाख परिधान करून लोक फोटो काढत होते.
        आम्ही सायंकाळी मार्केटमधून फेरफटका मारला.  माझेसह अनेक लोकांनी काही  वस्तूंची खरेदी केली.
         थोडक्यात सांगायचे म्हटले तर अमेर फोर्ट वास्तुकलेचा अप्रतिम नमुना आहे. भारतीय पुरातत्व खात्यामार्फत या किल्ल्याचे जतन व्यवस्थितरित्या केले जात आहे. देशातील अशा स्थळांना आपण भेट द्यायला हवी. आपल्या देशाचा इतिहास आपण जाणुन घ्यायला हवा असे मला वाटते.
        प्रवासवर्णन-- राजेंद्र पवार
             ९८५०७८११७८

मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०१९

!! राजस्थान सहल - प्रवास वर्णन !! (१ ) Rajasthan Tour

!!   राजस्थान सहल - प्रवास वर्णन   !! (१ )




  साताऱ्यातील साई टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या सहकार्याने दिनांक २५ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत राजस्थान सहलीचे नियोजन केले आहे. आम्ही २५ रोजी सकाळी सहलीसाठी  प्रस्थान केले.  सातारा मुंबई हा प्रवास बसने केला. दुपारी ४:१५ वाजता बांद्रा जयपूर एक्सप्रेसने राजस्थानकडे कुच केले. निर्धारित वेळेप्रमाणे दिनांक २६ नोव्हेंबर रोजी ट्रेन सकाळी १०:४५ वाजता जयपूर रेल्वेस्टेशनवर पोहोचलो. स्टेशनवर पोहोचल्याबरोबर जयपूर गुलाबी शहर असल्याची जाणीव झाली. आमची निवासव्यवस्था हॉटेल रुबीमध्ये करण्यात आली होती. आम्ही दुपारी भोजनानंतर साईटसिन पाहण्यासाठी बाहेर पडलो.
        जयपूर शहर सवाई मानसिंह दुसरा याने १८ नोव्हेंबर १७२७ रोजी वसवले असे सांगण्यात आले. राजा रामसिंह याने ६ फेब्रुवारी १८७६ रोजी संपूर्ण शहराला गुलाबी रंग दिला त्यामुळे हे शहर पिंक सिटी म्हणून ओळखले जाते. आता देखील दर दोन वर्षांनी सिटी पॅलेस परिसर शासनाच्यावतीने गुलाबी रंगाने रंगवला जातो. संपूर्ण शहराला ऐतिहासिक बाज आहे.
       सिटी पॅलेस परिसरात वस्त्रागार आहे. वस्त्रागाराची इमारत त्रिस्तरीय पध्दतीने बांधलेली आहे. वरचा भाग पाश्चात्य शैलीचा, मधला भाग मुस्लिम शैलीचा, खालचा भाग हिंदू शैलीचा आहे. वस्त्रागारामध्ये राजा माधवसिंह प्रथम यांनी वापरलेली वस्त्रे पाहण्यात आली. माधवसिंह प्रथम हे ७ फूट उंच,४ फूट छाती, २५० किलो वजन असणारे होते. इतर राजदरबारी वस्त्रेदेखील मोठ्या प्रमाणात होती. वस्त्रागारानंतर शस्त्रविभाग पाहण्यासाठी गेलो. तेथे जुन्या काळातील तलवारी, भाले, बंदुका, शिरस्त्राने, चिलखते,लढाईच्या वेळी वापरली जाणारी वस्त्रे पाहिली.
            यानंतर जंतरमंतर वेधशाळा पाहिली. अशा प्रकारच्या ५ वेधशाळा देशात आहेत परंतु जयपुरची वेधशाळा उत्तमस्तिथीत आहे. येथे दिशा, राशी, नक्षत्रे, वेळ, अक्षवृत्ते, रेखावृत्ते यांची मॉडेल पाहिली.
        आज भूगोलाच्या ज्ञानात भर पडली. ऐतिहासिक वास्तू, जुनी वस्त्रे, शस्त्रे, कलाकुसरीच्या वस्तु जतन करणे आवश्यक असल्याचे स्पष्टपणे जाणवले. चला आपणही आपल्याकडील जुन्या वस्तु पुढील पिढीला पाहण्यासाठी जतन करुया हाच संदेश यातून मिळतो.
     प्रवास वर्णन -- राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८

सोमवार, २५ नोव्हेंबर, २०१९

पुस्तकामुळे माणसाला  ऊर्जा व आनंद मिळतो -डॉ.यशवंत पाटणे




  रविवार दिनांक २४ नोव्हेंबर रोजी सातारा येथे आयोजित केलेल्या पुस्तक प्रकाशन समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. यशवंत पाटणे म्हणाले की, पुस्तकामुळे माणसाला ऊर्जा व आनंद मिळतो. आपल्याला निसर्गात रमता आले पाहिजे. निसर्गाकडून खूप काही शिकण्यासारखे असते. यासाठी आपण प्रवास केला पाहिजे. सुनील शेडगे लिखित 'साताऱ्याच्या सहवासात' या पुस्तकातून सातारा जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे, ऐतिहासिक वास्तू यांची माहिती मिळते. सातारा जिल्हा पर्यटनाच्यादृष्टीने पाहण्यासाठी हे पुस्तक सर्वांच्याच संग्रही असले पाहिजे.
          याप्रसंगी डॉ.राजेंद्र माने, प्रा. श्रीधर साळुंखे, सकाळचे सहयोगी संपादक राजेश सोळस्कर, न्युज ब्युरो चीफ हरीष पाटणे, बोरगावचे स. पो. नि. चंद्रकांत माळी, सातारा पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी संजय धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
       याप्रसंगी हरीष पाटणे म्हणाले की, सुनील शेडगे यांच्या पुस्तकातून ग्रामीण जीवनाचे यथार्थ दर्शन घडते. राजेश सोळस्कर म्हणाले की, सुनील शेडगे हे केवळ शिक्षक नसुन ते समाजशिक्षक आहेत. शेडगे सरांनी पत्रकारितेच्या माध्यमातून विधायक गोष्टी समाजापर्यंत नेण्याचे काम केले आहे. डॉ. राजेंद्र माने म्हणाले की, सातारा जिल्हा पर्यटनासाठी समृध्द आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर वाचकांना पुस्तकात आलेल्या ठिकाणांना भेट देण्याची तीव्र इच्छा होणार यात शंका नाही.
     सुनील शेडगे यांनी आपल्या लिखाणाचे सर्व श्रेय आपले आई वडील यांना दिले. आपल्या जीवनातील आईचे स्थान खूपच मोठे असल्याचे त्यांनी सांगितले. पत्नी, मुले यांचाही वाटा खूपच मोलाचा असल्याचे त्यांनी विनम्रपणे सांगितले.
       यावेळी शेडगे सरांचे पिताश्री माजी मुख्याध्यापक श्री. लक्ष्मण शेडगे यांचा पंच्याहत्तरीनिमित्त मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. पुस्तक प्रकाशन समारंभप्रसंगी सुनील शेडगे यांच्या जीवनावर आधारित दीपक मगर व गणेश शिंदे निर्मित चित्रफीत दाखवण्यात आली.
      या पुस्तकाच्या  प्रकाशनाची सर्व जबाबदारी वाडाकुंभरोशीच्या निलेश रांजणे व जयराज जाधव यांनी उचलली होती.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजिंक्यतारा कारखान्याचे संचालक अशोक पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन विठ्ठल माने यांनी केले तर आभार अजित साळुंखे यांनी मानले.
     या कार्यक्रमास सातारा जिल्ह्यातील अनेक पत्रकार, शिक्षणविस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, प्राथमिक, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षणप्रेमी नागरिक भरतगावमधील ग्रामस्थ उपस्थित होते.
       आजच्या कार्यक्रमातून सातारा जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे हे समजले. आपण पुस्तकात आलेल्या सर्व स्थळांना भेट देऊया. आपला जिल्हा खऱ्या अर्थाने जाणून घेऊया असे मला वाटते.
     शब्दांकन -- राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८

रविवार, १७ नोव्हेंबर, २०१९

!! गोवा रिव्हर मॅरेथॉन !!





  रविवार दिनांक १७ नोव्हेंबर रोजी वास्को स्पोर्ट्स क्लबने आयोजित केलेल्या गोवा रिव्हर मॅरेथॉनमध्ये मी २१ कि. मी.मध्ये भाग घेतला होता.आज  मी ही स्पर्धा २:१०:०९ (दोन तास दहा मिनिटे व नऊ सेकंदात)पूर्ण केली.
      गोवा येथे ४२ कि. मी.,२१कि. मी.,१० कि. मी.,५ कि. मी.अशा स्पर्धांचे आयोजन केले होते. सातारा हिल रनर्सचे निलेश माने यांच्यामुळे  मी या स्पर्धेत सहभागी झालो होतो. साताऱ्यातील अनेक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते.साताऱ्यातील उद्योजक श्रीकांत पवार त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. श्रद्धा पवार देखील सहभागी झाल्या होत्या. ही स्पर्धा सकाळी ६ वाजता सुरु झाली. स्पर्धेचा मार्ग बराचसा नदीकिनाऱ्यावरुन होता.स्पर्धेचा रुट अतिशय चांगला होता. रुट सपोर्ट देखील छान होता.
         स्पर्धा यशस्वी पूर्ण केल्यानंतर स्पर्धकांना मेडल ,अल्पोपहार, आणि बिअर दिली जात होती. बिअरचा आस्वाद देखील अनेकांनी घेतला. विशेष म्हणजे स्पर्धकांना नेआण करण्याची व्यवस्था आयोजकांनी केली होती. ही सर्व व्यवस्था मोफत होती.
         स्पर्धेच्या एक दिवस अगोदर आम्ही गोवा येथील बायना बीचवर फिरण्यासाठी गेलो होतो. तेथे सूर्यास्ताचा सुंदर देखावा पहिला. फोटोसेशन केले.आमची निवास व्यवस्था वास्को रेसिडनसी मध्ये करण्यात आली होती.
            समूहाच्या माध्यमातून एखादे एकदम सुलभ होते. आजच्या स्पर्धेतून समूहशक्तीचा प्रत्यय आला. कोणतेही काम एकट्याने करण्याऐवजी समुहाच्या माध्यमातून केले तर सोपे जाते.आपण फिजिकली फिट राहण्यासाठी व्यायामाची गरज आहे. आपण सगळेजणच व्यायाम करुया,निरोगी राहूया हाच संदेश आजच्या स्पर्धेतून मिळतो.
       शब्दांकन -- राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८

बुधवार, १३ नोव्हेंबर, २०१९

बालदिन | पंडित जवाहरलाल नेहरू जयंती

!! बालदिन !!



      भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा १४ नोव्हेंबर हा जन्मदिवस दरवर्षी संपूर्ण भारतात त्यांचा जन्मदिवस  बालदिन म्हणून साजरा केला जातो.लहान मुलं म्हणजे पंडितजींना जीव की प्राण ,मुलं ही देवाघरची फुलं आहेत असे ते म्हणायचे.
        पंडित जवाहरलाल नेहरु मुलांमध्ये रमायचे.मुलावरच्या प्रेमामुळे ते सर्वांचे लाडके चाचा नेहरु झाले. मुलं ही देशाचं भविष्य आहेत, त्यामुळे लहान वयात त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तरच ते आदर्श नागरिक होऊ शकतील. त्याच उद्देशाने पंडितजींनी पंतप्रधान झाल्यावर लहान मुलांसाठी अनेक योजना तयार केल्या आणि त्याची अंमलबजावणी होत आहेकी नाही याकडे जातीने लक्ष दिले. अशा पंडितजींना मानाचा मुजरा.           
संग्राहक -- राजेंद्र पवार
       ९८५०७८११७८

प्रतिमा साभार - गुगल  
!! कार्तिकी वारी पंढरीची !!(२)




   मंगळवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी  पहाटे लवकर उठून चंद्रभागेत स्नानाचा आनंद लुटला आणि लवकरच गोपाळपूराकडे प्रस्थान केले. आमचे निवासस्थान  नदीच्या पलीकडे असल्याने आम्हाला पूल ओलांडून यावे लागले.नदीस महापूर आल्याने आजही काही नदीकाठच्या मंदिरात पाणी आहे.विष्णूपद मंदिराचा भाग पाण्याने पूर्णपणे वेढलेला आहे.
                  गोपाळपूरमध्ये श्रीकृष्णासह अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. तेथे जनाबाईच्या संसाराची  एक खोली आहे. त्याकाळात वापरात असलेल्या वस्तू प्रतिकात्मक स्वरूपात जतन करुन ठेवलेल्या आहेत. जनाबाईस प्रत्यक्ष पांडुरंग दळण दळू लागला असल्याचेही प्रतिकात्मक रुपाने मांडले आहे. येथे देवाला दही व लाह्या वाहणे तसेच एकमेकांना भरवण्याची प्रथा आहे.आम्हीही तो आनंद लुटला.
            हा कार्यक्रम झाल्यानंतर काल्याच्या किर्तनासाठी  मुळ निवासस्थानी आलो. सकाळी ८ ते १० यावेळेत  ह.भ. प.केशवमहाराज हगवणे यांचे काल्याचे किर्तन झाले.
       आजच्या किर्तन सेवेसाठी जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अभंग घेतलेला होता तो खालीलप्रमाणे--
    माझे  गडी  कोण  कोण!  निवडा भिन्न यातुनी!!१!!
आपापणामध्ये मिळो!एक खेळो एकाशी !!धृ!!
घाबरियांच्या मिडा काड्या !धाड भ्याड वळतीया!!२!!
 तुका म्हणे देवापाशी!विटाळशी नसावी !!३!!
       महाराजांनी अभंगाचे सुंदर विवेचन केले. जीवनामध्ये खेळ विविध प्रकारचे आहेत उदा. बालपणीचा खेळ, संसार खेळ, भागवत भक्तीचा खेळ.
         भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात  प्रत्येकाने विचार करून कृती करावी. अविचारी कृतीचा काहीच उपयोग होत नाही. आपणास चांगल्या वाईटाची निवड करता आली पाहिजे.संघशक्ती महत्वाची,भ्याड भित्र्या लोकांमुळे यशप्राप्ती होत नाही. ज्याला देवाजवळ जायचे आहे त्याच्याकडे वाईट विचार असु नये. येथे विटाळ हा  शब्द वाईट विचाराबद्दल वापरला आहे. आपणाकडील अहंकार प्रथम घालवला पाहिजे. मी ऐवजी आम्ही असे म्हणता आले पाहिजे.
          किर्तन संपल्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम संपन्न झाला. नंतर महाप्रसाद घेतला.थोड्याचवेळात परतीच्या प्रवासाला निघालो. यावेळी मात्र माळशिरस, नातेपुते,फलटण,कोरेगाव  या मार्गाने गावी परत पोहोचलो. तुलनेने बराचसा मार्ग चांगला होता त्यामुळे प्रवासदेखील आनंददायी झाला.
        आजच्या दिवसातून जीवनात अहंकार नको,  वाईट विचार नको,टीमवर्क महत्वाचे हा संदेश मिळाला असे मला वाटते.
       शब्दांकन -- राजेंद्र पवार
           ९८५०७८११७८

मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०१९


         !! कार्तिकी वारी पंढरीची !!







       सोमवार दिनांक ११ नोव्हेंबर २०१९ रोजी
पंढरपूर येथे पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलो.माझ्या समवेत माझे मामा श्री पोपट पडवळ,नातेवाईक रामचंद्र निकम (सर), बाबासाहेब निकम, आमच्या ज्येष्ठ भगिनी श्रीमती रंजना जगताप आदि होते.
       आम्ही पंढरपूर येथे येण्यासाठी रहिमतपूर, वडूज, दहिवडी, म्हसवड,पिलीव मार्गाचा अवलंब केला. संध्याकाळी ६ वाजताच मुक्कामाच्या ठिकाणी ( वैष्णव सदन ,शेगाव दुमाला ) येथे पोहोचलो. त्याठिकाणी ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम (मोठे) यांचे कीर्तन चालू होते. कीर्तन सेवेसाठी त्यांनी घेतलेला अभंग खालीलप्रमाणे
      अवघींच तीर्थे घडली एकवेळा !चंद्रभागा डोळां देखलिया !!१!!
अवघींच पापें गेलीं!वैकुंठ पंढरी देखलिया !!ध्रु.!!
अवघीया संता एकवेळा भेटी!पुंडलीक दृष्टी देखलिया!!२!!
तुका म्हणे जन्मा आल्याचें सार्थक !विठ्ठल चि एक देखलिया !!३!!
   या अभंगात पंढरी तीर्थक्षेत्र महात्म्य, चंद्रभागा स्नान महात्म्य, पांडुरंग भक्ती महात्म्य, पुंडलिक सेवा महात्म्य यांचे वर्णन आलेले आहे. महाराजांनी अभंगाचे विवेचन सुंदररित्या केले. या वारीचे श्रेय श्री.गोरख चव्हाण (माऊली) यांच्याकडे जाते. आज वारकरी सौ.इंदुमती चव्हाण, हांडे मामा (जुन्नर), सी. बी. पवार (किडगाव), तानाजी निकम (चिंधवली) यांची भेट झाली. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
         रात्री प्रसाद घेऊन पांडुरंग दर्शनासाठी गेलो. दोन तासातच पांडुरंगाचे चरण दर्शन झाले. कमी वेळात दर्शन झाल्यामुळे खूपच आनंद झाला.
       वारकऱ्यांनी प्रत्येक आषाढी,कार्तिकी वारी करावयास हवी असे मला वाटते.
   शब्दांकन  -- राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८

रविवार, १० नोव्हेंबर, २०१९

!! सातारा कास हेरिटेज हिल मॅरेथॉन !!


      आज सातारा कास हेरिटेज हिल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. आज २१ कि. मी; १० कि. मी. व ३ कि. मी. अशा प्रकारच्या स्पर्धा होत्या. मी २१  कि. मी. मध्ये भाग घेतला होता. आज मी ही स्पर्धा २:१०:५५ (दोन तास दहा मिनिटे व पंचावन्न सेकंदात) पुर्ण केली. आज मी माझेच रेकॉर्ड ब्रेक केले. पूर्वीपेक्षा कमी वेळात हे अंतर पार करण्यात मला यश आले. आजच्या मॅरेथॉनमध्ये आमच्या कुटुंबातील चिरंजीव डॉ. श्रीधर, सुनबाई सौ. शितल बंधु डॉ. दत्तात्रय भोसले वहिनी डॉ.सौ. सारिका भोसले आदि सहभागी झाले होते.
         स्पर्धा सुरु होण्यापूर्वी झुंबा डान्सचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे वातावरणात वेगळाच माहोल तयार झाला. नंतर संस्थेचे अधिकृत प्रशिक्षक शिव यादव यांनी स्ट्रेचिंग घेतले. स्पर्धेस सुरुवात होण्यापूर्वी  जनगणमन राष्ट्रगीत घेण्यात आले. बरोबर ६ वाजता मान्यवरांचे हस्ते फ्लॅग ऑफ करुन स्पर्धेस प्रारंभ झाला. स्पर्धा मार्गावर  अनेक ठिकाणी ढोल-ताशा तुतारीने स्वागत केले जात होते. रुट सपोर्ट अतिशय चांगला होता. ठिकठिकाणी इनर्जी फुडची व्यवस्था केली होती. मेडिकल हेल्पदेखील अतिशय चांगली होती.
       आजची ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चेअरमन संदीपभाऊ शिंदे, रेसडायरेक्टर
डॉ. सुधीर पवार, डॉ.संतोष यादव, शरद भोसले, डॉ. प्रसाद साळुंखे, संदीप माने, माधुरी शिवदे,जयंत शिवदे,शुभांगी माने, अनुजा कदम, अल्पना शहा तसेच त्यांच्या टीममधील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
       आजच्या स्पर्धेतुन शरीरासाठी  व्यायामाची नितांत आवश्यकता आहे हा संदेश मिळाला. आपले आरोग्य चांगले असेल तरच आपण चांगले काम करु शकतो. कुटुंबातील वातावरण चांगले राखू शकतो. आपले कुटुंब चांगले ठेवण्यासाठी, आपल्या कामाचा दर्जा उंचावण्यासाठी, सकारात्मक ऊर्जा निर्मितीसाठी आपण अशा स्पर्धेत भाग घेऊया. स्वतः निरोगी राहूया,आपला देश बलवान करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करुया.






    शब्दांकन -- राजेंद्र पवार
           ९८५०७८११७८

रविवार, ३ नोव्हेंबर, २०१९

!! सातारा कास हेरिटेज हिल मॅरेथॉन !!



    आज सातारा कास हेरिटेज हिल मरेथॉनच्या (Last Sunday Practice Run ) चे आयोजन करण्यात आले होते.आज २१ कि. मी. मध्ये ज्यांनी भाग घेतला आहे त्यांच्यासाठी ९ कि. मी. चा सराव तर १० कि. मी.मध्ये भाग घेतलेल्यासाठी ४ कि. मी. च्या सरावाचे नियोजन केले होते. आजच्या प्रॅक्टिस रनमध्ये भारत भेटीवर आलेले जर्मनीचे पाहुणे चिलक्सनिस (Chillaxnis) सहभागी झाले होते.या पाहुन्यांची सेवा करण्याची संधी आमच्या कुटुंबियांना मिळाली. दोन देशातील संस्कृतीचीदेखील चर्चा झाली. भारत देश विविधतेने नटलेला आहे या देशात मला पुन्हापुन्हा यायला आवडेल असेही ते म्हणाले.
        पुढील रविवारी १० नोव्हेंबर रोजी  स्पर्धा असलेने  आठवड्यात घ्यावयाचा आहार याबाबत सविस्तर मार्गदर्शन डॉ. सुधीर पवार व डॉ.संतोष यादव यांनी  केले. जास्तीतजास्त पाणी पिण्याबद्धल सांगण्यात आले. या स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी संयोजक प्रयत्नशील असल्याचे चेअरमन संदीपभाऊ शिंदे यांनी सांगितले.
          आजचा रुट्सपोर्टदेखील छान होता. तीन ठिकाणी इनर्जीफुडची व्यवस्था करण्यात आली होती. संस्थेचे अधिकृत प्रशिक्षक शिव यादव यांनी प्री व पोस्ट स्ट्रेचिंग अतिशय सुंदररित्या घेतले. आजच्या सराव रनचे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यात आले. मॅरेथॉनसंबंधी काही लोकांच्या बाईट्स घेण्यात आल्या. मलाही माझे विचार बाईटसच्या माध्यमातून मांडण्याची संधी मिळाली.
    आज श्री रुद्रा ग्रुपचे सचिन धनावडे व संदीप माने यांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. आजची प्रॅक्टिस रन यशस्वी करण्यासाठी डॉ.निलेश थोरात, जयंत शिवदे, शरद भोसले, राजेंद्र गायकवाड, पल्लवी नाईक, अल्पना शहा, शुभांगी माने, दमयंती गीते, सौ. धनावडे यांनी परिश्रम घेतले.
      रविवारी होणाऱ्या स्पर्धेचे स्पॉट रजिस्ट्रेशन  अजूनही उपलब्ध आहे त्याचा फायदा सातार करांनी घ्यावा स्पर्धेत सहभागी व्हावे. आपण शारीरिकदृष्ट्या सक्षम व्हावे असे मला वाटते.चला तर आपण या स्पर्धेत भाग घेऊया आणि आरोग्याचा संदेश समाजाला देऊया.
   शब्दांकन -- राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८


शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०१९

कृषिरत्न आदर्श शेतकरी पुरस्काराने विक्रमसिंह कदम सन्मानित

कृषिरत्न आदर्श शेतकरी पुरस्काराने विक्रमसिंह कदम सन्मानित 








    वर्णे प्रतिनिधी -- निसराळे येथील प्रगतशील शेतकरी स्वर्गीय बाळू मारुती घोरपडे यांच्या १६ व्या पुण्यस्मरणानिमित  कराड तालुक्यातील पेरले येथील विक्रमसिंह कदम यांना कृषिरत्न आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सातारा जि.प.माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, जनता सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब लोहार,निसराळेचे माजी सरपंच शंकरराव घोरपडे, वर्णे  हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक राजेंद्र पवार,अतीत येथील नवचैतन्य सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक तानाजीराव जाधव ,इफकोचे सातारा, सोलापूर जिल्ह्याचे मार्गदर्शक प्रतिनिधी सुधीर जाधव यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
          यावेळी निसराळे येथील पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेली कन्या रुपाली भाग्यवंत गायकवाड व इयत्ता १० मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली ऐश्वर्या दिलीप गायकवाड यांचाही मान्यवरांचे हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
          यावेळी मार्गदर्शन करताना विक्रमसिंह कदम म्हणाले की, आपण शेती करताना आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावयास हवी. उत्पादित केलेला माल विक्री करण्याचे कौशल्य हवे. इंटरनेटच्या माध्यमातून सर्व जग जवळ आले आहे त्याचाही वापर करावयास हवा. एकाच प्रकारच्या पिकावर अवलंबून न राहता विविध कमी वेळेची पिके घ्यावीत जेणेकरून सतत आर्थिक उत्पन्नाचा स्रोत चालु राहील.शेतीला पाणी देण्यासाठी ठिबकसिंचनाचाच वापर करावयास हवा. शेतकऱ्यांनी शेती हा एक उत्तम धंदा असल्याचे देखील समाजमनात बिंबवले पाहिजे.
         याप्रसंगी ग्रामस्थ मंडळ निसराळे,अतीत, वारणानगर,खोजेवाडी येथील भजनी मंडळींनी उत्कृष्ट संगीताची मेजवानी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महादेव घोरपडे, सदाशिव घोरपडे, संदीप घोरपडे तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी परिश्रम घेतले.
         यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र देशमुख यांनी सूत्रसंचालन सुजित काळंगे यांनी तर आभार जितेंद्र आवळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी परिसरातील शेतकरी ,शिक्षणप्रेमी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...