सोमवार, २५ नोव्हेंबर, २०१९

पुस्तकामुळे माणसाला  ऊर्जा व आनंद मिळतो -डॉ.यशवंत पाटणे




  रविवार दिनांक २४ नोव्हेंबर रोजी सातारा येथे आयोजित केलेल्या पुस्तक प्रकाशन समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. यशवंत पाटणे म्हणाले की, पुस्तकामुळे माणसाला ऊर्जा व आनंद मिळतो. आपल्याला निसर्गात रमता आले पाहिजे. निसर्गाकडून खूप काही शिकण्यासारखे असते. यासाठी आपण प्रवास केला पाहिजे. सुनील शेडगे लिखित 'साताऱ्याच्या सहवासात' या पुस्तकातून सातारा जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे, ऐतिहासिक वास्तू यांची माहिती मिळते. सातारा जिल्हा पर्यटनाच्यादृष्टीने पाहण्यासाठी हे पुस्तक सर्वांच्याच संग्रही असले पाहिजे.
          याप्रसंगी डॉ.राजेंद्र माने, प्रा. श्रीधर साळुंखे, सकाळचे सहयोगी संपादक राजेश सोळस्कर, न्युज ब्युरो चीफ हरीष पाटणे, बोरगावचे स. पो. नि. चंद्रकांत माळी, सातारा पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी संजय धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
       याप्रसंगी हरीष पाटणे म्हणाले की, सुनील शेडगे यांच्या पुस्तकातून ग्रामीण जीवनाचे यथार्थ दर्शन घडते. राजेश सोळस्कर म्हणाले की, सुनील शेडगे हे केवळ शिक्षक नसुन ते समाजशिक्षक आहेत. शेडगे सरांनी पत्रकारितेच्या माध्यमातून विधायक गोष्टी समाजापर्यंत नेण्याचे काम केले आहे. डॉ. राजेंद्र माने म्हणाले की, सातारा जिल्हा पर्यटनासाठी समृध्द आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर वाचकांना पुस्तकात आलेल्या ठिकाणांना भेट देण्याची तीव्र इच्छा होणार यात शंका नाही.
     सुनील शेडगे यांनी आपल्या लिखाणाचे सर्व श्रेय आपले आई वडील यांना दिले. आपल्या जीवनातील आईचे स्थान खूपच मोठे असल्याचे त्यांनी सांगितले. पत्नी, मुले यांचाही वाटा खूपच मोलाचा असल्याचे त्यांनी विनम्रपणे सांगितले.
       यावेळी शेडगे सरांचे पिताश्री माजी मुख्याध्यापक श्री. लक्ष्मण शेडगे यांचा पंच्याहत्तरीनिमित्त मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. पुस्तक प्रकाशन समारंभप्रसंगी सुनील शेडगे यांच्या जीवनावर आधारित दीपक मगर व गणेश शिंदे निर्मित चित्रफीत दाखवण्यात आली.
      या पुस्तकाच्या  प्रकाशनाची सर्व जबाबदारी वाडाकुंभरोशीच्या निलेश रांजणे व जयराज जाधव यांनी उचलली होती.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजिंक्यतारा कारखान्याचे संचालक अशोक पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन विठ्ठल माने यांनी केले तर आभार अजित साळुंखे यांनी मानले.
     या कार्यक्रमास सातारा जिल्ह्यातील अनेक पत्रकार, शिक्षणविस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, प्राथमिक, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षणप्रेमी नागरिक भरतगावमधील ग्रामस्थ उपस्थित होते.
       आजच्या कार्यक्रमातून सातारा जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे हे समजले. आपण पुस्तकात आलेल्या सर्व स्थळांना भेट देऊया. आपला जिल्हा खऱ्या अर्थाने जाणून घेऊया असे मला वाटते.
     शब्दांकन -- राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...