शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१९

!! राजस्थान सहल !! (५ ) प्रवास वर्णन

!!  राजस्थान सहल !! (५ )

    आज ३० नोव्हेंबर, आज आम्ही सकाळी बिकानेरहून ६.:४५ लाच निघालो. बिकानेर ते जैसलमेर हे अंतर ३५५ कि.मी. एवढे असल्याने आजसुध्दा प्रवासात बराचसा वेळ गेला. वाटेतच रामदेवरा हे धार्मिकस्थळ लागले.येथे रामदेवबाबा यांची समाधी आहे. हे ठिकाण राजस्थान ,गुजरात आणि मध्यप्रदेशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे.याठिकाणी जवळपास दोन महिने यात्रा चालते असे सांगण्यात आले.येथील मार्केटसुध्दा खूपच मोठे आहे.
            याच मार्गावर सरंक्षण क्षेत्राच्या दृष्टीने महत्वाचे असणारे पोखरण हे गाव लागले.पोखरण येथे अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान असताना अनुचाचणी घेण्यात आली होती. जैसलमेर येथे मिलीटरीचा मोठा कॅम्प आहे. या परिसरात मिलिटरीच्या गाड्यांची मोठया प्रमाणात येजा दिसत होती.आम्ही दुपारी ४ वाजता जैसलमेर याठिकाणी पोहोचलो.
  जैसलमेरविषयी थोडेसे --
     भारतीय इतिहासातील मध्ययुगीन काळाच्या सुरुवातीला जैसलमेरची स्थापना भारताच्या पश्चिमेकडील  थर वाळवंटात यदुवंशीय भाटिचे वंशज रावळ जैसल यांनी केली होती.या भागात वाळूच्या मोठ्या मोठ्या टेकड्या पाहायला मिळतात. येथील पावसाचे गोळा केलेले पाणी गोड तर इतर पाण्याला खारट चव लागते. येथील हवामानाचा विचार केला तर हिवाळ्यात भरपूर थंडी आणि उन्हाळ्यात तापमान ४५ डिग्री सेल्सिअस पर्यंत. आजचाच विचार करावयाचा झाला तर सकाळी १० पर्यंत धुके होते तर दिवसभर जीवघेणी थंडी जाणवत होती.जैसलमेर येथे आपणास शाही इमारती पाहायला मिळतात. या शहराला गोल्डन सिटी असेदेखील म्हटले जाते.
                जैसलमेर येथे आमची हॉटेल रॉयल प्रिन्समध्ये निवासव्यवस्था करण्यात आली होती. तिथे  आम्ही फ्रेश होऊन   लगेचच ४० कि. मी. दूर असणाऱ्या "सम "या वाळवंटात गेलो. हे ठिकाण कला केंद्र  म्हणून राजस्थानात प्रसिध्द आहे.ओऍसिस कॅम्प सम यांनी सादर केलेली राजस्थानी कला  आम्हास पहावयास मिळाली. कलाकारांनी नृत्यांचे तसेच गीतांचे सुंदर सादरीकरण केले.  नृत्यात  आमच्या सहलीमधील लोकांनीही आनंद लुटला.      
           सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होण्यापूर्वी उंट सफारीचा आनंदही माझ्यासह सर्वांनीच लुटला.जैसलमेरने मूळ भारतीय संस्कृती कला,संगीत,साहीत्य यांची सुंदर जपणूक केली आहे. आज बऱ्याच ठिकाणी लोकाश्रय न मिळाल्याने काही कला लोप पावत चालल्या आहेत.
         अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच ज्ञान आणि करमणूक यांचीही मानवाला गरज आहे. करमणुकीसाठी साहित्य, संस्कृती, कला यांची जपणूक होणे गरजेचे आहे. आपण आपल्यापरीने लोप पावत चाललेल्या साहित्य,कला, संस्कृतीची जपणूक करण्यासाठी प्रयत्न करुया असे मला वाटते.
       प्रवासवर्णन -- राजेंद्र पवार
              ९८५०७८११७८




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...