गुरुवार, ३० मे, २०१९

!!  श्री भैरवनाथ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र फत्यापूर भेट  !!





        आज गुरुवार दिनांक ३० मे रोजी सातारा जिल्ह्यातील देशमुखनगर येथे एका विवाह समारंभानिमित्त गेलो होतो. तेथुन अगदी जवळ असलेल्या फत्यापुर गावी श्री भैरवनाथ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रास भेट देण्याचा योग आला.
            माझे समवेत वर्णे येथील बळीराम पवार(पाटील ), दादासाहेब पवार, वर्णे हायस्कूलचे मुख्याध्यापक संजयकुमार बाईंग, राजकुमार काळंगे, फत्यापूर सेवा सोसायटीचे चेअरमन अशोक घाडगे (सर ) होते. अशोक घाडगे (सर), सेवा सोसायटीचे चेअरमन झाल्यापासून गावात विविध उपक्रम राबवले जात असल्याचे दिसून आले. सध्या गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे त्यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचा प्रयत्न दिसुन आला. गावाशेजारी असणाऱ्या तलावांचे खोलीकरण करण्यात आले. यासाठी  गावचे भूमिपुत्र राजेंद्र घाडगे त्याचबरोबर सह्याद्री साखर कारखान्याने भरीव मदत केलीअसल्याचे चेअरमन यांनी सांगितले. गावातील तरुणांनी उस्फुर्तपणे श्रमदान केले. विधायक विचार असतील तर लोकांचे सहकार्य लाभते.
              बऱ्याच ठिकाणी सहकारी संस्थांचा गैरवापर होताना दिसून येतो. "बसायला फटफटी व खायला सोसायटी "असे चित्र चेअरमनचे पुर्वी रंगवले जायचे. परंतु आधुनिक विचारांच्या व्यक्ती सहकारात आल्यातर गावाचा  कसा कायापालट होतो हे फत्यापुर सोसायटीने दाखवुन दिले. सोसायटीच्या माध्यमातून  पिण्याच्या शुध्द पाण्याचा पुरवठा केला जात आहे. सोसायटीच्या इमारतीमध्ये  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. लोकसहभागातून एखादी योजना सुरू केली तर ती चिरकाल टिकते हेच दिसून येते.
       स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनकेंद्रात विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध करण्यात आलेली आहेत. ग्रंथालयासाठी आवश्यक असणारे फर्निचर तयार करण्यात आले आहे. सी. सी.टी. व्ही. ची व्यवस्था करण्यात आली आहे.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात थोर व्यक्तीचे विचार प्रदर्शित केलेले दिसून आले. उदाहरणादाखल एक विचार येथे देत आहे.
      " विद्येविना मती गेली;
        मतिविना निती गेली;
      नीतिविना गती गेली!
गतिविना  वित्त गेले,
      वित्ताविना शूद्र खचले,
       इतके अनर्थ एका अविद्येने  केले."
                      महात्मा जोतिबा फुले
         हे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले असल्याचे चेअरमन यांनी सांगितले. जागेअभावी सगळ्यांचाच उल्लेख करता येत नाही. काहींनी पैश्याचा स्वरूपात तर काहींनी वस्तुस्वरूपात मदत केली आहे. तरीही विशेष सहकार्य केलेल्या काही व्यक्तींचा उल्लेख करावाच लागेल त्यामध्ये जलसंधारण मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र घाडगे, लोढा ग्रुप मुंबईचे व्हा. चेअरमन दादासाहेब गवळी, निवृत्त आयकर अधिकारी महादेव घाडगे, सिंदखेडराजा येथील तहसीलदार संतोष कणसे, निवृत्त उत्पादन शुल्क अधिकारी मनोहर घाडगे, एरिक्सन पुणेचे मॅनेजर प्रकाश घाडगे, अभियंता नितीन घाडगे, विशाल कदम ,अनेक प्राथमिक शिक्षक आदि आहेत. अशोक घाडगे सरांचे कल्पक विचार आणि त्यांना ग्रामस्थांची उत्तम साथ असल्याने गावात कायापालट होताना दिसत आहे.
            स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून  तरुणांना योग्य दिशा देण्याचे काम केले जात आहे. अशा प्रकारची स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे गावोगावी सुरु झाली तर ग्रामीण भागातील तरुणांचा प्रशासनातील टक्का वाढल्याशिवाय राहणार नाही असे मला वाटते.
        शब्दांकन -- राजेंद्र पवार
           ९८५०७८११७८

सोमवार, २७ मे, २०१९

!! चैत्रपालवी - २०१९ (३ )  !!
         आज चैत्रपालवी कार्यक्रमाचा तिसरा आणि अखेरचा दिवस,या दिवसाच्या पहिल्या सत्रात  पर्यावरणपूरक व्यावसायिक शेती व पीक पद्धतीत बदल, शाश्वत उत्पादनासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन या विषयांतर्गत बांबूची किफायतशीर शेती व बांबूपासून तयार होणाऱ्या विविध वस्तू -- आनंद फिस्के, शुगरबीट (शर्कराकंद ) ऊस पिकाला काहीअंशी पर्याय -- डॉ.पी. व्ही. घोडके शास्त्रज्ञ व्ही. एस. आय. पुणे, मधुमक्षिका पालन डॉ. के. लक्ष्मीराव, रेशीमशेती -- प्रियांका गणाचार्य जिल्हा रेशीम विकास अधिकारी पुणे यांनी विचार व्यक्त केले.
          बांबू लागवडीविषयी माहिती  देताना आनंद फिस्के म्हणाले की, बांबू हा बहुगुणी वृक्ष आहे. याची वाढ फार झपाट्याने होते. जमिनीतील क्षारपडपणा नाहीसा करण्याची क्षमता बांबूमध्ये आहे.बांबूवर कोणतीही रोगराई येत नाही. बांबूंच्या १३६ व्हरायटी आहेत. त्यातील १८ व्हरायटीना आपल्या राज्यात मान्यता देण्यात आली आहे. शासन प्रतिझाड १२० रुपये अनुदान तीन वर्षात देते. आपल्याकडे बालकुआ जातीचा बांबू चांगला येतो. बांबू शेतकऱ्यांनी बांधावर लावायला हरकत नाही.
            शुगरबीटविषयी माहिती देताना डॉ. घोडके म्हणाले की, हे पीक थंड हवामानात येणारे आहे. पिकाचा कालावधी ५ ते ६ महिने आहे.साधारण १५००/-- रुपये एवढा भाव टनाला मिळु शकतो. आपल्याकडे हे पीक रब्बी हंगामात आपण घेऊ शकतो. शुगरबीटपासुन साखर उत्पादन तसेच इथेनॉल निर्मिती करता येते. या पिकास साखर कारखानदारीने प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
      मधुमक्षिका पालनाविषयी डॉ. के. लक्ष्मीराव म्हणाल्या की, मधमाशांचे तीन प्रकार आहेत. आग्या, देशी (सातेरी ), विदेशी माशी अश्या त्या होत. परागीभवन होणेसाठी मधमाश्या खूपच महत्वाची भूमिका बजावतात. मध तसेच मेणाचा आपणास भरपूर फायदा, होतो. मधमाश्या पालनासाठी फारसे भांडवल लागत नाही, स्वतंत्र जमिनीची गरज नाही, फारश्या मनुष्यबळाची गरज नाही, कसलेही प्रदूषण नाही. हा व्यवसाय महिला उत्तमरीत्या करू शकतात. आपल्या शेतात मधमाश्याची पेटी ठेवली तर २५ ते ३०% एवढी उत्पादनात वाढ होते. काही शेतकरी उत्पादन वाढीसाठी आपल्या शेतात मधमाश्याच्या पेट्या ठेवतात.
          रेशीमशेतीविषयी माहिती देताना गणाचार्य म्हणाल्या की, रेशीमशेती हा उद्योग आपणाकडे टिपू सुलतानाच्या काळापासून चालत आलेला आहे. रेशीमशेतीमध्ये कोषनिर्मिती, रोपवाटिका,किटक संगोपन करुन विक्री करणे, धागा निर्मिती, कापडनिर्मिती, कापडविक्री, आवश्यक औषधे व साहित्य पुरवणे  अशा रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर आहेत. यामध्ये तुतीचा चारा महत्त्वाचा आहे. या व्यवसायासाठी अनुदान देखील आहे.
         सोयाबीन पिकाविषयी प्रा. संतोष करंजे यांनी माहिती दिली. MACS-1188 ही नवी जात सोयाबीनची विकसित केली आहे. ही जात तांबेरा रोगास बळी पडत नाही. टोकन पद्धतीने लागवड केली  तर एकरी  १८ क्विंटलपर्यंत उत्पादन  घेता येते. एकरी बियाणे फक्त १२ किलो लागते.
          दुपारच्या सत्रात गटचर्चा झाली. चर्चेच्यावेळी मार्गदर्शन करताना सुधीर भोंगळे म्हणाले की, आपण उत्पादकतेचे अंतिम टोक गाठले पाहिजे आणि उत्पादन खर्च कमी आणता आला पाहिजे. शेतकऱ्यांनी मनमोकळा सवांद साधावयास हवा. नवीन ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची कास धरली पाहिजे.
        विजय बोराडे म्हणाले की, चैत्रपालवी कार्यक्रमातून गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्याला मार्ग मिळाला पाहिजे. शेतकरी मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे प्रगती करेल हा मुख्य उद्देश चैत्रपालवीचा आहे. विषमुक्तऐवजी किमान अवशेषमुक्त उत्पादन  आपणास घेता आले पाहिजे. यापुढे प्रत्येक शेतकऱ्याचे शेततळे असले पाहिजे. मत्स्य व्यवसाय केला पाहिजे. शेती व्यवसाय म्हणून केला तरच तरुणवर्ग शेतीकडे वळणार आहे. कार्यक्रमाचे आभार विवेक भोईटे यांनी मानले . शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. प्रत्येक सहभागी सदस्यास ट्रस्टच्यावतीने  बांबूचे रोप भेट देण्यात आले. आजच्या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील सहभागी शेतकऱ्यांनी प्रेरणा घेतली. संबधित शेतकरी आपआपल्या भागात जाऊन शेतीत परिवर्तन घडवून आणतील याबाबत मला संदेह वाटत नाही.
      शब्दांकन -- आर.व्ही. पवार
         ९८५०७८११७८
!!    चैत्रपालवी -- २०१९ (२ )
    आज चैत्रपालवीचा दुसरा दिवस, सुरुवातीस ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार  यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात ते म्हणाले की, चैत्रपालवी हा उपक्रम वैचारिक देवाणघेवाण करण्यासाठी आहे. आपण नेहमीच नाविन्याचा शोध घ्यावयास हवा. या कार्यक्रमाबाबत मी अजुनही समाधानी नसल्याचे ते म्हणाले. माणसाने अल्पसंतुष्ट असता कामा नये. "ठेविले अनंते तैसेचि का राहावे! चित्ती नसू ध्यावे समाधान!" असेही ते म्हणाले.कार्यक्रमास ट्रस्टचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री मा.शरद पवार, माजी सचिव सुधीरकुमार गोयल, महाराष्ट्राचे कृषिआयुक्त सुहास दिवसे, कृषी सहसंचालक दिलीप शेंडे , माजी कुलगुरू डॉ. शंकरराव मगर, आत्मा पुणेचे संचालक अनिल बनसोडे आदि उपस्थित होते.
      आपल्या बीजभाषणात शरद पवार म्हणाले की, शेतीस पशुपालनाचा जोडधंदा दिल्याने शेतकऱ्याचे जीवनमान उंचावले. जीवनमान कसे उंचावले यासाठी एका कुटुंबात कसाकसा बदल होत गेला हे त्यांनी मार्मिकपणे सांगितले. सुरुवातीला परातीत चहा, कानतुटका कप, सुंदर कप, बसायला घोंगडी, सतरंजी, सोफासेट हा बदल केवळ शेतीतील उत्पनामुळे झाला आहे. जीवनमानात सुधारणा होण्यात महिलांचा सहभाग खूप मोठा आहे. शिकलेल्या मुली सुना म्हणून आल्यानेदेखील शेतीक्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आला आहे. ते पुढे म्हणाले की, कोणालाही फुकट काही मिळता कामा नये. पाण्याचा वापर योग्यरित्या करता आला पाहिजे. पिकास मोजूनच पाणी दिले पाहिजे. दरएकरी उत्पादकता वाढवता आली पाहिजे. मानकांचा वापर करून  मार्केटिंग करता आले पाहिजे. आपण कमी पाण्याची पीके घ्यावयास हवीत. शेतीवरचा अतिरिक्त भार कमी करता आला पाहिजे. शेतजमीन दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. आपण रस्ते, शहरीकरण, औद्योगिकरण यासाठी जमिनीचा वापर करतो. या सर्व गोष्टींचा आपण बारकाईने विचार केला तरच आपली प्रगती आहे.
        मार्गदर्शन करताना सुहास दिवसे म्हणाले की, आपण तंत्रज्ञान अवगत करावयास हवे . आता आपली स्पर्धा जगाशी आहे. आपण कमीतकमी खर्चात उत्पादन करावयास हवे. कृषिविभागानेदेखील ज्ञान लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करावयास हवे. आपण चांगल्या दर्जाचा माल बनवा, बाजारात जे विकते तेच पिकवा, ग्राहकांच्यापर्यंत पोहचण्याचा सल्ला त्यांनी दिला. आपणामध्ये communication, co-ordination , collaboration असावयास हवे.
         कार्यक्रमात शेवटी आभार प्रदर्शन डॉ. विवेक भोईटे यांनी मानले. आजच्या कार्यक्रमातून शेतीचा जोडधंदा, प्रक्रियाउद्योग, पाण्याचा योग्य प्रमाणात वापर, महिलांचे सामाजिक बदलातील योगदान, शेतीची सद्यस्थिती याबाबत सविस्तर माहिती मिळाली असे  मला वाटते.
   शब्दांकन -- आर. व्ही . पवार
             ९८५०७८११७८
!!     चैत्रपालवी --२०१९  !!



कृषी संस्कृतीची सावली -- चैत्रपालवी २०१९ शेतीच्या नव्या वाटांचा धांडोळा - बदलत्या हवामानात शेतीपद्धतीत बदल घडवून मशागत ते मार्केट तसेच पूरक व्यवसायाची जोड देऊन शेती व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट ,बारामती  येथे करण्यात आले आहे.
          कार्यक्रमाच्या सुरुवातीस ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट,बारामती याठिकाणी चालत असलेल्या सर्व कामांची माहिती चित्रफितीद्वारे दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शाकीर अली सय्यद तसेच विवेक भोईटे यांनी केले. सुरुवातीला जलतज्ञ सुधीर भोंगळे, एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे सदस्य विजय बोराडे व विष्णुपंत हिंगे यांचे स्वागत करण्यात आले. लगेचच वेगवेगळ्या विषयांवर गटचर्चा झाली. मी पशुसंवर्धन विषयावरील गटचर्चेत सहभागी झालो.
            नंतर निरा येथील शेततळ्यातील मस्याशेतीला भेट दिली. कमीतकमी जागेत लहान मास्यांना वाढवून नंतर शेततळ्यात सोडले जाते. पक्ष्याचा त्रास होऊ नये यासाठी संपूर्ण शेततळ्यावर जाळी लावलेली दिसुन आली. निरा येथील भेट संपवून फलटण येथील के.बी. एक्सपोर्ट कडे रवाना झालो. के. बी. एक्सपोर्टसचा परिसर पाहुन भारावून गेलो. या ठिकानाहून भेंडी, दुधीभोपळा व बेबीकॉर्न  यांची निर्यात होते.
        दुधी भोपळा १३ रु. प्रतिकिलो, भेंडी २७ रु. प्रतिकिलो तर बेबीकॉर्न ७ रु. प्रतिकिलो दराने बांधावरून खरेदी केला जातो.शेतकऱ्यांना बियाणे , खते , किटक नाशके पुरवली जातात. औषध फवारणी कंपनीच्या मनुष्यबळाकडून होते. येथे मोठ्याप्रमाणावर दशपर्णी अर्क तयार केला जातो. थोडक्यात सेंद्रिय शेती काळाची गरज असल्याचे त्या प्रोजेक्टवरून दिसून येते. यापुढे शेती व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर गटशेतीशिवाय पर्याय नाही हेच आजच्या भेटीतून दिसून येते.
      शब्दांकन -- राजेंद्र पवार
              ९८५०७८११७८

सोमवार, २० मे, २०१९


         !!   राजीव गांधी  स्मृतिदिन  !!
            राजीव गांधी यांचा जन्म महाराष्ट्रात मुंबई येथे 20 ऑगस्ट 1944 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव फिरोज गांधी होते आणि आईचे नाव इंदिरा गांधी होते. ते भारताचे सातवे पंतप्रधान होते. 1984 मध्ये जेव्हा राजीवजींची आई इंदिरा गांधी यांची हत्या झाली, त्यानंतर ते भारताचे पंतप्रधान झाले . पंतप्रधान पदाच्या काळात त्यांनी अनेक निर्णय घेतले ज्यामुळे भारताची अर्थव्यवस्था सुधारली. विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आमुलाग्र बदल झाला.
           तमिळनाडूच्या श्रीपेरुंबदुरमध्ये एका भयंकर बॉम्ब स्फोटात त्याचा मृत्यू झाला.
  राजीव गांधीजींचा स्वभाव अतिशय साधा होता .
   राजीव गांधी अतिशय सहनशील होते, त्यांनी देशाचे तंत्रज्ञान आधुनिकीकरणासाठी नेतृत्व केले. 21 मे 1991 मध्ये त्यांचे निधन झाले  त्यांना “भारत रत्न” पुरस्कार मिळाला.
संग्राहक -- राजेंद्र पवार
          ९८५०७८११७८


शनिवार, १८ मे, २०१९

  !!  गांधीजींच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षाचे निमित्ताने !!
       !!  डॉक्टर गांधी  !!
गांधीजींचा अलोपथी, आयुर्वेद या वैद्यकीय पध्दतीपेक्षा निसर्गोपचार पद्धतीवर अधीक भर होता. पाणी, माती, ताजी हवा आणि सूर्यकिरण यांची गांधीजींनी उपचारात मदत घेतली. त्यांचा भर उपवास, आहारात बदल आणि वनस्पतीच्या उपयोगावर होता.
         आजारी माणसाचे निरीक्षण करुन व्यवस्थित निदान करण्याची असामान्य शक्ती त्यांच्याजवळ होती. त्याचा त्यांना आजारी माणसावर उपचार करताना खूप उपयोग झाला. त्यामुळे आजारी माणसे बरी होत. दक्षिण आफ्रिकेत अनेक युरोपियन आणि भारतीय लोक त्यांचा सल्ला घेत ते त्यांच्या काही अशीलांचे फॅमिली डॉक्टर झाले होते.
         गांधीजींनी अनेकदा वैद्यकसत्ता नाकारली. कस्तुरबाना एकदा शरीरातील रक्त कमी होण्याचा त्रास होत होता. डॉक्टरांनी त्यांना गाईच्या मांसाचा काढा घ्यायला सांगितले पण गांधीजी आणि कस्तुरबा दोघांनीही ते नाकारलं. गांधीजींनी त्यांना लिंबाचा सरबत अनेक दिवस दिला आणि बर केले.
        दक्षिण आफ्रिकेत एकदा एका पठाणाने गांधीजींवर हल्ला केला तेव्हा गांधीजींनी चेहरा, कपाळ, आणि बरगड्यांना मुक्कामार बसला होता त्यावर स्वच्छ मातीचा लेप लावला आणि सूज लवकरच उतरली.
        आश्रमातील लोक विनोदाने म्हणत, "बापूंचा सहवास हवा असेल तर आजारी पडावं." आजारी माणसांच्या सगळ्या बारीकसारीक गोष्टी बापूंना माहीत असत. रुग्णाला स्पंजिग कसे करावे, मसाज कसा करावा, एनिमामध्ये किती सोडा आणि किती मीठ घालावे तेही सांगत. त्यांनी सेवाग्राममध्ये एक तास रुग्णासाठी द्यायला सुरुवात केली तेव्हा जवळपासच्या गावातून खूप रुग्ण येऊ लागले. गांधीजींचा सल्ला असे-भाज्या खा, ताक प्या, मातीच्या पट्ट्या लावा.कधी कधी ते रुग्णांची विष्टा तपासत.
  संदर्भ-बहुरूप गांधी   लेखक -अनु बंदोपाध्याय
  संग्राहक -राजेंद्र पवार
           ९८५०७८११७८

शनिवार, ११ मे, २०१९

                                           !! शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष !!
       गांधीजींचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीवर्षं त्यानिमित्ताने "बहुरूपी गांधी " या पुस्तकातून गांधीजींच्या विविध रूपावर प्रकाशझोत टाकणारी लेखमाला क्रमश आपणास वाचनासाठी , अभ्यासासाठी सादर करत आहोत.
                                                         !!   कर्मवीर  !!
                   गांधीजी म्हणत की आपण गवंडी, चांभार, सुतार, लोहार, न्हावी यांना आपल्यापेक्षा कमी दर्जाचं मानलं. त्यांच्या व्यवसायाबद्धल सहानुभूती दाखवली नाही. कौशल्यपूर्ण कामांना खालच्या दर्जाचं मानलं आणि कारकुनीला वरचा दर्जा दिला आणि यातून गुलामगिरीला आमंत्रण दिलं.
            गांधीजी रोज पहाटे जात्यावर गव्हाचं पीठ दळत आणि  नंतर नीटनेटका पोशाख करून पाच मैल चालत आपल्या  कचेरीत जात. कपड्याना इस्त्री करत. ते कुष्ठरोग्याच्या जखमा धूत आणि मुताऱ्या स्वच्छ करायचीही त्यांना लाज वाटत नसे. भय आणि तिरस्कार हे शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हते.
            गांधीजी त्यांच्या वृत्तपत्रासाठी लेख लिहीत, स्वतःच टंकलेखन करत . पुस्तक बांधणी कलादेखील त्यांना  अवगत होती. हातमागावर कापड विणत, शिवणकाम करत, फळांची झाडं वाढवत, विहिरीतून पाणी आणणे, लाकूड तोडणे, गाडीतून जड माल उतरुन घेणे यातदेखील ते मागे नसत.
         गांधीजी अगदी तरुण वयात ४०-४० मैल चालत जाऊन दुकानातून सामान खरेदी करत असत. गांधीजी रोज १८ तास काम करीत कधी कधी तर कामाचे तास २१ होत. त्यांच्या कामावरच्या लोकविलक्षण श्रद्धेबद्धल आणि क्षमतेबध्दल दक्षिण आफ्रिकेतील  त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना ''कर्मवीर" ही पदवी दिली.
 संग्राहक -- राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...