मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०२४

!!खडकवासला अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत विशाल घोरपडे अव्वलस्थानी !!

 !!खडकवासला अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत विशाल घोरपडे अव्वलस्थानी !!

    रविवार दिनांक १७ नोव्हेंबर रोजी बावधन ब्रिगेड स्पोर्ट्स फाउंडेशन पुणे यांनी खडकवासला अल्ट्रा रनचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सातारा येथील विशाल घोरपडे आणि डॉ .सुधीर पवार यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी ही स्पर्धा १३:२०:५३  तेरा तास वीस मिनिट आणि त्रेपन सेकंदात पूर्ण केली.



थोडेसे स्पर्धा ठिकाणाविषयी :

                 खडकवासला हा पुण्याच्या पश्चिमेकडील भाग: हा परिसर गर्द झाडी साठीसाठीही प्रसिद्ध आहे.खडकवासला धरणाला प्रदिक्षणा घालावयाची होती. या रुट्वर अनेक  टेकड्या चढनं आणि उतरणं असा भाग होता. आपल्याला सातारा हील मॅरेथॉन माहीत आहे. ती देशातल्या अवघड पाच स्पर्धात मोडते. तिच्या पाचपट अवघड असणारी ही स्पर्धा विशालने विक्रमी वेळेत पूर्ण केली. या स्पर्धेत २९०० मीटर एवढे एलेव्हेशन होते. ही स्पर्धा सातारा येथील दोन दुर्गवेड्या तरुणांनी पूर्ण केली. या स्पर्धेत देशभरातील नामवंत अथलेटनी सहभाग घेतला होता . विशाल आणि डॉ.सुधीर पवार यांनी सातारा जिल्ह्याचे नाव या अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये रोशन केले.

                विशाल आणि मी एकत्रच सराव करतो. सराव करत असताना डोंगर चढनं आणि उतरणं हा नित्याचाच भाग होता. हे यश प्रचंड इच्छाशक्तीचे प्रतिक आहे. शिष्याने रनिंगमध्ये विक्रम केल्याचा विशेष आनंद होतो आहे. सातारा येथे रनिंग संस्कृती रुजते आहे आणि त्याचा राज्यभर डंका वाजत असल्याचा विशेष अभिमान आहे.

               विशाल आणि त्यांच्या बरोबर असणारे डॉ. सुधीर पवार  यांनी जगभरात यशाची शिखरे पादाक्रांत करावीत आणि ते पाहण्याचे भाग्य आम्हास लाभावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

      राजेंद्र पवार

रविवार, ४ ऑगस्ट, २०२४

शिवकृपा सहकारी पतपेढी "दीपस्तंभ" पुरस्काराने सन्मानित

 शिवकृपा सहकारी पतपेढी "दीपस्तंभ" पुरस्काराने सन्मानित

                  महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने ज्या पतसंस्थांची उलाढाल १००० कोटीपेक्षा अधिक आहे अशा गटातून महाराष्ट्र  राज्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कॉसमॉस सहकारी बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत रामोजी फिल्म सिटी हैद्राबाद येथे शिवकृपाला देण्यात आला. पुरस्काराचा स्वीकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोरख चव्हाण,संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष चंद्रकांत वंजारी, संचालक शिरीष देशमुख, नरहर देव, बाळासाहेब मोहिते, राजेंद्र पवार, हिंदुराव कदम, सुरेश संकपाळ,विजय घोरपडे, संतोष चव्हाण, किशोर माने, ओमकार भोसले, रमेश चव्हाण, शुभांगी वंजारी, पूनम जगदाळे यांनी केला. पुरस्कार वितरण समारंभा वेळी निवेदक संस्थेची सद्याची वाटचाल, संस्थेतील आदर्श बाबींचा उल्लेख करत होते. पुरस्कार प्राप्त संस्थांना बाहुबलीचा वेश परिधान केलेले युवक व्यासपिठाकडे घेऊन जात होते. वाद्यांचा तालसुर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत होता. पुरस्कार प्राप्त संस्थांमध्ये शिवकृपा ही सगळ्यात मोठी संस्था होती. दीपस्तंभ पुरस्कार मिळाल्याने शिवकृपाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

     शिवकृपा सहकारी पतपेढी विषयी थोडंसं....

                शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड, मुंबईची स्थापना १९८२ ला विक्रोळी येथील शिवमंदिरात झाल्याने नाव शिवकृपा. संस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे संस्था उभारणीत मोलाचे योगदान आहे. गत वर्षापासून चव्हाणसाहेब व वंजारीसाहेब यांनी पुन्हा पदभार स्वीकारून नव्या जोमाने कामाला सुरुवात केली. वर्षभरात संस्थेने गरुडभरारी घेतली. सध्या संस्थेचा समिंश्र व्यवसाय ४७०० कोटीवर पोहोचला आहे. थोड्याच दिवसात ५००० कोटीचा टप्पा संस्था पार करेल यात संदेह नाही.

              आपण कोणत्याही संस्थेत झोकून देऊन काम केले तर  सन्मानास पात्र ठरतो. आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रात करावे व सर्वोच्च पदाला जावे असे मनोमन वाटते.

      राजेंद्र पवार 

  संचालक, शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड,मुंबई

८१६९४३१३०६

सोमवार, २९ जुलै, २०२४

!! पुणे ते बारामती आरोग्यवारी १०० किलोमीटर (२८ जुलै २०२४)

 !! पुणे ते बारामती आरोग्यवारी १०० किलोमीटर (२८ जुलै २०२४)

                   महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढ दिवसानिमित्त रिले रनचे आयोजन केले होते. यामध्ये स्पर्धक १०,२१,५० आणि १०० किलोमीटरमध्ये भाग घेऊ शकत होते.मी १०० किलोमीटरच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. ही स्पर्धा पहाटे ४ वाजता सारसबाग पुणे येथून मान्यवरांच्या हस्ते फ्लॅग ऑफने सुरु झाली. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांक काढले जाणार नव्हते. ही स्पर्धा पूर्ण करणे एवढेच अपेक्षित होते. ही स्पर्धा पूर्ण करणे हेच मोठे स्पर्धकापुढे आव्हान होते.




                 आपणा सर्वांच्या कृपाआशीर्वादाने ते आव्हान पूर्ण  करता आले.स्पर्धा सुरु झाल्यानंतर स्पर्धकांच्यापुढे त्यांचा जोश वाढवण्यासाठी एका खास जीपचे आयोजन केले होते. त्यामध्ये गाणी वाजवली जात होती त्यामुळे गाण्यांच्या ताला - सुरावर स्पर्धकांचे पाय भिरकत होते. आजचा स्पर्धेचा मार्ग हा हडपसर, दिवेघाट, झेंडेवाडी, सासवड, मल्हारगड -जेजुरी, मोरगाव, कऱ्हावागज, नेवसेवस्ती, बारामती असा होता. 

                आज वातावरण खुपचं छान होते, निसर्गराजा जणू आमच्या स्वागतासाठी बरसात करत होता. संपर्ण स्पर्धा मार्गावर तुषार सिंचन होत होते असे  म्हटले तर वावगे होणार नाही. पावसामुळे स्पर्धक चिंब होऊन जात होते.संपूर्ण दिवसभर सूर्य नारायणाचे दर्शन झाले नाही. ही बाब स्पर्धकासाठी पोषक ठरली. मला तर या वातावरणाचा फायदा झाला. मार्गामध्ये शारिरीक क्षमतेचा कस बघणारा दिवेघाट सर्व रनर्सची जणू  कठीण परीक्षा घेत होता. बारामतीकरांचा रूट सपोर्ट हा नेहमीच छान असतो असे ऐकून होतो आज त्याचा प्रत्यय आला. प्रत्येक दोन किलोमीटरवर  हायड्रेशन पॉईंट होते त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्याची काहीच अडचण आली नाही. आज ही स्पर्धा पूर्ण झाल्यानंतरचा आनंद हा अवर्णनीय आहे. या वयात मोठ्या स्पर्धेत भाग घेणे आणि ती पूर्ण करणे हेच एक मोठे आव्हान असते. ते आव्हान लिलया पेलले. 

                     १०० किलोमीटरची स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर सत्कार समारंभाचे आयोजन नटराज सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री आदरणीय संजय बनसोडेसाहेब उपस्थित होते त्यांच्या हस्ते आमचा सन्मान करण्यात आला.यावेळी जयदादा पवार, जिल्हा क्रीडाधिकारी, तालुका क्रीडाधिकारी, फाऊंडेशनचे अध्यक्ष सतिश ननावरे उपस्थित होते. फाऊंडेशनचे अध्यक्ष ननावरे सरांनी प्रास्ताविक केले. अजितदादा पवार यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी गत पाच वर्षापासून या स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्याला उत्तम प्रतिसाद लाभत असल्याचे त्यांनी सांगितले. १०० किलोमीटर अंतर पूर्ण  करणाऱ्यांचा सत्कार मा.क्रीडा मंत्री संजय बनसोडे व जयदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धा मार्गावर जेजुरी जवळ आमचे बंधू डॉ. दत्ता भोसले आणि त्यांच्या सर्व कुटुंबीयांची भेट दिली. त्यांनी दिलेले प्रोत्साहन आणि इनर्जी फूडने आमचा उत्साह द्विगुणित झाला. आज प्रोत्साहन देण्यासाठी शिवकृपाचे संचालक रमेश चव्हाण हेही आले होते. आज माझ्यासोबत विशाल  घोरपडे, ओंकार पोतेकर होते त्यांच्या साह्याने मला ही स्पर्धा  नियोजित वेळेत पूर्ण करणे शक्य झाले. आरोग्यासाठी चालणे, धावणे हा उत्तम मार्ग आहे.

                   आपणही आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी चालणे, धावणे किंवा कोणताही व्यायाम प्रकार निवडावा,त्यात भाग घ्यावा आपले आरोग्य चांगले राखावे असे वाटते.

  राजेंद्र पवार 

  संचालक, शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड, मुंबई 

  ९८५०७८११७८

  ८१६९४३१३०६

सोमवार, २२ जुलै, २०२४

वयाच्या ६५ व्या वर्षी प्रोकॅम स्लॅम मुंबई - बेंगलुरु - दिल्ली- कोलकत्ता यशस्वीरित्या पूर्ण

वयाच्या ६५ व्या वर्षी प्रोकॅम स्लॅम मुंबई - बेंगलुरु - दिल्ली- कोलकत्ता यशस्वीरित्या पूर्ण

             मी  मे २०१७ ला नियत  वयोमानानुसार सेवानिवृत्त झालो. निवृत्तीनंतर उद्योजक श्रीकांत पवार यांच्या प्रेरणेने सेवा निवृत्तीनंतर मॅरेथॉन स्पर्धामध्ये भाग घेण्यास सुरुवात केली.प्रथमत सातारा हील मॅरेथॉनमध्ये  भाग घेतला. पहिल्याच प्रयत्नात दोन तास तेरा मिनिटात ही अवघड स्पर्धा पूर्ण केली. मी या स्पर्धेपूर्वी कोठेही भाग घेतला नव्हता. नंतर मात्र मी वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेऊ लागलो. बऱ्याच स्पर्धात मी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त केले.


           मी १० किलोमीटरपासून १०० किलोमीटर स्पर्धेत भाग घेतला. सातारा येथील धावपटू अनिल माने यांच्यामुळे प्रोकॅम स्लॅममध्ये भाग घेतला. या प्रोकॅम स्लॅममध्ये सन २०२३ मध्ये भाग घेतला. प्रथम मी १५ जानेवारी २०२३ ला  टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये ४२ किलोमीटर मध्ये भाग घेतला. ही स्पर्धा ४:३३:५८ (चार तास तेहतीस मिनिटे व अट्टावन सेकंदात) पूर्ण केली. पहिल्याच प्रयत्नात दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या कॉम्रेड रनसाठी पात्र ठरलो. टीसीएस १० के बेंगलुरु ही स्पर्धा  २१ मे २०२३ रोजी ( १० किलोमीटरची )स्पर्धा झाली. ही स्पर्धा ५० :२६ ( पन्नास मिनिटे सव्वीस सेकंदात ) पूर्ण केली. दिल्ली येथे १६ ऑक्टोबर २०२३ वेदांता दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. ही स्पर्धा १:४९:४२ ( एक तास एकोन पन्नास मिनिटे आणि बेचाळीस सेकंदात ) पूर्ण केली. टाटा स्टील कोलकत्ता ही पंचवीस किलोमीटरची स्पर्धा १७ डिसेंबर २०२३ रोजी कोलकत्ता येथे झाली मी ही स्पर्धा २:२१:१७ ( दोन तास एकवीस मिनिटे सतरा सेकंदात ) पूर्ण केली.

             या चारही स्पर्धा मी एका वर्षात पूर्ण केल्या. सातारा येथील सात आठ लोकांनी प्रोकॅम पूर्ण केल्याबद्दल वृत्तपत्रांनी देखील आम्हाला चांगलीच प्रसिध्दी दिली. प्रो कॅम पूर्ण केल्याबद्दल संयोजकाच्या वतीने आज मला गिफ्ट मिळाले. गिफ्टमध्ये चारही स्पर्धेतील आमचे धावतानाचे फोटो, कॅप, टी शर्ट आदि साहित्य मिळाले.

      आपण सातत्यपूर्ण सराव केला तर अशा स्पर्धेत भाग घेऊ शकतो तो आपण घ्यावा असे मला वाटते.

      राजेंद्र पवार 

 ९८५०७८११७८

८१६९४३१३०६

मंगळवार, १६ जुलै, २०२४

!! पाऊले चालती पंढरीची वाट ( दिवस सतरावा १६ जुलै)

 !! पाऊले चालती पंढरीची वाट ( दिवस सतरावा १६ जुलै)

           आमचा कालचा मुक्काम वाखरीनजिक गणेश पाटील यांच्या वडाच्या वस्तीवर होता. आज पालखी उशिरा मार्गस्थ होणार असल्याने आम्ही थोडं निवांतच होतो. काल रात्री पाऊस पडल्याने वारकऱ्यांना पावसापासून बचाव करण्यासाठी खूपच कसरत करावी लागली. आज सकाळी छानपैकी सत्संग झाला. आज दुपारी अडीच वाजता ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीसाठी मार्गस्थ झाला. सुरुवातीचा काही काळ पालखी सोहळ्यात चालणे झाले. नंतर मात्र एकाएका जागेवर अर्धा तास, एक तास थांबावे लागे.



                  आमच्या पुढे संत तुकाराम महाराजांची पालखी होती. वाखरी ते पंढरपूर हे अंतर केवळ पाच किलोमीटर असून ते पार करण्यासाठी लागणारा वेळ मात्र आठ, नऊ तासांचा होता. प्रत्येक दिंडी विविध प्रकारचे खेळ खेळण्यात व्यस्त होत्या. हे खेळ पाहणे, विविध पालख्यांची दर्शन घेणे यासाठी दुतर्फा गर्दी होती.







                  आज रथ ओढण्याचा मान पंढरपूर येथील वडार समाजाला आहे. पंढरपूर येथील अनेक लोक माउलींना आणण्यासाठी वाखरीच्या  दिशेने जातात.विठूरायाच्या  दर्शनासाठी आसुसलेले वारकरी बेभान होऊन नाचत असल्याचे सर्वत्र दिसून येत होते. प्रत्येक पालखी चंद्रभागेला येतेच. तेथे आरती होते.  माऊलींच्या मंदिरात  आरती होते. दिंडी चालकांच्या घरीदेखील आरती होते.मगच वारीची सांगता होते.

                 या वेळची वारी सफल होण्यामध्ये दिलीप चव्हाण, गोरख चव्हाण, ज्ञानेश्वर सावंत, सुधाकर अमृतकर, शिरीष देशमुख, सी.बी. पवार आदि मंडळींचा वाटा आहे.  पुन्हा पुन्हा वारी घडावी हीच पांडुरंग चरणी प्रार्थना.

      राम कृष्ण हरी 

       राजेंद्र पवार 

        संचालक, शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड,मुंबई

 ९८५०७८११७८

८१६९४३१३०६

!! पाऊले चालती पंढरीची वाट (दिवस सोळावा १५ जुलै)

 !! पाऊले चालती पंढरीची वाट (दिवस सोळावा १५ जुलै) 

                आमचा भंडीशेगावचा मुक्काम ज्ञानेश्वर यलमार यांच्या घरी  होता. आज पालखी उशिरा मार्गस्थ होणार असल्याने पहाटे लवकर उठण्याची आवशक्यता नव्हती. आज ज्ञानदीप को - ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची पंगत होती. या पंक्तीतच सकाळच्या भोजनाचा आस्वाद घेतला. भंडीशेगावला संत तुकाराम, सोपानदेव आदि पालख्या एकत्र आल्याने सर्वत्र गर्दीचा महापूर दिसत होता.





          आज दुपारी एक वाजता माऊलींची पालखी वाखरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. आज दिंड्या पुढे सरकण्याचा वेग अत्यल्प होता. ज्ञानबा - तुकारामाचा  गजर सर्वत्र वाऱ्याच्या लाटेप्रमाणे येत होता. पालखी तळापासून साधारण अडीच किलोमीटर अंतरावर उभे रिंगण झाले. रस्त्याच्या दुतर्फा गर्दी वाढत चालली होती. थोड्याच वेळात बाजीरावाची विहीर हे ठिकाण आले. याठिकाणी पालखी मार्गावर सर्वात मोठे रिंगण असते. या रिंगणात मोठ्या प्रमाणात खेळ खेळले जातात. येथे अनेक मानवी मनोरे पाहायला मिळतात. टाळ मृदंगाच्या गजरात फुगड्या खेळताना पाहिले. रिंगण पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांची भरपूर गर्दी असते. हे रिंगण मोठे असल्याने अनेक दिंड्याना आत येण्याची संधी मिळाली. प्रत्येक दिंडी आपले वेगळेपण खेळाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतात. गर्दी नियंत्रणात आणणे, त्यांना शिस्त लावणे यामध्ये पोलिसांची मोठी कसरत असते. वाखरीचा पालखी तळ  हा सर्वात मोठा तळ आहे. एखादी व्यक्ती गर्दीत चुकली तर त्यांना अपेक्षित ठिकाण सापडणे खूप अवघड आहे. फोनच्या माध्यमातून संपर्क होणे अवघड आहे.

       आज रस्त्यावर वारकऱ्याशिवाय आपण काहीच पाहू शकत नव्हतो. आज राष्ट्रीय सेवा योजनेची जलसंवर्धन दिंडी पाहायला मिळाली. सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे या दिंडीचे नेतृत्व करीत होते. गेल्या २० वर्षांपासून या दिंडीचा उपक्रम चालवला जातो. यावर्षी जलसंवर्धन ही थीम घेऊन ही दिंडी चालली आहे. या दिंडीचे नेतृत्व शरदचंद्र पवार महाविद्यालय जेजुरीचे प्रा. डॉ. राजकुमार रिकामे करतात. रिकामे सर खऱ्या अर्थाने कामसू वाटले.या दिंडीत पूणेसह अमरावती, जळगाव, सोलापूर आदि सात विद्यापीठे सामील झाली आहेत. या दिंडीत १४० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. पथनाट्य, भारुड, कीर्तन या माध्यमातून जनतेचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला जातो. ही मुले दमलेल्या वारकऱ्यांच्या पायांना मसाज करतात. रिंगणात पोलिसांना मदत करतात. जलसंवर्धन करण्यासाठी शासन राबवत असलेले उपक्रम पथनाट्याद्वारे सांगितले जातात, यामध्ये टॉप टू बॉटम पाणी अडवणे, सी.सी.टी.चरी काढणे, गाळमुक्त धरण, मातीचे बंधारे बांधणे आदि योजनांची माहिती दिली  जात होती.

 आपण सर्वजण जलसंवर्धनासाठी प्रयत्न करुया.पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवूया.

       राजेंद्र पवार 

        संचालक, शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड,मुंबई

 ९८५०७८११७८

 ८१६९४३१३०६

सोमवार, १५ जुलै, २०२४

!! पाऊले चालती पंढरीची वाट ( दिवस पंधरावा १४ जुलै)

 !! पाऊले चालती पंढरीची वाट (  दिवस पंधरावा १४ जुलै)

   आमचा कालचा मुक्काम वेळापूर येथे कुमार पवार यांच्या घरी होता. पंढरीच्या वाटेवर सेवा करण्यात लोक अजिबात कमी पडत नाहीत. आज सकाळी साडेसहा वाजता पालखी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. थोड्याच वेळात ठाकूर बुवा समाधी स्थळ उघडेवाडी येथे आजचा रिंगण सोहळा पार पडला. रिंगण पाहण्यासाठी सर्वच ठिकाणी भरपूर गर्दी असते. रिंगणात दोन अश्व धावत असतात. एका अश्व माऊलींचा असे मानले जाते. थोडक्यात सांगायचे म्हटले तर त्यावर माऊली विराजमान आहेत असे मानले जाते. हा अश्व रिंगणात धावत असताना त्याच्या पायाखालची माती घेण्यासाठी लोकांची झुंबड उडालेली असते. प्रत्येक ठिकाणच्या रिंगण सोहळा मनोहारी असतो.


             या रिंगण सोहळ्यानंतर तोंडले - बोंडले ही गावे येतात. तोंडले येथे एक मोठा ओढा आहे. निवृत्ती ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताई ही भावंडे पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूर येथे जात असताना या ओढ्यातील पाण्यात खेळण्यात रंगून गेले होते. या पाण्यात स्नान केले होते. आता काळ बदलला आहे.ओढ्यावर भला मोठा पूल झाला आहे. परंपरा जपण्याच्या उद्देशाने तेथे शॉवरच्या माध्यमातून लोकांना चिंब करण्याचा प्रयत्न केला जातो. एवढे सगळे केले तरी एकमेकांना भिजवण्याचा आनंद काही वारकऱ्यांना मिळत नाही.

                   तोंडले  येथेच दुपारचे भोजन घेतले. आज शिवकृपाचे अध्यक्ष गोरख चव्हाण यांची दिंडीसाठी पंगत होती त्यामध्येच दुपारचे भोजन घेतले. आज संत सोपानकाका यांची पालखी, संत तुकाराम महाराजांची पालखी एकत्र आल्या. दसुर गावच्या हद्दीत संत सोपानकाका व ज्ञानेश्वर माउलीं  या बंधूंची भेट झाली. भेटीच्या वेळी माऊलींचा अश्व आत डोकावून पादुकांचे दर्शन घेतो. दोन्ही पालख्या जवळ येतात. एकमेकांना हार घालतात. दर्शनासाठी राज्यातील अनेक मान्यवर येत असतात. दर्शनासाठी माजी आरोग्य मंत्री  यांनीही भेट दिली होती.

       आज बऱ्याच ठिकाणी भावाभावात पटत नाही. त्यामुळे आपले खूप नुकसान होते. आजच्या बंधूभेटीचा आदर्श घेऊन भावाभावांचे संबंध कसे दृढ होतील, स्नेह कसा वृद्धिंगत होईल हे पाहावे असे वाटते.

 राजेंद्र पवार 

   संचालक, शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड, मुंबई 

 ९८५०७८११७८

८१६९४३१३०६

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...