मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०२३

जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवणे गरजेचे : डॉ. भूषण यादगीरवार

            शेतीतील  आधुनिक बदल जाणून घेण्याच्या उद्देश्याने दिनांक २१ नोव्हेंबर रोजी आम्ही कृषी विज्ञान केंद्र, बोरगावला सदिच्छा भेट दिली. शेतीतील पीक पध्दतीविषयी चर्चा झाली. आपण अधिक उत्पादन वाढविण्यासाठी  रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वारेमाप वापर करत असतो. खते जादा टाकल्यामुळे उत्पादन वाढते असे नाही. जादा उत्पादनासाठी जमिनीचा सेंद्रिय कर्ब चांगला असणे गरजेचे आहे.


           सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी शेणखत,लेंडीखत, गांडूळ खत,जीवामृत यांचा वापर करणे गरजेचे असल्याचे मत बोरगाव येथील विषय विशेषज्ञ भूषण यादगीरवार यांनी व्यक्त केले. या खतामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो. या भेटीच्यावेळी  माझ्यासह मानसिंग पवार, राजकुमार काळंगे, उद्योजक श्रीकांत पवार, नामदेव पवार, एकनाथ मालुसरे आदी होते.

          यावेळी सोलर एनर्जीचा वापर करुन  जीवामृत तयार केल्याचे दिसून आले. बोरगावच्या प्रक्षेत्रावर आंबा फळबाग पाहता आली. बागेत पाल्याचे ढीग दिसून आले. या पाल्याचे कंपोस्ट करुन (कुजवून) झाडाच्या बुंध्याशी घातले जाते. थोडक्यात आपण कोणत्याही परिस्थितीत पालापाचोळा पेटवू नये. ऊस शेतीचा विचार करता कोणत्याही परिस्थितीत पिकाला पाटपाणी देऊ नये. उसाची वाढ पहिले आठ महिनेच होत असते. पाटपाण्याने पिकाची अन्नग्रहण क्षमता मंदावते. ड्रीपमुळे पीक सतत वाफसा स्थितीत राहते. वाफसा स्थितीत पीक असेल तरच पिकाची जोमदार वाढ होते.

       आपल्या भागातआंबा फळबाग लागवड  वाढत आहे.या पिकात मोहोर येण्यासाठी पाण्याचा ताण देणे आवश्यक आहे. प्रथम वर्षी झाड लावल्यानंतर अडीच फूट   उंचीवर झाडे छाटली पाहिजेत. झाडाच्या बुंध्याशी सूर्यप्रकाश येईल याची काळजी घ्यायला हवी. थोडक्यात सांगायचे झाले तर पाणी देण्याच्या पद्धती, फळबाग लागवड, खत व्यवस्थापन, पिकांचा पक्व होण्याच्या कालावधी या सर्व बाबींचा शास्त्रशुध्द विचार करायला हवा.

        शेतीत यशस्वी व्हायचे असेल प्रथम त्याकडे व्यवसाय म्हणून पाहायला पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करायला हवा, शेतीतील सेंद्रिय कर्ब वाढवायला हवे असे वाटते.

     राजेंद्र पवार

    ९८५०७८११७८

   ८१६९४३१३०६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...