रविवार, १५ ऑक्टोबर, २०२३

२१ किलोमीटर मधील माझी सर्वोत्तम वेळ - Vendanta Delhi Half Marathon 2023

 Vendanta Delhi Half Marathon 2023

 आज दिनांक १५ ऑक्टोबर दिल्ली येथे वेदांता हाफ मॅरेथॉनचे आयोजन केले होते.मी या हाफ मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. माझ्याबरोबर सातारा येथील स.पो.नि.संदीप जाधव, शरद चव्हाण, निलेश माने, आशा माने, आल्मास मुलाणी, स्वाथम फिटनेस क्लबचे डॉ. दयानंद घाडगे, अविनाश सुतार, मच्छिंद्र फडतरे, राजेंद्र रासकर आदि सहभागी झाले होते.




       आज ही स्पर्धा पहाटे ५:२० वाजता सुरु झाली. स्पर्धेचा प्रारंभ हवाई दल व भूदल वरिष्ठ  अधिकाऱ्यांच्या हस्ते  ध्वज उंचावून केला. आवाज स्पष्ट न आल्याने त्यांची नावे  मात्र समजू शकली नाहीत. स्पर्धेच्या स्टार्टलाइन पर्यंत पोहचन्यासाठी अनेक अडथळ्याची शर्यत पार करावी लागत होती. स्टार्टलाइनपर्यंत तीन ठिकाणी धातू शोधक यंत्राला सामोरे जावे लागत होते. स्पर्धकांच्या यापूर्वीच्या कामगिरीनुसार ए.बी.सी. डी. ई . अशा  लाइननुसार प्रवेश दिला जात होता.मला बी.लाइनमध्ये उभे राहण्याची संधी मिळाली होती थोडक्यात त्या परिसरात स्पर्धकांशिवाय  कोणासही प्रवेश नव्हता. 

      आज मी ही स्पर्धा १:४९:४१ (एक तास एकोणपन्नास मिनिटे आणि एक्केचाळीस सेकंदात) पूर्ण केली. आजचे माझे टायमिंग खूपच छान आले. आजच्या यशाचे श्रेय माझे स्नेही, रनगुरु अल्ट्रारनर विशाल घोरपडे यांना समर्पित करतो. त्यांनी वेळोवेळी माझ्याकडून सराव करुन घेतला. आज माझे मार्गदर्शक निलेश माने आणि डॉ. दयानंद घाडगे यांनीही या स्पर्धेत भाग घेतला होता. सातारा येथील सर्वच स्पर्धकांनी अतिशय चांगली कामगिरी करुन देशाच्या राजधानीत सातारचा झेंडा फडकवला. 

      स्पर्धा रुटचा विचार करता, अतिशय देखणे नियोजन होते असेच म्हणावे लागेल. संपूर्ण स्पर्धा मार्गावर अनेक वळणे होती त्यामुळे दिसणारे दृश्य अतिशय नयनरम्य होते. वाद्यवृंदाचा ठेका स्पर्धकांना प्रोत्साहित करत नव्हता तर त्या ठेक्यावर त्यांची पावले गती पकडत होती. संपूर्ण स्पर्धा मार्गावर अनेक स्वागत कमानी उभ्या केल्या होत्या. जणू काही सर्व स्पर्धा मार्ग सजवला होता. सर्वच वातावरण अतिशय प्रेरणादायी होते. आज दिल्लीमध्ये संपूर्ण देश पाहायला मिळाला. देश प्रेमाने भारलेले वातावरण देशाची एकता घट्ट करत होते असे वाटते. भिन्न प्रांतातून स्पर्धक आले होते. विविधतेत एकता पाहायला मिळत होती.

      आपण स्पर्धेत भाग घेतला तर शारीरिक दृष्ट्या तंदुरस्त राहतो. आपणामध्ये आपोआपच खिलाडू वृत्ती येते.आपली कार्यक्षमता वाढते. आपण कोणत्याही अडचणीस सामोरे जाण्यास सक्षम होतो म्हणून प्रत्येकाने आवडणाऱ्या खेळात सहभागी व्हावे. आवडीचा  छंद जोपासावा आणि आपल्या रुपाने देशाला एक तंदुरस्त नागरिक मिळावा असे वाटते.

       राजेंद्र पवार

    ९८५०७८११७८

     ८१६९४३१३०६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...