!! आम्ही आज साजरी केलेली कर्मवीर जयंती !! (२२ सप्टेंबर )
२२ सप्टेंबर हा कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म दिवस. आजच्याच दिवशी २२ सप्टेंबर १८८७ या दिवशी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म झाला होता. कर्मवीर जयंती रयत शिक्षण संस्थेच्या शाळा, कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते, इतकेच नव्हे तर इतर अनेक शैक्षणिक संस्था देखील हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात.
मी वर्णे येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना अनेक वेळा अण्णांचा जयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला होता. रयत शिक्षण संस्था ही अन्य छोट्या छोट्या संस्थांची मातृ संस्था आहे. आज या संस्थेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचे चित्र बदलले आहे. मी ही या संस्थेचा लाभार्थी आहे. माझे माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण याच संस्थेत झाले आहे. या संस्थेमुळेच आम्ही सक्षमपणे काम करु शकलो तसेच करत आहे अशी माझी रास्त भावना आहे. मी यापूर्वी अनेकदा संस्थेतील जयंती, पुण्यतिथी कार्यक्रमास उपस्थित राहिलो आहे.
आज मात्र कर्मवीर भाऊराव पाटील अर्थात सर्व रयतेचे अण्णा आणि रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांना अभिवादन करण्यासाठी चिंचणेरहून विशाल घोरपडे यांच्या समवेत रात्री दोन वाजता धावत निघालो. पहाटे तीन वाजता कर्मवीर समाधी परिसरात पोहोचलो. मुख्य गेटला कुलूप लावले होते, आम्ही विनंती केली आणि दरवाजा उघडला गेला.
आम्ही अगदी जवळून अण्णांच्या समाधीवर नतमस्तक झालो. समाधी परिसरात ज्योत प्रज्वलित केली होती तेथे फोटो काढण्याचा मोह आवरु शकलो नाही. यापूर्वी अशा रितीने अभिवादन करता आले नव्हते. आज खऱ्या अर्थाने कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. यानंतर पोवई नाक्यावरील छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. आजचा दिवस कायमच आमच्या स्मरणात राहील. आज आम्ही पहाटे २० किलोमीटर एवढे अंतर धावलो. पहाटेच्या वेळी धावण्याचा आनंद वेगळाच असतो.
विशाल घोरपडे आणि मी असे नवनवीन संकल्प करत असतो व ते सिध्दीस नेण्याचा प्रयत्न करत असतो. यापूर्वी देखील अशा अनेक ठिकाणांना भेटी दिल्या आहेत तेथून अक्षय ऊर्जा घेऊन पुढील वाटचाल चालू आहे. हा सत्संगाचा परिणाम आहे असे वाटते. आपण चांगल्या व्यक्तींच्या सानिध्यात असाल तर आपले जीवन उजळून निघते. प्रत्येकानेच सत्संगाची कास धरावी आणि आपले जीवन बदलून टाकावे असे वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
८१६९४३१३०६
सर,मनःपूर्वक धन्यवाद व खूप अभिमानास्पद
उत्तर द्याहटवा