!!आमची नर्मदा परिक्रमा !!(१०४ )१० मार्च
आमचा कालचा मुक्काम नरसिंहपूर जिल्ह्यातील बरिया घाट येथे होता. या आश्रमाजवळ सिध्द वटवृक्ष आहे. सिध्दवट वृक्ष म्हणजे ज्या वडाच्या १०८ पेक्षा जास्त पारंब्या पुन्हा जमीनीमध्ये शिरलेल्या आहेत त्याला सिध्द वटवृक्ष असे म्हणतात. आज आम्ही नेहमीप्रमाणे चालण्यास सुरुवात केली. दुपारपर्यंतचा मार्ग पूर्णपणे नदी किनाऱ्याने होता. गव्हाच्या शेतीचा नेहमीचाच अनुभव होता. फक्त स्प्रिंकलरचा अनुभव मिळाला नाही. आज आम्ही होशंगाबाद जिल्ह्यात प्रवेश केला आहे.
आज वाटेत खैर, सांडिया, सिवनी, सर्रा, सहलवाडा ही महत्वाची गावे तर पासी घाट, सांडिया घाट हे घाटही लागले. आज सांडिया घाटावर खूपच गर्दी पाहायला मिळाली. पूजेचे साहित्य विक्रीची अनेक दुकाने नदीपात्राच्या कडेला उभारली होती. येथे एक भंडाऱ्याचा कार्यक्रमही होता. आजचा भोजन प्रसाद भंडाऱ्यात घ्यावा या हेतूने आमची पावले त्या मंडपाकडे वळली. भोजन प्रसादास वेळ होता तरीही आम्ही तेथेच थांबलो. नर्मदा मैय्यात अनेकजण स्नानाचा आनंद लुटत होते. उन्हाचा चटका असल्याने आम्हीही स्नानाचा आनंद लुटला.
पिपरीया गावातील लछुभाई सोदा यांनी गाडीने नर्मदा परिक्रमा केली त्याप्रित्यर्थ भंडाऱ्याचे नियोजन केले होते. हा सर्व धार्मिक विधी पाहण्यात आला. या कार्यक्रमास मुली आणि महिलांची भरपूर गर्दी होती. या मंडपात महिला अधिकारी आल्या त्यांनी महिला व मुलींना सायबर गुन्हे याबद्दल माहिती द्यायला सुरुवात केली. गुन्हे कसे घडतात याबाबत महिला व मुलींचे समुपदेशन केले. आज मोबाईलचे युग आहे. जसा मोबाईल आपल्या फायद्याचा आहे. त्यांच्यामध्ये अनेक अँप्लिकेशन आहेत. बॅटरी, घड्याळ, कॅलक्यूलेटर, नोटपॅड, अशा अनेक बाबी आहेत. जसे अनेक फायदे आहेत तसे तोटेदेखील आहेत. आपल्याला काही मेसेज येतात की तुम्हाला बक्षीस मिळाले आहे. बक्षीस म्हटले की आपण हुरळून जातो. फोनवरच आपण सर्व माहिती देतो, मोहात गुरफुटून जातो आणि आपला बँक बॅलन्स संपवून टाकतो. थोडक्यात आर्थिक गुन्हे घडतात. असे गुन्हे घडू नयेत यासाठी आपण सतर्क राहिले पाहिजे.
मोबाईलमुळे मुलींच्यासंदर्भात अनेक गुन्हे घडत आहेत. अगदी अल्पवयीन मुली मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे पळून जात आहेत. फेसबुक फ्रेंड हा वाईट प्रकार आहे. आपल्या मुलींना मोबाईलचा योग्य वापर करण्यासाठी समजावले पाहिजे. आपल्या मुली कोणाशी, किती वेळ बोलत आहेत हे आपण जाणून घेतले पाहिजे. मोबाईल दुधारी शस्त्र आहे त्याचा योग्य वापर होण्यासाठी पालकांनी सतर्क राहायला हवे. मोबाईलचा योग्य वापर होण्यासाठी आपण मुलींना योग्य ती समज दिली पाहिजे की ज्यामुळे अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याच्या प्रकारावर निर्बंध आणता येईल. याबाबत पोलीस अधिकार्यांनी माहिती दिली.
चला आपल्या घरातील मुला-मुलींना मोबाईल वापराचे योग्य शिक्षण देऊया आणि होणाऱ्या अनर्थ घटना टाळूया.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#narmada #narmadamai #narmadariver #narmadaparikrama #shivaputri #shiv #satarakar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा