!! आमची नर्मदा परिक्रमा !!( १०२ ) ८ मार्च
आमचा कालचा मुक्काम नरसिंहपूर जिल्ह्यातील कोठीया गावातील हनुमान मंदिराच्या आश्रमात होता.वीज व पाण्याची गैरसोय असल्याने थोडे उशिराच निघालो. वाटेत नरवारा गावात कुलदीप कौरव यांच्या गुऱ्हाळघरात ऊसाचा रस तसेच गुळही घेतला. आजचा रस्ता थोडा बराच म्हणावा लागेल मात्र स्प्रिंकलर व चिखलाने आमची पाठ सोडली नाही. आजही गाळपेर असणारा गव्हाचा साधारण ५ किलोमीटरचा मोठा पट्टा पाहण्यात आला. असा सलग गव्हाचा पट्टा फार कमी वेळा पाहण्यात आला होता. वाटेत ककरा घाट लागला, ककरा घाटावर भाविकांची बरीच गर्दी होती. घाटाच्या अगदीजवळ साधारण एक किलोमीटर अंतरावर दंडवत परिक्रमा करणारी काही भाविक आढळून आले. साधारण तीस किलोमीटर अंतरावरुन दंडवत परिक्रमा करत ककरा घाटापर्यंत ते आले होते. नर्मदा मैय्याबद्दल अतिव आदर त्यांच्याकडून व्यक्त होत होता. आज आम्ही दुपारचा भोजन प्रसाद भटेरा येथील राजेश राजपूत यांच्या घरी घेतला.आज वाटेत बिझुआ, भटेरा, रिझवार ही महत्वाची गावे लागली.
आज आम्ही नरसिंहपूर जिल्ह्यातील शोकलपूर येथे तुलाराम पटेल यांच्या घरी थांबलो आहोत. तुलाराम पटेल हे आमचे मित्र गणपत पाठक यांचे स्नेही आहेत. श्रीयुत पटेल यांनी नुकतीच पाठक साहेबांच्याबरोबर मोटार सायकलवर परिक्रमा केली होती.एक परिक्रमा किती लोकांना जवळ आणते याचे प्रत्यंतर आज आम्हास आले.
शोकलपूर येथे प्राचीन शुकलेश्वर महादेव मंदिर आहे. हे फार पुरातन तीर्थक्षेत्र असून याचा नर्मदा पुराणात उल्लेख आहे.याच गावात संस्कृत पाठशाळा असून येथे शक्कर नदीचा संगमदेखील आहे. नर्मदा तीरावर अनेक तीर्थक्षेत्रे आहेत याची परिक्रमेमुळे माहिती मिळत आहे.
आज पाहिलेली दंडवत परिक्रमा मनाला खूपच भावली. परमेश्वरावर श्रद्धा असेल तर आपणास कोणताच त्रास वाटत नाही. आपण एखादे काम श्रध्दायुक्त भावनेने केले तर कामाचा त्रास तर वाटत नाही उलट ते काम दर्जेदार होते. चला तर आपणास मिळालेले काम श्रध्दायुक्त भावनेने करुया, कामाचा आनंद मिळवूया.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#narmada #narmadamai #narmadariver #narmadaparikrama #shivaputri #shiv #satarakar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा