बुधवार, ९ मार्च, २०२२

!!आमची नर्मदा परिक्रमा !! (१०३ ) ९ मार्च

 !!आमची नर्मदा परिक्रमा !! (१०३ ) ९ मार्च 

           आमचा कालचा मुक्काम नरसिंहपूर जिल्ह्यातील शोकलपूर गावी तुलाराम पटेल यांच्या घरी होता. आज सकाळी रस्ता भूलभुलैय्या करणारा असल्याने थोडे उशिराच चालण्यास सुरुवात केली. उशिरा सुरुवात करुन देखील नियोजित मार्गाने जाता आले नाहीच.सकाळच्या टप्प्यात नदी किनाऱ्यानेच चालत आलो. सतत चढ उतार असणारा रस्ता आम्हाला लगेचच दमवत होता. गाळपेर रस्ता, छातीइतका गहू, मधेच मोठमोठाले नाले त्यातून मार्ग काढत आमची वाटचाल चालू होती. कधी कधी आमचं आम्हालाही कळत नव्हतं ,आम्ही योग्य दिशेने वाटचाल करत आहोत की नाही.





           आजही स्प्रिंकलरने चांगलाच जलाभिषेक केला.दुपारी जलाभिषेक झाला तर बरे वाटते मात्र त्याचवेळी खाली चिखल झालेला असतो. पायवाट असल्याने चिखलमय रस्त्यातून मार्ग काढणे कसरतीचे असते. आज दुपारी महुआखेडा येथील आश्रमात भोजन प्रसाद घेतला. हा आश्रम खूपच छान आहे. एखाद्या पर्यटन स्थळासारखी येथील रचना वाटली.

           आज महाराष्ट्रीयन पध्दतीचे भोजन मिळाले त्याला कारणही तसेच होते कारण सेवा करणारे सर्व महाराष्ट्रीयन होते. त्यांच्या सेवा कार्याबद्दल थोडीसी माहिती आपणाला दिली पाहिजे. पलीकडच्या तीरावर अंडीया घाट आहे. या घाटावर महाराष्ट्रीयन लोक क्रमाक्रमाने सेवा देण्यासाठी येत असतात. ही सेवा पंधरा दिवसांसाठी देत असतात. यांचा कालावधी संपला की दुसरी टीम सेवा देण्यासाठी तयार असते.सध्या ही टीम दोन्ही घाटावर सेवा देत आहे. त्यांचा नामोल्लेख करायलाच हवा. सौ. व श्री. संजय सदलगेकर (बेळगाव ),सौ. व श्री.तळेकर (सांगली ), श्री. विजय पाटील, श्री. खाडे, श्री. शिंदे, श्री. पी. कुलकर्णी (कोल्हापूर ) हे परिक्रमावासीयांची सेवा करत आहेत.

           आज आमच्या मार्गावर ऊसराय, टूयियापानी, पिपरानी, महूआखेडा, पीटरस, झाकोली, निमावर ही महत्वाची गावे लागली.आजचा मुक्काम  सांदूक येथील बरिया घाट येथे आहे. आज महुआखेडा येथील प्रसंग बरंच काही शिकवून गेला. परिक्रमावासीयांची सेवा करण्यासाठी महाराष्ट्राची एकामागून एक टीम येत असते. प्रत्येकाला वैयक्तीक प्रपंच असतोच. आधी करावा प्रपंच नंतर करावा परमार्थ, याप्रमाणे सर्व महाराष्ट्रीयन लोक वागत आहेत. या मंडळींच्या सेवेतून " जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा" दिसून येत आहे.

        आपणही आपला प्रपंच करत करत शक्य तेवढी जनसेवा करावी असे मला वाटते.

    राजेंद्र पवार

  ९८५०७८११७८

 #narmada #narmadamai #narmadariver #narmadaparikrama #shivaputri #shiv #satarakar 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...