!!आमची नर्मदा परिक्रमा !! (९९ )५ मार्च
आमचा कालचा मुक्काम करोली येथील आश्रमात होता. सध्या उन्हाचा चटका लागत असल्याने दुपारी फारसे चालणे होत नाही. सकाळी लवकरच थांबावे लागते. आजही आम्ही पूर्णपणे नदीकिनाऱ्यावरून चाललो आहोत. नर्मदा मैय्याची विविध रुपे पाहण्यास मिळत आहेत. नरसिंहपूर जिल्ह्यात दोन्हीही काठावर मोठ्या प्रमाणात गाळपेर आहे. या गाळ पेरातून चालणे खूपच अवघड आहे.
शेतकरी स्प्रिंकलरने पाणी देतात त्यामुळे बऱ्याच ठिकाणी चिखलातून जावे लागले. स्प्रिंकलरच्या पाण्यात अनेकदा भिजावे लागते. नदीकाठच्या गावातील लोक एका तिरावरून दुसऱ्या तीरावर जाण्यासाठी बोटीचा सर्रास वापर करतात. एका ठिकाणी नदीत इंजिन बोटीने वाळू उपसा करण्याचे काम चालले होते. नर्मदा मैय्या कित्येक कोटी लोकांच्यावर उपकार करत आहे हेच यातून दिसून येते. काठावर गहू पीक मोठ्या प्रमाणावर असून अधून मधून अन्य पिके आहेत. एका ठिकाणी धन्याचे खूप मोठे क्षेत्र होते, त्यावर असंख्य मधमाशांची गुनगुन पाहायला मिळाली.
आज दुपारचा भोजन प्रसाद ब्रह्मकुंड येथे मिळाला. आज बऱ्याच ठिकाणी वालुकाश्म खडक पाहायला मिळाले. असे खडक केवळ दाबाने तयार होतात. आजचा मुक्काम नरसिंहपूर जिल्ह्यातील गुडवारा नावाच्या गावात आहे. आज मार्गात मुआर घाट, जमुनिया, ब्रह्मकुंड, सिध्देश्वर, बुध घाट, साकल आदी गावे लागली.
भौगोलिक दृष्ट्या नदीचा अभ्यास करायचा म्हटले तर सुरुवातीस नदीचा वेग जास्त असतो तेथे अनेक धबधबे पाहायला मिळतात तर जेथे नदीचा प्रवाह संथ असतो तेथे वाळूचा संचय होत असतो. सध्या वाळू उपसा होत आहे परंतु तो पूर्वी होत नव्हता त्यामुळे वालुकाश्म खडक तयार झालेले आहेत. आपण एखाद्या ठिकाणी भेट दिली तर त्या ठिकाणची इत्यंभूत माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्या ज्ञानात भर पडेल असे मला वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#narmada #narmadamai #narmadariver #narmadaparikrama #shivaputri #shiv #satarakar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा