!! आमची नर्मदा परिक्रमा !! (९८ )४ मार्च
आमचा कालचा मुक्काम जबलपूर जिल्ह्यातील सगडा या गावी होता. आम्ही सकाळी लवकरच चालण्यास सुरुवात केली. आज बराचसा रस्ता पायवाटेचा, निसरडा होता. शेतात पाणी देत असल्याने बऱ्याच ठिकाणी चिखलातून चालावे लागले. चिखलातून चालताना खूपच त्रास झाला. या परिसरात तुषार सिंचन पध्दतीने पाणी देण्याची पध्दती आहे. या तुषार सिंचनामुळे वारंवार भिजण्याची संधी मिळाली. अगदी सुरुवातीलाच संगमरवरी दगडाची खाण दिसून आली. आज दुपारचा भोजन प्रसाद भिकमपूर गावात धनु बर्मन यांच्या घरी मिळाला. भिकमपूरजवळ सनया नावाची नदी लागली. आम्ही त्या नदीत स्नानच केले नाही तर कपडेसुध्दा धुतली.या नदीच्या अलीकडे नरसिंहपूर जिल्हा सुरु होतो. लगेचच रेल्वे लाईन लागते. रेल्वे ब्रिजपासून नदीकाठचा मार्ग सुरु होतो. आज वाटेत भडपुरा, भिकमपूर, झाशी घाट, बेलखेडी ही महत्वाची गावे लागली. आमचा आजचा मुक्काम करोली येथील आश्रमात आहे.
आज दुपारनंतर आम्ही पूर्णपणे नदीकाठाने चाललो.मध्येच झाशी घाट लागला. या घाटावर भाविकांची बरीच गर्दी होती. या ठिकाणी असणाऱ्या पुलाची रचना वेगळी वाटली. नदीकाठी गाळपेर केलेला गहू होता. हा गहू म्हणजे एक प्रकारचे लॉनच वाटत होते. या ठिकाणी मला बालकवींच्या कवितेच्या काही ओळी आठवतात -
"हिरवे हिरवे गार गालिचे,
हरित तृणांच्या मखमालीचे "
अगदी अशीच गव्हाची स्थिती होती. जमीन चढ उतार असणारी असली तरी तिचा पूर्ण वापर केला होता. बऱ्याचवेळा चढ उतार असणारी जमीन पडीक ठेवली जाते. मात्र याठिकाणी तिचा पूर्णपणे वापर केलेला दिसत होता. आपणही जेवढी जमीन पिकाखाली आणता येईल तेवढी आणली पाहिजे. बांधावर फळझाडे लावता येऊ शकतात. झाडांमुळे पक्ष्यांना निवारा मिळतो. हेच पक्षी कीटक नियंत्रणाचे काम करतात. थोडक्यात जमिनीचा पूर्ण वापर करता आला पाहिजे असे मला वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#narmada #narmadamai #narmadariver #narmadaparikrama #shivaputri #shiv #satarakar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा