गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

!! आमची नर्मदा परिक्रमा !!(८६ )२० फेब्रुवारी

 !! आमची नर्मदा परिक्रमा !!(८६ ) २०  फेब्रुवारी

        आमचा कालचा मुक्काम अमरकंटकच्या  पायथ्याशी फेरीसेमर येथे होता. पाण्याची गैरसोय असल्याने आम्ही तेथून लवकर निघालो व नर्मदातटी असणाऱ्या रामकुटी येथे आलो. तेथे स्नान व पूजा आटोपली. या आश्रमात नारबतसिंग पाटले हे सेवा देतात.

           अमरकंटक पर्यंतचा सर्व भाग जंगलमय आहे. येथे मार्ग चुकण्याची शक्यता जास्त असते. रस्ता चुकू नये यासाठी पाटले स्वतः आले आणि त्यांनी रस्ता दाखवला. त्यांचा सेवाभाव वाखानण्याजोगा होता. जंगलातील  पाच किलोमीटरची पायपिट करुन प्रथम दुधधारा ठिकाणाला भेट दिली. येथील प्रवाह दुधासारखा फेसाळलेला दिसतो. याठिकाणी दुर्वास ऋषींनी तपस्या केली आहे. जवळच कपिलधारा स्थळ आहे. उंचावरुन पडणार पाणी मोठा आवाज करताना दिसून आले. हा धबधबा लोकांना आकर्षित करत आहे. याठिकाणी पर्यटकांची गर्दी भरपूर होती. वाटेत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा पुतळा पाहायला मिळाला. याच शहरात हर्बल गार्डनसुध्दा पाहायला मिळाली. याच शहरात जवाहर नवोदय विद्यालयदेखील आहे.










         दुपारी आम्ही माईका बगीचा येथे  नर्मदा पूजन केले. नंतर आम्ही नर्मदा कुंड येथे आलो. हे नर्मदा नदीचे उगमस्थान आहे. याच परिसरात नर्मदा मंदिर, सिध्देश्वर महादेव, राम जानकी मंदिर अशी मंदिरे आहेत. आज परिक्रमेचा महत्वाचा टप्पा पूर्ण केल्याचा मनस्वी आनंद झाला. आज आम्ही आरुंडी गुफा आश्रमात  थांबलो आहोत.

    आपणास अमरकंटकबद्दल अधिक माहिती द्यायलाच हवी.

       अमरकंटक हे नर्मदा नदी , सोन  नदीचे उगमस्थान आहे . हिंदूंसाठी हे पवित्र स्थान आहे . मैकल टेकड्यांमध्ये  अमरकंटक हे मध्यप्रदेशातील अनुपपूर जिल्ह्यातील लोकप्रिय हिंदू तीर्थक्षेत्र आहे. याच ठिकाणी समुद्रसपाटीपासून १०६५ मीटर उंचीवर मध्य भारतातील विंध्य आणि सातपुडा टेकड्या मिळतात. नर्मदा आणि सोन नद्या अमरकंटकमधून उगम पावतात, सागवान आणि महुआच्या झाडांनी वेढलेल्या आहेत. येथून पश्चिमेला नर्मदा नदी आणि सोन नदीपूर्व दिशेने वाहते. येथील सुंदर धबधबे, पवित्र तलाव, उंच टेकड्या आणि प्रसन्न वातावरण पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात. निसर्गप्रेमी आणि धार्मिक लोकांना हे ठिकाण खूप आवडते. अमरकंटक अनेक परंपरा आणि दंतकथांशी निगडीत आहे. असे म्हणतात की भगवान शिवाची कन्या नर्मदा ही जीवनदायी नदीच्या रूपात येथून वाहते. दुर्गेची मूर्ती मानली जाणारी माता नर्मदा यांना समर्पित अनेक मंदिरे आहेत. अमरकंटक हे अनेक आयुर्वेदिक वनस्पतींसाठी देखील प्रसिद्ध आहे, ज्यांना पौराणिक कथांनुसार जीवनदायी गुणधर्म आहेत असे मानले जाते. येथे आदिवासी गोंड जातीचे लोक राहतात. 

      अमरकंटक हे अध्यात्मिकदृष्ट्या तसेच पर्यटनाच्या दृष्टीने खूपच महत्वाचे ठिकाण आहे. आपण एकदातरी अशा स्थळांना भेटी द्यायला हव्यात असे वाटते.

    राजेंद्र पवार 

   ९८५०७८११७८

#narmada #narmadamai #narmadariver #narmadaparikrama #shivaputri #shiv #satarakar 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...