!! आमची नर्मदा परिक्रमा !! (७६)
आमचा कालचा मुक्काम जबलपूर जिल्ह्यातील शहपुरा तालुक्यातील उमरिया येथील हनुमान मंदिरात होता. या ठिकाणी नव्याने मंदिर उभारणीचे काम चालू आहे. गाव लहानच फक्त ऐंशी घरांचे आहे पण ग्रामस्थांची एकजूट खूपच लक्षवेधक होती. नर्मदातटी अनेक गावात पहाटे प्रभातफेरी पहावयास मिळाली. तेच दृश्य या गावातही पाहिले. यामध्ये दोन व्यक्ती असतात. यामध्ये पितळी थाळी व टाळ वाजवत श्रीरामाचा गजर करत गावातून फेरी काढली जाते. नंतर मंदिरात येऊन थोडा वेळ देवाचे (भजन ) नामस्मरण करतात.
आज वाटेत नटवरा, सरई, किसरोद, सहजपुर आदी गावे लागली. सकाळी नटवरा गावातील रतनलाल पटेल यांनी आम्हास दूध व बिस्किटे खायला दिली. हायवेवर आश्रमांची संख्या कमी असल्याने आज आम्ही किसरोद येथील सरोबर ढाबा येथे सकाळचे जेवण घेतले. सहजपुर येथे तात्पुरत्या स्वरुपात मंडी (बाजार समिती ) निर्माण करण्यात आली होती.
या परिसरात भाजीपाला लागवड फार मोठया प्रमाणावर होत असल्याचे दिसते. रस्त्याने वाटाणा भरलेल्या भरपूर गाड्या पाहायला मिळाल्या.
वेअर हाऊस तर पावलोपावली दिसत आहेत. भेडाघाटापासून पुन्हा नदीकिनाऱ्याने मार्गक्रमण केले. भेडा घाटापूर्वी सरस्वती घाट लागतो . तेथे आम्ही स्नानही केले. भेडाघाट हे संगमरवरी सौंदर्यासाठी व झऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे १०० फूट उंचावरून पाणी पडते. येथे पाण्याचा मोठा आवाज होतो. येथे नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते.
या परिसरात जशी प्रभातफेरी काढली जाते तशी आपल्याकडे गावे मोठी असल्याने ते शक्य नाही परंतु ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पहाटे ५ वाजता अलार्म लावू शकतो जेणेकरुन ग्रामस्थ पहाटे उठतील व आपल्या दैनंदिन कामाला लागतील. असा प्रयोग गावोगावी करायला हवा असे वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा #satara #satarakar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा