!! आमची नर्मदा परिक्रमा !!( ७५ ) " मुल सुरक्षित आईच्या कुशीत, धान्य सुरक्षित आमच्या वखारीत"
आमचा कालचा मुक्काम धूमगढ येथे शंकराचार्य आश्रमामध्ये होता. आज सकाळी आम्ही लवकर चालण्यास सुरुवात केली. थोडे अंतर गेलो नाही तोच पावसास सुरुवात झाली. भिजायला नको म्हणून वाटेत एका घरी थांबलो. क्षणार्धात पावसाने विश्रांती घेतली. वाटेत हिरण्या नावाची नदी लागली ती ओलांडून पुढे येत नाही तोच पुन्हा जोरदार पाऊस बरसाय लागला.
आम्ही शेजारीच पावला गावच्या हद्दीत असणाऱ्या देवेन पटेल यांच्या घराचा आधार घेतला. आज सकाळी पाण्याची अडचण असल्याने आम्ही उशिरा स्नान करण्याचा निर्णय घेतला होता.आम्ही पावला येथेच स्नान आणि पूजाही केली. सकाळी त्यांच्या घरीच भोजन प्रसाद घेतला. पावसामुळे नदीकिनाऱ्याने न जाता राष्ट्रीय महामार्गाने जायचा निर्णय घेतला. जयपूर जबलपूर हा मार्ग एन. एच.१२ असा आहे.
आज वाटेत हिरापूर, जुगपुरा, सुंद्रादेही, बेलखेडा, जमखार, मनकेडी, इमलिया ही गावे लागली. आजचा मुक्काम जबलपूर जिल्ह्यातील उमरिया येथे आहे. या परिसरात वाटाण्याचे पीक मोठ्या प्रमाणावर दिसून आले. या ठिकाणावरून देशाच्या अनेक भागात हा माल जात असल्याचे दिसून आले. या परिसरात वेअर हाऊसची संख्या जास्त दिसून आली. आपल्याला माल लगेच विकायचा नसेल तर वेअर हाऊसमध्ये ठेवता येतो. पूर्वी वेअर हाऊस संबंधी एक जाहिरात वाचनात यायची. " मुल सुरक्षित आईच्या कुशीत, धान्य सुरक्षित आमच्या वखारीत" अगदी याप्रमाणे शेतमाल वेअर हाऊसमध्ये सुरक्षित राहतो.
आपणही आपल्याला एखादा शेतमाल लवकर विकायचा नसेल तर तो वेअर हाऊसला ठेवला पाहिजे. योग्य दर आल्यानंतर तो विकता येतो. या मालावर आपणास कर्जदेखील मिळते. चला तर आपणही या सुविधेचा लाभ घेऊया.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा #satara #satarakar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा