आमची नर्मदा परिक्रमा !! (७३ )
आमचा कालचा मुक्काम सिद्धेश्वर मंदिर बरमान घाट येथे होता. ज्यावेळी आम्ही नर्मदा किनारी असतो त्यावेळी नर्मदेत स्नानाचा आनंद लुटतो. आज तो आनंद लुटला इतकेच नव्हे तर घाटावर आरती, पूजा केली आणि पुढील मार्गक्रमणासाठी सज्ज झालो. या घाटापासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर सतधारा येथे हरिहर आश्रम आहे. याठिकाणी परिक्रमावासीयांची निवास व भोजन व्यवस्था अतिशय उत्तम होते त्या ठिकानाचाही लाभ लोकांनी घ्यायला हवा. आम्ही येथे बालभोग (अल्पोपहार) घेतला. पुढे कुंडी गावात करण यादव यांनी आम्हास दुध दिले.
आज वाटेत कुंडी, गुरसी, गोकला, रमपुरा आदी गावे पाहायला मिळाली. आजचा मुक्काम नरसिंहपूर जिल्ह्यात केरपानी येथे आहे. आज नर्मदेची विविध रुपे पाहायला मिळाली. सतधारा ,रमपुरा आणि धुवांधार या तिन्ही ठिकाणी नर्मदा मैय्या खडक फोडून पुढे झेपावत आहे. मध्येच काही ठिकाणी बेटासारखे रुप पाहता आले. नर्मदाअष्टकामध्ये तोडीतान, तोडीतान, तुडडड, तूडडड असे वर्णन आहे.अगदी असा आवाज करीत नर्मदा मैय्या पुढे जात आहे. आज दुपारचा भोजन प्रसाद सिध्दतपोवन परमहंस आश्रम, छोटा धुवांधार येथे घेतला. याच ठिकाणी गुहा असल्याचे आम्हास सांगितले.
आजचा संपूर्ण रस्ता चढ उताराचाच होता. गहू, हरभरा, मसूर ही पिके मोठ्या प्रमाणात दिसत होती तर तुरळक प्रमाणात ऊसाचे पीक दिसत होते. मात्र ऊसाचे कोणतेच पीक तजेलदार वाटले नाही. याठिकाणी गुऱ्हाळघराला ऊस जात असल्याचे दिसून आले. हरभरा व मसूर ही दोन्ही पिके साधारण एकाच वर्गातील वाटत आहेत. कृषी अर्थशास्त्र पाहिले असता हरभरा पिकापेक्षा मसूर पीक जास्त फायदेशीर असल्याचे सांगितले. जे पीक अधिक फायदेशीर आहे त्याकडेच आपण वळले पाहिजे असे मला वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा #satara #satarakar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा