!! आमची नर्मदा परिक्रमा !! (७२ ) बरमान घाट
आमचा कालचा मुक्काम नरसिंहपूर जिल्ह्यातील करौदी येथे होता. आज या परिसरात कडाक्याची थंडी होती. हाता पायाची बोटं सुंभ पडली होती. या भागातील थंडी काय असते हे आम्ही चांगले अनुभवले. आज आम्ही ३० किलोमीटर चाललो. आज वाटेत बिलथारी, सरीया, झिरी, रुकवारा, चावरपाठा ही गावे लागली. आज संपूर्ण मार्गावर चढ उताराचा रस्ता होता. मात्र शेवटच्या सहा-सात किलोमीटरचा रस्ता चांगला होता. आज सकाळी आम्ही बिलथारी येथील राम जानकी मंदिरातील आरतीलाही उपस्थिती लावली.
आजचा मुक्काम बरमान घाट येथे आहे. आज सकाळी बिलथारी येथे निलेश पटेल यांनी तर सरिया येथे संगिता कहार यांनी बालभोग (अल्पोपहार ) दिला. त्यांनी बाल भोगासाठी दूध, लाडू, चिवडा असा खाऊ दिला. संगिताताईनी तर भोजनासाठी खूप आग्रह केला पण सकाळी दहाची वेळ असल्याने आम्ही थांबलो नाही पण त्यांचा आग्रह विसरु शकत नाही. आम्ही दुपारचा भोजन प्रसाद छतरपूर येथे मुन्नीभाई यांच्या घरी घेतला. येथे घरातील वाया जाणाऱ्या पाण्यावर भाजीपाला लागवड केली आहे.
आजचा मुक्काम बरमान घाट येथे आहे त्यामुळे तुम्हाला बरमान घाटाविषयी माहिती सांगितलीच पाहिजे.
बरमान घाट याविषयी माहिती......
बरमान घाट नरसिंहपूर जिल्ह्यातील एक धार्मिक स्थळ आहे.या स्थळाविषयी लोकांच्या मनात खूप मोठी आस्था आहे. हा घाट नर्मदा नदीच्या तीरावर असून नरसिंहपूर जिल्ह्यातील एक प्रेक्षणीय तसेच धार्मिक स्थळ आहे.
ही भगवान ब्रम्हाची तपोभूमी म्हणून ओळखली जाते. याला ब्रम्ह घाट असेही म्हटले जाते. या घाटाजवळ अनेक मंदिरे आहेत. या घाटावर मकरसंक्रातीला खूप गर्दी असते. या नदीत स्नान करुन नर्मदा मैय्याला प्रसन्न करण्यासाठी पूजा केली जाते. नंतर तिळाचे लाडू, खिचडीचे सेवन भाविक करतात.
मकर संक्रांती तसेच नर्मदा जयंतीला याठिकाणी खूप गर्दी असते. अशा ठिकाणी प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी भेट द्यायला हवी असे वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा #satara #satarakar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा