!! आमची नर्मदा परिक्रमा !! (७४ )नर्मदा जयंती
आमचा कालचा मुक्काम केरपानी या ठिकाणी होता. आज नर्मदा जयंती असल्याने नदीवर स्नान तर केलेच आणि पूजाही केली. थोडे उशीराच चालण्यास सुरुवात केली. आज वाटेत पिठेरा, मुर्गाखेडा, डोंगरगाव, रोहनी, कुरेला, आमोदा ही गावे लागली. डोंगरगाव येथील आश्रम बंद झाल्याने आम्ही दुपारचा भोजन प्रसाद त्याच गावातील भोला विश्वकर्मा व मुन्नीबाई विश्वकर्मा यांचे घरी घेतला. आज सर्वत्र नर्मदा जयंतीचा माहोल होता. वाद्यांचा गजर होत होता. जयंतीनिमित्त नर्मदा मातेस चुनरी(साडी) समर्पित करतात. दोन्ही तटावर दोन बांबू उभे केलेले असतात, दोरीच्या साह्याने चुनरी (साडी)या टोकापासून त्या टोकापर्यंत बांधली जाते. नदीत दिवे सोडले जातात. नंतर भंडाऱ्याचा कार्यक्रम होतो. नर्मदा जयंतीबाबत थोडी माहिती आपणास सांगितलीच पाहिजे.
नर्मदा जयंती ही माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमीला साजरी केली जाते. या ठिकाणी दोन दिवस जयंती साजरी होत आहे. आपल्याकडे जशी मकरसंक्रांत एखाद्या वर्षी १४ जानेवारीच्याऐवजी १५ जानेवारीला साजरी होते तशी आज सर्वत्र ८ फेब्रुवारीला नर्मदा जयंती साजरी होत आहे. नर्मदा ही भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक नदी आहे. नर्मदेचे वर्णन रामायण, महाभारत आदि धर्मग्रंथात पहायला मिळते.
धार्मिक ग्रंथात सप्तमीला जयंती साजरी करावी असा स्पष्ट उल्लेख आहे. नर्मदा जीवनदायिनी आहे. संपूर्ण विश्वात ही एक रहस्यमय नदी आहे. चार वेदात नर्मदेचा महिमा वर्णिलेला आहे. असे म्हटले जाते की, भगवान शंकरांनी अमरकंटक येथे १२ वर्षाच्या कन्येच्या रुपात नर्मदेस निर्माण(उत्पन्न ) केले आहे. कोणत्याही प्रलयात नाश होणार नाही असे वरदान नर्मदेने शिवशंकर यांचेकडून प्राप्त केले होते. प्रत्येक दगड विना प्राण प्रतिष्ठेशिवाय पूजला जाईल असेही वचन घेतले.
१२ ज्योतिर्लिंगापैकी एक प्रसिद्ध असे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग नर्मदातटी आहे. याशिवाय भृगुक्षेत्र, शंखोद्वार, धूतताप, कोटीश्वर, ब्रह्मतीर्थ, भास्करतीर्थ, गौतमेश्वर,सोमेश्वर तीर्थ अशी ५५ तीर्थे नर्मदेच्या वेगवेगळ्या घाटावर आहेत. सध्याच्या स्थितीत काही तीर्थे गुप्त स्वरूपात आहेत. स्कंद व मत्स्य पुरानानुसार नर्मदा ही प्रलय काळात स्थिर राहणारी, जिच्या केवळ दर्शनाने आपल्या जीवनात पवित्रता येते. नर्मदा नदीचा ५ मोठ्या तर ७ पवित्र नद्यामध्ये समावेश होतो. गंगा, यमुना, नर्मदा यांना सामवेद, यजुर्वेद, ऋग्वेद समान मानले जाते. महर्षी मार्कंडेय यांच्या म्हणण्यानुसार दोन्ही तटावर प्रत्येक कण अन कण शिवशंकराचेच रुप आहे.
येथे स्नान केल्याने किंवा केवळ नर्मदा मैय्याच्या दर्शनाने पुण्य प्राप्त होते असे म्हटले जाते. नर्मदा हा शब्दच एक मंत्र आहे. नर्मदा किनारी अनेक तपस्विनी साधना केली आहे.
नर्मदा अवतरणाबाबत कथा:
एक वेळ भगवान शिव कल्यानार्थ तपस्या करण्यासाठी मेखल पर्वतावर पोहोचले. त्यांच्या घामाच्या धारांनी एक कुंड तयार झाले. या कुंडातून एक बालिका उत्पन्न झाली की जिला शांकरी व नर्मदा असे म्हटले जाते. तिला रेवा असेही म्हटले जाते. नर्मदा मैय्या बाबत खूप माहिती आहे ती यथावकाश दिली जाईल.
आजचा मुक्काम शंकराचार्य गुरु कृपा आश्रम धूमगढ ता.जि. नरसिंहपूर येथे आहे. येथील मठ खूपच भव्य आहे. आपल्या जीवनात नदीला खूप महत्व आहे. नदीमुळे सर्वांचेच जीवन बदलून जाते. आपण सर्वचजण नद्यांची काळजी घेऊया. त्या प्रदूषित होणार नाहीत याची दक्षता घेऊया.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा #satara #satarakar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा