!!आमची नर्मदा परिक्रमा !! (५९ )
आमचा कालचा मुक्काम टीपरास येथील राम मंदिरात होता. सकाळी आम्हाला नदी ओलांडून जावे लागणार होते त्यामुळे आम्ही थोडे उशीराच चालण्यास सुरुवात केली. वाटेत दतोनी नावाची नदी ओलांडण्यासाठी नावेचा उपयोग झाला. आजचा मुक्काम नेमावरच्या पाठीमागे ५ किलोमीटरवर बजवाडा नावाच्या गावात आहे. आज वाटेत रवलास, तमखाना, राजोर, दावठा, मंडलेश्वर आदि गावे लागली. रवलास गावात आम्ही थोडा वेळ थांबलो होतो. प्रत्येक घराची रचना लक्ष वेधून घेत होती. छोटे ओटे, तेही शेणमातीने सरावलेले होते. अनेक घरांची प्रवेशद्वारे राजवाड्यासारखी होती.
आम्ही दुपारच्या भोजन प्रसादासाठी राजोर येथे थांबलो होतो. त्या घराचा दिवाणखाना एखाद्या संस्थानिकासारखा वाटत होता. येथील शेती नर्मदेच्या पाण्याने समृध्द झालेली आहे. जिकडे पहावे तिकडे गव्हाचा हिरवागार गालिचा दिसत होता. एका ठिकाणी छोट्या नदीत मोटारीचे जाळे दिसून आले, सगळ्या वायरी मोकळ्याच लोंबकळताना दिसत होत्या.पाणी उपसण्यासाठी मोटारींनी जणूकाही स्पर्धा सुरू केली होती.
रवलास गावाची ठेवण मनात घर करुन गेली. आखं गाव कसं सारवल्यासारखे वाटत होते. परमेश्वराचे दुसरे नाव स्वच्छता असे म्हटले जाते. आपणही आपलं घर, अंगण नेहमीच स्वच्छ ठेवायला हवं ,परमेश्वराला जवळ करायला हवे असे वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा #satara #satarakar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा