!! आमची नर्मदा परिक्रमा !! (५६ ) जयंती माता हे एक स्वयंभू स्थान
आमचा कालचा मुक्काम देवास जिल्ह्यातील रतनपूरच्या हनुमान मंदिरात होता. पुढील मुक्कामाचे ठिकाण जयंती माता मंदिर १० किलोमीटर अंतरावर असल्याने आम्ही उशिरा निघालो.सुरुवातीला तीन किलोमीटरवर बावडीखेडा नावाचे गाव आहे. तेथून सात किलोमीटर पुर्ण जंगल आहे. सर्व मार्ग पाऊलवाटेचा आहे. या मार्गात खाडी नावाची छोटी नदी लागली, ती ओलांडण्यासाठी तात्पुरता लाकडी पूल तयार केला होता.
जयंती माता हे एक स्वयंभू स्थान आहे. १०८ शक्तीपीठात या देवीचा समावेश होतो. मुघलांच्या काळात या मंदिरातील मूर्तीची तोडफोड करण्यात आली. येथे आता नव्याने मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. येथे खूप दुरवरून भाविक दर्शनासाठी येतात. लक्कड कोटच्या जंगल झाडीमध्ये हा परिसर रमणीय आहे. आजूबाजूला कसलीही लोकवस्ती नाही.
परिक्रमावासीयांची निवास व्यवस्था होण्याचे हे एकमेव स्थान आहे. येथून आणखी घनदाट जंगल सुरु होते. वन्यप्राण्यांचा अधिवास असणारा भाग असल्याने येथून फक्त सकाळीच लोकांनी जावे अशा सक्त सूचना आहेत. येथे लोकांनी समूहाने जाणे अपेक्षित आहे. एकट्याने चालणे खूपच धोकादायक आहे. आपण या जंगलाविषयीची माहिती उद्या घेणार आहोतच. जयंती माता मंदिरापासून थोड्याच अंतरावर भैरवनाथ गुफा आहे. गुफा पाहण्यासाठी शिडीचा मार्ग आहे. नदीत गुफाअसल्याने पाहणे सोपे नाही.
आज सकाळी दुधाच्या शोधार्थ रतनपूर येथे गेलो असता आम्हाला रामसिंह सोलंकी यांनी एक लिटर दुध दिले. पैसे देत असताना त्यांनी ते घेतले नाहीत. असे बऱ्याचवेळा घडलेले आहे. आपणही आपल्या घरी येणाऱ्या अतिथींचे आदराने स्वागत करावे असे वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा #satara #satarakar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा