!! आमची नर्मदा परिक्रमा !! ( ७९ )
आमचा कालचा मुक्काम जबलपूर जिल्ह्यातील धनपुरी येथे होता. धनपुरीमध्ये आम्ही सदाव्रताचा आनंद लुटला. धनपुरीहून आम्ही लवकर चालण्यास सुरुवात केली. थंडी काही कमी होत नाही. खऱ्याअर्थाने बोचऱ्या थंडीचा अनुभव आम्ही घेत आहोत असेच वाटते. आज आम्ही मंडला जिल्ह्यात प्रवेश केलेला आहे. प्रवेश करताच मनेरी येथील औद्योगिक वसाहत लागली. सकाळी सकाळी कामगार सायकलवरुन कामाला जात असताना दिसले. प्रत्येक जण "नर्मदे हर" म्हणून अभिवादन करत होते. दुपारीच सकरी याठिकाणी पोहोचलो तेथेच दुपारचा भोजन प्रसाद घेतला. आज वाटेत मनेरी, कोहानी, भदारी, हरदुली, ग्वारा, गुडलई आदी गावे लागली. आज मनेरी गावात अर्चना साहूयांनी आम्हास अल्पोपहार दिला. आज संपूर्ण मार्गाचा विचार करता रस्ता जरी डांबरी असला तरी जंगलाने वेढला होता. सर्वत्र सागाची झाडे पाहायला मिळाली. काही चालणे घाट रस्त्याने झाले. मंडला जिल्हा आदिवासीप्रणित आहे. आदिवासींच्या चालीरितीची माहिती मिळाली. मोहाची फुले एका ठिकाणी पाहायला मिळाली. आदिवासी लोक घरोघरी मोहापासून दारु बनवतात व सेवन करतात. शेतीचा विचार करता फारसी अनुकूल परिस्थिती नाही. ज्या ठिकाणी सखल भाग आहे तेथे गहू, वाटाणा शेती पाहायला मिळाली. सर्वत्र विंध्यचल पर्वतरांगा दिसत होत्या.
आजचा मुक्काम मंडला जिल्ह्यातील संग्रामपूर येथे राजेश मिश्रा यांच्या घरी आहे. राजेश मिश्रा आणि त्यांच्या सौभाग्यवती असीमा मिश्रा दोन्हीही शिक्षक आहेत. त्यांची मुलेही खूप कुशाग्र बुध्दीची आहेत. मोठा मुलगा ओम बी. एस्सी. करत आहे तर लहान मुलगा शुभ नववीच्या वर्गात शिकत आहे. एका आदर्श कुटुंबाला भेटल्याचा मनस्वी आनंद झाला. या कुटुंबाचा सेवाभाव वाखानण्यासारखा आहे. अशी कुटुंबे समाजात वाढली पाहिजेत असे वाटते.
या डोंगराळ परिसरात शेतीसाठी फारसी अनुकूल परिस्थिती नाही परंतु औद्योगिक वसाहतीमुळे चित्र बदलत आहे. ज्या ज्या ठिकाणी शेतीसाठी अनुकूल परिस्थिती नाही तेथे औद्योगिक वसाहती निर्माण व्हाव्यात असे प्रकर्षाने वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा #satara #satarakar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा