मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२

!! आमची नर्मदा परिक्रमा !! (८० )

 !! आमची नर्मदा परिक्रमा !! (८० )  राष्ट्रीय जीवाष्म उद्यान , आजचा दिवस ३४ किलोमीटरचा टप्पा 

     आमचा कालचा मुक्काम मंडला जिल्ह्यातील संग्रामपूर येथे राजेश मिश्रा यांच्या घरी होता.आज सकाळी आम्ही लवकरच निघालो. आज वाटेत बिझोली, बिसोरा, माणिकपूर, बिछिया, कंटगी, घुघुवा, मुतलवास, वंजरकुटी आदी गावे लागली. आजचा संपूर्ण मार्ग घाटाचा तसेच डोंगराळ होता. मध्ये मुक्कामाची सोय नसल्याने आज ३४ किलोमीटर चे अंतर पार करावे लागले. सर्वत्र विंध्यचलच्या डोंगररांगा दिसत होत्या. घाटातून येताना आम्हाला हरिणांची जोडी दिसून आली. मात्र ती कॅमेऱ्यात कैद करु शकलो नाही याची खंत वाटते. आज दुपारचा भोजन प्रसाद डिंडोरी जिल्ह्यातील बिछिया गावातील जितेंद्र पारवानी यांचेकडे घेतला. 







           आपल्या गावचे उद्योजक श्रीकांत पवार यांचे स्नेही शक्ती छत्रे हे मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील आहेत. शक्ती छत्रे यापूर्वी श्रीकांत पवार साहेबांच्याबरोबर वर्णे हायस्कूलमध्ये आले होते. ते हायस्कूलमध्ये आल्याने त्यांचा माझाही परिचय झाला होता. आज त्यांच्यामुळेच आमच्या भोजनाची व्यवस्था झाली इतकेच नव्हे तर  पारवानी परिवाराने आम्हाला दक्षिणाही दिली. परिक्रमेत आपणास काही अडचण आल्यास मदत करण्याचे अभिवचनही  जितेंद्र पारवानी यांनी दिले. आमचा आजचा मुक्काम शहपुरा येथील झारीया सेवा समितीच्या धर्मशाळेत आहे. येथील व्यवस्था खूप चांगली आहे.



        डिंडोरी जिल्ह्यातील घुघुवा येथे राष्ट्रीय जीवाष्म उद्यान आहे.  या उद्यानास आम्ही भेट दिली. जीवाष्म म्हटले की आपणास डायनासोर नजरेसमोर येतो. घुघुवा हा परिसर पूर्वी पूर्ण जंगलमय होता. येथील अनेक वृक्ष उन्मळून पडले होते. हजारो वर्षांपूर्वीची झाडे गाडली गेली. त्या झाडांचे खडकात रुपांतर झाले. मानवाची उत्क्रांती कशी झाली हे चित्र प्रदर्शनात दाखवण्यात आले आहे. खडकांची रचना पाहायला मिळाली. एखादा खडक किती वर्षां पूर्वीचा आहे हे संशोधनाद्वारे सांगता येते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून जिवाष्म पाहायला मिळाले. मानवाची उत्क्रांती कशी झाली हे नवीन पिढीला माहीत झालेच पाहिजे. विविध प्रदर्शनाच्या माध्यमातून देशातील कला, संस्कृती, इतिहास माहित झाला पाहिजे. लोकांना अधिक माहितीसाठी म्युझियम निर्माण झाली पाहिजेत, अशा म्युझियमला आपण भेटी द्यायला हव्यात असे वाटते.

   राजेंद्र पवार 

  ९८५०७८११७८ 

#narmada #narmadaparikrama #narmadariver #dindori #jivashma #shivaputri #narmadamai #narmadehar #shiva 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...