बुधवार, २ फेब्रुवारी, २०२२

!! आमची नर्मदा परिक्रमा !! ( ५३ )महासिध्द वटवृक्ष

 !! आमची नर्मदा परिक्रमा !! ( ५३ )महासिध्द वटवृक्ष

              आमचा कालचा मुक्काम श्री श्रीराम संस्थान नावघाट खेडी (बडवाह ) येथे होता.आम्ही सकाळी जवळच असणाऱ्या चारकेश्वर येथील संत श्री दगडुजी बापू धाम येथे गेलो. याठिकाणी प्राचीन शिव मंदिर आहे. या ठिकाणीच एक महाकाय वड आहे. येथे बापूजी जप, ध्यान,प्रवचन करीत असत. या वटवृक्षाला"महासिध्द वटवृक्ष" असे म्हटले जाते. शास्त्रानुसार ज्या वटवृक्षाच्या ११० फांद्या जमिनीपर्यंत जातात त्याला सिध्दवट असे म्हटले जाते. या वडाच्या असंख्य पारंब्यानी जमिनीत प्रवेश केला आहे. अर्थातच हा महासिध्द वटवृक्ष आहे.येथेच चोरल नदी नर्मदेला मिळते. अर्थातच याठिकाणी दोन नद्यांचा संगम आहे.या मंदिरापासून बडवाहपर्यंतचा बराचसा रस्ता कॅनालच्या कडेने आहे. बडवाह  शहरात नागेश्वर महादेव, गोपालकृष्ण तसेच दत्त मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत. त्या सर्वच ठिकाणी आम्ही दर्शनाचा लाभ घेतला. 









              शहरातून बाहेर पडल्यानंतर गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे विभागीय प्रशिक्षण केंद्र दिसले. मैदानावर वेगवेगळ्या कसरती चालू असलेल्या दिसल्या. हा भाग संपल्यावर वनविभागाचे कार्यक्षेत्र दिसून आले. सलग १० किलोमीटरचा टापू सागाच्या जंगलाने व्यापलेला दिसून आला.या मार्गावर चालत असताना सुलगाव येथे प्राथमिक शिक्षक असणारे यशवंत जोशी व त्यांच्या पत्नी शाळेला चालल्या होत्या. त्यांनी आम्हाला अल्पोपहार दिला. हा जंगलाचा परिसर असल्याने येथे खाण्यासाठी काहीच मिळत नाही म्हणून आम्ही परिक्रमावासीयांना रोजच खाऊ देत असतो असे त्यांनी सांगितले.

            शेतीचा विचार केला तर  सुलगाव येथे सर्व विहीर बागायत दिसून आले. विहिरींना पाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध होत असल्याने सर्वत्र बागायती शेती दिसत होती. गहू, कपाशी, मिरची ,भेंडी ही पिके मोठ्या प्रमाणात दिसून आली.

            आज दुपारी उशिरा सुलगाव येथे पोहोचलो. कंटाल्यामुळे येथेच थांबण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारचे आणि संध्याकाळचे दोन्हीही भोजने रामसिंह तंवर यांच्याकडे घेतली आहेत.रामसिंह तंवर २००२ पासून परिक्रमावासीयांच्या भोजनाची व्यवस्था करीत आहेत. दुपारी आणि संध्याकाळी जेवढे परिक्रमावासी येथील त्यांच्या भोजनाची व्यवस्था ते करतात. जवळपास ८ महिने हे काम चालते. कधी किती व्यक्ती येतील हे काही सांगता येत नाही. न कंटाळता विनम्रपणे सातत्याने सेवा देणे सोपे नाही. मात्र त्यांचे सर्व कुटुंबच सेवेत व्यस्त आहे. कुटूंबात कामाची श्रमविभागणी छान झालेली दिसत होती. एक मुलगा प्राध्यापक तर एक शेतकरी असल्याने आर्थिक स्थिती चांगलीच होती. आपल्याकडे सतत पाहुण्यांची वर्दळ वाढली तरी आपण कंटाळतो. रामसिंह तंवर यांच्या कुटुंबाकडून सेवाभाव शिकावा. आपणही जेवढी इतरांची सेवा करता येईल तेवढी करावी असे मला वाटते.

    राजेंद्र पवार 

    ९८५०७८११७८


#shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा #satara #satarakar

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...