!! आमची नर्मदा परिक्रमा !! (२२ ) गोमुख कृष्णपुरी , मनीनागेश्वर मंदिर
आमचा कालचा मुक्काम वेलूगाव येथे होता. निवासाची सोय हनुमान मंदिराजवळील हॉलमध्ये होती. आम्ही सकाळी लवकर उठून नदीवर स्नान केले. आरती करुन निघालो.वाटेत सरसाड,वडवाणा,कृष्णपुरी, भालोद ही गावे लागली.सरसाड गुप्त गोदावरी हे स्थान आहे. याठिकाणी गोमुखातून सतत पाण्याचा प्रवाह वाहत असतो.नर्मदा तटावर सर्वत्र शिव मंदिरे आहेत. प्रत्येकाची नावे वेगवेगळी आहेत.
कृष्णपुरी येथे हनुमान व मनीनागेश्वर अशी मंदिरे आहेत. दोन्हीही मंदिरे प्रशस्त आहेत. याठिकाणीच दुपारचा भोजन प्रसाद घेतला. निवासाचा विचार केला तर मनीनागेश्वर खूपच सोयीचे आहे. सकाळच्या सत्रात प्रवास पाय वाटेने झाला होता. दुपारी मात्र जवळचा मार्ग सोडून लांबच्या मार्गाने यावे लागले. मात्र मार्गात काही चांगल्या सेवाही मिळाल्या. वाटेत चहापान,बिस्किटे याचा आग्रह धरला जात होता.
आज सकाळचा प्रसंग मात्र मला खूप भावला. आम्ही वेलूगावमधून येत असताना एक महिला घराबाहेर काही तरी काम करत होती. त्यांनी चहापानाचा आग्रह धरला. आम्ही त्यांच्या घरी गेलो. घर दोन भागात विभागले होते. जुन्या घराच्या साहित्याचा वापर करुन निम्मा भाग तयार केला होता. निम्मे बांधकाम नवीन होते. त्या महिलेची मुद्रा अतिशय प्रसन्न होती. त्यांच्या घरी बरीच चर्चा झाली. माझ्या आनंदी जीवनाचे रहस्य माझ्या सासूबाई आहेत. मी रोज पहाटे चार वाजता उठते. पूजा अर्चा लवकर उरकली जाते.त्यांच्या बोलण्यातून सासूबाईबद्दल खूपच आदर दिसून आला. मला वाटते सासूसुनाचे नाते अतिशय आदराचे असेल तर त्या घराची खूप प्रगती होते.
सासूसुनांचे नाते ज्या घरात एकमेकांच्या विश्वासाचे असते त्या घराची प्रगती होते.प्रत्येक घरात सासूसुनाचे नाते मायलेकीसारखे असावे असे मला वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#नर्मदा #narmada #narmadamai #narmadaparikrama #narmadariver #shivaputri
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा