बुधवार, ५ जानेवारी, २०२२

!!आमची नर्मदा परिक्रमा !! (२१ )

 !!आमची नर्मदा परिक्रमा !! (२१ ) गिरणारी गुफा , आश्रम , पंचमुखी हनुमान मंदिर 

            आमचा कालचा मुक्काम मौनीबापू आश्रम कांदरोज येथे होता. तेथील आश्रम व्यवस्थापन खूपच उच्च दर्जाचे होते. ग्रामस्थांचा सहभाग अतिशय चांगला होता. आज सकाळी चालण्यास उशिरा सुरुवात केली. वाटेत वराछा, असा, पाणेथा, इंदोर वसना ही गावे लागली. वराछा गावात देवरुख - रत्नागिरी येथील महाराज आश्रम चालवतात. येथे चहापान तर झालेच, परिक्रमेविषयी भरपूर चर्चा झाली.


             सकाळी लवकरच असा येथील दगडू महाराज आश्रमात पोहोचलो. आश्रमात प्रवेश करताक्षणी आपल्या नावाची नोंद केली जाते, प्रत्येक परिक्रमावासीयांना दक्षिणा तसेच बिस्किटपुडे दिले गेले. भोजन प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये असे निक्षून सांगितले. याठिकाणी कपिलेश्वर महादेव मंदिर आहे तेथे दर्शन घेतले. देवाला नैवेद्य दाखवताना ' भोग लावणे" असे म्हणतात. यावेळी प्रवेशद्वारी पडदा ओढला जातो. भोग लावत असताना आपणास दर्शन घेता येत नाही.

           याठिकाणी मोठी गोशाळा आहे. परिसरही खूप मोठा आहे. येथे भोजन घेण्यासाठी वसतिगृहासारखी व्यवस्था आहे. याठिकाणी कपडे धुणे, अंघोळ करणे यासाठीही उत्तम सोय आहे. माझ्यासह सर्वांनीच या सेवेचा लाभ घेतला.

         भोजन प्रसाद घेतल्यानंतर दुपारी पाणेथा पंचमुखी हनुमान मंदिरात आलो. येथे सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले आहे. या परिसरात काटे नसलेली बेलाची झाडे मोठ्या प्रमाणात दिसून आली. याचठिकाणी गिरणारी गुफा आहे. नर्मदेचा संपूर्ण परिसर तपोभूमी आहे.

         शेतीचा विचारकरता अधिकाधिक केळीच्या बागा दिसून आल्या. काही ठिकाणी गुलाब बागाही होत्या. येथे रस्त्याचे काम चालू आहे.  मोठा रस्ता पण वाहनांची वर्दळ कमी अशी स्थिती होती.एका ठिकाणी वानरांनी रस्त्यावरच ठाण मांडले होते. वाहन चालक त्यांना त्रास न देता वाहने चालवीत होते.

    आज उशिरा वेळूगाव याठिकाणी मुक्कामास आलो. आश्रम लहान असला तरी येथील आदरातिथ्य वाखानण्यासारखे होते. गावकरी स्वतः स्वयंपाक करुन परिक्रमावासीयांना जेऊ घालत होते. गुजरातमध्ये रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात चालली आहेत. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होताना दिसून आला.भौतिक विकास म्हटलेकी नद्यांना ओरबाडने आलेच.

           केळीच्या बागांचा परिसर असल्याने मोठे मोठे वजनकाटे दिसून येत होते. समृध्द शेतीमुळे विकास आपोआपच होतो हे आज प्रकर्षाने दिसून आले. आपल्या भागाची प्रगती व्हायची असेल शेती समृध्द केली पाहिजे. शेतीला पाणी कसे मिळेल हे पहिले पाहिजे असे मला वाटते.

     राजेंद्र पवार

    ९८५०७८११७८

#narmadehar #narmada #narmadaparikrama #narmadariver 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...