!! आमची नर्मदा परिक्रमा !! (३९ ) किमान पन्नास परिक्रमावासीयांना भोजन प्रसाद जेऊ घातल्याशिवाय समाधान वाटत नाही...
आमचा कालचा मुक्काम बोरियाद येथील हनुमान मंदिरात होता. सुरुवातीला आम्हाला तेथे थोडीसी गैरसोय वाटली परंतु नंतर सर्व सुरळीत झाले. आम्ही त्याठिकाणी सदाव्रताचा लाभ घेतला. आम्ही भोजन घेत असतानाच गावातून जेवण आले. त्या भोजनाचा आम्ही थोडासा आस्वाद घेतला व उरलेले जेवण सकाळी बालभोग (नाश्ता ) म्हणून घेतले.त्याच गावातील प्रदीपभाई नावाच्या व्यक्तींने आम्हांस जिलेबी खाऊ घातली होती. नर्मदा मैय्या आपणास कोणतीही अडचण येऊ देत नाही हेच यातून सिध्द होते.
सकाळी उशिरा चालण्यास सुरुवात केली. थोड्याच वेळात वघाच येथे पोहोचलो. तेथे पुन्हा बालभोग घेतला. दुपारचा भोजन प्रसाद छोटा उदेपूर जिल्ह्यातील भाखा येथे निलकंठेश्वर महादेव मंदिर आश्रमात घेतला. भोजन मिळण्यास बराच अवधी असल्याने आम्ही तेथे कपडे धुतली.नंतर कवांटच्या दिशेने मार्गस्थ झालो.
नसवाडी कवांट हा राज्यमार्ग असल्याने चालताना कोणतीही अडचण आली नाही. हा रस्ता तयार करताना कडेला आलेली झाडे वाचवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होताना दिसला.
संध्याकाळी आम्ही कवांट येथील नीलकंठ महादेव मंदिरात पोहोचलो. आज येथे मुक्काम आहे. कवांट हे तालुक्याचे गाव असून येथील बाजारपेठ मोठी आहे. या परिसरात आदिवासी समाज भरपूर असल्याचे दिसून आले.
कवांटमध्ये आमची चांगली सोय झाली. आज दुपारी भाखा येथे महाराजांबरोबर चर्चा करताना किमान पन्नास परिक्रमावासीयांना भोजन प्रसाद जेऊ घातल्याशिवाय समाधान वाटत नाही. जितके जास्त लोक येतील तेवढा जास्त आनंद होतो.
कष्ट कितीही झालेतरी सेवेचे समाधान वेगळे असते हेच महाराजाच्याभेटीतून सिध्द होते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा #satara #satarakar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा