बुधवार, ५ जानेवारी, २०२२

!!आमची नर्मदा परिक्रमा !! (२०)

!!आमची नर्मदा परिक्रमा !! (२० )  ओढ ...  कोटेश्वर मंदिर 

          आमचा कालचा मुक्काम नर्मदा जिल्ह्यातील रुंडगाव येथील जलारामआश्रमात होता. या आश्रमात झोपल्यानंतर सरळ चंद्रदर्शन होत होते. याठिकाणी थंडीचे प्रमाण जास्त असल्याने परिक्रमावासीयांना पांघरण्यासाठी ब्लॅंकेट दिले जात होते. हा आश्रम गावापासून खूपच दूर आहे परंतू परिक्रमावासीयांची चांगली काळजी घेतली जात होती. आज सकाळी उठल्यावर चहापान झाल्याशिवाय कोणालाही जायची परवानगी दिली नाही. 



  आश्रमाजवळून करझन नावाची नदी वाहत होती. ती ओलांडण्यासाठी नावेचाच वापर करावा लागला. रुंडगावपासून छोटा पाटण गावात चंद्रकांतेश्वर तसेच महालक्ष्मी मंदिर होते. दोन्हीही ठिकाणी दर्शन घेतले. रुंडगाव ते छोटा पाटण गावचा रस्ता अतिशय भयानक होता. रस्ता म्हणजे पाऊल वाटा, जर रस्ता चुकला तर आपलं काही खरे नाही अशी परिस्थिती होती. छोटा पाटणपासून कांदरोज गावातील कार्तिक स्वामी आश्रमापर्यंतचा रस्ता खूपच चांगला होता. आज दुपारी भोजनप्रसाद कोटेश्वर महादेव मंदिरात घेतला. आज वाटेत ठीकठिकाणी चहापान व नाश्त्याची व्यवस्था ग्रामस्थांकडून केली जात होती. 



           

            शेतीचा विचार केला तर हा भाग खूपच प्रगत असल्याचे दिसून आले. सर्वत्र केळीच्या बागा दिसत होत्या. काही ठिकाणी ऊस तर एरंडाची लागवड केली असल्याचे दिसून आले. 

               दिनांक ५/१२ ते ९/१२ या कालावधीत माझ्या वैयक्तीक अडचणीमुळे परिक्रमेत खंड पडला होता. नंतर माझ्या बरोबरच्या लोकांना गाठण्यासाठी मी खूपच धावाधाव केली. आठ दिवसाच्या प्रयत्नांनंतर आपल्या माणसांची भेट ओरा गावातील कोटेश्वर मंदिरात झाली.भेटीचा आनंद शब्दात व्यक्त करणे अवघड आहे. 

              आपल्या माणसांची ओढ काय असते हे मला प्रकर्षांने जाणवले. एखादी सासुरवाशीण माहेरी आल्यानंतर तिची जी भावना असते अगदी तशीच भावना माझ्या मनात निर्माण झाली होती. प्रत्येकाला आपल्या माणसांची ओढ असते,ती ओढ प्रत्येकाच्या मनी असावी असे मला वाटते.

     राजेंद्र पवार

     ९८५०७८११७८

#narmada #narmadehar #narmadaparikrama #narmadariver #shivaputri #koteshwar

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...