शुक्रवार, १४ जानेवारी, २०२२

!!आमची नर्मदा परिक्रमा !! (३७ )गरुडेश्वर

 !!आमची नर्मदा परिक्रमा !! (३७ )गरुडेश्वर

        आमचा कालचा मुक्काम तिलकवाडा या नर्मदा जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी होता. परिक्रमावासीयांची संख्या जास्त झाल्याने निवासाची व्यवस्था करण्यात बरीच अडचण आली. सकाळी लवकर निघालो अर्धा किलोमीटर चाललो नाही तोच आम्हाला चहापाणासाठी थांबवले. एवढ्या सकाळीदेखील लोक किती आदरातिथ्य करतात याचा पदोपदी अनुभव येतो. आज वाटेत मनीनागेश्वर, वासना, रेंगन, सांजरोली, अक्तेश्वर,गभाना, खडगदा अशी गावे लागली.

       आम्ही सकाळी लवकरच गरुडेश्वर येथे पोहोचलो.गरुडेश्वर हे दत्तस्थान म्हणून प्रसिध्द आहे. हे टेंबे महाराजांचे  समाधी स्थळ आहे.




    या स्थळाविषयी अधिक माहिती....

 वासुदेवानंद सरस्वती (टेंबे ) स्वामी महाराज.... दत्तप्रभूंचे उपासक असणारे टेंबे महाराज यांचे संस्कृत आणि मराठीमध्ये विपुल लिखाण आहे.  शके १८३५ चैत्र वद्य षष्टी  शनिवारी महादेव मंदिरात उतरले. भक्त जनांना  ही माहिती कळल्यानंतर जनसमुदाय मोठया प्रमाणात वाढू लागला. स्वामीजी वेदांत, धर्माचरण, ज्योतिषविद्या, आयुर्वेद या विषयांवर प्रवचने करुन समुदायाला प्रबोधन करीत. दरम्यान बडोद्याचे विठ्ठल सोनी यांनी महाराजांना देण्यासाठी दत्त मूर्ती बनवून आणली.या मूर्तीची त्यांनी मनोभावे पूजा केली. त्यांच्या अंतसमयी गांडा महाराजांना सूचित केल्यानुसार ही मूर्ती नरसोबाचीवाडी, गानगापूर किंवा एखाद्या योग्य भक्तास देण्यात यावी असे सांगितले. त्याच रात्री श्री दत्तप्रभूंनी गांडा बुवाना स्वप्नात येऊन सांगितले की, मला गरुडेश्वर येथेच लीला करावयाची आहे. संवत १९७० वैशाख शुध्द सप्तमी रोजी छगनलाल कुबेरदास भट्टजी यांचेद्वारा नांदोदचे इंजिनिअर भगवानदास दलालजी यांनी १९७२ माघ वद्य द्वितीयादिनी ब्रम्हानंद सरस्वती (करनाली आश्रम ) यांच्या आशीर्वादाने मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. सभागृहात वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांच्या निर्गुण पादुकांची पूजा वैदिक मंत्राद्वारा केली जाते. याठिकाणी सध्या भक्तांची मोठी गर्दी असते.

         आम्ही दुपारी पुढील मार्गक्रमण सुरु केले. आमच्या ग्रुपला वाटेत एका ठिकाणी भजी खाण्याची इच्छा झाली परंतु हॉटेल मालकाने पंधरा मिनिटे थांबण्यास सांगितले आम्ही काही थांबलो नाही. मात्र झरीया गावाजवळ आल्यानंतर अशोक सिंह या व्यक्तीने आम्हास बोलावले व गरमागरम भजी खाऊ घातली. नर्मदा मैय्या भक्तांची इच्छा पूर्ण  कशी करते हेच यातून सिध्द होते.

               एखाद्या व्यक्तीच्या कार्यामुळे एखाद्या स्थानाचा कायापालट कसा होतो हेच गरुडेश्वर भेटीमुळे दिसून येते.

       राजेंद्र पवार 

    ९८५०७८११७८

#shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा  #satara #satarakar

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...