!!आमची नर्मदा परिक्रमा !! (३६ )दक्षिण प्रयाग स्वयंभू शिवाचे मंदिर सुमारे २५०० वर्षे जुने
आमचा कालचा मुक्काम वडोदरा जिल्ह्यातील शिनोर तालुक्यातील दरियापुरा येथील बद्रिकाश्रम येथे होता.आम्ही आज सकाळी लवकर निघालो. अगदी दोन किलोमीटर अंतरावर साई रेवा अन्न क्षेत्र येथे बालभोग ( नाश्ता) केला. सकाळी ९ वाजता करनाली येथे पोहोचलो. या ठिकाणाला दक्षिण प्रयाग असे म्हटले जाते. हे अतिपवित्र तीर्थक्षेत्र आहे.
या तीर्थक्षेत्रासंबंधी माहिती.....
गुजरातमधील वडोदरा शहरापासून सुमारे ६० किमी अंतरावर दाभोईजवळ कर्नाळी गाव आहे. तेथे नर्मदा नदीच्या काठावर स्वयंभू शिवाचे मंदिर आहे. येथील भगवान शिवाला कुबेर भंडारी या नावाने ओळखले जाते.
कुबेर भंडारी मंदिर जेथे भगवान शिवाचे स्वयंभू शिवलिंग आहे, जे दाभोई तालुक्यातील कर्नाळी गावात नर्मदा नदीच्या काठावर सुमारे ८०० फूट उंचीवर वसलेले आहे. हे मंदिर सुमारे २५०० वर्षे जुने मंदिर आहे. येथे भगवान शंकराच्या शिवलिंगाशिवाय गणेशजी, महाकाली, हनुमानजी आणि रणछोदराय यांचेही मंदिर आहे. अमावस्येच्या दिवशी ५ लाखांहून अधिक लोक कुबेर भंडारी देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी येतात.अमावस्येच्या दिवशी देवाचे दर्शन रात्री १२ वाजता सुरू होते. २ किमी पेक्षा जास्त लांब रांगेत ४ ते ५ तास उभे राहिल्यानंतर कुबेर भंडारी देवाचे दर्शन घेतले. येथे भाविकांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि निपुत्रिक महिलांनाही संतती प्राप्त होते, त्यामुळेच अमावास्येला लाखो लोक येतात. फुले अर्पण करणे इ. ज्यांना रांगेत उभं राहण्यात त्रास होतो त्यांच्यासाठी आणि तिकिट काउंटरवरून तिकीट काढून लवकर दर्शन घेऊ शकतील अशा वृद्धांसाठी मंदिर समितीतर्फे विशेष लवकर दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला नर्मदा नदीचा किनारा आहे, तो अतिशय सुंदर दिसतो. अमावस्येच्या दिवशी नर्मदेचे दर्शन आणि स्नान करून लोक धन्य होतात.
असे म्हणतात की कुबेर हा रावणाचा धाकटा भाऊ होता. रावणाने भगवान शिवाला प्रसन्न केले आणि तो अत्यंत शक्तिशाली झाला आणि त्याने आपल्या भावाला लंकेतून हाकलून दिले. त्यानंतर कुबेर नर्मदा नदीच्या तीरावर कर्णाली येथे आला आणि भगवान शंकराची तपश्चर्या (ध्यान) करू लागला आणि महाकाली मातेला येथे त्यांचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना केली. भगवान शिव त्यांच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि येथे प्रकट झाले, परंतु लंकेचे राज्य परत मिळवू शकले नाहीत, म्हणूनच त्यांना देवतांच्या संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली. म्हणूनच त्यांना संपत्तीची देवता "कुबेर भंडारी" असे म्हटले जाते. भगवान शिवाने त्यांना आपल्या सोबत स्थान दिले आणि या ठिकाणी स्वयं प्रकट झाल्यापासून हे स्थान लोकांच्या श्रद्धेचे केंद्र बनले आहे.
करनाली येथे ओरसंग, नर्मदा व गुप्त सरस्वती असा त्रिवेणी संगम आहे. या स्थानावर आम्ही स्नान केले. तेथील देवतांचे दर्शन घेतले. याच ठिकाणी आम्ही दुपारचे भोजन घेतले. आज आमचा मुक्काम तिलकवाडा या तालुक्याच्या ठिकाणी आहे.
शेतीचा विचार करता कपाशीचे पीक मोठ्या प्रमाणात दिसून आले. कपाशीच्या शेतातूनच बरेचसे चालणे झाले. ड्रॅगन फ्रुटचीही शेती पाहण्यास मिळाली.वाटेत आश्विनी नावाची नदी लागली. या नदीपात्रातून यावे लागले.
आजच्या दिवसाचा विचार करता कुबेर देवता प्रसन्न व्हावी यासाठी सर्वच व्यक्ती प्रार्थना करतात.प्रत्येकालाच कुबेर देवता प्रसन्न व्हावी असे मला वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा #satara #satarakar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा