!! वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित!!(९ जुलै )
९ जुलै १९६९ या दिवशी वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात आले.
वाघांविषयी माहिती
वाघ मार्जार कुळातील प्राणी असून भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून याची गणना होते व अन्न साखळीतील सर्वात टोकाचे स्थान वाघ भूषवतो.
दिवसेदिवस वाघाची संख्या घटत आहे.वाघांची संख्या घटण्याची कारणे-- १)निवासस्थान नष्ट करणे.
२) निवासस्थान खंडित करणे .
३) शिकार करणे.
वाघाचे खरे माहेरघर हे भारत मानले जाते. आजही तेथे काही शेकड्यांनी वाघ शिल्लक आहेत. तिथून वाघ मांचूरिया चीन, आग्नेय अशियातून भारतात आला असे मानले जाते. यातील बऱ्याच भागात पूर्वी वाघ मुबलक प्रमाणात आढळत होते परंतु शिकार व वसतिस्थानाचा नाश यांमुळे तेथून वाघ नामशेष झाले. जंगली वाघ हा आज प्रामुख्याने भारत, ब्रह्मदेश, थायलंड, चीन व रशिया या देशांत आढळतो तसेच प्राणिसंग्रहालयातील वाघ आज जगभर पोहोचले आहेत व ते वाघांच्या एकूण संख्येचा मोठा भाग आहेत. वाघ हा शिकार करून खातो. हा आशिया, मुख्यतः भारत, भूतान, चीन, कोरिया आणि साइबेरियन रशियामध्ये राहतो. जंगली वाघांतील ५० टक्क्यांपेक्षाही अधिक वाघ आज फक्त भारतात उरले आहेत.
वाघांची संख्या भारतात सर्वाधिक असली तरी भारतात देखील वाघ आज दुर्मिळ झाले असून त्यांची संख्या चिंताजनक आहे. भारतातील पंजाब, हरियाणा ही राज्ये सोडल्यास सर्व राज्यात वाघाचे थोडे थोडे अस्तित्व आहे.
भारतातील वाघांच्या आढळाचे पाच उपविभाग
१)हिमालय व तराई विभाग - यात जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तरांचल, उत्तरप्रदेश, बिहार,
सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश व इशान्य भारतातील राज्ये येतात. यातील हिमालयाच्या तराई जंगलांमध्ये वाघांचे वसतीस्थान आहे.
२)अरवली पर्वताच्या पूर्व भागातील शुष्क जंगलांमध्ये वाघांचे अस्तित्व आहे. यांत रणथंभोर सरिस्का सारखी राष्ट्रीय उद्याने येतात.
३)सुंदरबन व ओडिशा .
४)मध्य भारतातील पानगळी जंगलांमध्ये वाघांचे सर्वाधिक अस्तित्व आढळते. यात कान्हा, बांधवगड, मेळघाट
(गुगमाळ्), ताडोबा यासारखी राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये येतात.
५)सह्याद्री व मलबार किनारा यात प्रामुख्याने सह्याद्रीचा दक्षिण भाग येतो. बंदीपूर, मदुमलाई पेरियार इत्यादी. महाराष्ट्रातील सह्याद्रीत केवळ कोयना व चांदोली अभयारण्यात वाघांचे अस्तित्व आहे.
वाघाचे वसतिस्थान हे मुख्यत्वे दाट ते अतिशय घनदाट जंगलात असते. वाघाच्या शिकार करण्याच्या पद्धतीमुळे त्याने त्याचे वसतिस्थान निवडले असावे. राजस्थानातील शुष्क जंगले, तसेच सुंदरबन मधील खारफ़ुटीची जंगले, काझ़ीरंगातील गवताळ जंगल असे विविध प्रकारच्या जंगलात वाघाचे वास्तव्य आहे. तरीदेखील वाघ हा बिबट्यासारखा कोणत्याही प्रकारच्या जंगलात राहण्यास सरावला नाही. तसेच प्रत्येक वाघांचे शिकारीचे क्षेत्र हे बरेच मोठे असते (साधारणपणे १०० चौ.किमी). त्यामुळे वाघ साधारणपणे मोठी जंगले पसंत करतात. म्हणूनच पूर्वीच्या मध्यम आकाराच्या जंगलात वाघ दिसत व आज ती जंगले हे लहान झाल्यामुळे वाघांचे अस्तित्व संपृष्टात आले. (उदा: महाराष्ट्रातील सह्याद्री व कोकणातील जंगले)
नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार,भारतात वाघांची संख्या वाढली असून ती आता २२२६ झाल्याचे सांगण्यात येते. तसेच, मध्य भारतातील, ताडोबा, पेंच, कान्हा व मेळघाट आदी जंगल परिसरात एकूण सुमारे ७१८ वाघ असल्याचे यात दृष्टीपथात आले.हे सर्वेक्षण 'वाईल्ड लाईफ कंझर्वेशन ट्रस्ट' तर्फे कॅमेरे लावून करण्यात आले.
वाघ हा वर नमूद केल्याप्रमाणे मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी आहे. वाघाचा आकार हा स्थानिक परिस्थितीप्रमाणे कमी जास्त असतो. सायबेरीयन वाघ हा आकाराने मोठा असतो तर भारतीय वाघ त्या मानाने कमी भरतो. सायबेरीयन वाघ हा लांबीला ३.५ मीटर पर्यंत भरतो तर त्याचे वजन ३०० किलोपर्यंत असते. हा अपवाद झाला परंतु १९० -२०० सेमी पर्यंत लांब असतात व त्यांचे सरासरी वजन २२७ किलो पर्यंत असते. भारतीय वाघ साधारणपणे वजनात १०० ते १८० किलोपर्यंत भरतो. मादी ही नरापेक्षा लहान असते. सुमात्रा मधील वाघ हा अजूनच लहान असतो. वाघांची ओळखण्याची सर्वात मोठी खूण त्यांचे अंगावरचे पट्टे व तांबूस रंगाची फ़र असते. प्रत्येक वाघाचे अंगावरील पट्टे हे वेगळे असतात. जसे प्रत्येक माणासाचे ठसे वेगळे असतात त्याच प्रमाणे. यावरून वाघांना ओळखता येते. परंतु जंगली वाघ दिसायला मिळणे ही दुर्मिळ घटना असते त्यामुळे ही पद्धत अजूनही ग्राह्य धरलेली नाही. वाघाच्या अंगावर साधारणपणे १०० पर्यंत पट्टे असतात. पट्ट्यांचा मुख्य उपयोग वाघांना दाट झाडींमध्ये सदृश होण्यासाठी होतो. पट्ट्यांबरोबरच प्रत्येक वाघाच्या पंज्याची ठेवणही वेगळी असते. वाघांची पारंपारिक गणना पंजाच्या ठश्यांवरूनच होते. वाघाचा पंजा हा वाघाच्या आकारमानाने खूप मोठा व अतिशय ताकदवान असतो. त्याचा व्यास साधारणपणे ६ ते ८ इंच इतका भरतो. जंगलातून फ़िरताना वाघ जरी दिसला नाही तरी वाघाचे ठसे दिसू शकतात. शिकार साधण्यासाठी वाघांचा जबडा जबरदस्त ताकदवान असतो व तो वर-खाली या दिशेत फिरतो. जबड्याची ताकद ते भक्ष्यामध्ये सुळे रुतवण्यासाठी तसेच भक्ष्याला पकडून ठेवणे, ओढून नेणे या कामासाठी वापरतात. वाघाची सर्वात जास्त ताकद त्याच्या जबड्यात असते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. वाघ हे पट्टीचे पोहोणारे आहेत, म्हणजे त्यांची पोहोण्याची क्षमता चांगलीच असते वाघांना पाणी आवडते. उन्हाळ्याच्या दिवसात वाघ पाण्यात तासन तास डुंबून स्वता:ला थंड ठेवतात.
वाघांचे महत्त्व हे संपूर्ण निसर्गसाखळीत अनन्यसाधारण आहे. वाघ हे अन्न साखळीतील टोकाचे स्थान भूषवतात त्याचा अर्थ त्यांच्या पेक्षा नैसर्गिक क्षमतेमध्ये वरचढ शिकारी नाहीत. ते इतर प्राण्यांची शिकार करून जगतात मुख्यत्वे तृणभक्षक प्राणी. गवत हे सर्वत्र उपलब्ध असल्याने तृणभक्षक प्राण्यांची संख्या भराभर वाढते. वाघांचे निसर्गात सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे या प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवणे. वाघ नसतील तर या प्राण्यांची संख्या अनियंत्रित प्रमाणात वाढेल व इतर निसर्गसंपदेवर या गोष्टीचा ताण पडेल व निसर्गचक्र बिघडून जाईल. वाघ जंगलात असणे हे जंगलाच्या स्वास्थाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. वाघ असलेल्या जंगलात साधे लाकूडतोड व जंगलावर अवलंबून लोक भीतीपोटी जात नाहीत व जंगल सुरक्षित रहाते. वाघ नाहीसे झालेली जंगले साफ होण्यास वेळ लागत नाही असा आजवरचा अनुभव आहे व जंगलतोडीने होणारे निसर्गचक्राचे दुष्परिणाम आज जागतिक तापमानवाढीने दिसतच आहेत.
वाघाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. आतातर 'ताडोबा'तील वाघ चांदोलीत मुक्कामाला येणार आहेत. देशातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात क्षमतेपेक्षा जास्त झालेल्या वाघांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्यात येणार आहे. सह्याद्रीत सात वाघांचा अधिवास आणि संचार असल्याचे सिध्द झाले आहे.आपल्याजवळ सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे तेथे भेट देऊन वाघांची अधिक माहिती जाणून घेऊया.
संकलक: राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा