बुधवार, २८ एप्रिल, २०२१

शास्त्रज्ञ शंकर आबाजी भिसे जन्मदिन !!(२९ एप्रिल

 

!!  शास्त्रज्ञ शंकर आबाजी भिसे जन्मदिन !!(२९ एप्रिल)




          डॉ. शंकर आबाजी भिसे  जन्म :मुंबई, २९ एप्रिल १८६७ मृत्यू : ७ एप्रिल १९३५ हे एक मराठी शास्त्रज्ञ व संशोधक होते. त्यांना भारताचे एडिसन असे म्हटले जाते. 
            त्याच सुमाराला म्हणजे साधारण १८९७ मध्ये ' इन्व्हेन्टर रिव्ह्यू ॲन्ड सायंटिफिक रेकॉर्ड' नामक मासिकाने 'स्वयंमापन यंत्र' करण्याची एक स्पर्धा जाहीर केली होती. स्वयंमापन यंत्र म्हणजे साखर, पीठ इत्यादी वस्तूंचे गिऱ्हाइकाला हवे तेवढे वजन करुन देणारे यंत्र. शंकररावांनी अशा यंत्राचा आराखडा करून मासिकाकडे पाठवला. त्यावेळी शंकररावांच्या त्या यंत्राला प्रथम क्रमांक मिळाला. शंकर आबाजी भिसे यांच्या संशोधक कारकिर्दीची ही सुरुवात होती.
          पुढील आयुष्यात शंकर आबाजी भिसे यांनी दोनशेच्यावर निरनिराळे शोध लावले आणि त्यांतील ४०हून अधिक आविष्कारांची पेटंटे घतली.
              १९०० साली मद्रास येथे भरलेल्या 'इंडियन इंडस्ट्रियल काँग्रेस'चे ते अध्यक्ष होते. त्या काली प्रचलित असलेल्या लायनो, मोनो, स्ट्रिंजरटाइप, विक्स आणि त्या काळच्या इतर मुद्रण यंत्रांच्या रचना आणि त्यांच्या वापराच्या कमाल कार्यमर्यादा यांचा अभ्यास करून शंकरराव भिसे यांनी ’भिसोटाइप’ हे छापण्यासाठीचे खिळे पाडण्यासाठी आणि नंतर ते जुळवण्यासाठीचे यंत्र शोधले आणि त्याचे पहिले तात्पुरते पेटंट इंग्लंडमध्ये, २ डिसेंबर १९०१ रोजी घेतले. नंतर भिसे यांनी अमेरिका, जर्मनी, फ्रान्स आदी देशांतही ’भिसोटाइप’ची पेटंटे घेतली. या यंत्राच्या उत्पादनासाठी आणि एकूण भारताच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी त्यांनी रतन टाटा यांच्या भागीदारीत ’टाटा-भिसे इन्व्हेन्शन सिंडिकेट’ या कंपनीची लंडन येथे स्थापना केली, पण १९१५साली ही कंपनी बंद पडली. . १९१६साली भिसे अमेरिकेला गेले. तिथे त्यांनी युनिव्हर्सल टाइप मशीन या कंपनीच्या विनंतीनुसार ’आयडियल टाइप कास्टर’ या यंत्राचा आविष्कार केला, व अमेरिकेत त्याचे पेटंट घेतले. १९२० साली त्यांनी 'अमेरिकन भिसे आयडियल टाइप कास्टर कॉर्पोरेशन'ची स्थापना करून १९२१साली पहिले यंत्र विक्रीस आणले. याशिवाय अशी अनेक मुद्रण यंत्रांचे आराखडे, डॉ. भिसे यांनी बनविले. त्यांच्या टाइप कास्टिंगच्या शोधाचा अमेरिकेच्या तत्कालीन पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला होता. १९२७ मध्ये न्यूयॉर्क विद्यापीठाने शंकररावांना डी.एस्‌सी. ही पदवी दिली.
          भिसे यांनी काचेचा कारखाना काढला. १८९० मध्ये उत्तर हिंदुस्थानात जाऊन आग्रा लेदर फॅक्टरी काढली. भिसे यांनी सामाजिक कार्य देखील केले. धी सायंटिफिक क्लबची स्थापना केली. दादाभाई नौरोजींच्या सहाय्याने भिसे यांनी १९०१ साली ‘पेटंट सिंडिकेट’ नावाची कंपनी काढली.
           सौरऊर्जेवर चालणाऱ्या मोटारी तयार करण्याची मूळ कल्पना डॉ. शंकर आबाजी भिसे यांची होती.
                १९१०मध्ये भिसे आजारी पडले. त्यावेळी त्यांना देण्यात आलेले एक भारतीय औषध त्यांना फार गुणकारी वाटले. त्या औषधाचे त्यांनी रासायनिक पृथक्करण करून घेतले. त्यात आयोडीन असल्याचे कळताच भिसे यांनी १९१४साली एक नवीनच औषध तयार करून त्याला ’बेसलीन’ हे नाव दिले. हे औषध बाह्योपचारासाठी उपयुक्त ठरले. अमेरिकेच्या लष्कराने या औषधाचा पहिल्या महायुद्धात पुरेपूर उपयोग केला. याच औषधावर संशोधन करून आयोडीन हा घटक असलेले पण पोटात घेता येण्यासारखे एक औषध, भिसे यांनी बनवले. आणि त्याच्या उत्पादनासाठी न्यूयॉर्क येथे कंपनी स्थापन केली. १९२७मध्ये या औषधाच्या उत्पादनाचे आणि वितरणाचे हक्क भिसे यांनी शेफलीन या कंपनीला विकले. या औषधाला शंकर आबाजी भिसे यांनी ’ॲटोमिडीन’ (ॲटॉमिक आयोडीन) हे नाव दिले होते. हे औषध बऱ्याच रोगांवर गुणकारी आहे.शंकर आबाजी भिसे यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
            संकलक :  राजेंद्र पवार
             ९८५०७८११७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...