!! भारतात पहिली रेल्वे धावली !!
(१६ एप्रिल )
भारतातील पहिली प्रवासी रेल्वे सुरू होऊन आज १६८ वर्षे झाली. बोरीबंदर ते ठाणे ही पहिली रेल्वे भारतात धावली व भारतात परिवहन व्यवस्था पहिल्यांदा अमलात आली. यावेळी २१ तोफांची सलामी देण्यात आली. ब्रिटिशांना भारतावर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वेचा मोठा उपयोग झाला. १८५७ च्या उठावाच्या अगोदर ४ वर्षे याची सुरुवात झाली होती. ३३ किलोमीटरचा हा पहिला टप्पा होता.
रेल्वेच्या प्रगतीचा इतिहास खूपच रंजक आहे. “ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे’ (जीआयपी रेल्वे) या कंपनीने ही सेवा सुरू केली. यापुढील सात वर्षांत देशात आणखी आठ रेल्वे कंपन्या स्थापन झाल्या. मात्र, जीआयपी रेल्वे हीच नव्या युगाची सुरुवात करणारी रेल्वे ठरली. १४ कोच असलेल्या रेल्वेत ४०० प्रवासी बसले होते.
पहिल्या रेल्वे प्रवाशांमधे जगन्नाथ तथा नाना शंकरशेट यांचा समावेश होता. सन १८४५ मध्ये जमशेटजी व शंकरशेट यांच्या नेतृत्वाखालीच भारतीय रेल्वे संघाची स्थापना करण्यात आली होती. ते त्यावेळच्या रेल्वे कंपनीचे संचालक होते. वर्ष १८५४ मध्ये कल्याणपर्यंत मार्ग वाढविण्यात आला. मुंबई-ठाणे हा मार्ग व्यापारी पद्धतीने १६ एप्रिल १८५३ मध्ये कार्यान्वित झाला.
गदिमांच्या झुक झुक आगीनगाडीची धुरांची रेषा कधीच हवेत विरून गेली, त्याची जागा डिझेल व विद्युत इंजिनांनी कधी घेतली ते कळलेच नाही. आज माणसाच्या शरीरातील रक्तवाहिनीप्रमाणे देशात रेल्वेचे जाळे पसरले आहे, ती भारताची जीवनदायिनी ठरली आहे. भारताच्या सर्व दिशा रेल्वेनेजोडल्या गेल्या आहेत. कोकण रेल्वेचे आव्हानात्मक काम करून भारतीय अभियंत्यांनी इतिहास घडविला .
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा