शुक्रवार, १६ एप्रिल, २०२१

जागतिक हिमोफिलिया दिवस !! (१७ एप्रिल )

 

!! जागतिक हिमोफिलिया दिवस !!
   (१७ एप्रिल )



               दरवर्षी १७ एप्रिल रोजी जागतिक हिमोफिलिया दिन साजरा केला जातो. वर्ल्ड फेडरेशन ऑफ हिमोफिलियातर्फे आयोजित हा दिवस जगभरातील अनेक हिमोफिलिया संघटनांतर्फे साजरा केला जातो. हिमोफिलिया या गंभीर रोगाविषयी जनसामान्यांमध्ये जाणीव-जागृती व्हावी, यासाठी या दिवशी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
                हिमोफिलिया हा एक आनुवंशिक रोग आहे. हा रोग पूर्वजांकडून व्यक्‍तीला प्राप्त होतो. दुसऱ्या कोणापासून व्यक्‍तीला या रोगाची लागण होऊ शकत नाही. हिमोफिलिया होण्यास कारणीभूत असणारे गुणसूत्र किंवा जनुके पालकांकडून अपत्याला प्राप्त होते. हिमोफिलिया असणाऱ्या पुरुषांकडून हे गुणसूत्र त्यांच्या मुलींकडे संक्रमित होते; मात्र मुलांकडे संक्रमित होत नाही.
           सामान्यत: स्त्रियांना हा रोग होत नाही. त्यांच्यात हे सदोष गुणसूत्र असले तरी त्यांना स्वत:ला हा रोग होत नाही. त्या रोगाच्या रोगवाहक बनतात. अशा महिलांच्या मुलांना हिमोफिलिया होण्याची शक्‍यता ५० टक्‍के इतकी असते. हिमोफिलियावर उपचार विसाव्या शतकातच खऱ्या अर्थाने सुरू झाले.
१९३६ मध्ये अंड्याच्या पांढऱ्या भागापासून मिळवण्यात आलेला ब्रोमाईडचा अर्क हिमोफिलियावर उपयुक्‍त आहे, असा शोध प्रसिद्ध करण्यात आला. शेंगदाण्याच्या पिठाचा या रोगात उपयोग होतो, असाही एक अहवाल १९६६ मध्ये प्रसिद्ध झाला.
            सापाच्या विषामुळे हिमोफिलियाच्या रुग्णांमध्ये रक्‍त साकळवण्याच्या प्रक्रियांचा वेग वाढवता येतो तसेच या विषाच्या वापराने त्वचेवरील रक्‍तस्राव थांबवता येतात, असा शोधनिबंध आर. जी. मॅकफार्लेन यांनी १९३४ मध्ये प्रकाशित केल्यानंतर रोगोपचाराच्या विकासाला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली, असे म्हणता येईल.
        सध्या रुग्णाच्या रक्‍तातील घटक आठ व नऊ यांची भरपाई करून रुग्णावर उपचार केले जातात. यासाठी पूर्ण रक्‍त, रक्‍तातील पेशी काढून उरलेला द्रव (प्लाझ्मा), क्रायोप्रेसिपिटेट किंवा उपरोक्‍त घटकांचा एकवटलेला स्रोत रुग्णाला शिरेवाटे दिले जातात. योग्य उपचार न मिळाल्यास हिमोफिलियाचे रुग्ण प्रौढावस्थेला पोहोचण्यापूर्वीच मृत्युमुखी पडतात.
               सुयोग्य उपचार मिळाल्यास मात्र त्यांचे अपेक्षित आयुष्य हिमोफिलिया नसलेल्या व्यक्‍तींपेक्षा दहा वर्षांनी कमी होते. जगभरात नवीन जन्माला येणाऱ्या १ लाख मुलग्यांमागे १५ ते २० जणांना हिमोफिलिया असतो. सध्या जगात या रोगाचे  चार लाख वीसहजार रुग्ण असावेत, असा अंदाज आहे. भारतातही या प्रमाणात हिमोफिलियाचे रुग्ण आढळून येतात. अशा रुग्णांना योग्य उपचार मिळणे अतिशय महत्त्वाचे आहे.
             रक्‍त देणे हा उपचारातील महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी या रुग्णांना मोफत रक्‍त मिळाले पाहिजे व स्वेच्छा रक्‍तदान अभियानाद्वारे रक्‍तपेढ्यांतील रक्‍ताचा साठा मुबलक राहील हेही पाहिले गेले पाहिजे. हिमोफिलियाच्या रुग्णांना चांगले उपचार मिळावेत म्हणून “वर्ल्ड फेडरेशन ऑफ हिमोफिलिया’ कार्यरत आहे.
          संकलक : राजेंद्र पवार
                ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...